शाळांवर, त्यातल्या अभ्यासक्रमावर, परीक्षा पद्धतींवर नेहमीच टीका होताना आपण ऐकतो, पण काही पालक ती ऐकत नुसतेच थांबले नाहीत त्यांनी आपल्या मुलांचा, त्यांच्या मित्रांचा, सहध्यायीचाही सर्वागीण विकास व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. हे सदर अशाच काही पर्यायांचा शोध घेणारं. मुलांना  सर्जनशील बनवण्यासाठी प्रयोगशील पालकत्वाचे हे धडे.  पालक वाचकांसाठी नक्कीच मार्गदर्शनपर ठरतील.
यावर्षी आपण ओळख करून घेणार आहोत नवे विचार, कल्पना, दिशा आणि प्रेरणांची!  त्याच वेळी करणार आहोत संकल्प ‘पर्याय निर्माण करण्याचा’. कारण गेल्या वर्षीच्या सदराचा निरोप घेताना मी म्हटलं होतं, पालक, शिक्षक, शिक्षण संस्था सर्वानाच वर्तमान शिक्षण पद्धतीच्या मर्यादांचं भान आहे. म्हणूनच शोध सुरू आहे पर्यायांचा! असे पर्याय शोधणाऱ्या व्यक्ती, व्यक्तींचे गट, संस्था यांना नेमकं काय हवं होतं? त्यांनी नेमकं काय केलं? हे जाणून घेणं वाचकांसाठी, मुलांच्या सर्वागीण विकासाचा विचार करणाऱ्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल!
     आपल्या मुलांनी फुलावं, बहरावं, असं या पालकांना, हितचिंतकांना, शिक्षकांना वाटत होतं. एखाद्या चांगल्या शाळेत मुलाचं नाव घालून आपलं काम संपत नाही. मुलं शाळेत असतात केवळ काही तास. या शाळेबाहेरील अफाट शाळेची ओळख मुलांना करून द्यायला हवी, हे त्यांनी जाणलं होतं. मुलं घरापेक्षा समवयस्क मित्रांत जास्त रमतात म्हणून या पालकांनी स्वत:च्या मुलांबरोबर आसपासच्या मुलांनाही उपक्रमात सामील करून घेतलं. मुलांची नजर चौफेर, बुद्धी चौकस, मन हळुवार, हृदय संवेदनशील असतं हे त्यांनी पाहिलं. त्यांच्यात सर्जनाची गोडी निर्माण केली तर आपलं मूल वाढेल आणि त्याच वेळी तो इतरांना मदतीचा हात देईल याची त्यांना खात्री होती. या सगळ्या धडपडीत त्यांनाही आनंद मिळाला. त्यांचंही व्यक्तिमत्त्व समृद्ध होत गेलं हे ते प्रांजळपणे कबूल करतात.
सुरुवात आपण करणार आहोत मैत्रिणींच्या एका गटापासून. काही वर्षांपूर्वी एकमेकींना अनोळखी. माहेरघर, सासर, शिक्षण, व्यवसाय-नोकरी सारंच भिन्न. समान धागा एकच, मुलांची शाळा आणि मुलांनी सर्जनशील बनावं अशी आशा. ‘मुलं मातृभाषेतूनच उत्तम शिकतात. गणितातील संकल्पना, एखादी गोष्ट जाणून घेणं, त्यावर विचार करणं, आपले विचार नेमक्या वेळी, नेमक्या शब्दात, नेमकेपणानं मांडता येणं उत्तम तऱ्हेनं जमू शकतं ते मातृभाषेतच.’ यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच त्यांनी शाळा निवडली ‘रमाबाई परांजपे बालमंदिर’. आय.एस.ओ. नामांकन मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली शाळा.
नेहमीच आघाडीवर असणाऱ्या संध्यानं या मुलांना ‘घडवण्याची’ जबाबदारी घेण्यात पुढाकार घेतला. शाळा भरताना वा सुटताना पालकांना गाठ. त्यांची नावं घे, वृत्तपत्रातून वा इतरांकडून मिळालेली माहिती त्यांना दे. एकत्रपणे एखादी भेट ठरव. राजीव तांबे, अक्षरनंदन झाला आदींची भेट घे. असं चालू असतानाच तिची वर्षांताईंशी ओळख झाली. त्यांनी सल्ला दिला, ‘तुला वेगळी शाळा काढायची आहे मग आधी किमान २० समविचारी पालक शोध. जे तुझ्या मागे नव्हे तर बरोबर यायला तयार हवेत.’
बघताबघता असे काही पालक एकत्र जमले. मग सुरू झाला प्रवास – मुलांना समृद्ध करण्याचा, विविध अनुभव देण्याचा! काही गोष्टीचं अनुकरण होतं तर काही गोष्टी अगदी नवीन घडवाव्या लागतात. यातूनच मग अंजलीची ‘आनंदशाला’ सुरू झाली. सध्या ती स्वत: मुलांसाठी अ‍ॅडव्हेंचर ट्रेक आयोजित करते. तर सोनालीच्या घरचेही शिक्षण क्षेत्राशी संबंधित. त्यांनी सुरू केलं, ‘गुरुकुल- १२ तासांची मराठी माध्यमाची शाळा.’
प्रत्येकजण स्वत:साठी वेगळं काही करत होतंच, पण त्यांचा १० जणांचा गट जमला. सर्वाची मुलं आणि एक दोघांच्या आई. सर्वजण मिळून वैज्ञानिक खेळणी, कवितांचे वर्कशॉप, भूगोलाची शाळा असे उपक्रम राबवीत. एकवेळा शाळा बुडली तरी चालेल पण वेगळी संधी असेल, वेगळा अनुभव देण्यासारखा असेल तर त्या प्रयत्न करीत. आज त्यांची मुलं आठवीत आहेत. या सगळय़ा मुलांना मराठी, इंग्रजी आणि संस्कृतही बोलता येतं. तेजस त्याच्या मित्रात, भावंडात वेगळा उठून दिसतो कारण त्याला पाली वाचता येतं. इतर सारे इंग्रजी माध्यमात शिकतात. त्यांच्याशी, परदेशातील नातेवाईक वा इतरांशी वावरताना तो व्यवस्थितपणे इंग्रजीत संवाद साधू शकतो. जोक्स, चुटके, कविता यांचा मोठा खजिना तो गप्पात खुला करतो, केवळ मराठीच नव्हे तर बंगाली, गुजराथी अशा विविध भाषांतील गाणी त्याला पाठ आहेत. अनेक नाटय़ उतारे त्याला पाठ आहेत. संध्या कौतुकाने सांगते, ‘कौंतेय’ नाटकातील कृष्ण आणि कुंती संवाद तसा कठीणच. भाषाही जड पण त्याने १५ मिनिटांत पाठ केला. या पाठांतराचा परिणाम म्हणून त्याच सहज बोलणंही खूप प्रभावी होतं. तो अष्टावधानी झाला आहे. उदा. अहमदाबादचं सूर्यमंदिर बघायला गर्दीची वेळ टाळून ते गेले होते. सोबत गाईड होता. तेजस आपल्याच तंद्रीत असल्यासारखा. गाईडच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष आहे असं वाटत नव्हतं. पण घरी आल्यावर केवळ मंदिराचं वर्णन नव्हे तर बांधकामातलं विज्ञान, भूगोलही तो आजीला समजावून सांगत होता. त्याचं निरीक्षण जबरदस्त आहे.’
सोहमचं सारंच वेगळं. त्याचे बाबा व्यावसायिक, तर आई सॉफ्टवेअर इंजिनीअर. त्याचा दिवाणखाना मात्र अजबच, मोठा फळा असलेला. कुठे कागद लटकलेले. थोडा पसारा पडलेला. कारण सोहमचे उद्योग सतत सुरू असतात. बाबा घरी आल्यावर प्रश्न असतो, ‘आज वेगळं काय केलं?’ त्याने कधी चित्र, पेंटिंग, कविता केलेली असते, कधी काही पाठांतर, वाचन, नवनवे खेळ बनवण्याचा तर त्याला जबरदस्त छंद. इयत्ता दुसरीत असताना त्याने स्व-हस्ताक्षरात, स्वत:च्या भाषेत रामायणातल्या कथा लिहिल्या. त्याचं पुस्तक बनवलं. नाव दिलं, ‘सोहम प्रकाशन’ मूल्य-अमूल्य. सीनियर केजीत असताना त्याला महाराष्ट्राचा भूगोल पाठ होता. इयत्ता चौथीत १८८ देश, त्यांची वैशिष्टय़े यासकट जगाचा भूगोल पाठ होता. हे त्यानं सारं आत्मसात केलंय खेळाच्या माध्यमातून. त्यानं इयत्ता तिसरीत बनवलेला ‘सजीवांचं विश्व’ हा प्रकल्प माझ्या समोर होता. असंख्य फोटो त्यांची स्वत:च्या हस्ताक्षरातील माहिती. त्याचं नकाशावरचं स्थान, त्यांच्यावरील कोडी, कूट प्रश्न, ओरेगामीतून बनवलेले प्राणी आदी त्यावर होतं. काही भागाचं स्वत:च डीटीपी केलं. यामागचं त्याचं तत्त्व- कोणत्याही गोष्टीचा ९० अंशांनी विचार करावा! गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या बातम्या ऐकून त्यानंच वर्गातील मुलांकडून वर्गणी जमवली. वृत्तपत्रातील पत्त्यावरून तिकडे पैसे पाठवले. हा पुरावा होता त्याच्या मेंदूबरोबर मनाची निगराणी झाल्याचा!
त्यांच्याच गटातील प्रणव. प्रणव गर्दे प्रचंड चुळबुळय़ा,  स्वस्थ बसणं त्याला माहीतच नाही आणि सोबत मित्र असतील तर विचारूच नका. त्याचं वाचन दांडगं!  घरातील पुस्तकांची तर त्याची पारायणं झाली आहेत. संस्कृत पाठांतर, कथाकथन स्पर्धा यात त्यानं बक्षीस मिळवली आहेत. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हा त्याचा वीक पॉइंट. त्याचे खेळही असेच चोरपोलीस, सीआयडी, लुईपुटीच्या लढाया. एरवी बालिश वाटणारा प्रणव आईबाबांबरोबर व्याख्यानांना जातो. शास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत अशा कार्यक्रमांनाही जातो. शीतल, त्याची आई सांगत होती. ‘एकदा आम्ही गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. कार्यक्रम रंगला. आम्हाला घरी जाण्याची घाई होती. पण याचा आग्रह ‘आई जरा थांबना. भैरवी ऐकून जाऊया..’ गोडी आपण लावावी लागते. अस्सल, ताजं, सकस, समृद्ध आपण मुलांना पुरवावं लागतं’’
घर, आयुर्विमा महामंडळातील नोकरी सांभाळून संध्या, अंजली, सोनाली यांच्यासारखं काही वेगळा पर्याय शीतलला कायमस्वरूपी नाही निर्माण करता आला. पण गटातील आपलं काम तिने चोखपणे पार पाडलं. ती आणि तिचे यजमान मुलासाठी जे काही करतात ते पाहून म्हणावंसं वाटतं ‘हॅटस ऑफ.’ त्यांच्या मोठय़ा मुलात आणि प्रणवमध्ये वयात खूप अंतर. मोठय़ाला इंग्रजी माध्यमात असूनही चांगले गुण मिळत होते. पण कसलीशी कमतरता जाणवत राही. तो मराठी माध्यमात असता तर! त्यांनी ठरवून प्रणवसाठी मराठी माध्यमाची शाळा निवडली. शीतल स्वत: पूर्वी स्पर्धात्मक परीक्षांसाठी बुद्धिमापन चाचणी, मल्टिपल थिंकिंग याचा सराव घेत असे. त्यामुळेच बुद्धिवान मुले कशी असतात आणि त्यांच्या बुद्धीला धार येण्यासाठी काय करावं लागतं याची थोडी ओळख होती. विचार आणि प्रयत्नांची दिशा स्पष्ट होती. पुस्तकांची खरेदी, प्रदर्शनांना भेटी, नाटक, चित्रपट यांना आवर्जून जाणं आणि आपण वाचलेलं ऐकलेलं नावीन्यपूर्ण सकारात्मक सारं प्रणवला ऐकवणं हे त्यांनी आवर्जून केलं. इयत्ता तिसरी, चौथीचा इतिहास, भूगोल केवळ वाचून कसा समजणार. मग वर्ग सुरू होण्यापूर्वी सुट्टीतच विविध ठिकाणांना भेटी दिल्या जात. ती सांगते, ‘अहिल्याबाई समजून घ्यायला इंदूरला भेट दिली. चिखलीची रेणू दांडेकरांची शाळा त्याला दाखवली. भरत जोशींबरोबर जंगल कॅम्पमध्ये भाग घ्यायला लावला. त्यातून येणारी शिस्त, जंगलात भटकताना स्वत: घ्यायची काळजी, बिनधास्तपणे बरोबरीच्यांना समजून-सांभाळून घेणं हे सारं तिथून शिकला.’ तिने सांगितलेल्या, केलेल्या पैकी काहींची ही मोजकी यादी. ही खूप वाढवता येईल. थोडक्यात, बदल घडवायचा तर सुरुवात करायला हवी. तीही आपणच. तेव्हा चला काही तरी कमवायला काहीतरी करण्याची तयारी करूया,  प्रगल्भ मुलं, प्रगल्भ समाज घडवू या.    

                                                     

Story img Loader