‘मी कविता लिहितेय, आता कुणी मला विचलित करू नका’ असे शब्द त्यांच्या तोंडून वा कृतीतून कधीच उमटले नाहीत. त्या लिहीत असताना कुणी भेटायला आले तर शांतपणे उठत अन् आदरातिथ्य करत. सून वीणाने जेवायला हाक मारली तरी पेनाला टोपण लागे. ‘मी आणि माझे शब्द यांचे एक सुंदर जग आहे अन् त्यावर माझी पूर्ण हुकमत आहे. गृहिणीपद मला तेवढेच प्रिय आहे किंबहुना तीच माझी प्राथमिकता आहे’ हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून इतरांर्पयंत  पोचत असे..
प्रतिभासंपन्न कवयित्री इंदिरा संत यांची आज पुण्यतिथी. यंदाच्या त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त हे दोन लेख. कवयित्री म्हणून त्यांची प्रतिभा साऱ्यांनाच माहीत आहे. परंतु त्याही पलीकडच्या त्यांच्या आई म्हणून, घरातील कर्ती म्हणून ठाम, निग्रही, पण संयत रूपाचं हे दर्शन.
१३ जुल २००० साली बेळगावात इंदिरा संत नावाची एक व्रतस्थ कविता कायमची अबोल झाली. ८७  वर्षांचे संयमी, नंदादीपाप्रमाणे तेवत राहून, वादळवाऱ्यात टिकून सर्वाना शब्दांच्या प्रकाशात उजळवून टाकणारे आयुष्य आसमंतात विलीन झाले. आम्हा बेळगावकरांसाठी त्या सर्वार्थाने आक्का होत्या.  त्यांच्याच ‘लयवेल्हाळ’ या कवितेतील बकुळीच्या नाजूक फुलाप्रमाणे वाऱ्यावर गिरक्या घेत, मंद सुवास पसरत त्यांचे प्रेमळ अस्तित्व बेळगावकरांना प्रेरणा देत होते. नवोदितांच्या पाठीवरून त्यांचा ‘आक्का’ या बिरुदाला जागणारा, काम करून मऊसूत झालेला हात सदैव फिरत होता याची प्रचीती अनेकांनी अनेकदा घेतलेली आहे. १९९८ साली त्या बिछान्यावरुन उठून जेमतेम फिरू शकत होत्या, तरीही माझ्या आग्रहाला मान देऊन त्यांनी माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन केले अन् मला तोंड भरून आशीर्वाद दिला. समोर बसलेल्या गच्च फुललेल्या सभागृहाला बघून चार शब्दांऐवजी चांगल्या वीसेक मिनिटे सुरेख बोलल्या. रसिकांनीही अनेक दिवसांनी त्यांना बोलताना पाहिले, त्यांचे मधाळ शब्द ऐकून तृप्ती अनुभवली.
त्यांच्या कवितेला आजवर अनेक समीक्षकांनी, रसिकांनी, अनेक तऱ्हेने लिहून गौरवलेले आहे. त्यांच्या रक्तातून अक्षय्य वाहणारी अजंठय़ाची एक अबोल रेषा अनेकांना भावमुग्ध करून गेली आहे. कित्येक भावगीतकारांनी त्यांच्या रचना गायलेल्या आहेत, त्याच्या कवितांचे नृत्य अन् नाटय़ाविष्कार रंगमंचावर सादर झालेले आहेत. विविध पुरस्कारांना त्यांनी आपल्या गर्भरेशमी भावकवितेने सन्मानित केले आहे. आज त्यांच्या पुण्यतिथीदिनी, अन् जन्मशताब्दी वर्षांत मला भावलेले त्यांचे घरगुती रूप त्यांची सून वीणा अन् नातसून डॉ. आसावरी या दोघी माझ्या मत्रिणी असल्याने शब्दांत पकडण्याचा हा प्रयत्न.
कै. ना. मा. संत यांच्याशी विवाह होऊन आक्का बेळगावात आल्या अन् दोघांच्या प्रगल्भ सहवासातून ‘सहवास’ साकारले. त्यानंतर तीन अल्पवयीन मुले पदरात असताना इंदिराबाईंच्या वाटय़ाला कायमचा पतीविरह आला अन् तोवर जुळलेले शब्दांचे, कवितेचे नाते त्यांच्या उर्वरित आयुष्यात त्यांचा खडकासारखा आधार झाले. पण व्यवहारात त्यांचा दगडी आधार असलेल्या कवितेने आपला कोमल सायीसारखा साज अन् मृदगंधासारखा दरवळ कधीही गमावला नाही. उदरनिर्वाहासाठी केलेली ट्रेिनग, कॉलेजातील नोकरी, तीन अल्पवयीन मुले एकटीने वाढवताना येणारे अनेक आशानिराशेचे प्रसंग, दमछाक, जोडीदाराचा अभाव, संसारातील कधीही न संपणारी अगणित कामे अन् या सर्वाना पुरून उरणारे मंद प्रेमळ हास्य सदैव आपल्या चेहऱ्यावर लेऊन त्या बेळगावात सर्वाची मोठी बहीण म्हणजेच ‘आक्का’ झाल्या. इतक्या जणांशी त्यांचे प्रेमाचे, सौहार्दाचे नाते जुळले की त्याची मोजदाद करणे कठीण व्हावे. त्यांच्या समवयस्क बहिणी, मत्रिणी वा सुनेच्या नातसुनेच्या आई-आजी असोत, मत्रिणी असोत, आमच्यासारख्या नव्याने लिहित्या झालेल्या परक्या कुणी असोत वा पणतीच्या, आभाच्या र ला ट जोडून कविता करणाऱ्या शाळेतील कुणी असोत, आक्का  सगळ्यांची मत्रीण होत्या.
जीवनातील कठीण काळात आयुष्य कितीही खडतर झाले तरी त्यांच्या कवितेतील अन् व्यक्तिमत्त्वातील गोडवा कधीही उणावला नाही. सातत्याने कवितासंग्रह, ललितलेख, मालनगाथा, बालगीतसंग्रह प्रकाशित झाले अन् त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले. ही कविता करताना कधीही त्यांच्या वृत्तीत अभिनिवेश नव्हता, आपण फार मोठे प्रसवतो आहे असा अहंमन्यपणा नव्हता. सहज जात्यावर बसल्यावर जनीला ओव्या सुचत तशी त्यांची भावकविता हृदयातून उमलत, दरवळत शब्दात साकार झाली. सोबतीला वाचनही प्रचंड म्हणावे इतके विविध होते. पलंगाजवळ टेबलावर सतत पुस्तकांचा ढीग विराजत असे. त्यांचे हाताळणेही साजूक. कुणा नव्याने लिहिणाऱ्याला त्यांनी कधीच नाउमेद केले नाही. त्यांचा अभिप्राय नेहमी सकारात्मक असे ‘ती अद्भुत गारुड करणारी वाट तुला सापडली आहे, पुढचा रस्ता तुला आपोआप दिसत जाईल, लिहिते रहा’ असे त्यांचे प्रेरणा देणारे शब्द नवोदितांचे बळ वाढवत असत.
ठळकवाडीतील छोटय़ाशा अडचणीच्या घरातून अíकटेक्ट लेकाने आईसाठी अगदी निगुतीने बांधलेल्या हिरवाईने मढलेल्या वडगावातील देखण्या प्रशस्त बंगल्यात गेल्यावरही त्यांच्या कवितेची जात अन् पोत तोच राहिला; क्वचित कधीतरी पतीविरहाची वेदना, किनार म्हणून त्या शब्दचित्रात उमटली तरी समाधानी वृत्तीचा अलवारपणाच वाचकाला जास्त वेढून राहात असे. ‘मी कविता लिहितेय, आता कुणी मला विचलित करू नका’ असे शब्द तर त्यांच्या तोंडून वा कृतीतून कधीच उमटले नाहीत. त्या लिहीत असताना कुणी भेटायला आले तर शांतपणे उठत अन् आदरातिथ्य करत. साधी वीणाने जेवायला हाक मारली तरी पेनाला टोपण लागे. उसंत मिळून पुन्हा पुढचे शब्द लिहिताना भल्या भल्यांना चकवणारी प्रतिभा हात जोडून ‘मी इथे उभी आहे’ म्हणून जणू त्यांना विनवत असे अन् कविता पुढे लिहिली जाई. ‘मी आणि माझे शब्द यांचे एक सुंदर जग आहे अन् त्यावर माझी पुर्ण हुकमत आहे. गृहिणीपद मला तेवढेच प्रिय आहे किंबहुना तीच माझी प्राथमिकता आहे’ हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून इतरांना पोचत असे. त्यांना पहिला राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना एका पत्रकाराने विचारले, ‘कसे वाटते आहे’ त्या वेळी ही रक्कम पाचशे रुपये होती..  तेव्हा त्या मंद हसत म्हणाल्या, ‘‘आता मला मुलांची दिवाळी छान साजरी करता येईल.’’
त्यांना पतीसोबतचे सहजीवन अगदी अल्पकाळ लाभले. पण त्याची किंमत मात्र त्या खऱ्या अर्थाने जाणून होत्या. कुटुंबातील प्रत्येकाने जोडीदाराबरोबर आपले नाते फुलत ठेवावे याबद्दल त्या आग्रही होत्या. दोन्ही मुलांनी आपापले जोडीदार स्वत: शोधले त्याला त्यांनी सहजतेने स्वीकारले. एकदा मुलाने नऊच्या सिनेमाची तिकिटे काढून आणल्यावर, ‘जेवणाचे सर्व आवरायचे असताना मी कशी येऊ’ अशी सबब सुनेने पुढे केली तेव्हा त्या समजावणीच्या सुरात म्हणाल्या, ‘‘अगं, आवरणे काय रोजचेच असते, एक दिवस टेबल तसेच ठेवलेस, वा मी आवरले म्हणून तुला कुणी नावे ठेवणार नाही. तो बोलावतोय ना! आधी जा पाहू!’’
आणि या सुनेला जेव्हा डॉक्टर सून आली तेव्हा इंटर्नशिप बेळगावलाच कर, पतीसमवेतच राहा, करिअर काय त्याहून मोठी मानायची गरज नाही. पसे लागले तर मी देईन, असे म्हणण्याइतका मनाचा उमदेपणा त्यांच्याकडे होता. संसारातील कामे गोडीने केली तर आपल्यालाच आनंद मिळतो, स्वैपाक करणे, मुलांना वाढवणे या बाबी आनंदाची निधाने आहेत. तान्हय़ा मुलाला मांडीवर घेऊन का होईना पण सर्वानी एकत्र जेवायला हवे. त्यातूनच त्या कोवळ्या जीवावर एकत्रपणाचे संस्कार होतील, असं त्याचं मत होतं. ही त्यांची मते पटली नाहीत म्हणून कुणी आचरली नाहीत तरी त्यांनी मनात कधी कडवटपणा येऊ दिला नाही. तेवढे स्वातंत्र्य कुटुंबातील प्रत्येकाला द्यायला हवे याचे त्यांना भान होते. आवश्यक नसेल तर नोकरी करायची गरज नाही. संसार करण्यात आनंद मानणे यात काहीही कमीपणा नाही असे त्यांचे मत होते. स्त्रीमुक्तीची त्यांची संकल्पना, प्रत्येकाला आपला अवकाश हवा अन् मनाप्रमाणे फुलण्याचा अधिकार हवा अशी प्रगल्भ होती. ती बोलून दाखवण्यात त्यांना कधी अवमान वाटला नाही. संसार स्वीकारला आहे तर तो निष्ठेने करायला हवा, बाकी सारे त्यापुढे गौण मानायला हवे याबद्दल त्या आग्रही होत्या. पती, संसार, मुले, पपाहुणा अन् गृहिणीपद हे सर्व त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. कुटुंबाचा  गोडवा त्यामुळे टिकून राहतो, वाढतो असे त्यांचे ठाम मत होते. अन् तसे त्यांचे आचरणही होते. त्यांच्या घरात चार पिढय़ा आनंदाने नांदताना   बेळगावकरांनी पाहिलेल्या आहेत. यांच्या कवितांमध्ये, ललितलेखनात हा गोडवा हळुवारपणे प्रतीत होतो.
 दुर्दैवाने आपल्याला जोडीदार गमवण्याचे दु:ख वाटय़ाला आले, तेव्हा आपल्या मुलाबाळांनी जोडीदाराचा सहवास ही प्राथमिकता मानायला हवी असा त्यांचा आग्रह होता. काही जवळच्या कुटुंबीयांना त्यांच्या या मतामध्ये जर वेगळे दिसले तर तो इतरांचा दोष आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे असे मला मनापासून वाटते. आपल्या नजरेने इतरांना पाहून मूल्यमापन करणे योग्य नव्हे. आक्कांसारखी एखादी प्रतिभावान व्यक्ती इतक्या उंचीवर पोचते, की खालून पाहणाऱ्या सामान्यांना तिचे खरे रूप दिसणे अवघड असते. दोन्ही हातांनी आयुष्याचा संघर्ष पेलताना आपल्यातल्या कवितेत जराही कडवटपणा त्यांनी आणू दिला नाही. ही किमया त्यांना लीलया साधली, कारण त्यांची प्रतिभा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे अगदी निखळ, पारदर्शक अशी होती.
कुटुंबातील सर्वाना प्रेम अन् आपुलकी देण्यात, ती दर्शवण्यात, बोलून दाखवण्यात आपण अनेकदा कमी पडतो, त्यातून नाती साचल्याचा अनुभव येतो, आक्का मात्र या बाबतीत अगदी पारदर्शक होत्या. एकदा त्यांनी मुलाला अन् वीणाला सहज म्हणून एक रेकॉर्ड भेट दिली. ‘‘जिंदगी और कुछभी नही तेरी मेरी कहानी है’’ हे िहदी गाणे त्यात होते. स्वत: इतक्या मोठय़ा कवयित्री असूनही त्यांना हे शब्द अन् सूर मुलासुनेला भेट द्यावेसे वाटले. कुटुंबातील सदस्यांना, परिचितांना भेटी देणे त्यांना मनापासून आवडे. देण्यातला आनंद त्या अगदी पुरेपूर उपभोगत असत. त्यांच्या काव्यप्रतिभेचा सन्मान म्हणून एखादी भेट मिळाली की लगेचच ती समोर असलेल्या कुटुंबीयाला द्यायची. हे नेहमीचेच होते. एरव्ही पाकिटाऐवजी पोस्टकार्डावर निगुतीने भागवणाऱ्या आक्का कुणालाही भेट देताना बजेटचा विचार करत नसत. त्यात ती साडी असेल तर हात अगदीच सल सुटे.
   त्यांचे प्राण्याबद्दलचे प्रेम कुटुंबीयांना कधी कधी त्रासदायक ठरे. पण त्याबाबत मात्र आक्का आग्रही अन् ठाम होत्या. कुत्र्यामांजरांना त्या आपले कुटुंबीय मानत. त्यांची एक लाडकी मांजरी होती. तिला नेहमी ताजी पोळी दूध, साखर अन् तूप घालून द्यायची सवय आक्कांनी लावली होती. जेव्हा वीणाच्या हातात किचन आले तेव्हा तिने जर शिळी पोळी दिली तर ती मांजरी तोंड लावत नसे. आक्का टेबलाशी जेवताना त्यांच्या पायाशी बसून या महाराणी आपले अन्नसेवन करत असत. नवऱ्या सासूसोबत झक मारत तिलाही गरम पोळी द्यावी लागे. एकदा वीणाने म्हटले, हिला जेवढे कष्ट करून मला अन्न द्यावे लागते तेवढे दुसऱ्याला दिले असते तर ते जन्मभराचे माझे ऋणी रहिले असते. हिला इतके दूध तूप खाऊन साधे गुबगुबीत होता येत नाही.” आक्कांनी शांतपणे म्हटले, ‘‘माणसाप्रमाणे मुक्या प्राण्यालाही कळते की आपल्याला मायेने वाढले जाते आहे की वैतागाने.’’ मुक्या प्राण्यांची नावड असलेल्या वीणाने आक्का जाऊन तेरा वष्रे झाली तरी घरात दोन भलीमोठी कुत्री अन् मांजर पाळलेले आहे. या सासूसुनेचे नाते, व्यक्तिमत्त्वात इतके विरोधाभास असूनही त्यापलीकडे जाऊन फुलत, पक्व होत गेले की शेवटी मुलांऐवजी त्यांच्या तोंडात वीणाचे नाव आधी येई. पुढे त्यांची प्रकृती खालावत गेली, त्यांना ऐकू येणे कमी झाले अन् सांगूनही त्यांना कानाला मशीन लावणे आवडत नव्हते. पण घरात घडलेली प्रत्येक गोष्ट त्यांना कळायला हवी असे. हे कुटुंब माझे आहे हा भाव जराही उणावला नव्हता. मग पत्र, फोन वा घटना त्यांना मोठय़ा आवाजात सांगणे हे वीणाच्या दैनंदिनीतले एक महत्त्वाचे आन्हिक बनले. त्यातून इतका विश्वास निर्माण झाला की इतरांना त्याचा हेवा वाटावा. आपल्या कवितेचे सर्व हक्क त्यांनी वीणाला दिले. ‘मायबोली’ या नेटवरील मुखपत्रात आसावरीने, आक्कांच्या नातसुनेने अगदी हृद्य शब्दात त्या दोघींमधील नात्याचे तरलपण टिपले आहे. आपल्याला या नात्याने कसे बदलवले तेही मोकळेपणाने सांगितले आहे. आपापले अवकाश जपत एकत्र कुटुंबात कसे गोडीने राहावे याचे वस्तुपाठ आक्कांनी फक्त सुनेवरच नव्हे तर आपल्या नातसुनेवरही आपल्या आचरणातून अबोलपणे ठसवले आहेत.
शेवटी त्या बिछान्याला खिळल्या तेव्हा खोलीतून बाहेर येण्याचे टाळत असत. संध्याकाळी बागेत खुर्चीवर बसून आल्यागेल्यांशी चार शब्द बोलताना त्रास होतोय हे जाणवू लागले. पण हे माझे कुटुंब आहे हा भाव मात्र तिळमात्र उणावला नाही. घरातले कुणी आजारी असले तर त्या काळजी करतात, त्यांना त्रास होतो म्हणून कुणी सांगत नसे त्याचा त्यांना भारी राग येई. अन् भोवतीच्या परिस्थितीवरून त्यांना कळले तर त्या अगदी विकल होऊन जात.
पणतीच्या तिसऱ्या वाढदिवसाला तिचाकी सायकल भेट म्हणून घरात आली अन् योगायोगाने दुसरे दिवशी रविवार होता. नातू निरंजन आपल्या छोटय़ा मुलीला तिचाकीवर बसवून पेडल कसे मारायचे हे शिकवत होता. अन् रोजच्यासारखे वीणा आक्कांना घेऊन खुर्ची ढकलत बाहेर आली. समोरचे दृश्य पाहून आक्का मोठय़ाने रडू लागल्या. अगदी हुंदके देत. घरातील सर्वजण सभोवती गोळा झाले. चौकशी करू लागले.. शांत झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘घरातले छोटे मूल बापाकडून पहिल्यांदा सायकल शिकते आहे अन् मला कुणीच सांगितले नाही.’’
त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी हे पणती नातवाकडून हुंदडत सायकल शिकते आहे या आनंदाचे होते की अशी जवळीक उपभोगण्यापूर्वी आपल्या मुलांवरचे पितृछत्र हरपले यासाठी होते हे त्यांच्या हळुवार झालेल्या मनालाच ठाऊक!
आपल्या कवितेइतक्या अशा पारदर्शक असलेल्या इंदिरा संत म्हणूनच साऱ्या बेळगावकरांच्या ‘लयवेल्हाळ आक्का’ आहेत!

Story img Loader