स्त्रीभ्रूणहत्या आणि बालविवाहासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या राजस्थानमधल्याच एका छोटय़ाशा पिपलांत्री गावात आता प्रत्येक मुलीचा जन्म १११ झाडं लावून साजरा केला जातो. आत्तापर्यंत सुमारे तीन लाख झाडं वाढवणाऱ्या या गावाने कात टाकली आहे. स्त्रिया आर्थिक स्वातंत्र्य अनुभवत आहेत. मुलीच्या वाढीबरोबरच पर्यावरण संरक्षण आणि पाणीसंवर्धन करणाऱ्या या गावाबद्दल.. काल (५जून) साजरा केल्या गेलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त.
बेटी अभिशाप नही आशीर्वाद है और पेड-पौधे हमारी संतान’ ही केवळ घोषणा नाही तर राजस्थानमधील पिपलांत्री गावाने ती प्रत्यक्षात आणली आहे. एका अतिशय छोटय़ा, पण अनोख्या मोहिमेने हे पिपलांत्री गाव गेल्या नऊ वर्षांत देशाच्या मानचित्रावर आले आहे. स्त्री-भ्रूणहत्या आणि बालविवाहासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या राजस्थानमध्ये आता मुली श्वास घेताहेत, शिकत आहेत. इतकंच नाही तर इथल्या स्त्रिया आता स्वत:च्या पायावर उभं राहून रोजगारनिर्मितीही करीत आहेत. आणि हे सर्व होत आहे तेथील गावकऱ्यांनी उभ्या केलेल्या हिरव्यागार वनश्रींच्या पाश्र्वभूमीवर.
आज या छोटय़ाशा गावात सुमारे तीन लाख झाडांचं जंगल उभं राहिलं आहे. मुलींचा जन्म रोपांच्या झाडांच्या साक्षीने साजरा करणाऱ्या या गावाची कहाणीही तितकीच रोचक आहे.
भारतातली मुलींविषयीची अनास्था सर्वपरिचित आहे. भारतभरात गेल्या तीन दशकात तब्बल सव्वा कोटी स्त्री-भ्रूणहत्या झाल्या आहेत. या सर्वामध्ये आघाडीचं राज्य होतं, राजस्थान! स्त्री-भ्रूणहत्येचा या राज्याने कळस गाठला असे म्हटले तरी हरकत नसावी. त्याचाच भयावह परिणाम म्हणजे या राज्यात तरुण मुलींचं प्रमाण इतकं कमी होत गेलं की स्थानिक तरुणांना लग्नासाठी मुलीच शिल्लक राहिल्या नाहीत. आणि मग एक क्रूर वास्तव समोर आलं ते म्हणजे लग्नासाठी मुलींची सुरू झालेली खरेदी-विक्री. इतकंच कशाला ज्या घरात मुलगी जन्माला येऊ लागली त्याच दिवशी तिची लग्नगाठ दुसऱ्या घरातील मुलाशी बांधायला सुरुवात झाली. मुलींची कमी होत गेलेली संख्या अनेक प्रश्न निर्माण करत गेली. आणि त्यावर एक उपाय गवसला या छोटय़ाशा गावाला, मुली वाचवा, झाडं वाचवा आणि गावही! कारण तोपर्यंत संगमरवरासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात हिरव्यागार वनश्रींचंही दुर्भिक्षच होतं. पांढऱ्या संगमरवराच्या शोधात अवघे गाव काळोखाच्या खाईत लोटले गेलेले होते.
राजधानी जयपूरपासून अवघ्या ३५० किलोमीटर अंतरावर पिपलांत्री हे काही हजार घरांचे राजसमंद जिल्ह्य़ातले छोटेसे गाव! हा संपूर्ण परिसरच संगमरवरीच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. नव्हे तो त्याचसाठी ओळखलाही जातो. मात्र, गेल्या नऊ वर्षांत पिपलांत्री या छोटय़ाशा गावाने या ओळखीबरोबरच एक नवी ओळख तयार केलीय. स्त्री-भ्रूणहत्येवर अंकुश आणण्याचे त्यांचे प्रयत्न आणि त्याचा संबंध थेट पर्यावरणाशी जोडून या दोन्हींवर मिळवलेला विजय हा सगळ्यांसाठीच अभ्यासाचा विषय ठरला आहे. दशकभरापूर्वी या गावात फक्त घाणीचं साम्राज्य होतं! खाणीच्या आणि घाणीच्या विळख्यात सापडलेल्या या गावात गावकऱ्यांसाठी सोयी-सुविधा ही कोसो दूरची गोष्ट! गावावर चालत आलेले एकाच कुटुंबीयांचे वर्चस्वही हे त्यामागचं कारण असावं. त्यामुळे साहजिकच विकासाची मानसिकता कधी तयारच झाली नाही. मात्र, त्या कुटुंबाची एकाधिकारशाही संपुष्टात आली आणि गावचे सरपंच म्हणून श्यामसुंदर पालिवाल नामक व्यक्तीच्या हाती या गावाची कमान आली आणि अवघ्या आठ-नऊ वर्षांत स्वप्नवत वाटावेत असे या गावाचे चित्र पालटले.
गावाच्या विकासाचे ध्येय हाती घेतलेल्या पालिवाल यांनी आपला मूळ व्यवसाय बाजूला ठेवत घाणीच्या साम्राज्यातून गावाला बाहेर काढण्याचा जणू विडा उचलला. त्यासाठी पर्यावरणात हिरवी जादू आणणे गरजेचे होते. त्यासाठी सर्वात कठीण काम होते ते गावकऱ्यांची मानसिकता पालटण्याचे. मुलींच्या जन्माविषयीचा परंपरेचा पगडा घट्ट होता. स्त्री-भ्रूणहत्या सहज होत होती. काही वेळा तर तिला गर्भातच मारले जात होते. ही मानसिकता बदलवणे सहज सोपे नव्हतेच, पण त्याचबरोबरीने गावातील अधिकांश लोक अशिक्षित आणि जुन्या विचारांचे असल्याने त्यांना पर्यावरण, वृक्षारोपण हा विषयही पचणारा, रुचणारा नव्हता. गावातील मुलींची संख्याही वाढवायची होती आणि बरोबरीने झाडांचीही. काय करावे हा प्रश्न होता, निश्चय दृढ होता. आणि ती घटना घडली, पालिवाल यांच्या छोटय़ा मुलीचा, किरणचा झालेला अकस्मात मृत्यू. तेच निमित्त झाले आणि त्यांनी पर्यावरणाच्या बचावासाठी काम सुरू केले. किरणच्या स्मृतिप्रीत्यर्थ तुम्ही वृक्षारोपण करा, अशी विनंती त्यांनी अक्षरश: दारोदारी जाऊन सुरू केली.
ch16गावकऱ्यांसमोर त्यांनी एक विचार ठेवला. गावातील कोणत्याही कुटुंबात मुलगी जन्माला आली की सर्व समाजाने एकत्रित यायचे आणि १११ झाडे लावून त्याचे संवर्धन करायचे. २००६ पासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत कायम आहे. गावात मुलगी जन्माला आली की संपूर्ण समाज एकत्र येतो आणि १११ झाडे लावण्याचा सामुदायिक सोहळा पार पाडला जातो. आजतागायत या गावात, सरकारी जमिनीवर सरकारी योजनांच्याच सहकार्यातून सुमारे २ लाख ८६ हजार झाडांचे जंगल तयार झाले आहे. वृक्षारोपणासोबतच मुलीच्या भविष्याकरिता गावातील लोक आपापसात निधी जमा करून २१ हजार रुपये निधीच्या स्वरूपात गोळा करतात. दहा हजार रुपये मुलीच्या आई-वडिलांकडून मागितले जातात आणि असा ३१ हजार रुपयाचा निधी मुलीच्या नावाने बँकेत फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला जातो. मुलगी १८-२० वर्षांची झाल्यानंतर तिच्या लग्नासाठी वा तिच्या अन्य गोष्टींसाठी वापरला जातो. ही प्रक्रिया एवढय़ावरच थांबत नाही तर मुलीच्या आई-वडिलांकडून कागदपत्रांवर सहय़ा करून, करारनामा करून घेतला जातो. त्यात मुलीच्या संपूर्ण शिक्षणाची व्यवस्था करण्याचे वचन त्यांच्याकडून मागितले जाते. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतरच तिच्या लग्नाचा विचार करण्याची सक्ती-ताकीद यात दिली जाते. कुटुंबातील कुणीही व्यक्ती स्त्री-भ्रूणहत्येत सहभागी होणार नाही, असे वचन त्या कुटुंबीयांकडून घेतले जाते. मुलीच्या जन्मानंतर वृक्षारोपण आणि त्या लावलेल्या झाडांचा सांभाळ करण्याचा कायमस्वरूपी निश्चय तिच्या आई-वडिलांकडून करून घेतला जातो.
त्या झाडांचा सांभाळ ही केवळ त्या कुटुंबाचीच जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाचीसुद्धा असते. त्यामुळे गावातील लोक केवळ वृक्षारोपणच करीत नाहीत, तर पोटच्या पोराप्रमाणे त्याचा सांभाळ करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी अवघे गाव त्या वृक्षांना राखी बांधून त्याच्या संवर्धनाची शपथ घेतात. वृक्षसंवर्धनासाठी समोर आलेले हे गावकरी झाडांना उधई लागू देत नाहीत आणि त्यासाठी त्या संपूर्ण वृक्षांच्या सभोवताली कोरफडीची झाडे लावली जातात. वृक्षांच्या संवर्धनासाठी लावलेली कोरफडीची हीच झाडे आज गावकऱ्यांच्या उपजीविकेचे स्रोत बनली आहेत.
गावातील महिला बचत गटांमधील महिलांनी या कोरफडीपासून अनेक प्रकारची उत्पादने तयार केली आहेत. अ‍ॅलिव्हेरा फेस वॉश, बॉडी लोशन, शाम्पू या त्यांनी तयार केलेल्या उत्पादनासाठी त्यांना गावाबाहेर जावे लागत नाही, तर बाहेरची लोक त्या उत्पादनाच्या खरेदीसाठी गावापर्यंत येतात. या उत्पादनांच्या विक्रीतून या महिला दर महिन्याला बारा ते पंधरा हजार रुपये कमवू लागल्या आहेत. परिणामी या महिलांचा आर्थिक स्तर सुधारला आहे. त्यांची हीच प्रगती आता आधुनिकतेकडे त्यांची वाटचाल घडवून आणत आहे. हाताने उत्पादन तयार करणाऱ्या या महिला आता आधुनिक तंत्राचा, यंत्राचा वापर करून उत्पादनाच्या निर्मितीकडे वळल्या आहेत. आता माजी असणारे सरपंच श्यामसुंदर पालिवाल यांनी स्त्री-भ्रूणहत्या थांबवण्यापुरतेच आपले काम मर्यादित ठेवले नाही तर गावातील महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवले आहे.

पिपलांत्री या गावाचे इंग्रजी आणि हिंदीतील संकेतस्थळ आता तयार झाले आहे. या संकेतस्थळावर पंचायतमध्ये सुरूअसलेल्या विकास कार्यक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच भविष्यातील विकास योजनांची माहिती यात आहे. गावात किती लोकांकडे वीज कनेक्शन आहे, कोणत्या गावात अंगणवाडीची कामे सुरू आहेत, रुग्णालये आणि औषधालये कुठे आहेत, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च विद्यालय कुठे आहेत, जंगलाची स्थिती काय आहे, पाणी मिळवण्यासाठी कोणती कामे केली जातात, आदी पंचायतशी निगडित सर्व कार्यक्रमांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Grape
राज्यात ५० हजार एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड ? जाणून घ्या, नोटबंदी, कोरोना टाळेबंदी, नैसर्गिक आपत्तींचा परिणाम
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
96000 hectares of onion crops fraudulently insured
कांद्याच्या बोगस पीकविम्याचे पेव फुटले; जाणून घ्या, जिल्हानिहाय कांद्याचा बोगस पीकविमा
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…

सरकारी योजनांकडे आपण दुर्लक्ष करतो, पण सरकारी योजना योग्य पद्धतीने राबवली तर त्याचा असाही उपयोग होतो. मुलीच्या जन्मानंतर लावलेले झाड आणि तिच्यासाठी मुदत ठेवीत जमा केलेला पैसा या दोन्ही गोष्टी मुलीचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या आहेत. मुलगी सासरी जाईल तेव्हा हजारांच्या घरातील ‘एफडी’तला आकडा लाखांमध्ये पोहोचेल आणि भविष्याची ही तरतूद तिच्याच कामात येईल. त्याच वेळी लावलेली १११ झाडे मोठी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल. एका झाडाची किंमत एक लाख रुपये मानली तरीही एक कोटी रुपयाची संपत्ती ती मुलगी जाताजाता देऊन जाणार आहे. किती तरी पशुपक्ष्यांना आसारा मिळणार आहे. ती मुलगी गावासाठी एक वरदान आहे.
– श्यामसुंदर पालिवाल,
माजी सरपंच, पिपलांत्री, जिल्हा
राजसमंद, राजस्थान

सरकार आणि नागरिक एकत्र आल्यास काय चमत्कार घडू शकतो हे पिपलांत्रीने दाखवून दिले आहे. विकासाचे आदर्श मॉडेल म्हणूान हे गाव समोर आले आहे. संगमरवराच्या खाणींमुळे घसरत चाललेला पर्यावरणाचा स्तर पुन्हा उंचावण्याकरिता वृक्षारोपण आणि त्याचे जतन करण्यासाठी गावकऱ्यांनी स्वीकारलेले रक्षासूत्र यामुळेच गावाच्या विकासासोबतच ते हायटेकसुद्धा झाले आहे.
बद्रिलाल स्वर्णकार
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी, राजसमंद

पहाडांनी वेढलेल्या आणि पहाडी परिसरात वसलेल्या पिपलांत्री गावात संगमरवराच्या खाणींमुळे सतत खोदकाम सुरू असते. परिणामी येथील भूजल स्तर सातत्याने खालावत चालला आहे. पहाडाच्या खाली उतरत्या भागात गाव वसल्याने पावसाचे पाणीही थांबत नव्हते. कारण पावसाचे पाणी साठवण्यासाठी येथे झाडेच नव्हती. श्यामसुंदर पालिवाल यांना ही बाब खटकली. खाणींमुळे पाहता पाहता परिसर उजाड झाला. उत्खननानंतर निघणारी माती त्याच ठिकाणी टाकण्याची खाणमालकांची वृत्ती तिथल्या झाडांवर घाव घालून गेली. दरम्यान, काही झाडांवर गावकऱ्यांनी सरपणासाठी कुऱ्हाडीचे घाव घातले तर उरल्यासुरल्या हिरवळींवर त्यांच्या जनावरांनी हक्क दाखवला. अशा या उजाड झालेल्या माळरानावर हिरवळ पसरवणे काही सोपे काम नव्हते. मात्र पर्यावरण हा एकच ध्यास बाळगलेल्या पालिवाल यांनी गावातील वनसंपदा धोक्यात आल्याचे लक्षात येताच जलसंधारणाचे काम हाती घेतले. ग्रामीण विकासाचे सारे रस्ते जलसंरक्षणातूनच जातात हे त्यांच्या लक्षात आले. ग्रामपंचायत स्तरावर त्यांनी ग्रामस्वच्छता, बालिका शिक्षण, आरोग्य सुरक्षा आदी मुद्दय़ांवर गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भावनिक पूल बांधला आणि त्यांना वृक्षारोपणाच्या अभियानात जोडले.
मुलीच्या जन्मानंतर तर १११ झाडे लावली जात होतीच, पण त्याच वेळी व्यक्तीच्या मृत्यूनंतरही ११ झाडे लावण्याचा त्यांनी सोडलेला संकल्पही अविरत सुरू आहे. ओसाड झालेली सरकारची जमीन सरकारच्याच योजनांनी पुन्हा एकदा हिरवळीने फुलवण्यासाठी त्यांनी राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांना गळ घातली आणि पर्यावरणाचा मार्ग हा बालिकांच्या संरक्षणातून जात असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आणि ते पाळलेसुद्धा! मनरेगाअंतर्गत त्यांनी सुरुवातीला गावातील रस्ते मोठे करून मोठमोठय़ा रस्त्यांमध्ये त्याचे रूपांतर केले. सरकारी योजनांचा उत्कृष्ट व्यवस्थापनांतर्गत वापर केला तर गावाचा विकास कसा साधला जातो हे पालिवाल यांनी दाखवून दिले. जलसंरक्षणानिमित्त अतिशय छोटय़ा छोटय़ा गोष्टी त्यांनी अमलात आणल्या. या योजनेत गावकऱ्यांनीसुद्धा त्यांचे पाच ते दहा टक्के योगदान दिले. नरेगाच्या योजनांमधून लोकांनी उत्साहाने श्रमदान केले आणि जलसंरक्षणाची मोठी साखळी तयार केली.
हिमाचल प्रदेशातील पहाडांवर ज्या पद्धतीने लहान लहान कालवे तयार करून नैसर्गिक वनौषधी त्या ठिकाणी लावण्यात आल्या, तोच प्रयोग पिपलांत्रीतही करण्यात आला. या वनौषधींना वाचवण्यासाठी त्याच गटात मोडणाऱ्या कोरफड आणि केळीची झाडे त्यांनी लावली. केळीच्या झाडांमध्ये पाणी थांबवून ठेवण्याची क्षमता असते आणि उन्हाळ्यात इतर झाडांना जीवदान देण्याची क्षमतासुद्धा! या परिसरात सुमारे चारशेहून अधिक केळींची झाडे लावण्यात आली आहेत आणि २ लाख २५ हजार वनौषधींची रोपे. सुमारे २५ लाखांहून अधिक कोरफडीची रोपे त्यांना जगवण्यासाठी लावण्यात आली आहे. कोरफडीचे विशेष म्हणजे उतरत्या भागात माती थांबवून ठेवण्याची क्षमता त्यात आहे. उन्हाळ्यात कोरफडीची पाने चिंबून जातात, पण नष्ट होत नाहीत. पावसात पुन्हा ते नव्याने उभारी घेतात. त्यामुळे एक प्रकारे कोरफडीने इतर झाडांना संरक्षण देण्यासोबतच जलसंग्रहण योजनेतही बरीच मदत केली आहे. ज्या गावात कधी काळी रोपे जगवणे कठीण जात होते, त्याच पिपलांत्री गावात जलसंधारणामुळे रोपांच्या जगण्याची शक्यता शत-प्रतिशत वाढली आहे. लावलेल्या रोपांचे प्रमाणसुद्धा शत-प्रतिशत आहे. कारण त्यामुळे नव्या नैसर्गिक रोपांनी या ठिकाणी जन्म घेण्यास सुरुवात केली आहे. गावकऱ्यांच्या एकजुटीचे ते फलित म्हणूनसुद्धा याकडे पाहिले जाते.
गावकरी भलेही अशिक्षित असतील, पण त्यांनी भविष्याकरिता केलेली तरतूद म्हणजेच वृक्षारोपणाच्या त्यांच्या कार्याने त्यांच्यातील एकजूट आणखी मजबूत झाली आहे. या गावात ना आता सरपणासाठी लाकडे तोडली जात, ना गावातील जनावरे त्या हिरवळीवर तिन्हीत्रिकाळ चरायला जात. संगमरवरासाठी खणल्या जाणाऱ्या खाणींनाही आता त्यांनी केलेल्या पर्यावरण विनाशाचा दंड भोगावा लागतो. वृक्षारोपणासाठी त्यांना त्यांचे योगदान आधी द्यावे लागते आणि नंतरच त्यांना खणनाची परवानगी मिळते. पहाडांनी वेढलेल्या या गावात संगमरवरासाठी सुरुवातीला मोठमोठय़ा कंपनींकडून खणन केले जात होते आणि खणनानंतरचा सारा मलबा त्याच गावातल्या जमिनीवर टाकला जात होता. श्यामसुंदर पालिवाल यांनी सरपंचपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिले कोणते कार्य हाती घेतले असेल तर ते म्हणजे या कंपन्यांना पर्यावरणाच्या विनाशापासून त्यांनी परावृत्त केले. यातील अनेक कंपन्या अवैधपणे उत्खनन करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या कंपन्यांजवळ खणनासाठी ना ग्रामपंचायतचे ना हरकत प्रमाणपत्र होते, ना प्रशासनाचे ना हरकत प्रमाणपत्र! एकटय़ाने विरोध केला तर कदाचित तो पुरणार नाही हे त्यांनाही लक्षात आले आणि गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी खाणमालकांना त्यांची जागा दाखवून दिली. शेवटी गावकऱ्यांचाच विजय झाला आणि त्याचा फायदाही गावकऱ्यांनाच मिळत आहे. पिपलांत्रीच्या हिरवळीतून खनिज गाडी गेल्यास त्या प्रत्येक गाडी मागे १०० रुपये विकास शुम्ल्क आकारले जाते. या आकारणीतून गोळा झालेला पैसा वृक्षसंवर्धनासाठी वापरला जातो. जलसंधारण आणि वनसंरक्षण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वनसंरक्षणाकरिता सरपणाची समस्या श्यामसुंदर पालिवाल यांनी सोडवली. गावकरी आता उन्नत एकचुलीचा प्रयोग करतात. सरकारी शाळांमध्ये निर्धूर चुली लावण्यात आल्या आणि आता गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.
प्रत्येक जंगल उद्ध्वस्त होण्यापासून वाचवणे हे गावकऱ्यांचे उद्दिष्ट झाले आहे आणि त्यामुळे वनांच्या संरक्षण व संवर्धनासोबतच जलसंरक्षण व संवर्धनाचा उद्देशसुद्धा सार्थ ठरत आहे. स्वजलधारा योजनेंतर्गत प्रत्येक घरात जनसहयोगामुळे पाणी उपलब्ध झाले आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे गावात त्यासाठी एकाही रुपयाचे वीज बिल भरावे लागत नाही आणि रात्रकालीन वीजही सहजपणे उपलब्ध होते. विशेष म्हणजे आता वनसंरक्षणातून जलसंरक्षणाची प्रक्रिया कशी पार पाडायची याचा नवा अध्याय पिपलांत्री या गावाने घालून दिला आहे. पिपलांत्रीची ‘वॉटर हॉर्वेस्टिंग सिस्टम’ची संकल्पना विदेशात रुजवली जात आहे.
मुलींच्या संरक्षणासोबतच पर्यावरण संरक्षणाचा या गावाने विडा उचलला आहे. मुलगी, पाणी आणि झाडं यांच्या संरक्षणाचा एकत्रित संगम पाहणे ही आपल्या देशातीलच नव्हे तर विदेशातील लोकांसाठीही एक पर्वणी ठरत आहे, हे या पिपलांत्रीचे मोठे यश आहे.
राखी चव्हाण – rakhi.chavhan@expressindia.com 

Story img Loader