‘‘माझी कविता अस्वस्थतेतून येते, पण म्हणजे जरा काही खुट्ट झालं आणि कविता झाली असं होत नाही. ती अस्वस्थता खोलवर आत मुरावी लागते. पण एक मात्र खरं, कविता लिहून झाल्यावर ती अस्वस्थता काहीशी कमी होते. तात्पुरता का होईना, पण शांतता मिळाल्याचं जाणवतं. त्यामुळेच आयुष्यात कितीही वेळा नराश्याचे, कडेलोटाचे क्षण आलेले असले तरी कवितेचा हात धरून पुन्हा पुन्हा उठून उभं राहणं हे माझ्याबाबतीत घडलेलं आहे.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार.
कवी-लेखकाचं, त्याच्या-तिच्या स्वत:च्या निर्मितिप्रक्रियेशी असलेलं नातं नेमकं उलगडून सांगता येणं अवघडच आहे. ते एक आयामी, एकरेषीय तर नाहीच, पण कुठलंच अंतिम अथवा ठाम विधानही त्याबाबत संभवत नाही. हे नातं विलक्षण गुंतागुंतीचं, प्रसंगी अनेक अंतर्वविरोधांना पोटात वागवत असल्यानं त्याची एकास एक अशी उत्तरं देणं धाडसाचंच ठरू शकतं. तरीही मी हे धाडस करून पाहते, कारण अंतर्बाह्य़ माणूस असल्याचा शिक्का मी कपाळावर वागवते! माणूस लिहिता असो वा न लिहिता, ही गुंतागुंत वागवतच जगत असतो.
‘अंत:स्थ’ हा माझा कवितासंग्रह १९९३ मध्ये प्रसिद्ध झाला आणि नुकताच ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ हा पाचवा कवितासंग्रह. म्हणजे ‘अंत:स्थ’ प्रकाशित व्हायच्या आधी किमान काही वष्रे मी लिहू लागले असं गृहीत धरलं तर जवळजवळ पाव शतकाएवढा दीर्घ काळ मी सातत्याने कविता लिहितेय. याच काळात मी गद्यलेखनही केलं. नाटक, कथा, ललित गद्य आणि थोडंबहुत समीक्षापर लेखन अशा निरनिराळ्या पद्धतीनं. असं असलं तरी मूलत: कवी असणं हे मला स्वत:च्या नजरेत सगळ्यात आवडणारं आहे. त्यामुळे या ठिकाणी मुख्यत: मी कवितेच्या अनुषंगानेच लिहिणार आहे.
नुकताच घडलेला एक प्रसंग आठवतोय. कुणीतरी मला विचारलं, ठीकच आहे, तू जे करते आहेस, सांगते आहेस ते. उदाहरणार्थ, भूमिका घेणं, हस्तक्षेप करणं हे सगळं किती महत्त्वाचं आहे, वगरे वगरे. पण आपल्या आतल्या जगाबद्दल काय? आतल्या जगातल्या प्रश्नांची कोणती उत्तरं आहेत तुझ्याकडे? न राहवून मी म्हणाले, इथेच तर आपली प्रस्थापित व्यवस्था यशस्वी ठरली आहे, इतकी की आपल्यासारख्या कवींनाही आतलं आणि बाहेरचं जग वेगवेगळं असतं आणि ते प्रश्नही वेगवेगळेच असतात असं वाटावं. ही विभागणीच मुळात धोकादायक आहे. आणि ती मान्य करणं त्याहून अधिक धोकादायक. यातूनच कवी-लेखक नेमकं काय काम करतो? किंवा त्याने काय काम केलं पाहिजे या मूळ गाभ्यातल्या प्रश्नाकडे यावं लागेल. आपल्या मराठी कवितेच्या विस्तीर्ण अशा फलकावरही कवीची सांस्कृतिक भूमिका का आणि कशी बदलत गेली आणि तिचा एकूण मूल्यव्यवस्थेशी काय आणि कसा संबंध आहे हा शोध प्रत्येक लिहित्या माणसाने गंभीरपणे घ्यावा असं मला वाटत आलेलं आहे.
जगत असताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात. त्या प्रश्नांशी आपण सातत्याने होड घेत असतो. नेमकी उत्तरे शोधण्यासाठी उत्तरांचे वेगवेगळे पर्याय उभे करत असतो. तसे करताना रूढ, प्रचलित पण मुळातच अपुरे असणारे पर्याय सोडून कोणते नवनवे मार्ग असू शकतात अशी एक प्रक्रिया विचारांच्या आणि कृतीच्या अशा दुहेरी स्तरांवर चाललेली असते. दुसरीकडे, या प्रश्नांचं स्वरूपदेखील गुंतागुंतीचं, अंतर्वरिोधात्मक असतं. ते व्यक्तिगत म्हणून तर महत्त्वाचे असतातच, पण त्याचबरोबर समष्टीशीदेखील अभिन्नपणे जोडलेले असतात. कारण मुळात व्यक्तिपण हीच गोष्ट स्वायत्त, सुटी नसते, ती एक रचना असते आणि तिचं रचितपण हे अर्थातच सामाजिकतेतून साकारत असतं. उदाहरण म्हणून बाईबाबत हे आपल्याला स्पष्टपणे पाहता येईल. बाई जे वागते, तिला जे वागावंसं वाटतं आणि बाई म्हणून तिनं जे वागायला हवं याचा सारखा ताळमेळ घातला जात असतो, समाजाकडून आणि परिणामस्वरूपी तिच्याकडूनदेखील. त्यामुळे माणसाचा अस्सलपणा आणि व्यवस्थेतला रचितपणा यांच्यातील परस्परसंबंधाचा शोध मी माझ्या सगळ्याच लेखनातून घेत आले आहे. माझ्या कवितेची मूळ प्रेरणा म्हणायचीच झाली तर ती ही आहे-माणसाच्या अस्सलपणाचा शोध घेणं.
माझ्या कवितेचा विषय जरी बव्हंशी स्त्रीशी, चेहरा हरवलेल्या- चेहरा शोधणाऱ्या, त्यासाठी झुंजणाऱ्या स्त्रीशी जोडलेला असला तरी असं मला वाटत नाही की मी बाईची कविता लिहिते. स्त्री हे विषम व्यवस्थेचं एक प्रतिरूप म्हणून माझ्या कवितेत येतं. ते अँकरेज असतं असं म्हणता येईल. बाईच्या अनुषंगाने येणाऱ्या तिच्या जगण्याचा, स्त्री-पुरुष नातेसंबंधांचा व एकूण मानवी नातेसंबंधाचा उभा-आडवा पट पाहत असताना त्यातली मानुषता मात्र हरवलेली, ठायी ठायी विरूप झालेली दिसते. या विरूपतेमध्ये िलगभेदजन्य विषमतेबरोबरच जात-वर्गवास्तव, त्याबरोबरच जागतिकीकरणातून येणारं कंगालीकरण, बाजारशरणता आणि व्यक्तीशिवायची बाकीची सर्व मानवी एककं दुय्यम ठरवत जाणं या बाबी कळीची भूमिका बजावत असतात. या भूमिकांचा शोध घेणं, अर्थनिर्णयन करणं आणि त्यांच्या विरोधात हस्तक्षेप करणं हे कवितेचं काम आहे असं मी मानते. या अर्थानं कविता ही एक कृती करणं आहे, असं मला वाटतं.
कविता सुचण्याची प्रक्रिया ही गणिती सूत्रबद्ध पद्धतीने मांडता येण्याजोगी नक्कीच नाही. जरी कविता ही एक रचना असली, तरीदेखील नाही. निव्वळ ताíककतेच्या पातळीवरून कवितेचा उलगडा करणं ही तशी अवघडच गोष्ट. तुमच्या भोवतालातील काही गोष्टी तुम्हाला खोल भिडतात, आतून हलवून जातात, अस्वस्थ करतात, त्या गोष्टींना दिलेली तातडीची प्रतिक्रिया म्हणजे कविता असते. जेव्हा तुम्हाला काही छळतं, बेचन करतं, डसतं तिथे कविता सुचते, असं मला वाटतं.
कविता कशी उतरेल याचा एकच एक साचा नसतो. कवितेसाठी मला जो काही वेळ लागतो तो ती कागदावर उतरण्यापूर्वीचाच असतो. एकदा कागदावर उतरायला लागली की सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती सलग लिहून होते. फार कमी कवितांमध्ये मी लिहिल्यावर बदल केला. गंमत म्हणजे बदल करायला गेले अन् निराळीच कविता लिहिली गेली हातून, असंही काही वेळा घडलं आहे. याचं कारण कवितेचं प्रवाहीपणाशी आंतरिक नातं असतं. आपल्याला आलेल्या स्थूल, जड, ढोबळ अनुभवांचे कवितेत रूपांतर या प्रवाहीकरणातून, परिवर्तनशीलतेतून साक्षात होत असतं. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याची कृती कवितेतून घडते.
चांगलं लिहिण्यासाठी कवी-लेखकांना खूप बघावं लागतं, खूप अनुभवावं लागतं. कम्फर्ट-झोनच्या पलीकडे जाण्याची तयारी ठेवावी लागते, त्यासाठी प्रसंगी पडेल ती किंमत चुकवावी लागते. जे नियत आहे, ते म्हणजे आपलं शरीर, आपली लंगिक ओळख, जात- धर्म, वर्ग, आपलं भौगोलिक स्थान, हे सगळं सगळं तर चिकटून आलेलं असतंच आपल्याला. यात राहूनही आपण लिहू शकतो, नाही असं नाही. पण चांगल्या कवितेसाठी या नियतत्वापलीकडे जाणं अत्यंत आवश्यक असतं. माझ्या एका कवितासंग्रहाचं नाव आहे, ‘मी भिडवू पाहतेय समग्राशी डोळा’. साहजिकच मग कवितेतून दलित स्त्रीचं दु:ख तर येतंच, पण ते तिथेच थांबत नाही. अगदी पहिल्या ‘अंत:स्थ’ या संग्रहातील ‘अमिना’, ‘सलाम बाँबे’, ‘रूपकुँवर’ या कवितांची उदाहरणं इथं घेता येतील. तसंच दलित स्त्रीच्या दु:खाचं चित्रण करतानादेखील केवळ शोषित स्त्री म्हणून मी ते केलेलं नाही. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लढय़ात उतरलेली स्त्री नंतरच्या संकुचित पुरुषी राजकारणामुळे पुन्हा घरात कैद झाली. तिचं लढाऊपणाचं स्पिरीट गोठवून टाकण्यात आलं हे माझ्या कवितेतून रेखाटलं गेलं. एकूणात बाईच्या शोषणाची मिती ही काळागणिक बदलत जात असते. साहजिकच यातून एका चाकोरीबद्ध, सांकेतिक अशा दलित स्त्री-प्रतिमेला माझ्या कवितेतून शह मिळाला, असं मला नम्रपूर्वक सांगावंसं वाटतं. दलित स्त्रीचा चेहरा तपासताना ऐतिहासिकता विसरता येत नाही. ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ या कवितेत मी लिहिलं आहे –
सावित्रीमाय,  तू फोडून टाकलास एकदाचा
तो सनातन मायावी आरसा
किंचाळत बाहेर आल्या
पटापटा कितीतरी बाया
शोधू लागल्या पाळामुळांना..
रचत राहिल्या स्वत:ला तुकडय़ा तुकडय़ातून अखंडित माझ्यासकट.
जोतिरावांचं व सावित्रीबाईंचं जे एकमय नातं आहे ते आजच्या काळातदेखील आदर्शवत नातं ठरावं आणि त्या दिशेने जाण्याची आकांक्षा या कवितेत प्रकटताना दिसते. माझी पुस्तकं मी ताराबाई शिंदे, मुक्ता मांग, रमाबाई आंबेडकर, इस्मत चुगताईंपासून कमल देसाई, ऊर्मिला पवार, सुरेखा व प्रियांका भोतमांगे यांना अर्पण केलेली आहेत. हा लढणाऱ्या स्त्रियांचा एक प्रवाह आहे. त्या प्रवाहातला मी एक छोटासा िबदू आहे आणि त्यांच्याशी माझं जोडलेपण आहे, अशी माझी भावना आहे.
मला वाटतं, कविता आपली सबंध व्यवस्था घेऊन दृग्गोचर होत असते. त्यामुळे माझ्या कवितेत नुसतं व्यक्ती असणं, नुसतं स्त्री-पुरुष असणं एवढंच नाही, तर त्यांच्या नात्यातला उबदारपणा, तरलता, परस्परांबद्दलची प्रगाढ ओढ, नात्यांवरचा खोलवर विश्वास जसा दिसतो, तसंच राजकारण आहे, समाजकारण आहे. इतिहास आहे, त्यातली भौतिक द्वंद्वात्मकता आहे. मिथ्यकथांचा, रूपकांचा अन्वय लावणं, मिथकांना समकालात आणून ठेवणं, नवीन मिथकं निर्माण करणं हे सगळंचं एकवटून कवितेत येत असतं. कवितेची अशी धारणा माझ्या मनात असल्याने कविता लिहिणं ही माझ्यासाठी सहजसोपी बाब राहत नाही. गमतीगमतीतच लिहिलंय असं घडत नाही.
खरंतर माझ्या प्रत्येकच कवितेनं मला अस्वस्थ केलेलं आहे. तरीदेखील इथे मी दोन कवितांचा विशेष उल्लेख करेन. ‘आरपार लयीत प्राणांतिक’ या शीर्षकानं तमाशा लोककलेतील थोर कलावंत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकरांच्या जगण्यावर मी दीर्घ कविता लिहिली. ही कविता मी टप्प्याटप्प्यानं लिहिली. सुरुवातीला जो कवितेचा तुकडा मी लिहिला तेव्हा हा अंतिम असेल असं मला वाटत होतं, त्यामुळे तो ‘उत्कट जीवघेण्या धगीवर’ या माझ्या दुसऱ्या संग्रहात आला. पण त्यानंतरही विठाबाई माझ्या मनातून जाईना. ती दोन कारणांसाठी. विठाबाईचं काम हीणकस आहे, दलित स्त्रीच्या लंगिकतेचा वापर करणारं आहे, भाकरी आणि लावणीमध्ये फारकत करता न येण्याजोगी विवशता त्याच्यामध्ये आहे, शोषणाचं प्रतीक आहे हे सगळं तर आहेच. पण तरीसुद्धा हे सगळं विठाबाई ज्या व्यवस्थेतून आलेली आहे त्या व्यवस्थेतून उद्भवतं. त्यात तिचा काय दोष? तिला लाज वाटावी असं यात काय आहे? तिचं शोषण होतं हे खरं असलं तरी ती अत्यंत टणकपणाने त्याचा सामना करते. ही लढाई ती सुखासुखी करते असं मी म्हणणार नाही, पण सगळी रग अणि धग घेऊन ती जगते, ‘पोटासाठी नाचते मी, पर्वा कुणाची ’ असं परखडपणे म्हणणारी विठाबाई माझ्या कवितेची नायिका बनते.
‘लव्ह इन द टाइम ऑफ खैरलांजी’ ही ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ या संग्रहातली पहिलीच कविता. ही कविता मी पुण्यात लिहिली. काही कामासाठी गेले होते आणि अपेक्षेपेक्षा नियोजित काम लवकर संपलं आणि सलग असा मोकळा वेळ मिळाला. जवळपास एकटाकी ही कविता लिहून झाली. खैरलांजीमध्ये जे घडलं त्याचं ग्राफिकल वर्णन करणारी ही कविता नाही. रूढ अर्थाने ती प्रेमकवितादेखील नाही. भीमाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून लिहिलेली निव्वळ एका विलापाची, गाऱ्हाण्याची कविता नाही. जागतिकीकरणानं दलितांचं आयुष्य भीषण झालं आहे एवढंच सांगणारी ती कविता नाही. हे सगळं एकवटून एका कोलाजच्या रूपात कवितेत येतं. या कवितेतील काही ओळी अशा –
एकही पान नाही फांदीवर
हा देह असा निष्पर्ण धुवाधार
संपूर्ण गच्च
सळसळणारा..
अतीताच्या काळ्याभोर पावसानं
झोडपून काढलं मला,
उभं-आडवं हिंस्र.
काहीतरी मागू पाहणाऱ्या
बोटांवर, ओठांवर दिले डाग -प्रखर, चरचरीत.
चंद्र संपून गेला माझ्यापर्यंत येईस्तोवर !
क्षीण धुगधुगत मरतुकडा.
पाश म्हणाला होता,
‘सब से खतरनाक होता है
हमारे सपनों का मर जाना !’..
‘‘पसा फेको, तमाशा देखो !
बच्चे लोग बजाव बजाव
तालीयाँ बजाव!’’
हा सुबत्तेचा ग्लोबल फुफाटा उडतोय
भयालाल भोतमांगेच्या
ठार दगड झालेल्या डोळ्यात..
तूर्तास
आम्ही उतरलो आहोत
विद्रोहाची जुनीच परिमाणं घेऊन कुचकामी या दीर्घकवितेच्या शेवटच्या तीन ओळींमधून जमिनीवर पाय असल्याची जाणीव हरवलेली नाही असं दिसतं. सोपी, सुलभ मांडणी करणारी, सोपी सुलभ उत्तरं सुचवणारी कविता किंवा कुठलंही लेखन हे मला माझं वाटत नाही, ते यामुळंच.
इथेच मी कवितेपासून एक छोटंसं वळण घेते. खैरलांजीवरच्या कवितेच्या थोडं आधी मी ‘धादांत खैरलांजी’ नावाचं एक नाटकही लिहिलं. ‘अफवा खरी ठरावी म्हणून’ हा कथासंग्रहही याच सुमारास आला. लिहिण्यासाठी मुळातच एक ऊर्जा लागते. इच्छाशक्ती असावी लागते व्यक्त होण्याची आणि तीदेखील जगण्याच्या लिडबिडाटात माखून घेताघेताच. माझ्या आयुष्यातली अलीकडची सहा-सात वर्षे ही अत्यंत झंझावाती होती. मी निरनिराळ्या स्थळ-काळात, घटना-प्रसंगांत एकाच वेळी जगत, वावरत होते. आयुष्यात बरंच काही बदलत होतं. व्यक्तिगत स्तरावर चिक्कार उलथापालथी आणि पडझडी सुरू होत्या. काळ अक्षरश: राक्षसी गतीनं मला पुढं ढकलत होता. एक वेगवान असं आयुष्य ज्याला साहसीही म्हणता येईल, पुढं काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाजही करता येऊ नये आणि तरीही पावलं पुढं पुढंच जात राहावीत असं काहीतरी सुरू होतं. लेखन याचाच एक अनिवार्य हिस्सा. मला कुठेतरी  जाणवलं होतं की, हे लेखन या काळातच शक्य आहे. ‘एक्झिट’ या कथेमधला एक तुकडा असा  :तिनं स्वत:च्या हाताने योनीतून आपलं गर्भाशय खेचून बाहेर काढलं आणि नदीच्या पात्रात सोडून दिलं. क्षणार्धात नदीच्या पाण्याचा रंग बदलला. रक्तासारखा लाल लाल भडक. ती अचंबित झाली. पलीकडच्या काठाला लक्ष गेलं तिचं, तर तिथं दुसरी बाई बसलेली. तीही तिच्या हाताने तिचं गर्भाशय नदीत सोडत होती. मीताने चमकून आजूबाजूला जरा नीट पाहिलं तर तिला नदीच्या दोन्ही काठांना अशा कितीतरी बायका दिसल्या, आपापली गर्भाशयं पाण्यात सोडून देणाऱ्या.
माझ्या लगतच्या वर्तमानात दिसणारी जी काही चपल रूपं होती, लखलखत नाहीशी होणारी, ती मला पकडायची होती. मला खरा रस त्या रूपात होता आणि ‘अफवा..’मधून मी ती पकडण्याचा प्रयत्न केला, असं मला मनापासून वाटतं.
माझी कविता अस्वस्थतेतून येते, असं मी वर म्हटलं खरं, पण म्हणजे जरा काही खुट्ट झालं आणि कविता झाली असं होत नाही. ती अस्वस्थता खोलवर आत मुरावी लागते. पण एक मात्र खरं, कविता लिहून झाल्यावर ती अस्वस्थता काहीशी कमी होते. तात्पुरता का होईना, पण शांतता मिळाल्याचा फील येतो. त्या वेळी जगातली कितीही मोठी भौतिक समृद्धी त्या शांततेसमोर थिटी असते. त्यामुळेच आयुष्यात कितीही वेळा नराश्याचे, कडेलोटाचे क्षण आलेले असले तरी कवितेचा हात धरून पुन्हा पुन्हा उठून उभं राहणं हे माझ्याबाबतीत घडलेलं आहे. कवितेच्या या ताकदीनं मी वारंवार चकित झाले आहे!
pradnyadpawar@gmail.com
‘चतुरंग मैफल’मध्ये पुढील शनिवारी २७ जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम