वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी, दहा दिवस पायी प्रवास करून तिनं म्यानमारबाहेर पळ काढला. या घटनेला २६ वर्षे उलटून गेली तरी तिच्या भाळी अजूनही निर्वासितांचा ठपका कायम आहे. मात्र याही स्थितीत, सीमेलगतच्या ‘मे सॉट’ येथे लाखो निर्वासितांपर्यंत वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम ती अथकपणे करते आहे. अनेक अडथळ्यांचा सामना करत, उपचार केंद्राला मिळणाऱ्या देणग्यांमधून तिनं सीमेलगत शाळा, अनाथाश्रम आणि निर्वासित छावण्या उभारत लोककल्याणाचा वसा जपला आहे. सिन्थिया माँगविषयी..
‘सि न्थिया माँग ही म्यानमारमधली अत्यंत सुप्रसिद्ध डॉक्टर असली, तरी मायदेशी वास्तव्य करण्याचं भाग्य तिला लाभलेलं नाही. लष्करी झोटिंगशाहीतून जीव बचावून पळ काढावा लागल्यामुळे, तिनं म्यानमार सीमेलगतच्या थायलंड देशातल्या ‘मे सॉट’ गावात वास्तव्य केलं आहे. गेली २६ र्वष, राजकीय निर्वासिताचं आयुष्य जगता जगता, ती दर वर्षी दीड लाख रुग्णांना रुग्णसेवा पुरवते आहे. म्यानमार-थायलंड सीमेलगतच्या निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या आपल्या देशबांधवांवर ती वैद्यकीय उपचार करते आहे.
तिचं उपचार-केंद्र चिखलानं भरलेल्या एका गल्लीत उभं आहे. तिथं टी.व्ही., भोजन-सुविधा, हात र्निजतुक करण्यासाठीचं जंतुनाशक जेल यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. म्यानमारचे रहिवासी गालफडात जो पानसुपारीचा तोबरा भरतात, त्याच्या पिंका टाकण्यासाठी या केंद्रात पिकदाण्या ठेवल्या आहेत. रुग्णांसाठी खाटांऐवजी, सनमायका चिकटवलेली लाकडी बाकडी ठेवली आहेत. केंद्रातील विभागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. एके काळी मोडकळीला आलेल्या धान्याच्या गोदामात सुरू झालेलं हे उपचार केंद्र आज त्याहून खूपच बऱ्याशा सिमेंट काँक्रीटच्या इमारतीत हललं आहे. या केंद्राद्वारे मधुमेहापासून कर्करोग-अपस्मार (एपिलेप्सी) पर्यंतच्या सर्व व्याधींवर उपचार पुरवले जातात. परंतु सहजी टाळता येण्याजोग्या हिवताप आणि डायरिया या व्याधींचे रुग्णच सर्वाधिक संख्येत आढळतात.
या केंद्राची संचालिका, डॉक्टर सिन्थिया माँग म्हणते,‘‘म्यानमारच्या सरकारला फक्त सत्ता हवीय. जनतेच्या खालावलेल्या आरोग्याच्या मुद्दय़ाचं त्यांना वैषम्य वाटत नाहीय; कारण आजारात खितपत पडलेल्या लोकांना नियंत्रणात ठेवणं सरकारला सोपं जातं. याचा पुरावा म्हणजे, म्यानमारचं सरकार देशाच्या वार्षिक उत्पन्नाचा चाळीस टक्केभाग लष्करावर खर्च करतं; तर केवळ तीन टक्के भाग स्वास्थ्यसेवेसाठी खर्च करतं.’’

म्यानमारमधील लष्करी हुकूमशाहीनं सिन्थिया माँगला बंडखोर आणि अतिरेकी ठरवलं असलं, तरी गमतीचा विरोधाभास असा की, म्यानमार सरकारमधले आणि लष्करातले कर्मचारीच तिच्याकडे उपचारांसाठी धाव घेत असतात! लष्कर आणि विविध वांशिक गट यांमध्ये गेली अनेक दशकं जी यादवी सुरू आहे, त्याचे दुष्परिणाम सर्वानाच भोगावे लागत असल्याचाच हा पुरावा आहे.
सिन्थिया माँग स्वत: केरनवंशीयच आहे. १९८८ साली वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी, दहा दिवस पायी प्रवास करून तिनं जीव बचावण्यासाठी म्यानमारबाहेर पळ काढला होता. तिच्या खांद्यावरच्या थैलीत मोजकीच औषधं आणि उपचार-सामग्री होती. त्यात एक स्टेथस्कोप, थर्मामीटर आणि फॉरसेप्सचे दोन जोड होते. तिची आणि तिच्यासोबत पळ काढणाऱ्या विरोधकांची अपेक्षा होती की त्यांना सीमेवर फक्त तीन महिनेच वास्तव्य करावं लागेल. सीमेवर राहून लोकशाहीसाठी विरोधाची चळवळ सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस होता. ‘‘त्या गोष्टीला आता २६ र्वष होऊन गेली आहेत; पण तो लढा अद्याप सुरूच आहे!’’ खांदे उडवत ती स्थितप्रज्ञपणे म्हणते.
सुरुवातीला हाती जुजबी साधनसामग्री असताना ती प्रेशर कुकर वापरून उपकरणं र्निजतुक करत असे. आज दोन दशकांनंतर वेगवेगळ्या देणग्यांद्वारे तिला दर वर्षी वीस लाख ब्रिटिश पौंडांची मदत मिळते आहे आणि तिच्या उपचार केंद्रात आज जवळजवळ सातशे डॉक्टर्स, परिचारिका, अन्य प्रशिक्षित कर्मचारी आणि स्वयंसेवक कार्यरत आहेत. सिन्थियाचे अनेक विद्यार्थी म्यानमारमधील दुर्गम भागात वैद्यकीय मदत पुरवत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये म्यानमारचं सरकार शक्य तेवढे अडथळे आणत आहे. अशा सेवाभावी डॉक्टर्सना ठार मारणं किंवा कैदेत टाकणं; त्यांची उपचार केंद्रं जाळून टाकणं असे उपद्रव सरकारद्वारे सुरू असले तरी डॉक्टर सिन्थियांचे प्रयत्न नेटानं सुरूच आहेत. मिळणाऱ्या देणग्यांमधली पै आणि पै काळजीपूर्वक वापरून तिनं सीमेलगत शाळा, अनाथाश्रम आणि निर्वासित छावण्या उभारल्या आहेत. या सर्व मदत केंद्रांचं भविष्य आज अत्यंत धूसर आहे; कारण थाई सरकारनं सीमेवरच्या या निर्वासित छावण्या बंद करून, तेथील निर्वासितांना सीमेपलीकडे त्यांच्या मूळ देशात-म्यानमारमध्ये हाकलून देण्याचा फतवा काढला आहे. ‘मे सॉट’ या खेडय़ालगतच्या छावण्यांमध्ये आज दीड लाख निर्वासित वास्तव्याला आहेत.
केरनवंशीय सिन्थिया माँगचा जन्म ६ डिसेंबर १९५९ रोजी रंगून येथे झाला आणि ती मौलमीन येथे आई-वडील आणि सहा भावंडांसोबत लहानाची मोठी झाली. राजकीय उलथापालथीच्या काळातच तिनं आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि मौलामियांग- सार्वजनिक रुग्णालयात तिनं इन्टर्नशिप सुरू केली. इथं काम करताना तिला लोकांचं भीषण दारिद्रय़ जवळून पाहता आलं. नातेवाईकांवर वैद्यकीय उपचार करता यावेत म्हणून घर, शेत किंवा गाई-म्हशी विकून पैसे उभे करणारे गरीब लोक तिनं पाहिले. इथून ती बसीन येथील एका खासगी क्लिनिकमध्ये कामासाठी गेली. त्याच सुमारास म्यानमार सरकारनं अर्थव्यवस्थेत फेरफार केले आणि तत्कालीन चलन बेकायदेशीर ठरवलं. त्यामुळे अनेकांची आयुष्यभराची बचत नामशेष ठरली. याची सर्वाधिक झळ गरिबांना आणि विद्यार्थीवर्गाला सोसावी लागली, अनेकांना अध्र्यावरच शिक्षण सोडावं लागलं. विद्यार्थी चळवळीनं जोर धरला. १९८८ साली लोकशाहीची मागणी करणारी चळवळ अधिक व्यापक आणि जोरदार झाली. देशात सकारात्मक बदल घडवण्याच्या इच्छेनं प्रेरित झालेल्या माँगनं समविचारी लोकांच्या गटात सहभाग घ्यायला प्रारंभ केला. लष्करानं प्रत्युत्तरादाखल दडपशाही वाढवली. या चळवळीला आळा घालण्यासाठी लष्करानं संपर्काची आणि दळणवळणाची साधनं तोडून टाकली. महागाई भडकली. १९ सप्टेंबर १९८८ रोजी लष्करी हुकूमशाही राजवट सत्तेत आल्यावर, चळवळीत भाग घेणाऱ्या अनेकांची धरपकड आणि कत्तल झाली. अनेक जण लपून बसले किंवा म्यानमार सीमा ओलांडून थायलंडमध्ये पोचले. २१ सप्टेंबर १९८८ रोजी सिन्थिया आणि तिचे अन्य चौदा सहकारी यांनी थायलंडमध्ये आश्रय घेण्यासाठी प्रयाण केलं. वाटेतल्या दुर्गम भागातल्या अनेक खेडय़ांमध्ये वैद्यकीय मदतीशिवाय जगत असलेले अगणित लोक दिसले. जवळच्या साधनसामग्रीचा वापर करून डॉ. सिन्थिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा आजारी-जखमी लोकांवर उपचार केले.
थायलंड देशात पोचल्यावर          डॉ. सिन्थिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मे सॉट’ इथे स्वास्थ्यसेवा आणि उपचार केंद्र सुरू केलं. सुरुवातीच्या काळात चळवळीत भाग घेतलेले निर्वासित त्यांच्याकडे उपचारांसाठी येत असत.  आता कामाच्या शोधार्थ म्यानमारमधून थायलंडमध्ये येऊन पोहोचलेले मजूर आणि त्यांचे कुटुंबीय इथे उपचारांसाठी येतात. त्यांच्या वैद्यकीय गरजासुद्धा वेगळ्या आहेत. आज या केंद्रात दरवर्षी सत्तावीसशे बालकांचा जन्म होतोय. दररोज सरासरी चार-पाचशे लोक उपचारांसाठी येत आहेत. दर वर्षी एक लाख पंधरा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केले जात आहेत. आज इथं मुलं, प्रौढ व गर्भार स्त्रियांसाठी ओ.पी.डी. चालवली जातेय, शस्त्रक्रियांची सुविधा आहे. डोळे, दात, रक्त तपासणी, कृत्रिम अवयव, एचआयव्ही तपासणी, समुपदेशन आणि पुनर्वसन अशा अनेक सेवा पुरवल्या जात आहेत.
एका लहानशा बीजांचा आज प्रचंड फोफावलेला वटवृक्ष बनला आहे आणि अनेक रुग्णांचं तो आश्रयस्थान बनला आहे. कार्यकुशलता, समर्पितता, व्यवस्थापनकौशल्य, सत्कार्यासाठी देणग्या मिळवून त्यांचा उत्तम प्रकारे विनियोग करण्याचं कर्तृत्व या गुणांमुळेच सिन्थिया हे महत्कार्य करू शकल्या आहेत.    
(समाप्त)

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Story img Loader