‘करोना’नंतर मानसिक आजारांचं ‘सरसकटीकरण’ वाढलं! आपल्याला ‘डिप्रेशन’, ‘अँग्झायटी’, ‘बायपोलर’ किंवा ‘ओसीडी’ आहे, असं छातीठोकपणे सांगणारी मंडळी आता पदोपदी भेटतात. त्यांच्यातल्या कितीजणांनी खरोखरीच या आजारांचं निदान करून घेतलंय आणि कितींनी केवळ काही लक्षणांवरून, अर्धवट माहितीच्या आधारे स्वत:वर हे शिक्के मारून घेतलेत, असा प्रश्न पडतो. दीर्घकाळ माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झालेली काही स्वभाववैशिष्ट्यं ‘व्यक्तिमत्त्व विकारां’चा भाग असू शकतात. हे इतर मानसिक आजारांपेक्षा वेगळे आणि समजून घेतल्यास अनेक प्रश्न उलगडणारे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृतीं’चा गुंता सोडवणारं हे नवीन सदर दर पंधरवड्यानं…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिनीबाईंच्या मुलीचा साखरपुडा होता. घरात पाहुण्यांची वर्दळ होती. बाईंचे यजमान सुरेशराव सगळ्यांना हवं-नको ते बघत होते. तरी मालिनीबाईंचा एक डोळा त्यांच्यावर होता. त्याला कारणही तसंच होतं. सुरेशरावांचं सगळं व्यवस्थित चालू आहे, असं म्हणता म्हणता कधी बिनसेल ते सांगता यायचं नाही. आज त्यांच्या लग्नाला तीस वर्षं झाली होती. पण मालिनीबाईंना अजूनही त्यांच्या अचानक येणाऱ्या रागाचं कारण कळायचं नाही. त्या खूप पुढे पुढे करून, सुरेशरावांच्या कलानं, त्यांच्याच मतानं वागायचा प्रयत्न करायच्या. पण तरीही एक काही तरी गोष्ट अशी घडायची, की सुरेशरावांचा मूड एका क्षणात पालटायचा. मग ते घर डोक्यावर घ्यायचे. मालिनीबाईंना वाटेल तसे बोलायचे. गेली तीस वर्षं त्या डोक्यावरच्या टांगत्या तलवारीसह जगत होत्या. ‘सगळे सुटतील, पण आपण त्यांच्या रागाच्या तावडीतून कधी सुटणार नाही… यातून सुटण्याचा मरण हा एकच पर्याय!’ असं कित्येकदा वाटून त्या निराश व्हायच्या. पण ही एक गोष्ट सोडता सुरेशरावांनी मालिनीबाईंना कधी काही कमी पडू दिलं नव्हतं. त्यांचा चांगला जम बसवलेला व्यवसाय होता. बाहेरच्यांना तर सांगूनही खरं वाटलं नसतं सुरेशरावांचं वागणं. कोणत्या ना कोणत्या नात्याच्या निमित्तानं असे एखादे सुरेशराव आपल्याही आजूबाजूला असतात. प्रश्न फक्त रागाचा नसतो, तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, मूड, इतरांशी असणारे नातेसंबंध, हे असं काही असतं, की त्यांच्या (आणि पर्यायानं त्यांच्याशी संबंधित लोकांच्या) आयुष्यात ताण निर्माण होतो. त्यांच्या कामावर, त्यांनी घेतलेल्या निर्णयांवरही या विचारपद्धतीचा परिणाम होतो. एरवी सगळं काही व्यवस्थित करणारा माणूस एखाद्याच बाबतीत असा का वागतो? असं एक मोठं प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभं राहतं. ‘याचा स्वभावच असा आहे,’ असंही वाटून जातं बऱ्याचदा. पण वास्तविक पाहता तो व्यक्तिमत्त्व विकारही ( personality disorder) असू शकतो.

हेही वाचा : ‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही

व्यक्तिमत्त्व विकारांबाबत माहिती घेण्याआधी आपण मुळात ‘व्यक्तिमत्त्व’ ( personality) म्हणजे काय बघू या. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हणतात ते तंतोतंत खरं आहे. ‘वाह! क्या पर्सनॅलिटी हैं!’ अशी जेव्हा दाद मिळते, तेव्हा ती खरंतर फक्त दिसण्याला, रंगरूपाला दिलेली असते. पण प्रत्यक्षात मानसशास्त्रानुसार व्यक्तिमत्त्व म्हणजे विचार-भावना आणि वागण्याची पद्धत- जी एखाद्या व्यक्तीला इतर लोकांपेक्षा वेगळं करते. कशी ठरत असेल ही वागण्याची पद्धत? एकतर आनुवंशिकतेनं काही घटक आपल्याला पूर्वजांकडून येतात. उदाहरणार्थ- एखाद्या स्त्रीला लहान मुलांची खूप आवड असेल, तिचं लहान मुलांवर खूप प्रेम असेल, तर कदाचित तिची मुलगी मोठी झाल्यावर तिच्यातही हेच गुण अनुभवायला मिळू शकतात. दुसरीकडे काही घटक हे आजूबाजूचा परिसर, जीवनात आलेले अनुभव, अनुकरण, यांतूनही आलेले असतात. उदाहरणार्थ- जो मुलगा लहानपणापासून पंढरपूरची वारी, वारकरी हे जवळून पाहात आला असेल, त्याच्यात कदाचित भक्तीभाव ठळकपणे दिसू लागेल. मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्त्वावर अनुवंशाचा की परिसराचा, नक्की कशाचा परिणाम जास्त होतो, हे शोधून काढायला वेगवेगळे प्रयोग केले गेले. पण इथे ‘दूध का दूध- पानी का पानी’ असं करता येणं केवळ अशक्यच आहे. वर दिलेल्या उदाहरणातली मुलगी आईचं बघून लहान मुलांवर प्रेम करायला शिकली, की तिच्यात अनुवंशातून हा गुण आला, हे कसं सांगावं बरं?… तर अशा या दोन्ही घटकांनी प्रभावित अशी एक विचारांची पद्धत बनते, त्याला व्यक्तिमत्त्व म्हणतात. ही विचारांची पद्धत किंवा हे व्यक्तिमत्त्व कालांतरानं कायम राहतं.

तर अशी ही विचारांची पद्धत जेव्हा विचलित होते, त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात आणि हेच वर्तन दीर्घकाळ टिकून राहतं, तेव्हा त्याला ‘व्यक्तिमत्त्व विकार’ असं म्हटलं जातं. व्यक्तिमत्त्व गुण आणि व्यक्तिमत्त्व विकार याच्यातसुद्धा गल्लत होण्याची शक्यता असते. हे सांगायची किंवा स्पष्ट करण्याची खूप गरज आहे. कारण ‘करोना’नंतर मानसिक आजार, त्याच्याशी संबंधित लक्षणं, बऱ्याचदा त्याच्याशी संबंधित मेंदूमधली रसायनं (‘डिप्रेशन’, ‘डोपामाईन’ सर्वांत प्रसिद्ध!) याविषयी समाजमाध्यमांवर छोट्या छोट्या रील्समधूनसुद्धा इतकं बोललं गेलं आहे, की आता लहान मुलंदेखील मानसशास्त्रातल्या परिभाषा सहजपणे वापरायला लागली आहेत. एक ताजं उदाहरण सांगते- एक दहावीतला मुलगा समुपदेशनासाठी आला होता. तो सांगत होता, ‘‘मागच्या वर्षी माझ्या मेंदूमधलं डोपामाईन कमी झालं. माझा काहीच अभ्यास होत नव्हता. मला डिप्रेशन आलं होतं…’’ मी विचारलं, की ‘‘हे कोणी ठरवलं? तुला कसं कळलं?’’ तो म्हणाला, ‘‘कोणी सांगायला कशाला हवं? मला माझं माहिती आहे. मी वाचलंय गूगलवर.’’ ‘गूगल’नं सांगितलंय म्हटल्यावर समोरच्याची बोलती बंद, असं काही तरी त्याला वाटत होतं.

हेही वाचा : कारी बदरी जवानी की छटती नहीं…

‘डिप्रेशन’, ‘अॅग्झायटी’, ‘ओसीडी’ हे आता ‘ताप आला, सर्दी झाली’ असं सांगितल्यासारखं सांगतात काही जण! कोणालाही किंवा स्वत:लाही असं लेबल लावण्याआधी स्वत:ला असा प्रश्न विचारा, की मी या क्षेत्रातली अधिकारी व्यक्ती आहे का, की जी अशा प्रकारची निदानं करून लेबल लावू शकेल? अशा प्रकारचं निदान करण्याचा अधिकार फक्त मानसोपचारतज्ञांना (psychiatrist) असतो. तेही निदान करण्यापूर्वी समोरची व्यक्ती निकषांमध्ये बसते का, हे बारकाईनं तपासत असतात. एखाद्याला कर्करोग किंवा क्षयरोग झालाय, हे सांगायला जसे डॉक्टर लागतात, तसे मानसिक आजार किंवा व्यक्तिमत्व विकार यांचं निदान करायलाही डॉक्टरच लागतात याची जाणीव ठेवणं आवश्यक आहे.

व्यक्तिमत्त्व विकार आयुष्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर परिणाम करतात. त्यात एक म्हणजे व्यक्तीची स्वत:बद्दल किंवा इतरांबद्दल विचार करण्याची पद्धत.

रिमाच्या आतापर्यंत अनेक अयशस्वी ‘रीलेशनशिप्स’ झाल्या होत्या. प्रत्येक वेळी सुरुवातीला ती प्रेमात अखंड बुडालेली असे, पण एक-दोन महिन्यांतच पार्टनरबरोबर तिची भांडणं व्हायला लागायची. प्रत्येक वेळेस कारण एकच असायचं- की मी प्रेमात खूप प्रामाणिक आहे, पण समोरचा माझ्याबरोबर ‘चीटिंग’ करतोय. वयाच्या १८-१९ व्या वर्षापासून ते तिची चाळिशी आली तरी याबाबत तिची विचारांची पद्धत एकसारखीच होती. त्यामुळे ती अजूनही अविवाहित होती.

हेही वाचा : सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!

दुसरा प्रभावित भाग म्हणजे व्यक्तीची भावनिक प्रतिसाद देण्याची पद्धत. म्हणजे एखाद्यानं या व्यक्तींना कितीही सकारात्मक पद्धतीनं वागवलं, तरी त्यांची जी पद्धत ठरलेली असते, तसेच ते वागत राहतात. गणिताचे एक शिक्षक बहुसंख्य विद्यार्थ्यांना आपण आवडत नाही, हे माहिती असूनही विद्यार्थ्यांशी रागीटपणे आणि उद्धट आविर्भावातच वागायचे. एका विद्यार्थ्यानं मात्र गुरुपौर्णिमेला स्वत:च्या हातानं त्यांच्यासाठी ग्रीटिंग बनवून आणलं. पण त्यांच्या प्रतिक्रियेत काहीच फरक पडला नाही. उलट, ‘‘यात वेळ घालवण्यापेक्षा दोन गणितं सोडवली असतीस तर गुण मिळाले असते,’’ असा शेरा त्यांनी मारला!

तिसरं प्रभावित होणारं क्षेत्र म्हणजे या व्यक्ती इतरांशी कसे संबंध ठेवतात आणि चौथं क्षेत्र म्हणजे एखाद्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी या व्यक्ती कोणता मार्ग निवडतात.

यांपैकी किमान दोन क्षेत्रांच्या बाबतीत अपेक्षित निकष पूर्ण होत असतील, तरच व्यक्तिमत्व विकार आहे असं म्हटलं जाऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे हे निकष दर्शवणारे परिणाम दीर्घकाळपर्यंत व्यक्तिमत्त्वात लक्षणीयरीत्या दिसायला हवेत. मानसिक आजार होण्यासाठी आयुष्यात घडलेली कोणती ना कोणती तरी घटना, लहानपणातला ‘ट्रॉमा’ कारणीभूत असू शकतो. व्यक्तिमत्त्व विकारांत मात्र आनुवंशिकतेनं आणि अनुकरण किंवा परिसरातून जी वागण्याची पद्धती विकसित होते, ती पद्धती कारणीभूत ठरते. म्हणूनच १८ वर्षांपर्यंत- जोपर्यंत ही पद्धत पूर्णपणे विकसित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही व्यक्तिमत्त्व विकाराचं निदान केलं जात नाही. (अपवाद फक्त एका व्यक्तिमत्व विकाराचा आहे, त्याची माहिती पुढील लेखांमध्ये घेऊ.)

हेही वाचा : माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!

‘डीएसएम- ५’मध्ये (Diagnostic and statistical manual of mental disorders) व्यक्तिमत्त्व विकारांचे दहा प्रकार सांगितले आहेत, ते एक-एक करून आपण या सदरात समजूून घेणार आहोत. व्यक्तिमत्त्व विकारांसाठी विशेष असे औषधोपचार उपलब्ध नाहीत, पण जर एखादं मानसिक लक्षण जास्त दिसत असेल, तर काही प्रमाणात औषधांचा वापर केला जाऊ शकतो. अर्थात, ते औषधही मानसोपचारतज्ञांनी दिलेलं असलं पाहिजे. बाकी या व्यक्तींना मानसोपचार थेरपींनी- उदा ‘ DBT’ (Dialectical behavior therapy), ‘ CBT’ (Cognitive behavioral therapy) यांनी चांगली मदत मिळू शकते. त्यांचीही माहिती पुढील लेखांमध्ये घेऊ या.

‘आमचे ‘हे’ म्हणजे जमदग्नीचे अवतार आहेत’, ‘तिचा कोणावरच पूर्ण विश्वास नाही. स्वत:वरसुद्धा ती विश्वास ठेवते की नाही कुणास ठाऊक!’, ‘लहानपणी खोड्या करतो म्हणता म्हणता हा कधी गुन्हेगारीच्या वाटेवर गेला कळलंच नाही…’ असे उद्गार आपण ऐकतो, तेव्हा त्या व्यक्तींबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांना या सगळ्याचा किती त्रास होतो हे आपण समजू शकतो. एक वर्ष- दोन वर्षं नाही, आयुष्यभर अशा व्यक्तींबरोबर राहताना, त्यांना समजून घेताना, प्रसंगी दयाभाव दाखवताना येणारा थकवा (compassion fatigue) अनुभवावा लागतो. प्रत्यक्ष या कुटुंबीयांमध्ये कोणती समस्या नसतानासुद्धा त्यांना या व्यक्तिमत्त्व विकारांच्या अप्रत्यक्ष परिणामांना सामोरं जावं लागतं.

हेही वाचा : जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!

हे व्यक्तिमत्त्व विकार समजून घेतल्यामुळे या व्यक्तींना हाताळणं थोडे सोपं जावं, हाच या सदराचा महत्त्वाचा हेतू. एकविसावं शतक जर मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचं असेल, तर आपलं आणि आपल्या कुटुंबीयांचं, समाजाचं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपल्याला याबाबतीत साक्षर व्हावं लागेल. या नवीन सदरातून हा प्रयत्न करू या.

trupti.kulshreshtha@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality disorders in humans and diagnostic statistical manual of mental disorders css
Show comments