स्त्रीभ्रूणहत्या आणि बालविवाहासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या राजस्थानमधल्याच एका छोटय़ाशा पिपलांत्री गावात आता प्रत्येक मुलीचा जन्म १११ झाडं लावून साजरा केला जातो. आत्तापर्यंत सुमारे तीन लाख झाडं वाढवणाऱ्या या गावाने कात टाकली आहे. स्त्रिया आर्थिक स्वातंत्र्य अनुभवत आहेत. मुलीच्या वाढीबरोबरच पर्यावरण संरक्षण आणि पाणीसंवर्धन करणाऱ्या या गावाबद्दल.. काल (५जून) साजरा केल्या गेलेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त.
बेटी अभिशाप नही आशीर्वाद है और पेड-पौधे हमारी संतान’ ही केवळ घोषणा नाही तर राजस्थानमधील पिपलांत्री गावाने ती प्रत्यक्षात आणली आहे. एका अतिशय छोटय़ा, पण अनोख्या मोहिमेने हे पिपलांत्री गाव गेल्या नऊ वर्षांत देशाच्या मानचित्रावर आले आहे. स्त्री-भ्रूणहत्या आणि बालविवाहासाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या राजस्थानमध्ये आता मुली श्वास घेताहेत, शिकत आहेत. इतकंच नाही तर इथल्या स्त्रिया आता स्वत:च्या पायावर उभं राहून रोजगारनिर्मितीही करीत आहेत. आणि हे सर्व होत आहे तेथील गावकऱ्यांनी उभ्या केलेल्या हिरव्यागार वनश्रींच्या पाश्र्वभूमीवर.
आज या छोटय़ाशा गावात सुमारे तीन लाख झाडांचं जंगल उभं राहिलं आहे. मुलींचा जन्म रोपांच्या झाडांच्या साक्षीने साजरा करणाऱ्या या गावाची कहाणीही तितकीच रोचक आहे.
भारतातली मुलींविषयीची अनास्था सर्वपरिचित आहे. भारतभरात गेल्या तीन दशकात तब्बल सव्वा कोटी स्त्री-भ्रूणहत्या झाल्या आहेत. या सर्वामध्ये आघाडीचं राज्य होतं, राजस्थान! स्त्री-भ्रूणहत्येचा या राज्याने कळस गाठला असे म्हटले तरी हरकत नसावी. त्याचाच भयावह परिणाम म्हणजे या राज्यात तरुण मुलींचं प्रमाण इतकं कमी होत गेलं की स्थानिक तरुणांना लग्नासाठी मुलीच शिल्लक राहिल्या नाहीत. आणि मग एक क्रूर वास्तव समोर आलं ते म्हणजे लग्नासाठी मुलींची सुरू झालेली खरेदी-विक्री. इतकंच कशाला ज्या घरात मुलगी जन्माला येऊ लागली त्याच दिवशी तिची लग्नगाठ दुसऱ्या घरातील मुलाशी बांधायला सुरुवात झाली. मुलींची कमी होत गेलेली संख्या अनेक प्रश्न निर्माण करत गेली. आणि त्यावर एक उपाय गवसला या छोटय़ाशा गावाला, मुली वाचवा, झाडं वाचवा आणि गावही! कारण तोपर्यंत संगमरवरासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात हिरव्यागार वनश्रींचंही दुर्भिक्षच होतं. पांढऱ्या संगमरवराच्या शोधात अवघे गाव काळोखाच्या खाईत लोटले गेलेले होते.
राजधानी जयपूरपासून अवघ्या ३५० किलोमीटर अंतरावर पिपलांत्री हे काही हजार घरांचे राजसमंद जिल्ह्य़ातले छोटेसे गाव! हा संपूर्ण परिसरच संगमरवरीच्या खाणींसाठी प्रसिद्ध आहे. नव्हे तो त्याचसाठी ओळखलाही जातो. मात्र, गेल्या नऊ वर्षांत पिपलांत्री या छोटय़ाशा गावाने या ओळखीबरोबरच एक नवी ओळख तयार केलीय. स्त्री-भ्रूणहत्येवर अंकुश आणण्याचे त्यांचे प्रयत्न आणि त्याचा संबंध थेट पर्यावरणाशी जोडून या दोन्हींवर मिळवलेला विजय हा सगळ्यांसाठीच अभ्यासाचा विषय ठरला आहे. दशकभरापूर्वी या गावात फक्त घाणीचं साम्राज्य होतं! खाणीच्या आणि घाणीच्या विळख्यात सापडलेल्या या गावात गावकऱ्यांसाठी सोयी-सुविधा ही कोसो दूरची गोष्ट! गावावर चालत आलेले एकाच कुटुंबीयांचे वर्चस्वही हे त्यामागचं कारण असावं. त्यामुळे साहजिकच विकासाची मानसिकता कधी तयारच झाली नाही. मात्र, त्या कुटुंबाची एकाधिकारशाही संपुष्टात आली आणि गावचे सरपंच म्हणून श्यामसुंदर पालिवाल नामक व्यक्तीच्या हाती या गावाची कमान आली आणि अवघ्या आठ-नऊ वर्षांत स्वप्नवत वाटावेत असे या गावाचे चित्र पालटले.
गावाच्या विकासाचे ध्येय हाती घेतलेल्या पालिवाल यांनी आपला मूळ व्यवसाय बाजूला ठेवत घाणीच्या साम्राज्यातून गावाला बाहेर काढण्याचा जणू विडा उचलला. त्यासाठी पर्यावरणात हिरवी जादू आणणे गरजेचे होते. त्यासाठी सर्वात कठीण काम होते ते गावकऱ्यांची मानसिकता पालटण्याचे. मुलींच्या जन्माविषयीचा परंपरेचा पगडा घट्ट होता. स्त्री-भ्रूणहत्या सहज होत होती. काही वेळा तर तिला गर्भातच मारले जात होते. ही मानसिकता बदलवणे सहज सोपे नव्हतेच, पण त्याचबरोबरीने गावातील अधिकांश लोक अशिक्षित आणि जुन्या विचारांचे असल्याने त्यांना पर्यावरण, वृक्षारोपण हा विषयही पचणारा, रुचणारा नव्हता. गावातील मुलींची संख्याही वाढवायची होती आणि बरोबरीने झाडांचीही. काय करावे हा प्रश्न होता, निश्चय दृढ होता. आणि ती घटना घडली, पालिवाल यांच्या छोटय़ा मुलीचा, किरणचा झालेला अकस्मात मृत्यू. तेच निमित्त झाले आणि त्यांनी पर्यावरणाच्या बचावासाठी काम सुरू केले. किरणच्या स्मृतिप्रीत्यर्थ तुम्ही वृक्षारोपण करा, अशी विनंती त्यांनी अक्षरश: दारोदारी जाऊन सुरू केली.
त्या झाडांचा सांभाळ ही केवळ त्या कुटुंबाचीच जबाबदारी नाही तर संपूर्ण समाजाचीसुद्धा असते. त्यामुळे गावातील लोक केवळ वृक्षारोपणच करीत नाहीत, तर पोटच्या पोराप्रमाणे त्याचा सांभाळ करतात. रक्षाबंधनाच्या दिवशी अवघे गाव त्या वृक्षांना राखी बांधून त्याच्या संवर्धनाची शपथ घेतात. वृक्षसंवर्धनासाठी समोर आलेले हे गावकरी झाडांना उधई लागू देत नाहीत आणि त्यासाठी त्या संपूर्ण वृक्षांच्या सभोवताली कोरफडीची झाडे लावली जातात. वृक्षांच्या संवर्धनासाठी लावलेली कोरफडीची हीच झाडे आज गावकऱ्यांच्या उपजीविकेचे स्रोत बनली आहेत.
गावातील महिला बचत गटांमधील महिलांनी या कोरफडीपासून अनेक प्रकारची उत्पादने तयार केली आहेत. अॅलिव्हेरा फेस वॉश, बॉडी लोशन, शाम्पू या त्यांनी तयार केलेल्या उत्पादनासाठी त्यांना गावाबाहेर जावे लागत नाही, तर बाहेरची लोक त्या उत्पादनाच्या खरेदीसाठी गावापर्यंत येतात. या उत्पादनांच्या विक्रीतून या महिला दर महिन्याला बारा ते पंधरा हजार रुपये कमवू लागल्या आहेत. परिणामी या महिलांचा आर्थिक स्तर सुधारला आहे. त्यांची हीच प्रगती आता आधुनिकतेकडे त्यांची वाटचाल घडवून आणत आहे. हाताने उत्पादन तयार करणाऱ्या या महिला आता आधुनिक तंत्राचा, यंत्राचा वापर करून उत्पादनाच्या निर्मितीकडे वळल्या आहेत. आता माजी असणारे सरपंच श्यामसुंदर पालिवाल यांनी स्त्री-भ्रूणहत्या थांबवण्यापुरतेच आपले काम मर्यादित ठेवले नाही तर गावातील महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा