वंध्यत्व चिकित्सेमध्ये तर पॅथॉलॉजीला अभूतपूर्व महत्त्व आलेलं आहे. गर्भवतीच्या रक्ततपासणीतून- गर्भाची वाढ खुंटणे, मुदतपूर्व प्रसूतीचा अंदाज, एक्लेम्पसियाचं निदान, भ्रूणामधील डाऊन सिंड्रोमसारखे गंभीर गुणसूत्रीय विकार हे सारं आता कळू शकतं. आणि योग्य उपचारांनी बालकांना चांगला भविष्यकाळ मिळू शकतो.
का ही दिवसांपूर्वी एका अतिशय लोकप्रिय नूडल्सच्या ब्रॅण्डमध्ये शिसे या घातक धातूची धोकादायक पातळी आढळून आली. परिणामी, संबंधित कंपनीला हजारो टन नूडल्सची पाकिटं नष्ट करावी लागली. त्यानंतर, निदान होत नसलेल्या अनेक दीर्घकालीन आजारांमध्ये रुग्णाच्या रक्तात शिशाचं प्रमाण जास्त आहे, तसंच दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूंमध्येसुद्धा शिसं वापरलेलं आहे, अशा तऱ्हेचे अहवाल प्रसिद्ध झाले. हे शक्य झालं, ‘अटॉमिक अब्सॉप्र्शन’ किंवा ‘मास स्पेक्ट्रोमेट्री’ या नवीन तंत्रज्ञानामुळे, जो आजच्या प्रगत पॅथॉलॉजीचा एक भाग आहे.
पॅथॉस म्हणजे दु:ख. त्याच्याच अभ्यासाचं शास्त्र म्हणजे पॅथॉलॉजी. एके काळी काही परीक्षानलिका, काचेच्या पट्टय़ा, काही रीएजेंट्स आणि सूक्ष्मदर्शक यंत्र एवढय़ा सामग्रीवर केल्या जाणाऱ्या जुजबी तपासण्यांपुरतंच हे शास्त्र मर्यादित होतं. परंतु गेल्या ६०-७० वर्षांत त्यात आमूलाग्र बदल झाला आहे. क्रांतिकारक ठरतील अशा तपासण्यांच्या नवीन पद्धती निघाल्या आहेत. इम्युनोऐसे, पीसीआर, मोनोक्लोनल एंटीबॉडीजपासून आज मॉलिक्युलर बायोलॉजी, सायटोजेनेटिक्सपर्यंतचा पॅथॉलॉजीचा प्रवास थक्क करणारा आहे. आजची सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब म्हणजे अत्याधुनिक, स्वयंचलित, संगणकाच्या मदतीनं अत्यंत अचूक निर्णय देणाऱ्या उपकरणांची प्रयोग शाळा, जिथे मानवी चुकांची शक्यता कमीत कमी केलेली आहे. पॅथॉलॉजी हे केवळ रोगनिदानासाठी वापरलं जाणारं हत्यार नसून एखाद्या रुग्णाला कोणते उपचार उपयुक्त ठरतील, तसंच केलेल्या उपचारांना तो रुग्ण कसा प्रतिसाद देत आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांची भिस्त पॅथॉलॉजीवरच असते. प्रस्तुत लेखात आजच्या रुग्णसेवेमध्ये पॅथॉलॉजीची भूमिका याबद्दलच लिहिणार आहे.
रक्त, लघवी आणि इतर शारीरिक द्राव यांची तपासणी हा अजूनही पॅथॉलॉजीचा सर्वात मोठा भाग आहे, याचं कारण या द्रावांचे नमुने तपासायला घेणं अगदी सोपं असून रुग्णाला त्याचा काहीच त्रास नसतो. मधुमेह, कर्करोग आणि हृदय, मूत्रपिंड इत्यादी अवयवांच्या विकारांचं निदान आणि उपचारादरम्यानची प्रगती या तपासण्यांच्या आधारेच अजमावता येते. यामध्ये आलेल्या काही नवीन तपासण्या अशा आहेत- रक्तातील प्रथिनांचं पृथक्करण करून विशिष्ट प्रथिनांच्या वाढलेल्या पातळीवरून मल्टिपल मायलोमासारख्या आजाराचं निदान करता येतं. व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी, फॉलिक एसिड यांच्या रक्तपातळीबद्दल बहुतेक लोकांना माहिती असते पण आता थायमिन, पिरिडॉक्सिन, व्हिटॅमिन ए, ई, लोह, तांबे, झिंकसारखी खनिजं यांची रक्तपातळीही अचूकपणे मोजता येऊ लागली आहे. आणि त्यामुळे या गोष्टींची कमतरता किंवा जास्त प्रमाण यांच्याशी संबंधित आजारांचा इलाज अगदी सुकर झाला आहे.
वेगवेगळ्या आजारांत काही प्रभावी पण विषारी दुष्परिणाम असलेली औषधं वापरली जातात. ठरावीक अवधीनंतर त्यांची रक्तपातळी आता मोजता येते, ती सुरक्षित मर्यादेत आहे की नाही ते पाहून त्यांची मात्रा कमी-जास्त करता येते. उदा. हृदयविकारात डिगॉक्सिन, नैराश्याच्या रुग्णांना लिथियम, अवयवरोपणानंतर टैक्रोलिमस वगैरे.
कोणत्याही नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती आपणहून तपासणी करून घ्यायला सहसा तयार नसते. व्यसनाची शंका असल्यास अशा व्यक्तीचं रक्त किंवा लघवीसुद्धा मिळाली तर त्या तपासणीतून कोकेन,अफूजन्य पदार्थ, मेथाडोन, मारिआना (गांजा) इत्यादी अनेक अमली पदार्थ ओळखता येतात, एवढंच नव्हे तर त्यांचं प्रमाणही मोजता येतं. लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शिसे, अल्युमिनियम, अँटीमनी या विषारी धातूंचा तपास ‘मास स्पेक्ट्रोमेट्री’ ने लावता येतो.
जंतुसंसर्गामुळे होणाऱ्या सर्व रोगांच्या त्वरित आणि अचूक निदानासाठी मायक्रोबायोलॉजीचं महत्त्व वादातीत आहे. आजच्या मल्टी-ड्रग-रेझिस्टन्ट जमान्यात आक्रमण करणारा जिवाणू कोण आहे एवढं कळून उपयोग नाही, तर त्याचा नायनाट कोणत्या प्रतिजैविकांमुळे होईल हे समजणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरातील विविध द्रव किंवा घनपदार्थाची अत्याधुनिक बॅकटेक पद्धतीने कल्चर्स, जीन एक्सपर्ट, व्हायरल लोड टेस्टिंग इत्यादी तंत्रज्ञानामुळे क्षयरोग, हिप.बी, हिप. सी, एचआयव्ही, बुरशीचा संसर्ग अशा प्राणघातक गोष्टी ओळखणे शक्य झालं आहे.
सर्दी, दमा, त्वचारोग, पित्त आणि इतर पोटाचे विकार एलर्जीमुळे होऊ शकतात हे सर्वाना माहीत आहे. त्यावरची औषधं दिली जातात, पण त्रास नेमका कशामुळे आहे हे समजलं तर तो कायमचा बंद करता येईल, यासाठी पूर्वी त्वचेवर वेगवेगळ्या एलर्जेन्सच्या पट्टय़ा चिकटवून किंवा सुया टोचून रुग्णाची प्रतिक्रिया तपासली जायची. ही पद्धत वेळखाऊ आणि खर्चीक असून छोटी मुलं, गर्भवती स्त्रिया, वृद्ध मंडळी आणि पुष्कळशी इतर औषधं घेणारे रुग्ण यांच्यासाठी उपयोगाचीच नव्हती. आता मात्र रुग्णाकडून सविस्तर माहिती मिळवून संभाव्य एलर्जेन विरुद्ध तयार होणाऱ्या विशिष्ट अ‍ॅण्टीबॉडीज एका रक्त तपासणीत मोजता येतात, मग तो रुग्ण कोणीही असो.
ऑटो इम्युन डिस्ऑर्डर्स हा एक असा गट आहे की ज्यात रुग्णाचं शरीर त्याच्या स्वत:च्या पेशी-ऊती नष्ट करणारी द्रव्यं, अ‍ॅण्टी बॉडीज निर्माण करू लागतं. या विकारामध्ये हळूहळू जास्त जास्त पेशींचा आणि अवयवांचा नाश होणं अपरिहार्य असतं. याचं वेळेवर आणि अचूक निदान करणं ४०-५० वर्षांपूर्वी फारच अवघड असल्यानं आजार बळावून रुग्णाची स्थिती गंभीर व्हायची. आताच्या इम्युनो फ्लुओरेसन्स तंत्रामुळे मधुमेह प्रकार १, ऑटो इम्युन हिपटायटिस,मायस्थेनिया,थायरॉयडायटिस,सिलियाक डिसिज, सिस्टेमिक ल्यूपस अशा अनेक ओळखायला अवघड रोगांचं वेळेवर निदान करणं शक्य झालं आहे.
हृदयविकाराची संभाव्यता पाहण्यासाठी आता रक्तमेदाच्या सविस्तर तपासणीबरोबरच अतिसंवेदनशील सीआरपी, होमोसिस्टीन, लायपो प्रोटिन ए अशा अनेक तपासण्या केल्या जातात. हृदयाची आकुंचनक्षमता कमी झालेल्या रुग्णांची प्रगती जाणून घेण्यासाठी प्रो-बीएनपी, तर मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांची सिस्टाटिन-सी ही तपासणी केली जाते.
वंध्यत्व चिकित्सेमध्ये तर पॅथॉलॉजीला अभूतपूर्व महत्त्व आलेलं आहे. गर्भधारणा होत नसल्यास शुक्रजंतूंचा नाश करणाऱ्या अ‍ॅण्टीबॉडीज, बीजांडकोषाची क्षमता तपासणी, गर्भाशयाच्या क्षयरोगाची तपासणी, वारंवार गर्भपात होत असेल तर टॉर्च पॅनल (पाच जंतुसंसर्गाच्या तपासण्या), अ‍ॅण्टी फोस्फोलिपिड अ‍ॅण्टीबॉडी इत्यादी अनेक नवनवीन गोष्टी आता समजू लागल्या आहेत व त्यावर उपाय करणं शक्य होत आहे.
गर्भवतीच्या रक्ततपासणीतून- गर्भाची वाढ खुंटणे, मुदतपूर्व प्रसूतीचा अंदाज, एक्लेम्पसियाचं निदान, भ्रूणामधील डाऊन सिंड्रोमसारखे गंभीर गुणसूत्रीय विकार हे सारं आता कळू शकतं. नवजात बालकाच्या टाचेतून थेंबभर रक्त काढून ते एका विशिष्ट टीपकागदावर घेतात. या ठिपक्यामधून अनेक जन्मजात विकारांचं निदान करता येतं आणि योग्य उपचारांनी त्या बालकाला चांगला भविष्यकाळ मिळू शकतो.
अनेक प्रकारच्या कर्करोगात विशिष्ट पदार्थ रक्तात वाढलेले दिसतात. त्यांना म्हणतात टय़ूमर मार्कर्स. अर्थात पक्कं निदान होण्यासाठी अजून पुष्कळ तपासण्यांची गरज असते. तरीही टय़ूमर मार्कर्सची वाढलेली पातळी डॉक्टरांना तपासाची योग्य दिशा दाखवते. आज प्रोस्टेट, बीजांडकोश, मोठे आतडे, स्तन, जठर, यकृत, फुफ्फुसं अशा अनेक अवयवांशी संबंधित मार्कर टेस्ट्स उपलब्ध आहेत आणि नवनवीन मार्कर्स उजेडात येत आहेत.
याखेरीज हिमटॉलॉजी म्हणजे रक्तपेशी शास्त्रात खूपच प्रगती झाली आहे. ल्यूकेमिया, लिम्फोमा इत्यादी रक्ताच्या कर्करोगांच्या बाबतीत नव्या तंत्रज्ञानामुळे अचूक रोगनिदान, उपचारांची दिशा, उपचारांचा रुग्णावर परिणाम, ही सर्व माहिती मिळू शकते. गुणसूत्रीय दोषांमुळे होणारे थॅलेसीमिया, सिकल सेल अ‍ॅनिमिया, हिमोग्लोबिनमधले दोष यांचं संपूर्ण रोगनिदान आज पॅथॉलॉजीमुळेच शक्य झालेलं आहे. रुग्णाच्या सर्व कुटुंबीयांची तपासणी करून, विवाहपूर्व समुपदेशन करून पुढच्या पिढीत या व्याधी संक्रमित होऊ नयेत अशी काळजी यामुळे घेता येते.
आर्थर हेलीची ‘फायनल डायग्नोसिस’ ही कादंबरी अनेकांना आठवत असेल. निदान प्रक्रियेतला अंतिम टप्पा म्हणजे हिस्टोपॅथॉलॉजी-शस्त्रक्रियेतून अथवा बायोप्सीतून मिळालेल्या शरीरातील ऊतींची प्रत्यक्ष तपासणी. यात आता नव्या इम्युनो हिस्टो केमिकल, आणि सायटो जेनेटिक पद्धतींमुळे रोगनिदानाच्या अचूकपणाने एक नवीन उंची गाठली आहे. उपचारांना दिशा दिली आहे. रुग्णाच्या भवितव्याची कल्पनाही यावरून येऊ शकते.
एकंदरीत, सर्व दिशांना वाढणाऱ्या शाखांमुळे पॅथॉलॉजीचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे वाढत चालला आहे. आजाराचा इतिहास, प्रत्यक्ष शारीरिक तपासणी आणि पॅथॉलॉजीने दिलेली अनमोल माहिती यांच्या संयुक्त प्रयत्नातून आज रोगनिदान सिद्ध होत आहे. रुग्णसेवेमध्ये फिजिशियनच्या बरोबर पॅथॉलॉजिस्टचा सहभाग अधिकाधिक सक्रिय होतो आहे.
या लेखासाठी विशेष साहाय्य- डॉ. अवंती मेहेंदळे, एमडी पॅथॉलॉजी, गोळविलकर मेट्रोपोलिस लॅबोरेटरीज.
डॉ. लीली जोशी – drlilyjoshi@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा