नीरजा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाऊस सखा सोबती होतो आपला आपल्या एकांतात आणि दाटून येतो अंगभर तसाच. कधी कधी कोसळतो आकांताने जगण्यावरच. नात्यांची वीण जशी घट्ट करत जातो तसाच ती उद्ध्वस्तही करतो. विश्वांताच्या पावसाचा आवाज ऐकला तरी छातीत धस्स होऊन जातं. कधी सुखावणारा तर कधी आत आत कळ उमटवून जाणारा, तर कधी दु:खाच्या काठावर नेऊन सोडणारा पाऊस आपल्या आयुष्याला व्यापून राहिलेला असतो कायम..
मेघ सावळा फुलारूनिया विरघळला अंबरी
कलत्या रविचे ऊन विंचरित आल्या श्रावणसरी
तुषार चुंबुन किरण कोवळे कलती पूर्वेकडे
वसुंधरेला इंद्रधनूचे स्वप्न गुलाबी पडे.
(कवी शंकर वैद्य)
लांबलेला पाऊस हळूहळू कोसळायला लागला आणि हिरव्या रंगाच्या दुलईत उबदार पहुडलेल्या धरित्रीच्या हजारो पायवाटा खुणावायला लागल्या की ढगांवर स्वार होऊन मंडळी बाहेर पडतात पावसाळी सहलींसाठी. एखादं रिसॉर्ट नाहीतर व्हिला बुक केला जातो आणि मग
मला हिरवा प्रदेश देतो हिरवा आदेश
चल सोडुनी खुराडे घाल पावसाचा वेष..
(कवी नलेश पाटील)
असं म्हणत पाऊसवेडे लोक निसर्गाच्या कुशीत शिरायला लागतात. पाऊस कोणाला आवडत नाही? मुसळधार पाऊस कोसळत असतो बाहेर आणि आपण आपल्या खिडकीत बसून त्याला डोळ्यांत भरून घेत राहतो. आभाळ उसवून बरसत येणाऱ्या पावसात चिंब भिजण्यासाठी जमिनीवर उतरतो. पण मला पावसात भिजण्यापेक्षा तो डोळ्यांत साठवायला आवडतो. त्याच्या वेगवेगळ्या छटा, त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा आवेग अनुभवासा वाटतो. पावसाच्या धारांची नक्षी तुटत तुटत ओंजळीत पडते तेव्हा चाखावासाही वाटतो. बाहेरच्या पावसाला दार उघडून घरात घेते मी आणि अंगावर ओढून घेत शिरते त्याच्या कुशीत गुडूप.
खरंच पाऊस काय असतो आपल्यासाठी नेमका? तो असतो एक हिरवं ओलं भान देणारा आप्त. आठवणींच्या धारांत चिंब भिजवणाऱ्या गाण्याच्या लकेरी. पाऊस असतो एखादी कथा. कधी कधी तर संपूर्ण कादंबरीच होतो पाऊस. कितीही वाचली तरी संपूच नये अशी वाटणारी ही कादंबरी कायम उशाला घेऊन झोपावंसं वाटतं आपल्याला. हवं तेव्हा उलगडावीत या पावसाची पानं आणि वाचायला सुरुवात करावी त्याला कोणत्याही पानावरून. कवितेचा तर आत्माच असतो हा पाऊस. सर्जनशील मनांना साद घालणाऱ्या या पावसाला अंगावर ओढून राहतात जन्मभर काही कवी. प्रत्येक कवीनं एक तरी कविता लिहिलीच आहे पावसावर. ज्येष्ठ कवी सदानंद रेगे यांनी पाऊसपक्षाचं तर इतकं सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतात,
पाऊसपक्षी
कृष्णसावळा
शाळिग्रामसा
श्यामलसुंदर
क्षितिजाच्या
थरथर तारेवर
बसुन पालवित
पंख ढगांचे
गोंजारित अन्
पिसे विजेची
वादळचोचीने.. डौलानं
मृद्गंधाला
घेऊन वक्षी
..पाऊसपक्षी!
(कवी सदानंद रेगे)
आमचे कवीमित्र नलेश पाटील तर पावसात कायम चिंब भिजलेले असायचे. म्हणायचे,
एका पावसाची सर गुंफली मी गळाभर
मंद मवाळ रंगाने मिसळली रानभर
पाण्यावर तरंगाने ओव्या नव्याने लिहिल्या.
पाण्याच्या कागदावर कविता लिहिणाऱ्या कवींच्या कवितेत हा पाऊस जसा येतो तसाच तो चित्रकाराच्या कॅनव्हासवर बरसत राहातो. सर्जनशील लेखकांच्या अनेक कथांचं आणि कादंबऱ्याचं एक पात्र झाला आहे हा पाऊस. कृष्णात खोत यांच्या ‘झड-झिंबड’ या कादंबरीतलं तर मुख्य पात्रच आहे हा पाऊस. संपूर्ण कथानकावर पसरून राहिलेला हा
पाऊस अस्वस्थ करत जातो आपल्याला. दिवसरात्र कोसळणारा पाऊस क्षण दोन क्षण विसावा घेण्यासाठी थांबावा असं वाटतं माणसांना, पण नाही थांबत तो. उद्ध्वस्त करत जातो जगणं. या अशा पावसाविषयी खोत म्हणतात, ‘सगळी दुपार पावसानं अंधारून आली होती. सगळा गाव पावसानं जाळं टाकल्यागत झालता. विचित्र काळजीत अडकला होता. कोण घरामागच्या लागलेल्या पाण्यात, कोण घरामागच्या झाडानं मांडलेल्या गहिवरात, कोण जनावरांच्या वैरणीत, कोण घराच्या भिंतींना चढत निघालेल्या ओलीत, कोण शिवारातली पिकं गेली त्यात, कोण जोपासलेली झाडं गेल्याच्या दु:खात. तर कोण आणखी कशात आणि कशात. आणि असा किती दिवस पाऊस राहाणार त्याचं आता गणितच कुणाला मांडता येत नव्हतं. सारखं आभाळ भरून येत होतं. आणि पखालीगत
धारा सोडून देत होतं.’
या अशा धुवांधार कोसळून आयुष्य उजाड करणाऱ्या पावसाची वैशिष्टय़ं सांगण्यासाठी या संपूर्ण कादंबरीत पावसासाठीच्या विशेषणांची खैरात केली आहे लेखकानं. उरबडव्या पाऊस, कौलपाझरा पाऊस, झाडंउमळ्या पाऊस, झोपउडव्या पाऊस, झाडंमोडय़ा पाऊस, शेरडंमाऱ्या पाऊस, ढोरंमाऱ्या पाऊस, लचकंतोडय़ा पाऊस, शिवारबुडव्या पाऊस, पूलबुडव्या पाऊस, घरपाडय़ा पाऊस, अंधारझोडप्या पाऊस, गावहालव्या पाऊस आणि काय काय.
मातीत मुरून नव्यानं तरारून येणारा पाऊस हवाच असतो प्रत्येकाला. म्हणून तर पावसाची आतुरतेनं वाट पाहातात माणसं. मग तो शेतकरी असो की चाकरमानी. पण प्रत्येक वेळी तो आपल्याला हवा तसाच येईल याची शाश्वती नसते. अनेकदा तो येतो तो असा माणसाच्या आयुष्याचे लचके तोडल्यागत. तो न येण्यानं जसं रिकामपण येत जातं आयुष्यात तसंच त्याच्या अशा येण्यानं खचून जातात माणसाच्या सुरक्षित जगण्याच्या भिंती आणि कलथून जातात उमेदीचे खांब. कधी कपारी कोसळतात तर कधी नदीनाल्यावरचे बांध वाहून जातात. शहराला वेठीला धरतो हा पाऊस आणि गावाला दु:खाच्या पुरात बुडवून टाकतो.
पाऊस जसा सखा सोबती होतो आपला आपल्या एकांतात आणि दाटून येतो अंगभर तसाच कधी कधी कोसळतो आकांताने जगण्यावरच. माणसांची, नात्यांची वीण जशी घट्ट करत जातो तसाच ती उद्ध्वस्तही करतो. विश्वांताच्या पावसाचा आवाज ऐकला तरी छातीत धस्स होऊन जातं. या पावसाची अगदी आतुरतेनं वाट पाहाणाऱ्या शेतकऱ्याला तो जेवढा हवासा वाटतो तेवढाच पुरानं वेढलेल्या माणसांना तो नकोसाही वाटतो. हा असा, ‘पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद स्वराने’ असं म्हणत आठवणींचं मोहळ उठवणारा, कधी सुखावणारा तर कधी आत आत कळ उमटवून जाणारा, तर कधी दु:खाच्या काठावर नेऊन सोडणारा पाऊस आयुष्याला व्यापून राहिलेला असतो कायम.
‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आमच्या आसवांवरच काढले आहे.’ असं जेव्हा कवी यशवंत मनोहरांसारखा एखादा कवी म्हणतो तेव्हा किती खोल काळजातून मांडत असतो तो आपली युगानुयुगाची वेदना! या अशा पावसाचे संदर्भ आपल्याला समृद्धीचं मिथक असलेल्या पावसात नाही सापडणार. ते सापडतात आपल्या अन्याय्य समाजव्यवस्थेत, जातीपातीच्या उतरंडीत, या उतरंडींमुळे अभावाचं जगणं वाटय़ाला आल्यानं जगण्याचा आनंदच हिरावून घेतलेल्या माणसांमध्ये. आर्थिक समृद्धीबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक समृद्धीच्या परिघाबाहेर कायम राहिलेली ही माणसं आजही ही वेदना सहन करताहेत. सामाजिक न्याय त्यांना मिळेल अशी व्यवस्था संविधानानं केली असली तरी आजही परिघाबाहेरच उभी आहेत अशी अनेक माणसं. समृद्धीच्या पावसात खेळणाऱ्या माणसांकडून फटकारली जाताहेत. वर्णव्यवस्थेनं दिलेल्या खालच्या पायरीवरून वर येण्याचा प्रयत्न करताहेत ती. माणूस म्हणून जगण्याचा आनंद घेऊ पाहताहेत. पण आजही नाकारलाच जातो आहे त्यांना जगण्याचा हक्क. अशा लोकांपर्यंत कधी पोचवणार आहोत आपण पारदर्शक धारांचं निर्मळ गाणं घेऊन येणारा पाऊस?
या पावसाशी किती वेगवेगळ्या प्रकारे नातं जोडून जगतो आहोत आपण सगळेच. लिंगसत्तेची तशी थेट ओळख न झालेली एखादी मुलगी वाट पाहात असते रिमझिमत वर्षांवणाऱ्या पावसाची. तिला वाटत असतं अंगावर घ्यावंसं त्याला. दप्तरात हळूच लपवून ती कधी कधी घरीही घेऊन येते त्याला. निरखून पाहात राहते त्याच्याकडे. नकळत ओलीही होते त्याच्यासोबत. पण असा पाऊस पोचू नये मुलीपर्यंत म्हणून घरातली मोठी माणसं आभाळच शिवून टाकतात कायमचं आणि मुलीला शिकवतात उभं राहायला रिपरिपणाऱ्या पावसात. मनात जपलेला थुईथुई नाचणारा पाऊस हरवून जातो मुलीच्या आयुष्यातून आणि वाटय़ाला येतात ते कोरडे ठक्क क्षण. नाहीतर कधी झोडपणारा तर कधी पूर होऊन सारी स्वप्नंच वाहून घेऊन जाणारा पाऊस. पायाखालची जमीन घेऊन जाणारा आणि अधांतरी लटकवून ठेवणारा पाऊस. असा पाऊस मग नकोसाच वाटतो बायांना.
पूर्वीसारखाच पाऊस
आताही येतो नियमित
पण सहन होत नाही त्यांना
तुडुंब कोसळतो अंगावर तेव्हा.
भिजून घ्यावं लागतं निमूट
आणि वस्त्रावर वस्त्र बदलत
कोरडं व्हावं लागतं सकाळ संध्याकाळ.’
(कवी अजय कांडर)
अशा नकोशा पावसाचीही सवय करून घेतात बायका. पण तरीही त्यांनी जपलेला असतो त्यांच्या मनात त्यांना हवासा वाटणारा पाऊस. तो पाऊस साद घालत राहतो अधूनमधून. तो दिसत नाही आजूबाजूला पण ठिबकत राहतो आत आत. त्या थेंबांचा आवाज सोबत घेऊन सारं आयुष्य काढतात बायका. बोलत राहतात त्याच्याविषयी मत्रिणींशी, नाहीतर स्वत:शीच. वेचत राहातात एक एक थेंब आठवणींचा.
या पावसाचे असे किती थेंब, असे किती रंग, असे किती गंध साठवले आहेत आपण आपल्या कानात, डोळ्यांत, श्वासात हे नाही सांगता यायचं. हे सारे रंग, गंध आपल्याला हवे तसे असतीलच असे नाही. पण तरीही हवे असतात ते जगण्यात ओलावा यावा म्हणून. तसं पाहिलं तर एकूणच रणरणता उन्हाळा आजूबाजूला असण्याचा काळ आहे हा सगळ्यांसाठीच. अशा काळात आयुष्य वेठीला धरणाऱ्या पावसापेक्षा हिरव्या धारा घेऊन येणारा समंजस, समजूतदार पाऊस हवा आहे आपल्याला. अशा या पावसाच्या हातात हात गुंफून चाललं दोन पावलं तर हा सखा दाटून येईल डोळ्यांत आणि म्हणेल,
मला रुजवलंस खोल आत
तर तरारून येईल अंगभर
खळाळतं निर्मळ गाणं
आणि वाढत जाईल पावसाचंच झाड
ज्याच्या फांद्यावर लगडतील
थेंबांच्या कविता.
पाऊस होईल एक पूर्ण कविता
आणि कविता गच्च पाऊस.
neerajan90@yahoo.co.in
chaturang@expressindia.com.