पालकांच्या सहभागामुळे आणि अर्थातच सहवासामुळे वर्गात शिकविलेल्या गोष्टींची उजळणी किंवा त्याला पूरक अशा स्वाध्यायमाला किंवा प्रकल्प पालकांबरोबर घरी करताना मुलांना आई-बाबांबरोबरचा अमूल्य वेळ आपल्याला मिळाल्याचा मोठ्ठा आनंद तर मिळतोच, पण एरवी कंटाळवाणा  वाटणारा एखाद्या विषयाचा गृहपाठ त्या मुलाला केवळ आई किंवा बाबांच्या सहभागाने हुरूप आणणारा ठरू शकतो. म्हणूनच मुलांच्या शिक्षणातील स्वत:च्या या सहभागाकडे ‘लादलेली कंटाळवाणी भूमिका’ म्हणून न पाहता मुलांच्या प्रगतीसाठी जमेची बाजू म्हणून पाहायला हवे.
‘दि वसेंदिवस पेरेन्ट्सची कामं वाढवतच चाललीय शाळा! आज काय क्राफ्टसाठी जिलेटिन पेपर हवाय, उद्या आइस्क्रीम स्टिक्स तर परवा टिन्टेड पेपर हवाय! रोज नवीन काही तरी आहेच!’’
‘‘आणि स्पोर्ट्स डे, अ‍ॅन्युअल डेसाठी प्रॉप्सही आपले आपणच तयार करायचे! एकेक आठवडाभर दुकानांतून शोधताना आणि पेपरची कापाकापी, पुठ्ठय़ांची डिझाइन्स करता-करता नाकीनऊ येतात अगदी!’’
‘‘नाही नाही, खूप झालं हे! आता पुढच्या पेरेन्ट्स मीटिंगमध्ये मी सांगणारच आहे, वर्षभराचे मिळून किती ते सगळे क्राफ्ट मटेरिअल आणि प्रॉप्सचे पैसे एकदाच फीबरोबर घेऊन टाका, पण वर्षभर रोज उठून हे व्याप आमच्या मागे लावू नका!’’
‘‘तर काय! नोकरी, घर सांभाळता-सांभाळता शाळेची ही कामंसुद्धा करायला वेळ आणायचा कुठून?’’
‘‘बरं, या मुलांनाही आदल्या रात्री आठवण येते उद्या न्यायच्या वस्तूंची. दुकानं बंद व्हायच्या वेळेला धावपळ करायची आपण!’’
अध्ययन-अध्यापनाच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित प्रयोगशील खासगी शाळांमध्ये शिकणाऱ्या चिल्ल्या-पिल्ल्यांच्या सुशिक्षित आयांमधल्या संभाषणाची ही झलक. पाठय़पुस्तकातील संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांनी समजून घ्याव्यात म्हणून प्रोजेक्ट (प्रकल्प) हा प्रकार थोडय़ाफार फरकाने केजी टू पीजीच्या सर्व स्तरांवर चांगलाच मुरलाय. सध्याच्या शिक्षणपद्धतीतील हा मैलाचा दगड विद्यार्थी, शिक्षक आणि शालेयस्तरावरील काही ठरावीक इयत्तांपर्यंत पालक या सर्वावरच कामाचा थोडा जास्त भार लादणारा असला तरी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास या तीनही आघाडय़ांवर सातत्याने नवीन कल्पना, योजकता आणि सर्जनशीलतेला चालना देतो.
 शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वाच्या बदलाच्या पाश्र्वभूमीवर अध्यापन-अध्ययनाच्या या चौकोनातील चारही घटकांकडून (शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक) उपक्रमशीलतेला चालना मिळण्याच्या हेतूने अपेक्षांचा परिघ चांगलाच विस्तारला आहे. दशकभरापूर्वीपर्यंत (जेव्हा जागतिक स्तरावरील अध्ययन-अध्यापनाच्या संकल्पना खऱ्या अर्थाने ‘परकीय’ होत्या) शिक्षण क्षेत्रातील नावीन्य, सर्जनशीलतेला वाव देणारा दृष्टिकोन इत्यादी सर्व प्रागतिक बदल सरकारी पातळीवरच फक्त व्हायचे, किंबहुना ते सरकारकडूनच होणे अपेक्षित असायचे.
पण जागतिकीकरणाच्या वाऱ्यांबरोबर पाश्चिमात्य शिक्षणपद्धती भारतात येऊन थडकू लागल्या आणि इंटरनॅशनल स्कूल्सचे पेव फुटले. या शाळांच्या नावीन्यपूर्ण (भारतीय मातीत सर्वार्थाने रुजून तग धरू शकतील की नाही याबद्दल साशंक करणारे) उपक्रमांना/ शिक्षणपद्धतीला तुल्यबळ ठरतील असे वेगवेगळे उपक्रम मग खासगी, पण भारतीय चेहरा असलेल्या शाळांमध्येही नित्याचेच झाले. तोपर्यंत शिक्षण हा (जवळजवळ नव्वद टक्के) विद्यार्थी, शाळा आणि शिक्षक या तीन आघाडय़ांनीच खेळण्याचा खेळ म्हणून गृहीत धरला जात होता. शिक्षक-पालक संघटना ही कल्पना अस्तित्वात असली तरी सभेतील उपस्थितीपलीकडे या दोन घटकांतला संवाद फारसा महत्त्वाचा मानला जात नव्हता; किंबहुना तुमच्या ताब्यात मुलाला दिले आहे आणि त्या गोळ्याला ठाकून-ठोकून, प्रसंगी ताणूनही, हवा तसा आकार देणं हे तुमचं काम असल्याने मुलाच्या शैक्षणिक प्रवासात सर्वस्वी तुमच्यावर त्याची जबाबदारी आणि भिस्तही आहे, असा सर्वसाधारण दृष्टिकोन पालकांमध्ये दिसून येत असे. या शिक्षण प्रवासात मुलाला आवश्यक असलेली शैक्षणिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात पालकांची तेव्हाही तयारी असायची.
पण पाल्याच्या शिक्षणातल्या पालकांच्या या सहभागाची सीमारेषा गेल्या काही वर्षांत कळत-नकळत विस्तारली गेली. पालकांच्या पाल्य-शिक्षणातील सहभागाच्या या विस्तारलेल्या परिघाची प्रतिक्रिया म्हणून वर उल्लेखिलेले उदाहरणादाखलचे संवाद फार साहजिक आणि नैसर्गिक आहेत; पण झपाटय़ाने बदलणाऱ्या सामाजिक रचनेचा, दिवसेंदिवस जास्तीत जास्त गतिमान आणि आव्हानात्मक बनत चाललेल्या जीवनशैलीचा विचार करता पालकांकडून पाल्यशिक्षण आणि त्यातल्या स्वत:च्या सहभागाविषयी कमालीची सकारात्मकता अपेक्षित आहे.
याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जागतिक स्तरावरच्या शिक्षणपद्धती आणि शाळांच्या भारतातील उदयानंतर प्रचंड वेगाने वाढणाऱ्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी (किंवा त्या स्पर्धेत टिकण्यासाठीही) शाळा आणि प्रत्येक शिक्षकाला आपले प्रत्यक्ष शिकविण्याव्यतिरिक्त कामाचे तास वाढविण्यावाचून गत्यंतर नसताना पालक या वेगवान प्रक्रियेपासून स्वत:ला वेगळे ठेवू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पुस्तक-वही आणि वर्गातील अध्ययन-अध्यापनापलीकडे जाऊन त्याला प्रात्यक्षिकतेची जोड देण्यासाठी तसेच अध्ययन प्रक्रिया जास्तीत जास्त आनंददायी, खेळकर बनविण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग करताना या शिक्षकांना अर्थातच पालकांची मदत घेण्यावाचून पर्याय नसतो.
 आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांपुढील आव्हाने पाहता असे लक्षात येते की, ज्ञान, माहिती, कौशल्ये, दृष्टिकोन या सर्व स्तरांवर जेवढे म्हणून शक्य होईल तितके आकाश त्याला/ तिला कवेत घेण्याची गरज आहे. (प्रचलित शिक्षणपद्धतीच्या अमर्याद कक्षांसाठी आकाशाइतके दुसरे कोणतेही रूपक योग्य ठरणार नाही.) मग काहींच्या मते ती स्पर्धेची/ रॅट-रेसची जीवघेणी रस्सीखेच ठरणार असेल किंवा प्रगत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या प्रत्येकाला ‘जीवघेणी रस्सीखेच’ हा शब्दप्रयोग नकारात्मक वाटत असेल- पण पुढे उभे ठाकलेल्या या अमर्याद आकाशाला कवेत घेण्यात आपला मुलगा पूर्णत: यशस्वी झाला नाही तरी त्याच्यात ती क्षमता निर्माण व्हायलाच हवी, असे प्रत्येक पालकाला वाटणे ही काळाची गरज आहे आणि या अमर्याद आकाशात लीलया नसेल तरी समर्थपणे विहार करण्याचे बळ या चिमुकल्यांच्या पंखांत भरण्यासाठी केवळ शिक्षक पुरेसा नाही.
प्रत्येक बाळासाठी वयाच्या पहिल्या वर्षांपासूनच किंवा फार-फार तर दोन वर्षांनंतर घर, शाळा आणि परिणामी मित्र-मैत्रिणी, बसची दीदी, ड्रायव्हर काका, भोवतालचा परिसर या महत्त्वाच्या सामाजिक घटकांचा एकत्रित परिघ बनू लागतो. कुटुंबाच्या त्याच्या कक्षा गेल्या काही वर्षांत या अशा, पूर्वीच्या तुलनेत, फार लवकर रुंदावल्या जातात आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी उचलण्यात कुटुंबाबरोबरच नकळतपणे समाजातील या बाह्य़ घटकांनी महत्त्वाचा हातभार लावला आहे. अध्यापनाव्यतिरिक्त मूल्यशिक्षण, समुपदेशन हे तर शाळा आणि शिक्षकांच्या भूमिकेचा गेल्या काही वर्षांत एक महत्त्वाचा भाग बनले आहे. शिक्षकत्व आणि पालकत्व जर असे एकात एक मिसळू लागले असतील  तर पालकांनी शिक्षकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये थोडाफार हातभार लावण्यात का-कू का करावी?
शैक्षणिक साधने तयार करणे, करमणुकीच्या कार्यक्रमांसाठी लागणारे मुलांचे विविध कपडे आणि प्रॉप्स तयार करणे, क्राफ्टसाठी लागणाऱ्या सामानाची जय्यत तयारी करून देणे इथपासून ते अनुपस्थित शिक्षकांना पर्याय म्हणून वर्गात जाऊन शिकविणे, पीटीएच्या माध्यमातून शाळा आणि पालकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन, जबाबदाऱ्या पार पाडणे तसेच स्कूल बसमध्ये सरप्राइस व्हिझिट देणे, फील्ड ट्रिप्समध्ये मुलांना सोबत करणे यांसारख्या वेगवेगळ्या कामांत हल्ली पालकांना सहभागी करून घेतले जाते; पण त्यांच्यापैकी किती जण स्वेच्छेने, आनंदाने यात सहभागी होतात आणि किती जणांना ही लादलेली जबाबदारी वाटते, हा अर्थातच चर्चेचा वेगळा विषय ठरू शकतो.
 विद्यार्थिकेंद्री शिक्षणाचा भाग म्हणून बरीचशी प्रात्यक्षिके किंवा प्रकल्प मुलांकडून तयार करून घेण्यावर शिक्षकांना भर द्यावा लागतो. त्यासाठी माहिती गोळा करणे, त्या प्रकल्पाची कलात्मक, आकर्षक आणि मुद्देसूद मांडणी आणि सादरीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या सामग्रीची जमवाजमव हे सगळे मग ओघाने आलेच; पण वर म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांपुढील आव्हानांचा विचार करता शाळा, गृहपाठ, छंदवर्ग या सगळ्यांतून पुरवून-पुरवून शिल्लक राहिलेल्या वेळेपैकी त्यांनी थोडा तरी वेळ खेळ, करमणूक यांसाठी वापरायचा, की मन आणि शरीराला रिझविणाऱ्या आणि आकार देणाऱ्या या गोष्टींना रोजच्या जीवनातून हद्दपार करायचं? त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाची ही प्रक्रिया शाळेच्या वेळेपुरतीच मर्यादित न राहता इतर वेळेतही विद्यार्थ्यांकडून व्यस्ततेची अपेक्षा केली जातेय. मग इंटरनेटवरून काही माहिती गोळा करण्यासाठी (जे या सर्व प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग अगदी पहिल्या इयत्तेपासूनच बनले आहे.) त्याला मदत करणे किंवा सादरीकरणाच्या काही नवीन कल्पना सुचविणे, स्वत:ला अवगत असलेली काही कलाकौशल्ये कृतीतून दाखवीत त्याचा वापर तो प्रकल्प उत्तमोत्तम बनविण्यासाठी त्याला मदत करणे या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून पालकांनी मुलांच्या अभ्यासात सहभागी होणे हे चूक नक्कीच नाही, तर काळाची गरज आहे.
 पालकांच्या सहभागामुळे आणि अर्थातच सहवासामुळे वर्गात शिकविलेल्या गोष्टींची उजळणी किंवा त्याला पूरक अशा स्वाध्यायमाला किंवा प्रकल्प पालकांबरोबर घरी करताना मुलांना आई-बाबांबरोबरचा अमूल्य वेळ आपल्याला मिळाल्याचा मोठ्ठा आनंद तर मिळतोच, पण एरवी कंटाळवाणा, बोअरिंग वाटणारा एखाद्या विषयाचा गृहपाठ त्या मुलाला केवळ आई किंवा बाबांच्या सहभागाने हुरूप आणणारा ठरू शकतो. अभ्यास पक्का व्हायलाही त्यामुळे मदत होते. काही पालकांच्या बाबतीत तर हा अनुभव पुन्हा अध्यापनाचा आनंदही ठरू शकतो. परिणामी मुलांच्या परीक्षेतील गुणांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे संशोधन सांगते.
पण काही पालकांची याबाबतीत थोडय़ाफार प्रमाणात रास्त वाटणारी तक्रार अशी असते की, अभ्यास मग मुलांचा न राहता पालकांचाच होऊन बसेल आणि महत्त्वाचे म्हणजे मुलांना अभ्यासासाठी पालकांवर अवलंबून राहायची सवय लागते. ज्येष्ठ समुपदेशिका डॉ. शुभा थत्ते यांनी सांगितलेले एक उदाहरण या संदर्भात फार बोलके आहे. त्यांच्याकडे आलेल्या एका विद्यार्थ्यांच्या बाबतीत आईचा सहवास =अभ्यास हे समीकरण इतकं पक्कं झालं होतं की, एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षांचा अभ्यास करतानादेखील या स्वारीला आपली आई समोर बसलेली हवी असायची. खरं तर हा मुद्दा एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरू शकतो, पण इथे एक लक्षात घ्यायला हवं की, पालकांनी हा आपला नाही तर मुलाचा अभ्यास आहे आणि आपल्या केवळ सहवास, मदत आणि मार्गदर्शनाचीच त्याला गरज आहे, हे सतत मनावर बिंबविले पाहिजे आणि ते देता-देता स्वत:चा अभ्यास स्वत: आवडीने, स्वयंस्फूर्तीने करण्यासाठी त्याला तयार करणे हे त्यामागचं ध्येय असायला हवं.
पालक-शिक्षक संघटनेच्या माध्यमाने तर पालकांना मुलांच्या शिक्षणप्रक्रियेत फार छान सामावून घेतलंय. शाळेत मुलांसाठी सुरू केलेला एखादा नवीन उपक्रम जेव्हा पालकांच्या सहमतीने किंवा सूचनेतून सुरू झालेला असतो तेव्हा मुलालाही त्या उपक्रमात, प्रकल्पात सहभागी होताना, ते काम करताना उत्साह आणि आनंद वाटतो. एवढंच नव्हे तर ते करण्यामागचा हेतू आणि त्याचे फायदे समजावून सांगण्यात शिक्षकांबरोबरच पालकही महत्त्वाचा वाटा उचलू शकतात.
पर्यावरण, संस्कृती, सामाजिक मूल्ये आणि त्या संदर्भातील छोटय़ा-छोटय़ा, पण महत्त्वाच्या जाणिवा केवळ शिक्षक  किंवा केवळ पालकांनी प्रयत्न करून मुलांमध्ये रुजलीतच असे नाही, पण या दोन्ही घटकांनी एकत्र येऊन केवळ पुस्तकातील माहितीच्या आधारेच नव्हे, तर छोटे तक्ते किंवा कल्पकतेने तयार केलेला एखादा प्रकल्प अशा जाणिवा परिणामकारकरीत्या निर्माण करतो. साधं उदाहरण द्यायचं तर सगळ्या मुलांना जवळजवळ सर्वच शाळांतून ‘जंक फूड’ आणि ‘पोषक आहार’ यातला फरक समजावून काय खावं आणि खाऊ नये, हे सांगितलं जातं. कोणत्याही सुशिक्षित, सजग आईसाठी शिक्षकांबरोबर आपल्या मुलाच्या संस्करणात सहभागी होण्याची ही फार छान संधी ठरू शकते.
पण या संपूर्ण प्रवासात ‘हे मुलांचे प्रोजेक्ट म्हणजे आई-बाबांच्या डोक्यावर लादलेले काम’ असा दृष्टिकोन न ठेवता आणि नोकरी, करिअर, घरसंसार या जबाबदाऱ्यांची सबब पुढे करून मुलांच्या शिक्षणातील स्वत:च्या या सहभागाकडे ‘लादलेली कंटाळवाणी भूमिका’ म्हणून न पाहता सकारात्मकता, उत्साह आणि पुढाकाराची वृत्ती या पालकांसाठी आणि परिणामी मुलांच्या प्रगतीसाठी जमेच्या बाजू ठरणार आहेत.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Story img Loader