बाबासाहेबांचा स्वभाव पहिल्यापासूनच नेतृत्व सिद्ध करणारा, नमतं न घेणारा. त्यामुळे असेल कदाचित, फॅनीनं त्यांच्याशी बरोबरीनं भांडण केलं, तर त्यांना ती हुकमत गाजवणारी वाटे. त्यांचा आत्माभिमान सदाच फणा काढलेला; पण फॅनी मोठी निर्मळ आणि समंजस असली पाहिजे. भावनेनं भरलेली असली पाहिजे. बाबासाहेबांबद्दल तिला नुसती बौद्धिक ओढ किंवा आदरयुक्त भक्ती वाटत होती असं नव्हे, तर तिला हृदयापासून त्यांच्या मोठेपणाविषयी आपुलकी वाटत होती. बाबासाहेबांनी सांगितलेली माहिती आणि फॅनीची पत्रं यांवरून ते सहज लक्षात येतं.
एखाद्या माणसाची थोरवी जेव्हा अंगभूत असते, तेव्हा कर्तृत्वानं त्यानं अर्जित कलेल्या महात्मतेपेक्षाही ती त्या माणसाचं व्यक्तिमत्त्व अधिक उजळून टाकते. त्याच्या लहानसहान कमतरतांची तीव्रता ती कमी करते. त्याच्यातल्या उणिवांचे परिणाम सौम्य करते, एवढंच नव्हे तर सगळ्या त्रुटींसकट, अभावांसकट आयुष्याचा रोख विधायक निर्माणाकडे वळलेला ठेवण्याचं अवघड कामही ती सातत्यानं करते. त्या थोरवीच्या बळावर एखादं माणूस व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनात केवढी उंची गाठू शकतं, याचं एक उदाहरण म्हणजे डॉ. भीमराव रामजी ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर.
लष्करात महार पलटणीत रामजी सकपाळ हे सुभेदार म्हणून काम करीत होते. भीम – त्याला भिवा म्हणत. हे त्यांचं चौदावं मूल. एकोणिसाव्या शतकाच्या अगदी शेवटच्या दशकात १८९१मध्ये भीम जन्माला आला. त्या काळाचा विचार करता तो नुसता बी. ए. झाला असता तरी फार मोठा पराक्रम मानला गेला असता. मात्र तो मुंबईच्या प्रख्यात एलफिन्स्टन महाविद्यालयातून बी. ए. तर झालाच, पण पुढे उच्च शिक्षणासाठी आधी अमेरिकेत आणि नंतर इंग्लंडलाही गेला. एक-दोन नव्हे तर पाच उत्तम पदव्या त्यानं तिथं मिळवल्या. त्यानं कसून अभ्यास केला. स्वतंत्र विचारशक्ती जपली आणि वाढवली. मौलिक ग्रंथांची निर्मिती केली. त्यानं मोठा ग्रंथसंग्रह जमवला, वाढवला आणि अभ्यासून उपयोगात आणला. साऱ्या अस्पृश्य समाजाला व्यवस्थेच्या तळातून उचलून सन्मानपूर्वक उन्नत करण्याचा त्यानं यशस्वी प्रयत्न केला. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यानं सिंहाचा वाटा उचलला.
केवळ व्यक्तिगत पातळीवर नव्हे किंवा केवळ जातीय पातळीवर नव्हे, तर एकूण समाजजीवनातच काळाच्या संदर्भात बाबासाहेबांनी प्रकट कलेली ही महात्मता आश्चर्यकारक आहे. तिची बीजं अधिकांश त्यांच्या व्यक्तिमत्त्वातच दिसतात. आयुष्यात विस्तारण्याचा आणि वाढण्याचा अवकाश निर्माण करणारे अनेक गुण त्यांच्या ठायी होते. स्वत:ला मोहापासून सावरण्याचं, ढळण्यापासून वाचवण्याचं आणि उन्नतीच्या वाटेवर विचारपूर्वक चालवण्याचं दुर्मीळ असं भान त्यांना होतं. फार थोडय़ांजवळ असं भान दिसतं. स्त्रीविषयीचा त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचं वर्तन यांचा विचार करताना, स्त्री-पुरुष मैत्री आणि विवाह यांसंबंधीची त्यांची भूमिका समजून घेताना, तर हे दुर्मीळ भान प्रकर्षांनं जाणवतं. त्यांच्या बाळपणाचा आणि किशोरवयाचा विचार करता त्यांच्या एकूण आयुष्यातही ते दिसून येतं.
पुस्तकांच्या संगतीने ते स्वत:ला आवरत आणि सावरत गेले. त्यांना वाचनाचा विलक्षण नाद लागला आणि त्या नादानं त्यांची तहानभूक अशी जागी झाली, की ज्ञानसंपादनासाठी बेदरकारपणे वाटेल ते कष्ट करायला ते तयार झाले. ज्या बेदरकारपणे त्यांनी एके काळी पुंडाई केली होती, त्याच बेगुमानपणे त्यांनी पुस्तकांच्या जगावर आक्रमण केलं. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं हस्ताक्षर आणि त्यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व हे योगायोगानेच बडोद्याच्या सयाजीराव महाराजांना प्रभावित करणारं ठरलं आणि त्यांना त्यांच्याकडून परदेशी शिक्षणासाठी तीन वर्षांची शिष्यवृत्ती मिळाली. ही संधी मिळाली ती योगायोगाने हे खरं; पण बाबासाहेबांनी तो योगायोग मोठय़ा जिद्दीने अर्थपूर्ण केला.
खरं पाहता अमेरिकेला पोचल्यावर जातीय अवहेलनेचा दु:सह अनुभव विसरायला लावणारं मुक्त स्वच्छंदी वातावरण न्यूयॉर्कमध्ये त्यांना लाभलं, तेव्हा सुरुवातीला तरी ते त्या चैनबाजीत रमलेही. त्यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षक होतं. ते गोरे होते. बांध्याने उंच आणि बळकट. केस लांब आणि कुरळे. असाधारण बुद्धिमत्ता आणि प्रतिष्ठित वर्तन! पाहणाऱ्याला त्यांच्याविषयी आकर्षण वाटलं तर नवल नव्हतं. त्यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खरमोडे यांनी बारा खंडांत त्यांचे आयुष्य तपशीलवार वर्णन केलं आहे. अमेरिकेतल्या बाबासाहेबांच्या प्रारंभीच्या दिवसांविषयी खरमोडे यांनी लिहिलं आहे, ‘युनिव्हर्सिटीत मुलीही त्यांच्याभोवती जमा होत. तारुण्याच्या सहजसुलभ लीलांनी तरुण-तरुणींची मने एकमेकांकडे आकर्षिली जातात. त्या आकर्षणाला भीमरावही हुकले नव्हते; पण त्याबद्दल त्यांना पुढे वाईट वाटू लागले आणि स्त्रीसंगतीच्या मोहाचा अंमल त्यांनी आपल्यावर फारसा बसू दिला नाही.’
केवळ चार-सहा महिन्यांतच बाबासाहेबांनी स्वत:ला सावरलं. आपण कशासाठी परदेशी आलो आहो, याची आठवण त्यांनी स्वत:च स्वत:ला करून दिली. शिक्षण हा नुसता व्यक्तिगत प्रगतीचाच मार्ग आहे असं नव्हे, तर ज्या समाजाच्या विकासाची तळमळ आपल्याला वाटते आहे, त्याच्याही विकासाचा तोच मार्ग आहे हे त्यांना परदेशाच्या भूमीवर पाऊल ठेवतानाच माहीत होतं. त्या ध्येयाकडे जाणाऱ्या वाटेवर भेटलेल्या मोहांना दूर सारण्याचं सामथ्र्यही त्यांच्या ठायी होतं. ध्येयाच्या प्रकाशात ते सामथ्र्य अधिक उजळून निघालं.
बाबासाहेबांवर व्यक्तिविमर्शात्मक साक्षेपी लेखन करणारे डॉ. द. न. गोखले यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेताना म्हटलं आहे, ‘आत्मप्रस्थापना ही त्यांची उपजत प्रमुख प्रवृत्ती होती.. जे कर्तृत्ववान नेतृत्वगुणसंपन्न पुरुष असतात, त्यांच्या ठिकाणी आत्मप्रस्थापनेची प्रवृत्ती हटकून जोरकस असलेली दिसून येते. आंबेडकरांच्या व्यक्तिविमर्शात तिला विसरून चालणार नाही.’
न्यूयॉर्कमधल्या प्रारंभीच्या दिवसांत इतरांच्या आकर्षणाचा आपण विषय आहोत, याची सुखद जाणीव बाबासाहेबांना झाली असेल आणि त्यांच्यातला ‘मी’ त्यामुळे समाधानी झाला असेल. इतरांचं नेतृत्व करावं, आपलं म्हणणं आपल्या परिवारानं सतत मान्य करावं, असा हट्ट तर घराबाहेर आणि घरातही त्यांनी नेहमीच चालवला होता. त्यांच्याविषयी आकर्षण वाटून सहजपणे त्यांच्या संगतीत राहणाऱ्या मुलींमुळे ते सुखावले असतील, तर नवल वाटण्याचं कारण नाही. नवल हे, की ते त्या आकर्षणात फार काळ गुंतून पडले नाहीत. मनाला विळखा घालण्याआधीच ते मोह त्यांनी दूर केले. स्वत:ला त्यांनी विचारपूर्वक सावरलं आणि ते निग्रहाने अभ्यासाला लागले. मौजमजा आणि गप्पा यांसाठी चाललेले मित्रांचे आग्रह त्यांनी नाकारले. त्यांचा निग्रह इतका होता, की शेजारच्या खोलीत मित्रांचा दंगा चालू असताना कानात कापसाचे बोळे घालून ते एकाग्रपणे अभ्यास करू लागले.
अमेरिकेत असताना त्यांनी मौजमजेकडे एकदा जी पाठ फिरवली होती, ती कायमचीच. नाटक-सिनेमा, नाचगाणं, दारू आणि पाटर्य़ा यांपैकी काहीही त्यांना पुन्हा आकर्षित करू शकलं नाही. आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आणि आपला अभ्यास एवढाच विचार त्यांना या मोहापासून दूर ठेवायला पुरेसा होता. या काळात तारुण्यसुलभ आनंदाच्या सर्वसाधारण कल्पना घेऊन कोणीही मुलगी त्यांना भेटली असती, तर तिला त्यांची मैत्रीण होता येणं अवघडच होतं.
पण फॅनी वेगळीच होती. फॅनी म्हणजे फॅन्सिस्का फिट्झेराल्ड. बाबासाहेब तिचा उल्लेख ‘एफ’ असा करीत. फॅनीशी त्यांची भेट कुठे कशी झाली, याचा नक्की तपशील बाबासाहेबांच्या चरित्रकारांना आठवत नसावा. खरमोडे यांनी त्या दोघांची भेट लंडन म्युझियमच्या लायब्ररीत प्रथम झाली आणि मग परिचय वाढत गेला, असं एके ठिकाणी म्हटलं आहे खरं, पण नंतर पुन्हा एकदा तिच्याविषयी लिहिताना त्यांनी म्हटलं आहे, की ‘पहिल्या ‘नतद्रष्ट’ लँडलेडीच्या कद्रूपणाला कंटाळून बाबासाहेब दुसऱ्या लँडलेडीकडे राहायला गेले. त्या लँडलेडीची मुलगी मिसेस फॅन्सिस्का फिट्झिराल्ड हिची व बाबासाहेबांची मैत्री झाली.’ काही असो, दोघांची ओळख मैत्रीच्या पातळीवर गेली, हे खरं.
फॅनी आयरिश होती. विधवा होती. मजूर वर्गातून आलेली होती. कदाचित तशा सामाजिक स्तरामधून आल्यामुळेच बाबासाहेबांविषयी आणि त्यांच्या विचारांविषयी, ध्येयाविषयी तिला आपुलकी वाटली असावी. तिचा स्वभाव प्रेमळ होता पण कधी कधी बाबासाहेबांना तिच्या ममत्वाची मात्रा जास्तही होत असावी. खरमोडय़ांशी बोलताना ते म्हणाले होते, ‘She was mothering me too much.’
तरीसुद्धा तिची मैत्री त्यांच्या लंडनच्या वास्तव्यात त्यांना दिलासा देणारी होती. या मैत्रीत तारुण्यसुलभ आकर्षणाचा भाग असलाच तर तो अगदी नगण्य असला पाहिजे. कोणतीही चैन त्यांना आर्थिक किंवा मानसिक दृष्टय़ाही परवडणारी नव्हती. परस्परांना भेटवस्तू देणं किंवा हॉटेलमध्ये जेवायला नेणं हेही त्यांना शक्य नव्हतं. आणि स्त्रीच्या शारीरभोगाला तर त्यांच्या जीवनकार्याच्या तुलनेत आयुष्यात कुठे स्थानही नव्हतं. ‘Sex has no place in my life.’ स्त्रियांच्या संगतीचा मला तसा मोह नाही’, असं फॅनीविषयी बोलताना बाबासाहेबांनी एकदा सांगितलं होतं.
बाबासाहेब लहानाचे मोठे झाले ते एका धर्मश्रद्ध आणि नीतिप्रवण अशा कुटुंबात. कमालीच्या नैष्ठिक वातावरणात ते वाढले. त्या वातावरणाचा संस्कार त्यांच्यावर खोल असा घडला. आयुष्यातली अवघड वळणं पार करताना तो संस्कारच त्यांच्या कामी आला. जोडीला वाचनानं आणि अनुभवानं समृद्ध अशा मनानं विवेक शिकवला होताच. त्यांच्या अभ्यासाला बांध नव्हते; पण त्यांच्या सुखभोगाला मर्यादा होती. मैत्रीला सीमा ओलांडण्याचा मज्जाव होता. स्त्रीसहवासात स्वैरतेला मुभा नव्हती.
लंडनमध्ये फॅनीशी झालेली मैत्री या अंगभूत बंधनांमध्येच वाढली. अर्निबध मुक्ततेचा तिला ध्यासच नव्हता. बाबासाहेब मित्रांना सांगत होते, ‘मी विवाहित आहे. मला दोन मुलं झालेली आहेत. हा अभ्यासक्रम पुरा करून मला लवकर घरी गेलं पाहिजे. ख्यालीखुशाली मला कशी परवडेल? आणि खरं म्हणाल तर मला त्याची आवडही नाही.’ फॅनी बुद्धिमान होती. ती ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये नोकरी करत होती. बाबासाहेबांशी तिची मैत्री झाली. ती मैत्री नुसती एका तरुण मुलाशी नव्हती. ती त्याच्या बुद्धिमत्तेशी, त्याच्या कष्टांशी, त्याच्या स्वप्नांशी मैत्री होती. त्याच्या विचारांशी, त्याच्या जीवनध्येयाशी मैत्री होती.
बाबासाहेब तेव्हा वयाच्या अवघ्या पंचविशीत होते; पण ती गद्धेपंचविशी मात्र नव्हती. दिवस-रात्र अभ्यास करणाऱ्या त्या तरुण मुलाला आपल्या तळागाळातल्या कष्टकरी माणसांचं आयुष्य वर काढायचं होतं. त्याला मोठमोठे ग्रंथ लिहायचे होते. जगभरातल्या श्रेष्ठ विद्वानांच्या पंक्तीला बसायचं होतं. त्यासाठी तो झपाटल्यासारखे कष्ट करत होता. एक लहानसा माशाचा तुकडा, चिंचोक्याएवढा जाम लावलेला एक लहान पावाचा काप आणि एक कप ‘बॉव्हरिन’ असा नाश्ता करून तो इंडिया ऑफिसच्या लायब्ररीत किंवा ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीत जाऊन बसे. बारा-चौदा तास तो न कंटाळता अभ्यास करी. आपल्याला हवी असलेली पुस्तकं इतर कुणाकडे जाऊ नयेत, म्हणून तो जागचा हलतही नसे.
फॅनीला त्याच्या या जीवनक्रमाची आणि त्याच्या परिश्रमांमागच्या प्रेरणांची माहिती झाली, तेव्हा ती चकित झाली. त्याला मनापासून मदत करण्याचं तिनं ठरवलं. दोघांमधल्या मैत्रीचं नातं बाबासाहेबांच्या ध्येयनिष्ठेभोवतीच विणलं गेलं. ही निष्ठा कंेद्रस्थानी राहिल्यामुळेच की काय, त्या मैत्रीत कसलं हीण मिसळलं नाही की कसला गुंता झाला नाही. फॅनी प्रेमळ होती पण खटय़ाळही होती. मनावर सतत दडपणं वागवणाऱ्या बाबासाहेबांना तिच्या सहवासाचा थोडा विरंगुळाही असला पाहिजे. त्या दोघांची अधूनमधून भांडणंही होत. बाबासाहेबांनी खरमोडय़ांना सांगितलं आहे, ‘तिचं- माझं भांडण झालं, की ती आसपासची मुलं गोळा करून त्यांना माझ्यामागे आरडाओरडा करायला लावून मला त्रास देई. तिनं शिकवल्याप्रमाणे ती मुलं मी जेव्हा ब्रिटिश म्युझियमच्या लायब्ररीकडे जाई, तेव्हा तेव्हा ओरडत – ‘ Baby elephant going, going, going gone.’ पण आमची भांडणं लवकर मिटत; कारण ती स्वत: होऊनच माझ्याशी बोले.’
बाबासाहेबांचा स्वभाव पहिल्यापासूनच नेतृत्व सिद्ध करणारा, नमते न घेणारा. त्यामुळे असेल कदाचित, फॅनीनं त्यांच्याशी बरोबरीनं भांडण केलं, तर त्यांना ती हुकमत गाजवणारी वाटे. त्यांचा आत्माभिमान सदाच फणा काढलेला; पण फॅनी मोठी निर्मळ आणि समंजस असली पाहिजे. भावनेनं भरलेली असली पाहिजे. बाबासाहेबांबद्दल तिला नुसती बौद्धिक ओढ किंवा आदरयुक्त भक्ती वाटत होती असं नव्हे, तर तिला हृदयापासून त्यांच्या मोठेपणाविषयी आपुलकी वाटत होती. बाबासाहेबांनी सांगितलेली माहिती आणि फॅनीची पत्रं यांवरून ते सहज लक्षात येतं.
बाबासाहेबांच्या लंडनच्या मुक्कामात फॅनीनं त्यांना मनापासून साहाय्य केलं. त्यांच्यासाठी लायब्ररीत बसून त्यांना हवी ती टिपणं तीही काढून ठेवी. तिच्या हस्ताक्षरातले जातींविषयीचे अनेक उतारे असलेली एक वही बाबासाहेबांच्या संदर्भसाधनांमध्ये होती. बाबासाहेब भारतात परतल्यानंतरही त्यांच्यासाठी ती टिपणं काढण्याचं काम करतच होती. त्यांना १९३७ साली पाठवलेल्या एका पत्रात तिनं म्हटलं आहे की, ‘इंडिया ऑफिसमधल्या कामात मला खूप रस वाटतो आणि ते काम मी तुझ्यासाठी करते आहे, या भावनेनेही मी सुखावून जाते.’
लंडनमधल्या आपल्या वास्तव्यात बाबासाहेबांनी अर्धपोटी राहूनसुद्धा पुष्कळ पुस्तकं जमवली होती. ते भारतात परत आले तेव्हा आपण मुंबईत थोडे पैसे जमवू आणि लंडनची पुस्तकं आणवू, अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे नोकरी करून त्यांनी थोडेफार पैसे बाजूला टाकले आणि फॅनीकडे पाठवून दिले. त्या पैशांमध्ये फॅनीला स्वत:च्या पैशांची थोडी भर टाकावी लागली; पण तिनं ती पुस्तकं त्यांना व्यवस्थित पाठवून दिली.
अभ्यासक्रम संपवून परत भारतात येणं केवळ आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेबांना अटळ होतं असं नव्हे, तर त्यांचं कार्यक्षेत्रच इथे होतं. फॅनीचं जग वेगळं होतं; पण बाबासाहेबांशी झालेल्या मैत्रीतून त्यांच्या विचारांची आणि ध्येयाची कल्पना तिला आली आणि ती त्यांच्याबरोबर त्या ध्येयपूर्तीसाठी काम करायला तयार झाली. बाबासाहेबांच्या कामात तिला सहभागी व्हायचं होतं. भारतात येऊन त्यांना साथ करायची होती. तिच्या त्या इच्छेचा स्वीकार करणं बाबासाहेबांना मात्र शक्य नव्हतं. ज्या देशात ते जन्मले होते, त्या देशाला फॅनीच्या देशाहून वेगळी अशी एक संस्कृती होती. एक परंपरा होती. हजारो वर्षांच्या संस्कारसंचितातून घडत आलेलं एक भारतीय मन होतं. चारित्र्यासंबंधीच्या त्याच्या विशिष्ट धारणा होत्या. नीतिमूल्यांची विशिष्ट घडण होती. त्यांना ज्या समाजाला हात देऊन वर आणायचं होतं, तो समाज अज्ञानी होता, धर्मभोळा होता आणि त्याच्या अंत:करणाचं स्वामित्व मिळवायचं तर निष्कलंक चारित्र्याच्याच आधारे ते शक्य होणार होतं. बुद्धाच्या आणि आपल्या जीवनात आणि व्यक्तित्वात पुष्कळ साम्य आहे, असं त्यांना जाणवत होतं आणि बुद्धाचं शील त्यांना वंद्य आणि स्वीकार्य होतं. त्यांच्या भोवतीची माणसं साधी होती. त्या माणसांच्या शुद्ध चारित्र्याच्या आणि नैतिकतेच्या कल्पना काय होत्या, याचं स्वच्छ भान त्यांना होतं. म्हणून फॅनीनं त्यांच्यासाठी भारतात येणं ही गोष्ट कशी अशक्य आहे, याचीही जाणीव त्यांना असली पाहिजे.
फॅनीबद्दल खरमोडय़ांशी ते मोकळेपणाने बोलले होते. बोलता बोलता म्हणाले होते, ‘अरे, पण हे मी तुला सांगितलेले सर्वकाही तू माझ्या चरित्रात लिहिणार की काय? माझी हरकत नाही; पण आपल्या लोकांच्या नैतिक कल्पना विचित्र आहेत. एखादा माणूस लहानपणी अगर तरुणपणी पाय घसरून पडला तर तो जन्माचाच पडला, असं समजतात व ते त्याचा तिरस्कार व हेटाळणी करतात. युरोप-अमेरिकेत असं नाही. प्रत्येक स्त्री-पुरुषाला खासगी व सार्वजनिक जीवन सुखाने घालवता येते. त्यांच्या खासगी जीवनाचा इतिहास त्यांच्या चरित्रात दिला जातो. आपल्याकडे चरित्रलेखनात या गोष्टीला स्थान नाही. मोठा माणूस हा लहानपणापासून मरेपर्यंत मोठाच होता. त्याच्या हातून काही वाईट कृत्यं वा दुराचार झालेच नाहीत, याबद्दलचं चित्र आपल्या देशातील थोर गृहस्थांच्या चरित्रग्रंथात पाहायला मिळतं. मी सांगितलेली माझ्या खासगी जीवनातील माहिती तू माझ्या चरित्रात देणार असशील तर दे. माझी काही हरकत नाही. लोक त्याबद्दल माझ्याकडे वाईट दृष्टीनं पाहतील की काय, याचीही मला चिंता वाटत नाही.’
फॅनीशी असलेल्या मैत्रीची मर्यादा त्यांनी रेखली, त्यांनी सांभाळली आणि तिलाही सांभाळायला लावली. दया पवारांनी त्या मैत्रीच्या आलेखाला ‘निष्पाप’ असं विशेषण लावलं आहे, ते खरोखरच फार अर्थपूर्ण आहे. शेवटी अशा मैत्रीसंबंधांचा स्वीकार उभयपक्षी कसा केला गेला, हेच त्या संबंधाच्या सामाजिक स्वीकारापेक्षाही अधिक महत्त्वाचं.
बाबासाहेबांसाठी भारतात यावं, अशी फॅनीची तीव्र इच्छा होती. तिला बाबासाहेबांनी बहुधा कठोर शब्दांत कधी धिक्कारलं नसावं. तसं करणं म्हणजे तिच्या त्यागमय, निव्र्याज आणि प्रेमपूर्ण अंत:करणाचा अपमान करणं ठरलं असतं. तसं त्यांनी केलं नाही. तिला कधी दुखावलं नाही; पण मैत्रीच्या मर्यादेपलीकडे जाणाऱ्या तिच्या इच्छा त्यांनी स्वीकारल्याही नाहीत.
खरमोडेलिखित आंबेडकरचरित्रात फॅनीची पत्रं आहेत. त्या तिच्या पत्रांमधून तिची भारतात येण्याची उत्कट इच्छा कळते. तिची बाबासाहेबांविषयीची सच्ची आस्था कळते आणि तिच्या स्वप्नांची सुंदर झलकही दिसते.‘You have not written to me again this week so I feel very neglected. I often wonder if someone else has supplanted me in your affections, but I try to console myself with a thought that it cannot possibly be, you are different to other men.’ असं तिनं त्यांना एका पत्रात लिहिलं होतं. बाबासाहेबांच्या वेगळेपणाबद्दलचं तिचं लिहिणं खोटंही नव्हतं. ते खरोखरच इतरांपेक्षा वेगळे पुरुष होते. म्हणून त्यांनी फॅनीच्या मैत्रीचा अव्हेर किंवा अनादर केला नाही; पण म्हणूनच तिची तीव्र इच्छा असूनही मैत्रीचं पाऊल त्यांनी मनोमन रेखलेल्या मर्यादेबाहेरही पडू दिलं नाही. तिच्या भावनाशीलतेला स्वत:चं बळ बनवीत असतानाच व्यवहारात ती वेडीवाकडी वाहत येण्यापासून त्यांनी रोखून धरलं.
ही गोष्ट एरवी कोणाही माणसासाठी सोपी नव्हती. मैत्रीला तलवारीच्या धारेवरून ते चालवणं होतं आणि तसं ते चालवणं केव्हाही कोणालाही अवघडच असतं. फॅनीचा स्नेह निर्मळ पण उत्कट आहे हे कळत असताना, तिच्या इच्छा तिच्या शब्दांतून सतत वाहत असताना तिला तिचा मान राखूनसुद्धा थांबवणं कसं सोपं असेल? ती त्यांना लिहीत होती, ‘तू गेल्या आठवडय़ात मला लिहिलं नाहीस म्हणून माझं कशातही लक्ष लागत नव्हतं. केवढी निराश झाले होते मी! बाहेर पडण्याचा आता प्रयत्न करते आहे. मी तुला दोष देत नाही प्रिय, कारण तसंच काही कारण असल्याखेरीज तू असं करणार नाहीस.’
ती त्यांना विचारत होती, ‘आपल्या लहानशा घराचं काय झालं? ती झोपडी बांधली जातेय ना? तू माझ्यासाठी कधी सिद्ध असणार आहेस, ते मला कळवशील? ‘My darling Bhim’ अशा मायन्याने तिच्या पत्रांची सुरुवात होत होती आणि ‘with fondest love, Ever yours’ अशा आश्वासनानं पत्राच्या शेवटी तिचं नाव उमटत होतं. ‘माझ्यासाठी तू स्वत:ची काळजी घे’, असं ती कधी कळकळीनं विनवीत होती. कधी ती ‘मी दिवसभर तुझं चिंतन करते. तुझ्याजवळ येण्याचा मला ध्यास लागतो,’ अशी मनाची विवशता व्यक्त करीत होती. कधी बाजारातून येताना आवडले म्हणून मेणबत्तीचे स्टँड ती विकत आणत होती आणि बाबासाहेबांबरोबर जेवण घेताना टेबलावर त्या मेणबत्त्या उजळल्याचं दिवास्वप्न पाहत होती.
इतकं असूनही बाबासाहेबांनी तिच्या-त्यांच्या मैत्रीला विकारवशतेचा स्पर्श होऊ दिला नाही. तिची भावना, तिची ओढ आणि तिनं सहृदय स्नेहभावनेनं कलेलं मोलाचं साहाय्य यांचा सन्मान त्यांनी राखलाच; पण आपल्या पायांमध्ये ध्येयाच्या वाटेवर चालताना त्या भावनेची बेडी मात्र होऊ दिली नाही. फॅनी भारतात कधी आली नाही. तिच्या मैत्रभावनेत कसलीही खोट नव्हती, असं वाटतं. तिनं बाबासाहेबांना समजून घेतलं असावं. ते कसं घडलं किंबहुना काय घडलं याचा तपशील आज उपलब्ध नाही. उपलब्ध आहे ती वस्तुस्थिती अशी आहे, की फॅनीबद्दल बाबासाहेब पूर्ण आदराने बोलले. त्यांनी तिची मदत प्रसंगी स्वीकारली, तरी तिची त्यांच्याबरोबर राहण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली नाही. त्या दोघांमधला पत्रव्यवहार मात्र १९२३ ते १९४५ असा वीस-बावीस र्वष चालू राहिला. बाबासाहेबांनी लंडनमध्ये राहत असताना फॅनीबरोबर बायबल वाचलं होतं. बायबलमधल्या अनेक गोष्टींवर तिच्याशी चर्चा केल्या होत्या. बायबलमधल्या काही घटनांच्या मुळाशी जाऊन त्यावर नवा प्रकाश टाकणारा ग्रंथ त्यांनी लिहावा, असा तिनं बाबासाहेबांना आग्रह केला. तो लिहून तिलाच अर्पण करण्याचं वचन त्या वेळी तिला बाबासाहेबांनी दिलं. पुढे राजकारणाच्या गदारोळात सापडल्यानं आठवण असूनही तो ग्रंथ लिहिण्याची उसंत बाबासाहेबांना मिळाली नाही. पण बाबासाहेब अस्पृश्यतेच्या प्रश्नाचा गुंता खोलवर उकलत गेले आणि गांधीजींनी अस्पृश्यतेच्या प्रश्नाविषयी काय केलं, या संबंधीचा इंग्रजी ग्रंथ त्यांनी लिहून पुरा केला. फॅनीला अर्पण करायचा तो ग्रंथ पुढे हातून लिहून होईल, न होईल; पण पुरा झालेला ग्रंथ तिला आताच अर्पण करून अध्र्या वचनाची तरी पूर्तता करावी म्हणून बाबासाहेबांनी त्या ग्रंथाला एक दीर्घ अर्पणपत्रिका लिहिली. आणि अखेरीला म्हटलं,
To,
F.
In thy presence is the fulness of joy. परिपूर्ण आनंदाचा अनुभव फॅनीच्या स्नेहमय सहवासात बाबासाहेबांना मिळाला आणि अतिशय संयमाने आणि विवेकाने त्यांनी तो सांभाळला. त्या दोघांची मैत्री हे दोघांच्याही आयुष्यातलं एक निरागस सुखस्थान होतं, यात शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा