प्रतिभा ही आनुवांशिक असते का? काव्यप्रतिभेचा दुर्मीळ वारसा जपणारी चार पिढय़ांची परंपरा लाभलेलं घराणंही दुर्मीळच म्हणायला हवं. कवी दत्त, त्यांचे सुपुत्र कै. विठ्ठलराव घाटे, त्यांच्या सुविद्य कन्या डॉ. अनुराधा पोतदार आणि त्यांची मुलं.. डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि यशोधरा पोतदार-साठे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चार पिढय़ांचा शोध घेताना काव्य-साहित्य-ललितलेख
जन्मापासून पाहिली वरवरी तेवीस पाने पुरी,
कोणा माहित आणखी कितितरी पाहिन या भूवरी?
दृष्टीदेखत आज पान सरले, आले नवे बाहिर
जाणू काय अम्ही शुभाशुभ किती वाचील तो यावर?
दत्तात्रय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांची ही कविता. तेवीस वर्षांचं आयुष्य उपभोगल्यावर सहज मनात आलेला विचार या कवितेत उमटला. रविकिरण मंडळातील एक तेजस्वी किरण समजला जाणारा हा तरुण कवी, पुढे त्याच्या जीवनग्रंथाचं अवघं एकच पान उलगडलं गेलं.
अवघ्या चोवीस वर्षांचं आयुष्य म्हणजे जाणत्या वयातली केवळ सात ते आठ र्वष लाभली. पण एवढय़ा अल्पकाळात कवी दत्तांनी जो वारसा मागे ठेवला तो चार पिढय़ांपर्यंत झिरपला. विपुल लेखन केलेल्या, आपल्या नातवंड-पतवंडांच्या सहवासात रमलेल्या किती कवी-लेखकांच्या वाटय़ाला हे भाग्य आलं असावं? हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नावं सापडली तरी पुरे!
नियतीचा खेळ जितका आकलनाच्या पलीकडे, तितकीच प्रतिभाशक्ती चिमटीत पकडून बोलणं अशक्य. नियतीचे संकेत आणि प्रतिभेचे आविष्कार अतक्र्य असतात हेच खरं. नाही तर सन १८९९ मध्ये मृत्यूनं गाठलेल्या कवीची पतवंडं, लोकमान्यता आणि राजमान्यता मिळवतील.. कुणी सांगितलं असतं?
प्रतिभा ही आनुवंशिक असते का? दोन्ही बाजूंनी भरपूर उदाहरणं आपल्याला देता येतील. पण ती देतानाच प्रतिभेच्या बरोबरीनं वाङ्मयीन संस्कारांचंही तितकंच महत्त्व मानायला हवं हेही डोळ्याआड करता येणार नाही आणि म्हणूनच काव्यप्रतिभेचा दुर्मीळ वारसा जपणारी चार पिढय़ांची परंपरा लाभलेलं घराणंही दुर्मीळच म्हणायला हवं. कवी दत्त, त्यांचे सुपुत्र कै. विठ्ठलराव घाटे, त्यांच्या सुविद्य कन्या डॉ. अनुराधा पोतदार आणि त्यांची मुलं.. डॉ. प्रियदर्शन पोतदार आणि यशोधरा पोतदार-साठे. वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या चार पिढय़ांचा शोध घेताना काव्य-साहित्य-ललितलेखनाच्या क्षेत्रात सातत्यानं लिहिणारं.. नव्हे काव्य जगणारं हे घराणं!
कवी दत्तांशी आपला परिचय आपल्या प्रत्येकाच्या लहानपणी झाला आहे. ‘शहाणी बाहुली’ किंवा ‘मोत्या शिक रे अ आ ई..’ तसंच आजही कानात गुंजणारं अंगाईगीत.. ‘नीज नीज माझ्या बाळा’ ही रचना त्यांचीच. पण त्याखेरीज कवी दत्तांचं काव्यकर्तृत्व वेगवेगळं आणि जास्त आहे. त्यांनी १८९५ मध्ये मेघदूताचा मराठी अनुवाद सिद्ध केला होता, ज्याची प्रत उपलब्ध नाही. ‘उत्तर रामचरित’ या नाटकाचा त्यांनी मराठी अनुवाद केला. श्री शिवछत्रपतींना नरसिंह अवतारात पाहणारी त्यांची ओजस्वी कविता प्रसिद्ध आहे. ‘मराठी नवकवितेचे एक प्रवर्तक’ म्हणून कवी दत्तांचं स्थान अगदी थोडय़ा निर्मितीवरच पक्कं झालं हे आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर बालसुलभ बालकविता लिहिणाऱ्या दत्तांनी ‘आधुनिक मराठी कवितेत वत्सलरसाचा आणि निरागस बालमनाचा चिमुकला निर्भेळ प्रवाह आणून सोडण्याचं श्रेय मोठं आहे,’’ अशा शब्दात कवी माधव ज्यूलियन यांनी कवी दत्तांची कामगिरी नोंदवली आहे. असं सांगतात, की कवी दत्त ‘गोल्डन ट्रेझरी’ उशाशी घेऊन झोपत असत. केवळ अति काव्यप्रेमातून आलेला हा प्रकार नव्हता तर त्या कविता त्यांनी आत्मसात केल्या होत्या. चार मित्र जमले म्हणजे गप्पांचा प्रमुख भाग, केलेल्या.. आवडलेल्या कविता म्हणणे.. वाचून दाखवणे हाच असे. बडोद्याच्या मुक्कामात प्लेगनं कहर मांडलेला असता, आपले कविमित्र चंद्रशेखर यांना कविता वाचून दाखविण्यासाठी कवी दत्त मैल दोन मैल रात्रीच्या अंधारात चालत जात असत. हे काव्यप्रेम फार डोळस होते. ‘नवनीत’मध्ये सन १८१२ पर्यंतच्या कवितांचा संग्रह करून परशुरामपंत तात्यांनी मोठीच कामगिरी केली. पुढच्या कविता मोठय़ा कष्टानं मिळवून कवी दत्त अर्वाचीन कवितासंग्रह संपादित करीत होते. त्यांचं अपूर्ण कार्य पुढे त्यांच्या परममित्राने कवी चंद्रशेखर यांनी पूर्ण केले. नगरच्या मुक्कामात ज्येष्ठ कवी रेव्ह. टिळक आणि बडोद्याला चंद्रशेखर यांचा अपार स्नेह कवी दत्तांना लाभला. त्यातून काव्यानंद लुटायची गोडी लागली.
हे थोडं सविस्तर सांगण्याचं कारण असं, की प्रतिभेचा वारसा रक्तातून येतो, पण काव्यप्रेमाचाही वारसा कवी दत्त देऊन गेले आणि पुढच्या पिढय़ांनी तो जोपासला हे महत्त्वाचे. दत्तांचे पुत्र विठ्ठलराव घाटे यांना वडिलांचा सहवास लाभल्याचं आठवणं शक्यच नाही. पण ‘दिवस असे होते’ या आपल्या आत्मचरित्रात विठ्ठलराव घाटे म्हणतात, ‘‘दत्त, तुमच्या कोणत्याच उबदार आठवणी माझ्यापाशी नाहीत. पण रक्तात ज्या प्रेरणा ठेवून गेलात त्या जाग्या आहेत. अनेक प्रसंगी त्यांनीच मला वाट दाखवली. थकलो, थांबलो.. त्या वेळी पुढे ढकललं, कवी दत्तांचा मुलगा मी! थकता, थांबता, घसरता कामा नये, पुढेच गेलं पाहिजे असं वाटे. हाच तुमचा वारसा.. तुमचा आशीर्वाद.’’
खरोखरच.. वि. द. घाटय़ांचे हे केवळ शब्द नव्हते तर दत्तांचा वारसा त्यांनी सर्वार्थानं विस्तारला, संपन्न केला. प्रारंभी कविता करून कवी माधव ज्यूलियन यांच्यासोबत ‘मधु-माधव’ हा काव्यसंग्रह काढणाऱ्या घाटय़ांनी अतिशय प्रसन्न अशी व्यक्तिचित्रे.. ललितलेखन केलं. नाटकंही लिहिली. इतिहासाचा अभ्यास केला. शिक्षणशास्त्रात तज्ज्ञ झाले. भाषेवर प्रेम केलं. काव्यप्रेमाचा आणि भाषाप्रेमाचा वारसा पुढे पोहोचवण्यासाठी आचार्य अत्रे यांच्यासोबत नवयुग वाचनमालेचं संपादन केलं. नवलेखक, नवकवी यांना दादा घाटे म्हणजे नेहमीच, उमदं, रसिक.. शब्दश: ‘पांढरे केस, हिरवी मने’चा प्रत्यय देणारं व्यक्तिमत्त्व, भुरळ घालत राहिलं. ‘नाटय़रूप महाराष्ट्र’ लिहून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी इतिहासाची गोडी कशी लावता येते हे दाखवून दिलं. सर्व क्षेत्रांत संचार केला तरी घाटय़ांचं पहिलं प्रेम साहित्यावर होतं. कवी दत्तांप्रमाणेच घरी सदैव मित्रमंडळींचा राबता, गप्पांच्या मैफलीतला मुख्य भाग कविता वाचणं.
विठ्ठलराव घाटय़ांची बुद्धिमान आणि अतिसंवेदनशील मुलगी कविता करू लागली हे तर ओघानंच आलं. पण उषा घाटे म्हणजे डॉ. अनुराधा पोतदार यांची कविता सर्वस्वी निराळीच. अतिशय आत्मनिष्ठ.. प्रेमानुभव असो वा जीवनानुभव तीव्रतेनं व्यक्त करणारी, सूक्ष्मात शिरू पाहणारी आणि भावनांच्या आवर्तात भोवंडणारी अशी होती, आहे. डॉ. अनुराधा पोतदार कवयित्री म्हणून अधिक प्रसिद्ध, तरी त्यांचं आस्वादात्मक ललित लेखन, अनेक काव्यसंग्रहांचं संपादन, समीक्षा.. लक्षवेधी आहे. ‘मराठीचा अर्थविचार’ अशा तांत्रिक विषयात पीएच.डी. आणि तीस वर्षांचं मराठीचं अध्यापन. पोतदारबाईंमुळे काव्याची गोडी लागली असे सांगणारे हजार तरी विद्यार्थी भेटतील आणि त्यांच्यामुळे कविता करू लागलो सांगणारे शेकडो.
आपला पहिलाच कवितासंग्रह ‘आवर्त’ आपल्या आजोबांना-म्हणजे कवी दत्तांना अर्पण करणाऱ्या अनुराधाबाई
‘धगीत पेटत्या लाविले कुणी,
लावण्यवेलीचे नाजुक पिसे’
असं वर्णन करतात, तेव्हा कविता करणं ही केवळ कला राहत नाही.
‘तो आकाशातला धन्वंतरी
माझ्यावर इलाज करतो आहे
एक जळजळीत रेघ माझ्या
भाळावर त्यानं कधीचीच
ओढून ठेवली आहे..
काटय़ानं काटा काढावा,
तसा दु:खाला
दु:खाचाच उतारा देऊन,
तो इलाज करतो आहे..’
अशा उद्गारातून कविता करणं म्हणजे काय, याचाच प्रत्यय आपल्याला येतो.कविता म्हणजे दु:खाचा, विदीर्ण करून टाकणाऱ्या अनुभवांचा शाप, असं चौथ्या पिढीचे कवी डॉ. प्रियदर्शन पोतदार यांनाही वाटतं. ते म्हणतात, ‘‘माझ्या कवितेतली आंतरिक विदीर्णता, मृत्यूचं भान, पोरकेपणा, परकेपणाची जाणीव यांच्यामागे मला आयुष्यात आलेले अनुभव एवढंच कारण नाही. असे अनुभव मला विदीर्ण का करून टाकतात? अशा भग्नावस्थेतही कविता निर्माण करण्याची क्षमता कुठून येते? माझ्या साहित्यिक वारशानं जर मला असं बनवलं असेल तर हे श्रेय त्यांचंच..! खरं तर कवितेचं हे व्रत, हा वसा वर नसून शाप आहे आणि हा शाप वर म्हणून सांभाळण्याचा वेडेपणा जन्मजात कवीच करू जाणोत.’’
प्रतिभेला चिद्घनचपला म्हटलं गेलंय. ती कवेत घेऊ पाहणारा असाच होरपळणार. डॉ. प्रियदर्शन पोतदार यांचे दोन कवितासंग्रह आहेत- ‘लाटांच्या आसपास’ आणि ‘रात्रींच्या रानात’. त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहानं महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि विशाखा पुरस्कार मिळवला. ‘आत्मशोधातून आत्मविलोपाच्या अवस्थेचा प्रत्यय देणारा शोक,’ असं त्यांच्या कवितेचं वर्णन समीक्षकांनी केलं आहे.
‘कविते.. किती घायाळ केलंस तू मला,’ असं म्हणणारी कवयित्री यशोधरा पोतदार-साठे. ‘तनमनाची गाणी’ या पहिल्याच काव्यसंग्रहाला ‘राज्य पुरस्कार’ आणि ‘इंदिरा संत पुरस्कार’ मिळाला. आजोबा म्हणजे विठ्ठलराव घाटय़ांकडे लहानपणापासून सारेच कवी भेटत. संध्याकाळी गल्लीवरच्या संधिप्रकाशात त्यांच्या जमलेल्या मैफली, मोगऱ्याचा सुगंध, गार वारा यांच्या आठवणी मनात खोलवर रुजलेल्या आहेत. आईच्या कविता वाचत-ऐकत मोठी झालेली यशोधरा आईविषयी सांगते, ‘‘आपली आई कवयित्री म्हणजे इतर आयांपेक्षा खूप वेगळी याचं भान खूप लवकर आलं.’’
घरातलं वातावरण कवितेला खूपच पोषक. उत्तम साहित्य, उत्तम कविता, कवितेबद्दलचं उत्कट प्रेम सारंच भरभरून मिळालं. तरीही कविता रक्तातून आली हेच खरं! रक्तातून आलेलं हे दैवी देणं सासरच्या घराण्यानं प्रेमानं जोपासलं. तिचे पती श्रीनिवास, सासुबाई सुधा साठे याही लेखिका.
सासरे कै. शं. गो. साठे यांच्या ‘ससा आणि कासव’ या गाजलेल्या नाटकावरून सई परांजपे यांनी ‘कथा’ हा चित्रपट केला. प्रारंभी आईच्या कवितेच्या वळणानं जाणारी आपली कविता पुढे बदलली, असं यशोधरा साठे म्हणतात. श्वास घ्यावा इतक्या सहजपणे मी लहानपणापासून कविता केली, असंही सांगतात. कवी दत्त आणि विठ्ठलराव घाटे या दोघांच्या लेखनात त्या काळाप्रमाणे अतिशय संयत आविष्कार होता, तर डॉ. अनुराधा पोतदार आणि चौथी पिढी प्रियदर्शन-यशोधरा यांचा केवळ आविष्कारच नव्हे तर कवितेची जातकुळीच बदलली. पण जगण्याचा केंद्रबिंदू कविताच राहिली. ‘जिच्याकरिता जन्म या जगी झाला’ असं दत्तांनी म्हटलं तर ‘जगण्याचं पात्र कविता होऊन उतू जातं’ असं अनुराधाबाईंनी म्हटलं.
‘तू असतेस तेव्हाच फक्त जगणं असतं
एरवी सावली पांघरतो जगण्याची’ असं प्रियदर्शन म्हणतात, तर
‘असह्य़ जगणं.. स्वीकारताना..
तूच होतीस जपलेला उत्कट, शांत दिवा’ असं यशोधरा साठे सांगतात. कविता जगणाऱ्या या घराण्यात आता ही परंपरा थांबल्यासारखी वाटतेय. पाचवी पिढी कर्ती आहे. पण कविता नाही. पण प्रतिभेचे व्यवहार अतक्र्य हे आपण पाहिलं. निसर्गातही काही बीजं दीर्घकाळ सुप्तावस्थेत पडून राहतात. पण जेव्हा अंकुरतात, तेव्हा दुर्मीळ वृक्ष बहरतात. कवी दत्तांच्या कविकुळातही असंच एखादं आश्चर्य गवसेल. कुणी सांगावं?
vasantivartak@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा