|| अनुराधा ठाकूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनमध्ये एक अजस्र हवा शुद्धीकरण यंत्र नुकतेच बसविण्यात आले. या एअर प्युरिफायरचे परिणाम अत्यंत प्रभावी ठरले आहेत. याच्यामुळे धूळ, हवेतली अशुद्धता जवळजवळ ८० टक्के निघून जाते. आसपासच्या १० चौरस किलोमीटर प्रदेशातील हवा शुद्ध करण्याची क्षमता या एअर प्युरिफायरमध्ये आहे. चीनमधल्या इतर शहरांतही असेच मनोरे आणि याहून जास्त क्षेत्रातील हवा शुद्ध करण्यासाठी उपकरणे तयार करण्यासाठी अनेक तांत्रिक प्रयोग चालू आहेत. प्रदूषणमुक्त चीन ही वास्तवात येणारी संकल्पना ठरली आहे. आपल्याही देशातील वाढत्या प्रदूषणावर अशा सारखे उपाय रामबाण ठरू शकतात.

३१ ऑक्टोबर १९१८ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘एकता पुतळा’ (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वल्लभभाई पटेल यांच्या अतिभव्य पुतळ्याचे अनावरण झाले. त्याच सुमारास चीनमध्ये एक अभिनव प्रयोग झाला. Xian (शियान) येथे shaanxi प्रॉहीन्समध्ये एक अजस्र हवा शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले.

हा प्रदेश उत्तर चीनमध्ये येतो. एक शंभर मीटर उंच स्तंभ आणि त्याभोवती वसविलेली ग्रीनहाऊस पॅनल्स ही साधारण एका फुटबॉल ग्राऊंडएवढी अजस्र आहेत. शियान शहरातली दूषित हवा या ग्रीनहाऊस पॅनल्समध्ये ओढली जाते आणि सौर ऊर्जेने ती गरम केली जाते. पॅनल्स ही हवा सूर्यकिरणांच्या साहाय्याने गरम ठेवतात. ही गरम हवा त्या शंभर मीटर मनोऱ्यातून वर जाते आणि अनेक थर असलेल्या चाळण्यांतून (फिल्टर्समधून) शुद्ध होऊन वरूनच परत बाहेर जाते. सारे अशुद्ध धूलिकण, कर्बकण, घात वायू मिश्रण आणि घातक रसायने या फिल्टर्समध्ये साठतात.

या एअर प्युरिफायरचे परिणाम अत्यंत प्रभावी ठरले आहेत. याच्यामुळे धूळ, हवेतली अशुद्धता आणि इतर प्रदूषण जवळजवळ ८० टक्के निघून जाते. आसपासच्या १० चौरस किलोमीटर प्रदेशातील हवा शुद्ध करण्याची क्षमता या एअर प्युरिफायरमध्ये आहे. चीनमधल्या इतर शहरांतही असेच मनोरे आणि याहून जास्त क्षेत्रांतील हवा शुद्ध करण्यासाठी उपकरणे तयार करण्यासाठी अनेक तांत्रिक प्रयोग चालू आहेत. प्रदूषणमुक्त चीन ही जवळच्या काळात वास्तवात येणारी संकल्पना ठरली आहे. आपल्याला हे पक्के माहीत आहे, की प्रदूषणामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्याची किंमत आपल्याला मोजावी लागतेच; पण प्रशासनालाही मोजावी लागते. पायाभूत सुविधांचा अभाव आणि प्रदूषण यामुळे भारतात कर्करोग, श्वसनसंस्थेचे आणि पचनसंस्थेचे रोग काही मागासलेल्या देशांपेक्षाही जास्त प्रमाणात आहेत याची शासनाला माहिती असायला हवी.

आपण स्वत:ला प्रगतिशील म्हणवतो, पण अजून कुपोषित बालकांचे प्रमाण (उंची आणि वजन) या निकषात जगातील ११९ देशांत आपण १०३ वे आहोत. नेपाळ, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेहून आपण मागे आहोत. दारिद्रय़रेषेखाली भारतात अजून २८ टक्के लोक (३६.४० कोटी) आहेत. अशा परिस्थितीमध्येही भव्यदिव्य पुतळे बांधण्याची आपली स्पर्धा चालू आहे. देशात अनेक ठिकाणी देवांचे, ऐतिहासिक पुरुषांचे, युगप्रवर्तक पुरुषांचे पुतळे उभारण्याचे बेत जोरात चालू आहेत. काही बाबतीत डिझाइन्सही तयार होत आहेत. सर्वाचे खर्च शेकडो/ हजारो कोटी रुपयांच्या घरात आहेत. हा सर्व पैसा राज्य शासन आणि काही अंशी केंद्र शासन उभा करणार! जोपर्यंत आपण जनतेला स्वच्छ पाणी आणि शुद्ध हवा पुरवू शकत नाही, तोपर्यंत भव्यदिव्य शिल्पे हवीत का? असा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही.

दिल्ली आणि मुंबई ही शहरे जगात सर्वात प्रदूषित शहरात वरच्या क्रमांकावर आहेत. मुंबईचे ट्रॅफिक, झोपडपट्टय़ा, दमट हवा यातून प्रदूषण धोक्याच्या पातळीजवळ जाते, तर धान्याच्या पिकाची साले जाळून जे प्रदूषण पंजाब आणि हरयाणातून दिल्लीला येते, त्याने दर वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यांत नागरिकांना मास्क बांधून बाहेर पडावे लागते, तसेच शाळाही बंद कराव्या लागतात. ही दोन शहरे भारताच्या राजकीय आणि आर्थिक नाडय़ांची केंद्रस्थाने आहेत. समजा, या दोन शहरांत शियानसारखे महाकाय एअर प्युरिफायर वसवले तर केवढय़ा नागरिकांचे जीवनमान सुधारेल, श्वसन आजारांवरचा केवढा अपव्यय वाचेल. या सर्वाचा कार्यक्षमतेवरही सकारात्मक परिणाम होतो, ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. या दोन्ही शहरांतच नव्हे तर इतरत्रही अशी हवा शुद्धीकरण यंत्रे बसवण्याची आवश्यकता आहे.

चीनसारखा प्रचंड लोकसंख्येचा आणि भूकबळींसाठी प्रसिद्ध असलेला देश. तेथील कम्युनिस्ट राजवट; पण त्यांनी भविष्यकाळाची पावले अचूक ओळखून नियोजन केले, योजना आखल्या आणि त्या कडक शिस्तीने कार्यवाहीत आणल्या. लोकसंख्येचा प्रश्न त्यांनी एक जोडपे एक मूल हा कार्यक्रम राबवून आटोक्यात आणला. लहानलहान विद्युतनिर्माण प्रकल्पांचे (small power project) जाळे देशभर विणून वीजनिर्मिती आणि पुरवठा अखंडित ठेवला. ज्यांना चीनला जाण्याची संधी मिळाली असेल, ते जाणून आहेत की, आपण त्याच्या किती तरी पटीने मागे आहोत. आपली जीडीपी ग्रोथ (उत्पादनवाढ) ७.२८ टक्के अमेरिकेच्या आणि चीनच्या वाढीपेक्षा जास्त आहे असे आपण वारंवार वाचतो. हे विधान असत्य नसले, तरी यात चकवेगिरी कुठे आहे, हे ज्यांना अर्थशास्त्राचे थोडेफार ज्ञान आहे तेही जाणतात.

चीनचे गोडवे गाण्याचा उद्देश इथे अजिबात नाही. त्यांच्याकडून चांगले काय घ्यायचे हे महत्त्वाचे! आजही अनावश्यक बाबींवर आणि आम्ही जगात केवढे श्रेष्ठ आहोत या अहमहमिकेखातर जो पैसा ओतला जातो आहे, तो त्याऐवजी शुद्ध हवा, शुद्ध पाणी, भेसळरहित अन्न यावर हे हजारो कोटी रुपये खर्च होण्याची आवश्यकता आहे.

आपल्याकडे तंत्रज्ञानाची कमतरता नाही. दोनेक वर्षांपूर्वी बातमी वाचली होती की, रायगड जिल्ह्य़ातील एका खेडय़ात एका तरुण आणि सुशिक्षित ग्रामपंचायत प्रमुखाने पाणी शुद्ध करण्याचे यंत्र एका स्थानिक कंपनीकडून बसवून घेतले आणि १ रुपयास १ लिटर या दराने शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले. अनेक हुशार इंजिनीअर्स आणि तंत्रज्ञ यांच्याकडे याबाबतच्या तंत्रज्ञानाची माहिती असेल, पण त्यांचा शोध घेणे, त्यांना उत्तेजन आणि आर्थिक साहाय्य देणे, असे प्रकल्प मोठय़ा प्रमाणात गावोगाव निर्माण करणे याकडे आपण लक्षच देत नाही.

ज्या व्यक्तींचे पुतळे वा अन्य स्मारके आपण घडवत आहोत, त्यांचे व्यक्तित्व, कार्य, दूरदृष्टी आणि समाजाप्रति असलेली निष्ठा हे गुण आभाळाएवढे, असीम होते. त्यांना मुजरा करायला त्यांच्या पुतळ्यांची उंची वाढवण्याची गरज नाही. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना उंचीच्या आणि आकाराच्या मापात तोलून आपण आपले खुजेपण दाखवत आहोत.

पंडित नेहरू म्हणत असत, भाक्रा नांगल, दामोदर ही प्रचंड धरणे आधुनिक भारताची मंदिरे आहेत. तसेच मोठे हवा शुद्धीकरण प्रकल्प आपण शांक्सीच्या धर्तीवर उभे केले आणि प्रदूषण आटोक्यात आणून पर्यावरणाला महत्त्व दिले, तर असे प्रकल्प ही आधुनिक भारताची खरीखुरी मंदिरे ठरतील आणि अशी मंदिरे बांधणे हे आपल्या आणि पुढील पिढय़ांसाठी खरोखर उपकारक ठरेल.

anuradha333@gmail.com

chaturang@expressindia.com