प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

पटचित्रं आणि ताडपत्रचित्रं ही ओडिशाची प्रसिद्ध कला. पूर्वी या कलेत पुरुष चित्रकारच प्रामुख्यानं असत आणि स्त्रिया केवळ मदतनीस म्हणून काम करत. आताच्या काळात एकीकडे चित्रकलेत पुरेसा पैसा नसल्याकारणानं तरुण या कलेपासून दूर जात आहेत. त्याच वेळी सौदामिनी स्वैन आणि बिजयालक्ष्मी स्वैन यांच्यासारख्या चित्रकर्ती मात्र मनापासून या चित्रशैलीचं जतन, संवर्धन करत आहेत. त्यातून अर्थार्जनाचा चांगला मार्ग शोधण्यातही त्या यशस्वी झाल्या असून इतर अनेक स्त्रियांना ही कला शिकवून त्यांना आत्मनिर्भर करण्यात या चित्रकर्तीचा महत्त्वाचा वाटा आहे.

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Sangeet Manapmaan Movie Review in marathi
नावीन्यपूर्ण अनुभव देणारा चित्रप्रयोग
Abhinav, Raosaheb Gurav , Raosaheb Gurav passed away, loksatta news, pune,
‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन

प्रत्येक घर म्हणजे एक ‘स्टुडिओ’ आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्य म्हणजे चित्रकार आहे, असं जवळजवळ १४० ‘स्टुडिओंचं गाव’ ओडिशामध्ये आहे. या गावाचं नाव रघुराजपूर. पुरीपासून चौदा किलोमीटरवर भार्गवी नदीकिनारी ते वसलं आहे. मध्यभागी बारा मंदिरं आणि या मंदिरांच्या दोन्ही बाजूला रांगेत ही स्टुडिओरूपी घरं वसली आहेत. या गावात राष्ट्रपती पुरस्काराचे

२५ मानकरी, २ पद्मविभूषण आणि १ पद्मश्री मिळवलेले चित्रकार राहातात.

हे गाव म्हणजे मोकळ्या वातावरणातील कलावस्तू संग्रहालयच आहे. घरांच्या ओसरीवर सुंदर कलाप्रदर्शन कायमच मांडलेलं असतं. प्रत्येक घराची ओसरी म्हणजे एक कलादालन. त्यात चित्रकार आपल्या कलाकृती निर्माण करण्यात मग्न असतो. घरातील सदस्य त्याला मदत करत असतात. कोणी रंग तयार करत असतात, तर कोणी चित्रनिर्मितीसाठी कागद तयार करताना दिसतात. या गावातून फेरफटका मारला तरी ओडिशाच्या चित्रकलेची, हस्तकलेची पूर्ण कल्पना येते. ओडिशा हे पटचित्रं (किंवा ‘पट्टचित्र’ असंही म्हणतात) आणि ताडपत्रचित्र या चित्रप्रकारासाठी प्रसिद्ध आहे. हा ओडिशाचा सर्वात जुना लोकप्रिय कलाप्रकार आहे. ‘पट’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ कापड, कॅनव्हास असा होतो. कागदावर किंवा कॅनव्हासवर केलेलं चित्र म्हणजे पटचित्र. उच्च दर्जाची रंगसंगती, सुंदर मनुष्याकृती, प्राणी-पक्ष्यांच्या आकृती,

पानाफु लांचे सर्जनात्मक आकार, यांची सुंदर चित्रं पटचित्रात असतात. विशेषत: पौराणिक विषय यात चित्रित करतात. जगन्नाथजी आणि वैष्णव पंथ यांच्याशी संबंधित विषय आढळतात. जगन्नाथ हे श्रीकृष्णाचंच रूप असल्यामुळे कृष्णजन्म, कृष्णलीला हे विषय ओघानंच येतात. जगन्नाथ मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचं वातावरण हा विषय लोकप्रिय असून त्याला उडिया भाषेत ‘बडबोडुआ’ म्हणतात. याशिवाय विष्णूचे दहा अवतार- ‘दसाबतारा’ आणि पंचमुखी गणेश हेही विषय आढळतात.

ओडिशा पट्टचित्रशैलीचं वैशिष्टय़ म्हणजे अलंकारिक चौकटीमधील चित्रं. यात व्यक्ती, विविध कामात व्यग्र असलेले लोक, असे विविध विषय असतात. चित्रकार या चित्रांतील सर्व व्यक्तींचं चित्रण कौशल्यपूर्णतेनं करतात. जेणेकरून त्यांच्या आविर्भावातून मुख्य विषयाकडे लक्ष जाईल. समोरून पाहिल्यावर दृष्टीस पडणारं दृश्य बहुतेक चित्रांतून चित्रित केलेलं दिसतं. ओडिशा पटचित्रांचे तीन प्रकार आहेत- एक भित्तिचित्रं, जी मंदिरांच्या भिंतीवर आढळतात, दुसरी पटचित्रं, जी कागदावर, कापडावर चित्रित करतात, तर तिसरी ताडपत्रावरील चित्रं. हे तिन्ही प्रकार अजूनही जिवंत आहेत. विशेषत: पुरी, भुवनेश्वर, रघुराजपूर, परलाखेमुंडी, चिकिती, सोलेपूर या ठिकाणी ही भित्तिचित्रं पाहाता येतात.

पटचित्रांसाठी कॅनव्हास बनवताना पर्यावरणाचा विचार केला जातो. जुन्या सुती साडय़ा एकमेकांवर चिकटवल्या जातात. त्याकरिता चिंचोके (चिंचेच्या बिया) पाण्यात रात्रभर भिजवून, त्याची बारीक पेस्ट करून ते उकळवतात. त्यात चुनखडीची पूड मिसळून तयार झालेल्या मिश्रणाचा लेप एका साडीवर देतात. त्यावर दुसरी साडी चिकटवून ती उन्हामध्ये वाळवून कडक झाली की दगडानं घासतात. एक बाजू घासून अगदी गुळगुळीत करतात. या बाजूवर चित्रांकन करतात. दुसरी बाजू त्या मानानं खरखरीत ठेवतात. ती चित्रांची मागील बाजू असते.

ही चित्रं रंगवण्यासाठी नैसर्गिक रंग वापरले जातात. यात पाच मुख्य रंग असतात आणि त्यांच्या मिश्रणातून पंचवीस रंग बनवतात. पांढरा रंग हा शंखापासून, हरियल नावाच्या पिवळ्या दगडापासून पिवळा, िहगूळ या खनिजापासून लाल रंग, निळा रंग हा ‘इंडिगो’पासून (नीळ), काळा रंग दिव्याच्या काजळीपासून किंवा केळीच्या पानाला तेल लावून ते जाळून त्याच्या राखेपासूनही बनवतात.

मोठय़ा आकाराचे कुं चले बनवण्यासाठी केवडय़ाची पानं (ज्यात खूप तंतू असतात) वापरतात, तर बारीक कुंचले मुंगूस, उंदीर यांच्या केसांपासून बनवले जातात. चित्रांचं रेखाटन करण्यासाठी चारकोल (द्राक्षवेली जाळून केलेला कोळसा) किंवा पेन्सिल वापरतात. अलीकडे साडय़ा किंवा दुपट्टेही याच प्रकारे रंगवले जातात, त्यात मात्र थोडासा फॅब्रिक कलर मिसळून घेतात. या वस्तू धुतल्या जातात त्या वेळी रंग पक्का राहावा, म्हणून ही सावधानता बाळगली जाते. चित्र पूर्ण रंगवून झालं की त्याला चकाकी आणण्यासाठी, तसंच पाण्याशी संपर्क आल्यावर ते पुसलं जाऊ नये याकरिता लाखेचा थर देतात. अलीकडे फॅब्रिक रंग नैसर्गिक रंगांत मिसळतात, त्यामुळे लाखेचा थर देण्याची आवश्यकता भासत नाही.

कापडावरील पटचित्रांव्यतिरिक्त ‘ताडपत्र खुदाई’ हाही एक प्रकार आहे. ताड वृक्षाच्या पानांच्या पट्टय़ा कापून कडक उन्हात वाळवून त्या सरळ केल्या जातात. त्यावर अणकुचीदार हत्यारानं चित्र खोदलं किंवा कोरलं जातं. त्यानंतर त्यात काजळीची कोरडी भुकटी घासून ओल्या फडक्यानं ताडपत्र पुसतात. जेणेकरून कोरलेल्या खाचांमध्ये काळी भुकटी भरली जाऊन पक्की होते आणि काळ्या शाईनं रेखाटलेल्या चित्राचा परिणाम साधता येतो. ज्या आकारमानाचं चित्रं हवं असेल त्या आकारमानात ताडपत्राच्या पट्टय़ा सुरुवातीलाच सुई-दोऱ्यानं टाचून घेतात आणि त्यावर मनुष्याकृती, झाडं, पानं, फुलं रेखाटून अर्थात खोदून चित्र रंगवतात अथवा फक्त काळ्या रेषांचंच ठेवतात.

दुसऱ्या प्रकारात ताडपत्राच्या पट्टय़ा घडीच्या पंख्याप्रमाणे घडी होईल अशा पद्धतीनं, उलटसुलट ठेवता येतील अशा जोडतात. घडी उघडल्यावर मोठय़ा आकाराचं चित्र दिसतं. मात्र घडी साधारण एक इंच रुंदी आणि पाच ते सहा इंच लांबीची किंवा त्याहून जास्त असू शकते. त्यात संपूर्ण रामायण कथा, कृष्णजीवन रंगवतात.

आपल्याकडे महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडीमध्ये आढळणारे वर्तुळाकार आकारातील चित्रकथी शैलीचं चित्रण असलेले खेळाचे पत्ते अर्थात ‘गंजिफा. ही पारंपरिक कला टिकवून ठेवण्याची वेळ आली आहे. ओडिशात ‘गंजप्पा’ हा पत्त्यांचा प्रकार असून त्यावर पट्टचित्र शैलीतील चित्रं रंगवली जातात.

आपण सामान्यत: देव किंवा देवतेचं मंदिर अथवा देवदेवतेचं एकत्र मंदिर पाहतो. पण भावंडांच्या मूर्ती असलेलं मंदिर विरळाच. जगन्नाथ मंदिरात मात्र बालभद्र, सुभद्रा, जगन्नाथ यांच्या भावंडांच्या मूर्ती आहेत. रथयात्रा हा महत्त्वाचा उत्सव. त्याला बोली भाषेत ‘रथजात्रा’ म्हणतात. या मंदिरात १२० सेवक असून त्यांपैकी चित्रकार हा एक. त्याला ‘चित्रकर’ म्हणतात. त्याच्या हाताखाली अनेक चित्रकार असतात. देवळातील भित्तिचित्रं, जगन्नाथ रथावरील चित्रं रंगवणं हे त्यांचं काम असतं.

ओडिशा पटचित्रं ही पूर्वी पुरुष चित्रकारांची मक्तेदारी होती. स्त्रिया फक्त मदतनीस असत. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्री चित्रकर्ती पुढे येत आहेत. सौदामिनी स्वैन ही ४३ वर्षांची चित्रकर्ती १६ वर्षांहून अधिक काळ या क्षेत्रात आहे. सामान्यत: घरात चित्रकार असला तर कलेचं बाळकडू मिळतं. पण सौदामिनी यांचे वडील शेतकरी असून घरात कुणीही चित्रकार नाही. मात्र सौदामिनींनी जाणीवपूर्वक हे क्षेत्र निवडलं. त्यांनी ‘बी.ए.’ची पदवी घेतल्यावर गुरू सोमनाथजी नायक यांच्याकडे चार र्वष पट्टचित्रकलेचा अभ्यास केला. सौदामिनी यांचे पती सरतकुमार प्रधान हेही चित्रकार आहेत. त्यांचं त्यांना खूप  प्रोत्साहन मिळतं. २०१३ मध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार आणि २०१४ मध्ये राज्य पुरस्कार मिळाला असून त्याखेरीजही इतर चार पुरस्कार पट्टचित्राकरिता मिळाले आहेत. ग्रेट ब्रिटनसह देशात नागालँड, सूरज कुंड मेला आणि इतरही अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या चित्रांची प्रदर्शनं भरवली आहेत. विशेष म्हणजे आजपर्यंत ३०० महिला चित्रकर्तीना त्यांनी प्रशिक्षण दिलं असून त्या उत्तम व्यावसायिक यशही मिळवत आहेत. ८ फूट बाय ३ फूट एवढय़ा मोठमोठय़ा आकारांत सौदामिनी चित्रं रंगवतात. त्यांचा आवडता विषय म्हणजे कृष्णलीला. परदेशी प्रवासी अधिक संख्येनं याच विषयावरील त्यांची चित्रं संग्रहात ठेवण्यासाठी विकत घेतात. टसर सिल्क साडय़ांवर पट्टचित्रातील आकृती, डिझाईन्स रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना भविष्यातील योजनांबद्दल विचारलं असता त्या म्हणतात, ‘‘माझ्या आयुष्यातला चित्र काढण्याचा आनंद मला आयुष्याच्या अंतापर्यंत मिळावा म्हणून मी परमेश्वराजवळ मला निरोगी ठेव अशी प्रार्थना करते. तहान, भूक, काळ, वेळ विसरून मी चित्र रंगवण्यात मग्न होते.’’

पट्टचित्रातील ताडपत्रावरील चित्रं (पोथी चित्रं) या दुसऱ्या प्रकारात काम करणाऱ्या बिजयालक्ष्मी स्वैन या चंदनपुरी (ओडिशा) येथे राहातात. त्या कापडावरील पट्टचित्रंही करतात. ताडपत्र म्हणजे पट्टीसारख्या आकारात कापलेलं ताड वृक्षाचं पान. साधारण १ इंच ते ५ इंच असा लहानात लहान आकार असतो. ताडपत्राच्या अनेक पट्टय़ा एकमेकांना सुई-दोऱ्याच्या सहाय्यानं टाचून मोठय़ा-मोठय़ा आकारात चित्र काढलं जातं. बावीस इंच बाय साठ इंच, अठरा इंच बाय तीस इंच, अशी विविध आकारमानांत ताडपत्रं जोडून त्यावर अणकुचीदार हत्यारानं चित्रं काढतात- त्याला उडिया भाषेत लिखन आणि हिंदीमध्ये सुई म्हणतात. ताडपत्राच्या ठरावीक आकाराच्या पट्टय़ा जोडून कितीही मोठय़ा आकारमानाचं चित्र तयार करता येतं, अगदी दहा फुटांपर्यंत, असं बिजयालक्ष्मी सांगतात. चित्र विकत घेणाऱ्या व्यक्तींच्या पसंतीनुसार आकार ठरवला जातो.

ताडपत्राचा पोत पाहाता त्यावर आडव्या बारीक रेषांचा पोत असतो. अशा पोतावर वक्राकार रेषांमध्ये रेखाटन करणं कठीण असतं. परंतु अनेक पट्टय़ा जोडून त्यावर अणकु चीदार लिखननं मनुष्याकृती, झाडं, पानंफुलं अतिशय सौंदर्यपूर्ण पद्धतीनं रेखांकित करतात.

बिजयालक्ष्मी यांचं शिक्षण नववीपर्यंत झालं असून आपल्या चित्रकार वडिलांकडून हा कलेचा वारसा त्यांच्याकडे आला. वडिलांच्या निधनानंतर गुरू जगन्नाथ महापत्र यांच्याकडे त्यांनी अध्ययन केलं. मनुष्याकृतीचं प्रमाणबद्ध रेखांकन ताडपत्रावर करण्यासाठी मनुष्याकृती रेखाटनात परिपूर्णता येणं गरजेचं असतं. त्याकरिता या चित्रकारांना खूप सराव करावा लागतो.

बिजयालक्ष्मी १ इंच बाय ५ इंच आकारातील ताडपत्रावर सुंदर चित्रं ‘बुकमार्क’साठी रंगवतात. तसेच १८ इंच बाय ३० इंच किंवा त्याहून मोठय़ा आकारांत ताडपत्रं जोडून चित्रं काढतात. २०१० मध्ये त्यांना ओडिशा राज्य पुस्कार मिळाला असून २०१९ चा मध्य प्रदेशमधील कालिदास पुरस्कार मिळाला आहे. बिजयालक्ष्मी गेली वीस र्वष या क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे चित्रकार पती आशीषचंद्र स्वैन हे त्यांना प्रोत्साहन देत असतात.

पूर्वी फक्त पुरुष चित्रकार पट्टचित्रं काढत आणि स्त्रिया केवळ मदतनीस असत. आता शिक्षण घेतलेले तरुण चित्रकला क्षेत्रात पुरेसा पैसा नाही असं म्हणत इतर नोकरी करतात. त्यामुळे ही कला हळूहळू लोप पावेल अशीही भीती काही ज्येष्ठ मंडळी व्यक्त करतात. सौदामिनी या मात्र आपण प्रशिक्षण दिलेल्या जवळजवळ सर्व स्त्रिया या क्षेत्रात कार्यरत आहेत, हे अभिमानानं सांगतात. बिजयालक्ष्मीही ताडपत्र चित्रांचं प्रशिक्षण देत आहेत. आपल्या विद्यार्थिनींची कामातील प्रगती दोघींनाही समाधानकारक वाटते. त्यामुळे आपण यापूर्वी पाहिलेल्या अनेक कलांप्रमाणे ओडिशा पट्टचित्रं ही कलाही जपण्याचा, जिवंत ठेवण्याचा स्त्री चित्रकर्ती यशस्वी प्रयत्न करत आहेत हेच दिसून येतं. इतर कलांप्रमाणे ही कलाही अमर राहाणं हेच या चित्रकर्तीचं मोठं यश म्हणावं लागेल.

विशेष आभार- डॉ. अनिता साबत, ओडिशा

Story img Loader