रेणू दांडेकर
रवींद्रनाथांनी शिक्षणाचा प्रारंभ जिथून केला त्या शांतिनिकेतन विद्यापीठाअंतर्गत असणारी ‘पाठोभवन’ ही एक शाळा. शंभर वर्षांपासून आजही टवटवीत असलेली अनेक झाडं. सगळ्या झाडांच्या सावल्या मुलांनी फुलून गेल्या होत्या. झाडांच्या सावल्या सूर्याच्या प्रवासानुसार मुलं अंगावर घेत होती. झाडाला टेकवून फळे उभे आहेत. मुलं गोलात, गटात बसतात. संकल्पना दिली जाते. मुलं त्या संकल्पनेवर काम करतात. शिक्षक आपल्या जागी थांबतात आणि मुलं विषयानुसार झाडं बदलतात. निसर्गाच्या सान्निध्यातला तो अभ्यासोत्सव.. अनोखा अनुभव देत जातो. शांतिनिकेतन संस्थेच्या ‘पाठोभवन’मधला विमुक्त बंदिशीचा हा अनुभव..
रवींद्रनाथ टागोर आणि शांतिनिकेतन हे समीकरण, त्याविषयी काहीही माहीत नाही अशी व्यक्ती विरळा. या दोन शब्दांमागची जादू काहींनी कागदावर, तर काहींनी प्रत्यक्ष पाहून अनुभवली असेल. माझ्या सुदैवाने मी ती दोन्ही प्रकारे अनुभवली. तीच इथे मांडते आहे. आज इथल्या शाळेत ‘पाठोभवन’ (शांतिनिकेतन विद्यापीठाअंतर्गत असणारी, रवींद्रनाथांनी शिक्षणाचा प्रारंभ जिथून केला ती शाळा)मध्ये आपण जाऊ या. मी सहा ते सात दिवस तिथे राहिले तरी समाधान होईना. मुलं, मुली, ग्रंथपाल, शिक्षक, प्राचार्य सगळ्यांशी खूप गप्पा मारल्या. एक सांस्कृतिक कार्यक्रमही पाहिला. अगदी भारावून गेले. अथांग परिसर, देखणा निसर्ग, महाकाय वृक्ष, कमालीची समाधानी शांतता. काही समृद्ध व्यक्तिमत्त्वं अनुभवली आणि त्या काळातच गेले जणू..
‘पाठोभवन’ ही शाळा कोलकात्यापासून रेल्वे प्रवासाने चार-पाच तास अंतरावरील बोलपूर या गावात आहे. इथले रेल्वे स्टेशनही वेगळ्या कलाकृतींनी नटलं आहे. रवींद्रनाथांच्या साहित्यातील भावुकता, आत्ममग्नता, व्यक्त होण्याचा भीतीविरहित मोकळेपणा आणि जगणं, स्वत:ची पुस्तकं, अभ्यासक्रम अशा वेगळ्या गोष्टींची अनुभूती ‘पाठोभवन’च काय, पण इथल्या सगळ्या परिसरात आली. कदाचित मन त्या भूमिकेत असेल म्हणूनही अशी अनुभूती आली असेल. आजही जे पाहिलं ते मनात घट्ट रुतून आहे. १०० वर्षे उलटली तरी ‘पाठोभवन’ आजही रवींद्रनाथांना जणू जगतंय. ‘पाठोभवन’ परिसरात सकाळी ८ वाजता प्रवेश केला आणि ‘व्हेअर द माइंड इज विदाऊट फीअर’ ही रवींद्रनाथांची कविता प्रत्यक्ष अनुभवू लागले.
आत शिरताना अनेक जुन्यापुराण्या इमारती दिसल्या. त्यावर लिहिलं होतं ‘ऐतिहासिक भवन’. अर्थातच फोटो काढायला परवानगी नव्हती. प्राचार्य त्या दिवशी येणार होते. त्यांच्याशी माझ्या येण्याचा हेतू बोलण्याची आवश्यकता होतीच. तोवर सुजितदा भेटले नि गप्पांना सुरुवात झाली. त्यातून ‘पाठोभवन’ समजायला खूप मदत झाली. आपली वेळ झाली की ते तासावर जात होते. तासाहून आले की पुन्हा गप्पा सुरू.
आज या प्रांगणात शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचे वृक्ष आहेत. या वृक्षांचा मुलांच्या शिकण्यात मोठा वाटा आहे. सर्व ऋतूंत बहरलेली झाडं इथे लावली आहेत. फुलं नाहीत असा दिवस नाही. रवींद्रनाथांनी जाणीवपूर्वक देशविदेशातून आणलेली झाडे टिकून आहेत. झाडांच्या सावलीत मुलं शिकत असतात. सर्वत्र हिरवळ नि हिरवेगार डेरेदार वृक्ष आणि त्या वृक्षछायेत मुलांचं शिकणं, मुलांना कोंडलेपणातून बाहेर काढतं. वर्ग नाहीत, त्यामुळे खिडक्या-दरवाजे नाहीत नि ते बंद करणं नाही. मुलं इतकी आत्ममग्न दिसली, की त्यांचं अवतीभवती अजिबात लक्ष नव्हतं. रवींद्रनाथांना वाटायचं इमारतीवर खर्च होता कामा नये. बाकं, खुर्च्या आदी फर्निचरची गरजच नाही. आकाश, पाणी, झाडं, फुलं, माती यात मुलं वाढायला हवीत. अजूनही तसंच आहे. एक मुलगी म्हणाली, ‘‘दीदी, आमचा हा सुंदर निसर्ग आमचं शिकणं सुरू ठेवतो. हीच आमची शाळा. आमचे धडे.. आम्ही खूप खूप शिकतोय असं जाणवतं आम्हाला.’’
आपल्यासाठी जे आहे ते का आहे याचा अर्थ इथल्या मुलांना माहितेय. झाडांचं स्थान काय इथल्या? तर सर्व विषय झाडांकडून शिकून घेतले जातात. विज्ञानाच्या तासाला इथली झाडं वेगळा संदर्भ देतात. भूगोलाच्या तासाला वेगळ्याच जगात नेतात. कविता शिकवताना वेगळा संदर्भ देतात. चित्रकलेच्या तासाला ती वेगळी जाणवतात. हे माझं मत नाही तर मुलांनी दिलेलं स्पष्टीकरण होतं. उत्सव हा ‘पाठोभवन’चा आनंद देणारा घटक आहे. ‘ढोल’ नावाच्या उत्सवात सर्व जण सहभागी होत दंग होतात. वसंतोत्सव, वर्षांउत्सव मुलांच्या जगण्यात एवढा आनंद भरतात, की इथून बाहेर पडलेल्या मुलांना अजून तो जसाच्या तसा आठवतो. नृत्य, नाटय़, संगीत, चित्रकला, मूर्तिकाम, शिल्पकला अशा सहा ललित कलांतून मुलांना घडवलं जातं. या सहा कलांची दालनं पाहणं, तिथं काम करणाऱ्या मुलांना पाहणं मला खूप काही वेगळं सांगून गेलं. या उत्सवांना ललित कलांतून प्रकटीकरण मिळतं, वातावरणात उत्साह निर्माण होतो. सगळे एकत्र येत दंग होऊन जातात. सर्व काही विसरून नवनिर्मितीचा आविष्कार होतो.
योगायोगानं त्या दिवशी रवींद्रसंध्या होती. रवींद्र संगीत, नृत्य सादर होत होतं. एका सभागृहात ‘संस्कृती, धर्म आणि व्यापार हातात हात घालून जातात’ या विषयावर चर्चासत्र होतं. यात भाषणं नव्हती, चर्चा होती. कार्यक्रमाची सुरुवात रवींद्र संगीत नृत्यानं झाली. पाहुण्यांचं स्वागत होताना कुणी टाळ्या वाजवल्या नाहीत. सभागृहातून आवाज आला – शादो, शादो, शादो! (अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन). एकूणच प्रत्येक गोष्ट वेगळी होती. कार्यक्रमाला सर्व वयांचे श्रोते होते. विशेष म्हणजे सगळे सायकलने आले होते. इथे हॉर्न वाजवायला बंदी आहे तशी वेगावरही बंदी आहे. बाहेरच्या माणसांना समजावं म्हणून वेगळ्या स्वरूपात सूचना लिहिल्या आहेत. नियम मनात होते नि त्यामुळे पाळले जात होते. अतिथीगृहात पोचले तेव्हा प्रवेशासाठी बाहेरच्या राज्यातून वेगळ्या अपेक्षेने आलेली मुलं नि पालक भेटले.
नवा दिवस उजाडला. वेगवेगळ्या इयत्तांच्या प्राथमिक वर्गातून मी फिरत होते. या वयोगटांतली काही मुलं झाडाखाली जमतात. काही गटांसाठी ‘बेदी’ म्हणजेच बैठकी बांधल्या आहेत. बसायला नि लिहायला गोलाकार सिमेंटची बाकं. हा आत्ताचा बदल असावा. अशी रचना तिथे फारच कमी आहे. या वर्गातली बंगाली भाषेची पुस्तकं म्हणजे प्रथमभाषेची पुस्तकं, अजूनही रवींद्रनाथांनी लिहिलेलीच वापरली जातात. इथे प्रथम भाषा माध्यम बंगालीच आहे. पाठाच्या शेवटी स्वाध्याय, उपक्रम, शिक्षकांसाठी सूचना, अभ्यास असं काहीच नाही. ही गोष्ट महत्त्वाची आहे. हे सर्व आपल्या विचारांनी, गरजेनुसार, विशिष्ट पद्धतीने शिक्षक करतात. शिक्षकांकडून ही अपेक्षा का नसावी? आपण किती तयार साधनसामग्री शिक्षकांना देतो, का देतो? असा विचार मनात आला. रवींद्रनाथ स्वत: पहिली ते चौथीला शिकवायचे. १९५० नंतर वेळोवेळी त्या पुस्तकात बदल केलाय, पण मूळ गाभा बदलला नाही. रवींद्रनाथांचा भर कला विकासावर होता आणि भाषा शिकण्याला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं होतं.
मी पाहात होते की, सगळ्या झाडांच्या सावल्या मुलांनी फुलून गेल्या होत्या. स्वत:भोवतीच गिरकी मारल्यावर हे सुखद दृश्य दिसत होतं. झाडांच्या सावल्या सूर्याच्या प्रवासानुसार मुलं अंगावर घेत होती. प्रत्येक झाडाखाली ‘दा-दी’साठी ‘बेदी’ बांधलीय. तीही उंच नाही, तर फूटभर-वीतभर उंचीचीच आहे. झाडाला टेकवून फळे उभे आहेत. मुलं गोलात, गटात बसतात. संकल्पना दिली जाते. समजून घेण्यासाठी मुलं त्या संकल्पनेवर काम करतात. काम करता-करता मुलंच शैक्षणिक साहित्य तयार करतात. कागदाचा कमी आणि निसर्गाचा वापर जास्त करतात. शिक्षक आपल्या जागी थांबतात आणि मुलं विषयानुसार झाडं बदलतात.
इतिहासाचा तास बांधीव वर्गात होतो, कारण प्राचीन ऐतिहासिक साधनांनी, वस्तूंनी तो वर्ग समृद्ध झाला आहे. विज्ञानाची प्रयोगशाळा मोठय़ा इयत्तांसाठी आहे. इथली मुलं कशी दिसली? पहिली ते बारावीपर्यंत जवळजवळ तेराशे विद्यार्थी आहेत. हे सगळ्या थरांतील आणि स्तरांतील आहेत. ‘शांतिनिकेतन’चे स्वप्न बघणारे पालक, शेतमजूर पालकही आहेत. पांढऱ्या नि हळदी-केशरी रंगाच्या पोशाखाची खासियत एका नववीच्या गटानं सांगितली. असलेल्या-ठरलेल्या गणवेशामध्ये काळानुसार बदल करताना मुलं दिसतात. इथे मात्र तसे नाही. पहिली ते चौथीसाठी हळदी केशरी रंगाची पँट आणि पांढरा शर्ट आहे, तर मुलींसाठी हळदी-केशरी रंगाचा स्कर्ट आणि पांढरा कॉलरचा ब्लाऊज असा गणवेश आहे. चौथी ते सातवीच्या मुलींसाठी पंजाबी ड्रेस (पांढरी सलवार आणि हळदी-केशरी रंगाचा कुर्ता आहे. या वयातल्या मुलींसाठी फुल पँट आणि शर्ट आहे. विशेष आहे ते पुढेच. आठवी ते दहावीतल्या मुलींसाठी हळदी-केशरी रंगाची सुती साडी आणि पांढरा ब्लाऊज (गळाबंद कॉलर आणि उंची जास्त असलेला लांब बाह्य़ांचा) आहे. मुलींनी साडय़ा अगदी नीटनेटक्या नेसल्या होत्या. एका मुलीला मी विचारलं, ‘‘अशी साडी, ब्लाऊज घालणं आवडतं तुला? आता किती फॅशनचे ब्लाऊज घालतात मुली?’’ ती म्हणाली, ‘‘मलाच नाही, आम्हाला सगळ्यांना हा गणवेश आवडतो. छानच वाटतं. गणवेशामुळेच आम्ही मोठय़ा कशा होत गेलो हे आम्ही समजलो. लहानपणीचा स्कर्ट ब्लाऊज, मग पंजाबी ड्रेस नि आता साडी. माझ्या शरीर-मनातला बदल आज ही साडी मला सांगते..’’ शालेय जगण्यात आपण जे करतोय त्याची कारणं आणि परिणाम जाणून घेणं घडत नाही. इथे मात्र ‘अधिकाऱ्यांकडून काही येतंय नि आम्ही ते फक्त अमलात आणतोय’ असं घडत नव्हतं. इतर मुली-मुलांनीही हाच संदर्भ दिला. दुसरी मुलगी म्हणाली, ‘‘आम्ही वसतिगृहात राहतो. दीदी आमची ‘दीदी’ असते नि ‘दा’ही. ती साडी नेसायला शिकवताना जे बोलत होती त्यामुळे भावबंध निर्माण झाले. वयाबद्दल किती छान ऐकायचो आम्ही..’’ तिच्या बंगाली हिंदीत हे ऐकताना खूप सुखद वाटत होतं.
शाळेचा गणवेशाचा एकतेपेक्षा वेगळा अर्थ इथे मुलांना माहीत होता. इथे वावरणाऱ्या मुलामुलींना पाहणं, त्यांच्यातील आत्ममग्नता नि मनस्वीपणा जाणवणं, हा वेगळा अनुभव होता. मुलंमुली खूपच मोकळेपणाने वावरत होते. शिस्तीवरून कुणी कुणाला ओरडत नव्हतं. इकडून तिकडे झाडाखाली बसायला जाताना कुणी कुणाच्या आड येत नव्हतं. ‘पाठोभवन’चे खास वैशिष्टय़ म्हणजे इथली आश्रम (वसतिगृह) व्यवस्था. मुलं-मुली इथे पहिली-दुसरीपासून येतात ते बारावीपर्यंत इथलेच होऊन जातात. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणासह घरगुती वातावरण, आपुलकी जाणवली. फुकट मिळतंय म्हणून गोष्टी कशाही हाताळणं, सैरभैरपणा अशी अवस्था दिसली नाही. गंमत म्हणजे ‘पाठोभवन’ बाहेरच्या सामान्य माणसात कसं भिनलंय याचाही अनुभव आला. रोज सकाळचा वेळ शाळेसाठी आणि दुपारी बाजूच्या खेडय़ात फिरणं होत होतं. ‘पाठोभवन’मधून एक दिवस बाहेर पडले नि बस स्टॉपवर किशोरदा भेटले. ते इथले माजी विद्यार्थी, पण सध्या एका सरकारी शाळेत काम करतात. त्यांच्याबरोबर त्यांनी सुरू केलेले काम बघून आले. मला शोधायचं होतं, त्यांच्या आयुष्यात तेव्हाचं ‘शांतिनिकेतन’ किती आहे? तेच म्हणाले, ‘‘लहान वयात, कुमार वयात आम्हाला इथे खूप मिळालं. खूप जमवलं आम्ही! आज मीही इथल्या मुलांना ‘पाठोभवन’चे संस्कार देतो. कधी वाटतं तेव्हा इथल्या सगळ्या झाडांना भेटतो. झाडाखाली जाऊन बसतो. इथल्या ‘बेदी’ मला नवं बळ देतात..’’
‘पाठोभवन’ हे स्वप्न आहे. इथली जगायची रीत वेगळी आहे. आनंद आगळा आहे. बाहेरचं रूप नि इथलं रूप वेगळं आहे. हे स्वप्न आहे तसा बाहेरचा जगाचा व्याप हे वास्तव आहे. शंभर वर्षांपूर्वीचं तत्त्वज्ञान मुलांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वासाठी अजून ताजंतवानं आहे. इथे मुलं जन्मभराची शिदोरी बांधून नेतात.
लोक म्हणतात, ‘पूर्वीसारखं राहिलं नाही ‘शांतिनिकेतन’.’ मला जाणवत होतं, पूर्वीचं काहीच नसताना हे टिकवणं अवघड आहे.
(पाठोभवनच्या अभ्यासक्रमाविषयीचा उर्वरित लेख २७ जुलैच्या अंकात)
शाळेचा पत्ता – पाठोभवन, बोलपूर, पश्चिम बंगाल – ७३१२०४
renudandekar@gmail.com
chaturang@expressindia.com