आज आपण ज्या व्यक्तिमत्त्व विकाराची माहिती घेणार आहोत त्याचा उगम पार ग्रीक पुराणकथांमध्ये सापडतो. ग्रीक देवी-देवतांचं वर्णन सौंदर्याचं प्रतीक म्हणून केलं जातं. त्यातला एक नार्सिसस. हा एका अप्सरेचा मुलगा होता. एकदा त्या अप्सरेनं एका ज्योतिषाला, ‘नार्सिसस दीर्घायुषी असेल का?’ असं विचारलं. त्यावर तो म्हणाला, ‘‘जोपर्यंत त्याला स्वत:बद्दलची जाणीव-जागृती असणार नाही तोपर्यंत तो जगेल.’’ या भविष्यवाणीचा अर्थ त्या अप्सरेला अर्थातच कळला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नार्सिसस दिसायला खूप देखणा होता. जिथं जाईल तिथं फक्त स्त्रियांचेच नाही, तर पुरुषांचेही लक्ष तो वेधून घ्यायचा. पण त्याला त्याच्या देखणेपणाची अजिबात जाणीव नव्हती, कारण त्यावेळी आरसे नव्हते. एक दिवस तो जंगलात शिकारीला गेला असता त्याला एक तलाव दिसला. त्यातील पाणी अतिशय स्वच्छ होते. तो पाणी पिण्यासाठी तलावात वाकला असता त्या स्वच्छ पाण्यात त्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. तो देखणा चेहरा पाहून तो इतका हरखून गेला की स्वत:च्या प्रतिबिंबाच्या प्रेमात पडला. आणि मग त्याला तो तलाव आणि त्यातील स्वत:च्या प्रतिबिंबाला सोडून जाणं अशक्य झालं. आपल्या तहान, भूक, झोप या सगळ्या शारीरिक गरजा विसरून तो फक्त प्रतिबिंब पाहात राहिला. परिणामस्वरूप, काही दिवसांतच त्याने तिथेच प्राण सोडला. त्या जागी एक सुंदर फूल उगवलं. त्याला ‘नार्सिसिस’चं फूल म्हणतात. तर असा हा ‘नार्सिसस’ स्वप्रेमात आकंठ बुडालेला होता. खरं तर या कथेच्या अजून काही वेगवेगळ्या आवृत्त्या (versions) आहेत, पण इतकं खोलात न जाता आपल्याला त्याच्या नावावरून ओळखला जाणारा पुढचा ‘व्यक्तिमत्त्व विकार’ पाहायचा आहे. ज्याचं सर्वात प्रमुख लक्षण स्वत:वर असलेलं अतीव प्रेम हे आहे.

‘क्लस्टर बी’मधला हा तिसरा प्रकार आहे. ‘जब वुई मेट’ या चित्रपटातली गीत अर्थात करीना कपूर आठवा. तिचं एक वाक्य होतं, ‘मैं अपनी फेवरेट हूँ’. स्वत:वर प्रचंड खूश असलेली ही मंडळी आपल्याच विश्वात रममाण असतात. इतर लोक त्यांच्याविषयी काय विचार करतात त्यापेक्षा ते स्वत:ला काय समजतात ते त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं असतं. हे एवढं वाचल्यावर तुम्हाला पटापट तुमच्या आजूबाजूची ‘नार्ससिस्टिक’ वाटणारी लोकं आठवतील. पण फक्त वरवरची लक्षणं असून चालणार नाही. ‘ DSM-५’ (Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders, Fifth Edition (DSM-5))मध्ये सांगितल्यानुसार, वय वर्षे १८ पूर्ण असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचं, कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकाराचं निदान केलं जाऊ शकत नाही. आणि दिल्या गेलेल्या एकूण नऊ लक्षणांपैकी पाच लक्षणं दिसत असतील तरच ‘नार्ससिस्टिक व्यक्तिमत्त्व’ विकार असं एखाद्या व्यक्तीचं निदान होऊ शकतं. सांगितले गेलेले निकष पूर्ण होऊन मानसोपचारतज्ज्ञांनी निदान केलेल्या शरयूची केस समजावून घेऊ.

हेही वाचा…दीपज्योतिर्नमोऽस्तुते।

दिसायला गोरीपान असलेली शरयू साधारण २६ वर्षांची होती. प्रचलित सौंदर्याच्या निकषानुसार असलेला उंच आणि सडपातळ बांधा मात्र तिच्याकडे नव्हता. अर्थात तिला त्यामुळे अजिबात फरक पडायचा नाही. पण लहानपणी सगळे तिला बुटकी म्हणून चिडवायचे. तिला बरोबरीनं वागवायचे नाहीत. खेळायला घेताना पण लिंबूटिंबू म्हणायचे. पण तिला तिचा गोरा रंग खूप आवडायचा. ती स्वत:ला खूप भारी समजायची. तिनं तेव्हाच ठरवलं की, आपण अभिनेत्री व्हायचं. त्या स्वप्नात तिचं अभ्यासातलं लक्ष केव्हाच उडालं होतं. तसं तर तिनं कधी शाळेच्या स्नेहसंमेलनात साधं कामही केलं नव्हतं, पण तरी ती स्वत:ला खूप ‘महान’ समजायची. ती तिच्या मैत्रिणींना, मला मधुबाला म्हणा असं सांगायची आणि वागायचीही त्याच तोऱ्यात, जणू ती आताच एखादं शूटिंग पूर्ण करून आली आहे. नगर जिल्ह्यातल्या एका छोट्या तालुक्यात राहाणाऱ्या शरयूला सतत वाटायचं, खरं तर तिनं एखाद्या गर्भश्रीमंत कुटुंबात जन्माला यायला हवं होतं. थोडक्यात, ती स्वत:च्या प्रेमात वेडी होती.

अर्थात ती स्वत:ला काहीही समजत असली, तरी तिचं कर्तृत्व शून्य असल्यामुळे ती दुसऱ्यांच्या चेष्टेचा विषय झाली होती. तिचा लहान भाऊ, मकरंद तिला ‘ए गल्लीतली मधुबाला, आईने भाजी करायला सांगितली आहे.’ असं चिडवायचा. तिला त्यामुळे काही फरक पडायचा नाही, कारण तिच्या लेखी तिचा भाऊ अगदीच क्षुल्लक कोणीतरी होता. तिची अभिनयकला, सौंदर्य ओळखायला समोरचा माणूससुद्धा कोणीतरी महान असायला हवा. आणि असा माणूस मुंबईमध्ये, बॉलीवूडमध्येच असू शकतो तिथे जावं का, असेही विचार तिच्या मनात येत. तिच्या योग्यतेचा असा महान माणूस तिला न मिळाल्यामुळं शरयूनं लग्न केलं नव्हतं. मग आईने घरात नुसतं बसण्यापेक्षा एका कपड्याच्या दुकानात नोकरीला जायला लावलं. त्या दुकानातसुद्धा तिला फक्त गल्ल्यावर बसायला हवं असायचं. कपडे घड्या करणं, लोकांना कपडे दाखवणं, असली तिच्या लेखी फालतू असलेली कामं तिला करायची नव्हती. ती दुकानाच्या मालकाशी भांडायची. तिच्या मते, त्या दुकानदाराचीही लायकी नव्हती तिच्यातलं टॅलेंट ओळखायची.

हेही वाचा…‘भय’भूती: मम भय कोण वारिते?

दुसऱ्या एका गावात अशीच एक ‘नार्सासिस्टिक’ रिया राहायची. भारी फॅशन सेन्स असलेली रिया इंजिनीयर होती. तिचा बॉयफ्रेंड कुणाल इन्व्हेस्टमेंट बँकर होता. या व्यक्तिमत्त्व विकाराच्या व्यक्तींना कायमच इतरांनी खूप कौतुक केलेलं आणि इतरांचं लक्ष वेधून घ्यायला आवडतं. सुरुवातीला कुणाल खूप कौतुक करायचासुद्धा, पण हळूहळू तिचं कौतुक, तिला काय वाटतंय, हे आणि हेच बोलायचा त्याला कंटाळा यायचा. कुणालनं तिच्या स्टाइलचं, दिसण्याचं कौतुक केलं नाही की ती भांडायची. कौतुक कोणाला आवडत नसतं? पण या ‘व्यक्तिमत्त्व विकारा’च्या व्यक्तीच्या अपेक्षा एवढ्या जास्त असतात की, गमतीत असं म्हटलं जातं, साखरेच्या पाकात बुडवून यांना साखर दिली तरी हे म्हणतील अजून थोडी गोड असायला हवी होती. सगळ्या लोकांनी मला बघावं, माझं कौतुक करावं यात त्यांना कमालीचं समाधान मिळतं.

रियाची तिच्या सहकाऱ्यांकडूनही हीच अपेक्षा असायची. तिला वाटायचं यांचं नशीब चांगलं आहे. म्हणून यांना माझ्यासारखी कर्मचारी मिळाली आहे. तिला विशेष अशा सवलती, विशेष वागणूक पाहिजे असायची. म्हणजे ती उशिरा आली, तरी लोकांनी समजावून घ्यावं. या ‘व्यक्तिमत्त्व विकारा’च्या लोकांचे नखरे खूप जास्त असतात. त्यांच्या सगळ्यांकडून अपेक्षा असतात. सुधीर, वय वर्षं ३२. हा नोकरी करत नव्हता. आई-वडील दोघंही सरकारी नोकरीत असल्यामुळं याचं बेकार राहाणं चालून गेलं होतं. त्याच्या बेकारीबद्दल विचारल्यावर तो म्हणायचा, ‘‘खरं तर मला २ कोटी रुपये या दोघांनी द्यायला हवे. मी काही यांच्यासारखी आयुष्यभर खर्डेघाशी करणार नाही. मला मोठ्ठी कंपनी काढायची आहे, पण यांची एवढे पैसे द्यायची लायकी नाही.’’ ती महान असण्याची भावना त्यांच्याकडून हे बोलावून घेत असते. हे करताना तो आई-वडिलांचं मानसिक शोषण करत आहे याची त्याला जाणीवही नव्हती. त्याच्या लेखी त्या दोघांचं त्याला पैसे पुरवणं कामच आहे. त्याच्या वडिलांनी खूप कौतुकानं पैसे जमवून एक कार विकत घेतली होती. पण हा परवानगीशिवाय ती कार घेऊन मित्रांना फिरवून आणायचा. कारण त्यामुळं मित्र त्याचं कौतुक करायचे.

‘‘ तू न विचारता गाडी नेलीस कशी? ’’ असं विचारल्यावर तो म्हणायचा, ‘‘तुमचं नशीब चांगलं आहे की, मी तुमची गाडी चालवतो. नाहीतर मी असल्या फडतूस कारला हातसुद्धा लावला नसता.’’ दुसऱ्यांचा फायदा घायचा आणि तोसुद्धा स्वत:चा हक्क आहे असं समजणं, हे एक लक्षण या व्यक्तिमत्त्व प्रकारात खूप ठळकपणे दिसून येतं. एक प्रकारचा अहंगंड आणि त्यातून येणारा उद्धटपणा त्यांच्यात ठासून भरलेला असतो.

हेही वाचा…सांदीत सापडलेले…! मैत्री

कोणताही नातेसंबंध हा दोन्ही बाजूच्या प्रयत्नातून, प्रतिसादातून तयार होतो. या व्यक्तिमत्त्व विकारामध्ये सगळे काही स्वत:भोवतीच फिरत राहिल्यामुळं एकतर्फी नातं तयार होतं. त्यांना आपल्या जोडीदाराबद्दल ना समानुभूती वाटते, ना कौतुक. त्यामुळं त्यांचं नातं फार काळ टिकत नाही. स्वप्रेमात बुडालेल्या या व्यक्तींना सायकोथेरपीमुळं चांगली मदत होऊ शकते. यांना व्यक्तिमत्त्व विकार आहे, त्याचं वागणं जाणीवपूर्वक नसतं तर त्यांच्या पूर्वायुष्यात झालेल्या काही घटनांमुळे ते स्वत:ला वेगळं समजतात. व्यक्तिमत्त्व विकार नसलेल्या, पण स्वकेंद्रित झालेल्या व्यक्तींची संख्यासुद्धा आज कमी नाही. अशा व्यक्तींना स्व चिंतनातूनच बदलाची दिशा मिळेल.

‘पडसाद’ तुमच्यासाठी

‘चतुरंग’ पुरवणीतून तुम्हाला नेहमीच वाचनाचा भरघोस आनंद मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. विविध कंगोरे मांडणारे वेगवेगळे विषय, नामवंतांचे अनुभव, त्यांच्या मुलाखती या सगळ्यांमुळे तुमच्याही विचारांत, अनुभवांत नक्कीच भर पडत असेलच. काय आहे तुमचा अनुभव या सदरांविषयी आणि पान १ वरच्या लेखांविषयी. आम्हाला नक्की कळवत राहा. ‘पडसाद’ हे सदर याचसाठी आहे. तुम्ही मोकळेपणाने आम्हाला कळवू शकता तुमची मते. अगदी मतभेदही मुक्तपणे नोंदवा. ठोस विचार मांडणारी पत्रे नक्कीच प्रसिद्ध केली जातील. फक्त आणि फक्त मराठीमध्ये पाठवलेलीच पत्र प्रसिद्ध केली जातील. इमेल करताना सब्जेक्ट मध्ये ‘चतुरंग पडसाद’ असा उल्लेख करावा. आमचा पत्ता ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturang.loksatta@gmail.com

trupti.kulshreshtha@gmail.com
(तळटीप या लेखातील माहितीचा वापर स्वत:च्या किंवा आप्तस्वकीयांच्या निदानासाठी कृपया करू नये. योग्य निदानासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.)