‘‘कधी कधी ठरवूनही रुजवता येत नाही कवितेचा गर्भ. वांझ जमिनीसारखं पडून रहावं लागतं दिवसेंदिवस. सुचत नाही एकही शब्द. घुसमट वाढत जाते जिवाची. असह्य होतात दिवस. रात्र रात्र तळमळत राहतो आपण. आणि एखाद्या क्षणी गच्च भरलेल्या धान्याच्या कोठाराची कवाडं उघडल्यावर जसे सरसर दाणे येत राहतात हातात तसेच शब्द उतरायला लागतात मनातून हातात आणि हातातून कागदावर. कागदावर उमटते तेव्हाच खऱ्या अर्थानं कविता जन्माला येते.’’ लेखनामागची वेणा उलगडून दाखवताहेत सुप्रसिद्ध कवयित्री आणि कथाकार नीरजा.
एक बंद दरवाजा. अलिबाबाच्या गुहेला असतो तसा. कितीही धडका मारल्या तरी उघडत नाही तो. या दाराआड काय असतं नेमकं? जन्म आणि मृत्यू यामधील प्रवास करताना घडलेल्या प्रत्येक घटनेचे मनावर उमटलेले ठसे, त्या प्रवासात भेटलेली अनेक स्वभावाची माणसं, त्या हजारो घटना आणि माणसांच्या आठवणींचा कोलाज, जगताना घेतलेल्या अनुभवाच्या टोकदार काचांचे तुकडे, वाचलेल्या अनेक पुस्तकांची फडफडती पानं, त्यावरचे शब्द आणि बरंच काही..
आपल्या सर्वाच्या आत असते ही नेणिवेची गुहा. त्या गुहेत शिरत नाही आपण सहसा. आलेला प्रत्येक क्षण सारत जातो या गुहेच्या दाराआड आणि एखाद्या अडगळीच्या खोलीसारखी ही गुहा सामावून घेते बारीसारीक क्षणांनाही. दार बंद करून जगत राहतो आपण आपलं रोजचं जगणं. पण गर्दी झाली तिथं की या दाराआतल्या अनेक गोष्टी धडका मारायला लागतात, बाहेर येऊ पाहतात. त्या येतातही. कधी आक्रमक होऊन उगारतात हात, कधी विव्हळत राहतात, वाहत राहतात अश्वत्थाम्याच्या जखमेसारख्या अविरत. त्यांच्याकडे नाही लक्ष दिलं तर त्या जखमा बदलून जातात एखाद्या व्रणात, एक वेदना बनून टोचत राहतात भोवरी टोचावी तशा. तो ठसठसता सल घेऊन जगताना कधी कधी माणूस बनत जातो कडवट; जगावर रागवतोच पण स्वत:च्या जगण्याचाही राग राग करायला लागतो. अशा वेळी वाटतं या नेणिवेच्या दाराची कळ उघडण्याचा पासवर्ड असलेला कोणीतरी यावा आणि  खुल जा सिम सिम म्हणत शिरावा आत. कवटाळून घ्यावं त्यानं आत दडलेल्या साऱ्या घालमेलींना, अलगद हात फिरवावा त्यावरून आणि सुईसारख्या टोकदार शब्दांच्या साहाय्यानं बाहेर काढावं त्या खुपणाऱ्या जखमांना. पण नाही येत तो. वाट पाहून पाहून कंटाळतो आपण शोधत राहतो आजूबाजूला व्याकूळ होऊन आणि एक दिवस जाणवतं अचानक, हा पासवर्ड आपल्याच हातात असल्याचं.
माझ्या हातात हा पासवर्ड असल्याचं कळलं मलाही एक दिवस आणि उघडली गेली नेणिवेची गुहा. आत कोंडलेल्या हजारो अनुभवांचे शब्द झाले आणि भळभळायला लागले वहीच्या पानावरून.
लहानपणापासून केलेलं भरताड वाचन, त्यातली पात्र आणि माझं आजूबाजूचं जग, ते समजून घेण्याचा प्रयत्न करताना लिहिलेल्या कविता माझ्या समीक्षक असलेल्या बापाला मात्र तितक्याशा भावत नव्हत्या. त्यांना माझ्याकडून हवं होतं काहीतरी विलक्षण, अस्वस्थ करणारं. आणि ते त्यांना मिळालं ते मी ‘आजतरी तो नक्की येईल’ ही कविता लिहिली तेव्हा. ही कविता म्हणजे जगाच्या निर्मितीपासून आजपर्यंतचा सारा सांस्कृतिक पट उभी करणारी कविता होती त्यांच्या दृष्टीनं. भारतीय आणि पाश्चात्त्य मिथकांचा कोलाजच होता तो.
इथूनच भीष्मानं त्याच्या बापाची वरात आणली
आणि इथूनच इव्ह आणि साप
हसत हसत गप्पागोष्टी करत गेले
इथेच कुणा द्रौपदीची वस्त्रं फेडली आणि
त्याच्याच पताका करून इथूनच
पंढरपूरची िदडी गेली
अजूनही तो आला नाही.
तेच झाड
तोच रस्ता
क्षितिज खणून पुढं गेलेला
वेळेचं नीटसं आठवत नाही,
पण आजतरी तो नक्की येईल.
नराश्य दाटून राहिलेलं असतं मनात, पण एका दुर्दम्य आशेवर जगणाऱ्या माणसाचा सांस्कृतिक इतिहास सांगणारी ही माझी कविता बाबांनी अक्षरश: डोक्यावर घेतली होती. माझ्या दृष्टीनं हा सगळ्यात महत्त्वाचा क्षण होता माझ्या निर्मितीच्या कळांना हलक्या हातानं गोंजारणारा.
खरंच काय व्याख्या आहे कवितेची? वर्डस्वर्थनं म्हटल्याप्रमाणे भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार की स्वत:ला व्यक्त करण्याचं केवळ एक साधन? खरंच कविता उत्स्फूर्त असते का? की आपण हवं तेव्हा हवं ते लिहू शकतो? एखाद्या कारखान्यात वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल साच्यात घातला की त्या साच्यासारख्या हुबेहूब वस्तू बाहेर पडायला लागतात. तशीच असते का ही निर्मिती? घाला अनुभवांचा कच्चा माल साच्यात आणि काढा बाहेर हव्या तेवढय़ा कविता!
इतकी सहज सोपी नसते कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया. वाटेल तेव्हा नाही येत ती. तिच्या जन्माच्या वेणा भोगाव्या लागतातच प्रत्येक कवीला. वाट पाहावी लागते गर्भ धरण्याची, तो धरल्यावर त्याला जपावंही लागतं जीवाच्या आकांतानं. नाहीतर निसटून जातो तो हाताच्या ओंजळीतून पाण्यासारखा. एखाद्या विजेसारखे लख्ख चमकलेले असे मोत्याच्या दाण्यासारखे अस्सल शब्द माझ्याही हातून किती वेळा निसटले आहेत. मग कितीही प्रयत्न केला तरी सापडत नाहीत ते पुन्हा. असे रुजता रुजता किती गर्भ खुडले गेले याची गणतीच करता येत नाही कवीला.
कधी कधी तर ठरवूनही रुजवता येत नाही कवितेचा गर्भ. वांझ जमिनीसारखं पडून रहावं लागतं दिवसेंदिवस. सुचत नाही एकही शब्द. घुसमट वाढत जाते जिवाची. असह्य होतात दिवस, रात्र रात्र तळमळत राहतो आपण आणि एखाद्या क्षणी गच्च भरलेल्या धान्याच्या कोठाराची कवाडं उघडल्यावर जसे सरसर दाणे येत राहतात हातात तसेच शब्द उतरायला लागतात मनातून हातात आणि  हातातून कागदावर. कागदावर उमटते तेव्हाच खऱ्या अर्थानं कविता जन्माला येते.
खूप रोमँटिक वाटेल हा अनुभव, पण असाच असतो तो काहीसा हातात पकडता न येणारा निर्मितीचा क्षण. मुलाला जन्म दिल्याचा आनंद जसा भोगते स्त्री तसाच थकवाही असतो प्रचंड वेदनेचा प्रवास केल्यानंतरचा. कविता आणि कथा लिहून झाल्यावर मलाही असाच आनंद मिळतो, वेदनेतून सुटका झालेल्या आणि नवनिर्मिती केलेल्या बाईला मिळतो तसा आणि त्याबरोबरच विलक्षण थकवा जाणवतो. विशेषत: कथा लिहिल्यावर तर खूप थकून जाते मी. त्या त्या कथेतील पात्रांचे ताण, त्यांचे संघर्ष, त्यांचे राग लोभ, त्यांचे आनंद, त्यांच्या वेदना सारंच लेखकाला सहन करावं लागतं. तो त्या साऱ्या भावभावनांतून, भावनिक ताणातून जात असतो. मीही माझ्या पात्रांचं जगणं स्वत: जगत असते त्यामुळे प्रत्येक कथेनंतर हा भावनिक थकवा येतोच. हे साऱ्याच कथांच्या बाबतीत थोडय़ाफार प्रमाणात होत असतं. ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ या कथासंग्रहातील ‘महिषासुर मर्दनिी’सारखी कथा असो की ‘सुटका’सारखी कथा असो, ‘ओल हरवलेली माती’ या संग्रहातील याच शीर्षकाची कथा असो किंवा ‘सावर रे’, ‘तिच्या मुलीचा बाप’सारखी कथा असो हा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. ‘जे दर्पणी िबबले’ या कथासंग्रहात ‘विटाळ’ नावाची एक कथा आहे. ती कथा लिहितानाचा अनुभव तर विलक्षण होता. या कथेची सुरुवात तर अगदी सहज सुचली होती, पण शेवटाला येताना झालेली दमछाक मी आजही अनुभवते. मानसिकदृष्टय़ा विकलांग असलेल्या बहिणीला सांभाळता सांभाळता तिच्या वयात आलेल्या शरीराकडे ओढला गेलेला आणि त्यातून तिला गर्भ राहिल्यानं गोंधळून गेलेला सदा या कथेचं मुख्य पात्र. या प्रसंगातून तिची आणि स्वत:चीही सुटका करायची असते त्याला. शेवटी संभोगातून गर्भ पाडण्याचा प्रसंग या कथेत आला आहे. तो भडक होऊ न देता त्यातली अपराधी भावना, असहायता, वेदना आणि त्या प्रसंगातील तीव्रता माझ्याच मनापर्यंत पोचवायची होती मला. वाचकांचा विचारच केला नव्हता मी तेव्हा. फक्त माझ्या मनाला ते सारं जाणवायला हवं होतं. ती कथा मी तेव्हा तीन वेळा लिहिली होती. कच्चा खर्डा, मग बाबांना वाचता येईल असा दुसरा खर्डा आणि शेवटी छापण्यासाठी पाठविण्याचा तिसरा खर्डा. तीन वेळा त्याच वेदनेतून जाण्याचा तो प्रवास आजही अंगावर काटा आणतो.
का कुणास ठाउक, पण निसर्गाचे विविध चमत्कार पाहून किंवा प्रेमात पडलेल्या प्रेमिकांचे विभ्रम पाहून मोहरलेल्या मनाची कविता नाही लिहिता आली मला.  माझ्या आजूबाजूचं वास्तव हे लोकप्रिय कथा कादंबरीतल्या किंवा नाटक, सिनेमातल्या जगापेक्षा वेगळं होतं. या भ्रामक जगालाच खरं जग समजून जगणाऱ्या स्त्री-पुरुषांचं भावविश्व खऱ्या जगात जगायला लागल्यावर विस्कटून जाताना मी पाहात होते. जग खूप कठोर असतं याची जाणीव जगताना होत होती. त्याग, समर्पण, सेवाभाव, मातृत्व, वात्सल्य अशा शब्दांनी बाईच्या जगण्याचं उदात्तीकरण करणाऱ्या समाजात बाईला काडीचीही किंमत नसल्याचं मी पाहात होते. अनेक परंपरा रूढींच्या बेडय़ांत स्वत:ला अडकवून घेतलेल्या, नवरा नामक पुरुषाची मर्जी सांभाळत साऱ्या कुटुंबाला सांभाळताना हताश झालेल्या आणि जगण्याच्या परीक्षा देत देत पुढं निघालेल्या बाया मी पाहात होते. माणसा माणसात असलेलं सौहार्द पाहतानाच धर्म, वर्ग आणि जातीच्या कप्प्यात विभागलेली माणसं पाहात होते. त्यांना प्याद्यासारखं वापरून बाजूला सारणारे, राजकीय बळानं माज आलेले लोकप्रतिनिधी पाहात होते. एकीकडे आनंदात असलेली मत्री, प्रेम या भावनांना जपणारी माणसं एखाद्या प्रसंगात अत्यंत क्रूर होताना पाहात होते. हे असं आयुष्य आजूबाजूला दिसत असलं तर कवितेत हिरवे हिरवे गार गालिचे आणि त्यावर बागडणारी फुलराणी नाहीच दिसणार ना! त्यामुळे माझ्या कवितेत आली ती वयात आल्याबरोबर संपून गेलेली मुलगी, शेजेच्या सुगंधात गुदमणारी ओलीचिंब हळद, किचननामक भट्टीमध्ये आपल्या अस्तित्वाचे लचके तोडून खरपूस भाजून त्याला हवे तेव्हा सव्‍‌र्ह करणारी आणि त्यानं दाखवलेला वंशावळीचा आल्बम पाहून विझून गेलेली बाई.  ‘मला काढून टाकायचा आहे गर्भाशयावरच्या वाटेवरचा त्याचा अहोरात्र पहारा’ असं म्हणत शरीरावरून निघणाऱ्या स्वप्नांच्या पाऊलवाटांची नाकेबंदी करत, बंडाचं निशाण हातात घेऊन निघालेली बाई. याबरोबरच आला तो देवाच्या दारात घातलेला रक्तसडा, रामनमाच्या फोलपटांची भाकर थापणारे हात, हरवलेले देव शोधायला बाहेर पडल्यावर स्वत:तून हरवलेली माणसं, जागतिकीकरणाच्या लाटेत स्वत:च शॉिपग मॉल्स झालेली आणि ग्लोबल गावात निर्थकाचे पक्षी आकाशात उडवत बसलेली माणसं.   
कविता लिहिण्यासाठी तुम्हाला कोणती भूमिका घेण्याची, एखादा इझम समजून घेण्याची गरज नसते. मी लिहायला लागले तेव्हा कुठं माहीत होता मला स्त्रीवाद आणि मार्क्‍सवाद. पण एक बाई म्हणून जन्माला आल्यावर बाईचा भोगवटा वाटय़ाला येतोच. तो अगदी तंतोतंत सारखा नसेल प्रत्येकीचा. पण या व्यवस्थेच्या चौकटीतला असतोच. हजारो प्रश्न असतात. माणूस म्हणून जगण्याचे आणि बाई म्हणून जगण्याचे आणखी वेगळे प्रश्न. त्या प्रश्नांसकट जगताना केवळ बाई म्हणून नाही तर माणूस म्हणूनही या जाचक चौकटी तोडून मानवतेकडे घेऊन जाण्याचा प्रवास करण्याचं स्वप्न पाहात असतोच ना आपण. प्रत्येकाच्या मनात या वर्गीय, जातीय, िलगाधिष्ठित किंवा धार्मिक चौकटीपलीकडे जाऊन जगण्याची इच्छा असतेच. फक्त आपल्या आजूबाजूचा समाज आपल्याला तसं जगू देत नाही. आपल्या जन्मापासून आपल्याला चिकटलेले वर्ग, वर्ण, जात, धर्म आणि िलग यांचं वास्तव घेऊन जगायची सक्तीही केली जाते अनेकदा. आणि ही सक्ती आहे हे जाणवलं की तोडायची, नाकारायची भाषा एका मर्यादेनंतर प्रत्येकजण करायला लागतो. मीही तो प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात माझ्या कवितेतली स्त्री आक्रमक झाली होती, या व्यवस्थेला सतत प्रश्न विचारत होती. उदाहरणार्थ त्या काळात आपल्या पुराणातील अनेक स्त्रिया माझ्या मनात प्रश्न उभ्या करत होत्या. कधी मी त्यांना प्रश्न विचारत होते तर कधी त्यांचं दु:ख स्वत: भोगत होते. द्रौपदीच्या मनातली व्यथा व्यक्त करताना मी एका कवितेत म्हटलं होतं,
कुंडातल्या चार चौकटीतला मासा
आंधळा झाला
आणि साऱ्याच वाटा बंद झाल्या
अंधारात मी तरी कुठं धर्म शोधणार?
अधर्मालाच दिली सारी दाने
तेव्हापासून आजपर्यंत
किती वस्त्रहरणे किती वस्त्रहरणे.
स्त्रीचं परंपरांच्या नावाखाली चालणारं शोषण आजही थांबलेलं नाही. तिच्या वाटय़ाला आलेलं दुय्यमत्व काही अपवाद सोडले तर कमी झालेलं नाही. आजही ती शिकली असली, स्वत:ला अधुनिक म्हणत असली तरी परंपरेनं आखून दिलेल्या वाटेवरच चालत राहते. मग माझ्या हातून आपोआप लिहिलं जातं,
स्वत:च्या नावाची फाइल ती
उघडत नाही चुकूनही
त्याच्याच फाइलमध्ये आपलं नाव
लिहिते वळणदार
ती कॉम्प्युटर शिकते मुलीबरोबर
आणि मुलगी शिवणटिपण आईबरोबर.
आपल्या आजूबाजूची माणसं आणि त्यांची मनं जपताना स्वत:चं स्वत्त्व हरवून बसणारी स्त्री माझ्यातही होती. लग्नानंतर नवी माणसं, नवं घर, नोकरी हे सांभाळताना बाहेरच्या जगाशी संबंध तुटल्याचा अनुभव घेतला मी. एकीकडे साऱ्या जगण्याचा नव्यानं विचार करत होते मी आणि प्रत्यक्ष जगण्यात परंपरेनं आखून दिलेल्या वाटेवरून चालत होते. आपल्या विचारांत आणि प्रत्यक्ष जगण्यातला हा विरोधाभास जाणवत होताच. हे असं दोन दगडावरचं जगणं सहन होत नव्हतं आणि ते नाकारून समाजमनाला दुखावण्याची िहमतही नव्हती. स्वत:ला हवं तसं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असलेल्या घरातून परंपरांच्या पसाऱ्यात स्वत:ला अडकवून घेतलेल्या घरात जाणाऱ्या मुलींच्या वाटय़ाला येणारी घुसमट माझ्याही वाटय़ाला आली. त्यामुळेच ‘सावित्री’सारखी कविता माझ्याकडून लिहून झाली. त्यात म्हटलं होतं,
आम्ही पाचोळा  
पुराणकथांनी फोफावलेल्या या वृक्षाचा
बांधल्या जातो आहोत हजारो नात्यांनी
आणि रेशमी धाग्यांनी
कुरवाळतो आहोत त्यांच्या अहंकारी प्रेमाला
आणि जन्मोजन्मी त्यांच्याच नावाचे टिळे मागत शृंगारतो स्वत:ला
‘आईस पत्र’सारखी कवितेची मालिकाही याच काळात माझ्या हातून लिहून झाली. त्या मालिकेतल्या एका कवितेत मनातल्या मनात आईला लिहिलेल्या पत्रात मुलगी म्हणते,
इथं आल्यानंतरच्या हजारो घटका
संपलेल्या प्रेमाशी इमान राखण्यात    
घालवल्या
उरलेल्या वेळात किचन नामक भट्टीमध्ये
माझ्या अस्तित्वाचे लचके तोडून,
खरपूस भाजून त्याला हवे तेव्हा सव्‍‌र्ह केले.
आई हे तुझ्याहून वेगळं नाही
फक्त विटंबनांचे संदर्भ बदलत असतात
एवढंच.
मला वाटतं आपल्याकडच्या अनेक बायकांच्या  वाटय़ाला ही घुसमट येत असते. पदरात पडलेलं जगणं त्या स्वीकारतात, परिस्थितीशी तडजोड करतात. अशा वेळी ‘आपल्यासाठी एवढंच जग, दुसरं चांगलं कुठून आणायचं?’ असा कवयित्री अनुराधा पाटील यांच्यासारखा अनेकांना प्रश्नही पडतो. पण मला मात्र उलट प्रश्न पडला. का नसावं याहून चांगलं जग माझ्यासाठी? आणि ते मिळवायचं असेल तर मला परंपरांनी भरलेली माझी पाटी पुसून ओल्या ढगांच्या साक्षीनं नवे शब्द गिरवायला हवेत त्याच्यावर. त्यामुळेच मग अक्षरांचे थवे घेऊन केवळ माझ्या कवितेतल्याच बाया बाहेर पडल्या नाहीत तर कथेतील स्त्रियाही आपल्या स्वत्त्वशोधाच्या प्रवासाला निघाल्या. स्वत:च्या जगण्याचा विचार करायला लागल्या. मग ती ‘जवळ तरी दूर’ मधली माई असो, ‘सावर रे’ मधली मानसी असो की ‘ओल हरवलेली माती’मधली फातिमाबी असो. प्रत्येकीचं वेगळं आयुष्य आहे, वेगळे प्रश्न आहेत आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही वेगवेगळे आहेत. पण प्रत्येकीचा प्रवास हा आत्मशोधाचा प्रवास आहे. तो वेदनेचा आहे, त्याला कारुण्याची झालर आहे, स्त्री-पुरुष नात्यातल्या तरल बंधाचा शोध घेतानाच त्यातलं सत्ताकारणही त्या समजून घेतात. पण माझ्या नायिका परिस्थितीशरण नाहीत. त्या स्वत:ला शोधू पाहातात; कारण माझा स्वत:चा या शोधावर विश्वास आहे.
माझ्या कथा-कवितांतून मिळणारा अनुभव मनाला विसावा देणारा नसतोच कधी. तो सतत अस्वस्थ करणारा असतो. त्यामुळेच मला वाटतं, माझं लेखन किंवा माझी कविता ही माझ्या जगण्याचे संदर्भ तपासून पाहताना मनात उठलेल्या कल्लोळांचं प्रगटीकरण असतं माझ्यासाठी.


‘चतुरंग मैफल’मध्ये पुढील शनिवारी (२९ जून) च्या अंकात सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्मात्या स्मिता तळवलकर

Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Loksatta chaturang article English playwright Christopher Marlowe Dr Faust plays journey of life
मनातलं कागदावर : स्वर्ग की नरक?
chaturang loksatta
जिंकावे नि जगावेही : शब्द शब्द जपून ठेव…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध