ज्या क्षेत्राकडे पूर्वी समाजसेवक करुणा आणि समाजसुधारणेची आत्यंतिक गरज म्हणून वळत असत त्या क्षेत्राकडे मी एक तज्ज्ञ समाजसेवक म्हणून वळले. एम. एस. डब्ल्यू. या पदवीमुळे समाजमन जाणून घेण्याची फक्त एक तंत्रशुद्ध पद्धतच कळते असं नाही तर यातील वाईट प्रवृत्तींवर विविध प्रकारे मात करण्याचं प्राथमिक शिक्षणही मिळतं. त्याचा प्रत्यक्ष समाजात वावरताना, काम करताना खूप उपयोग होतो, असं माझं प्रामाणिक मत आहे.
१९९१ मध्ये एम.एस.डब्लू. पूर्ण केलं आणि लगेचच सामाजिक कार्याकडे मोर्चा वळवला. पुण्यामध्ये कॉन्व्हेंटमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर होम सायन्स घेऊन मी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्या वेळी चाइल्ड डेव्हलपमेंट हा स्पेशलायझेशनचा विषय निवडला. त्यामुळे पुढे समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलं, महिला आणि वृद्ध यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी पुढाकार घेतला.
१९९१ ते ९७ या काळात मी अनेक संस्थांबरोबर समाजसेवा करत होते. मात्र १९९७ मध्ये ‘दिशा एनजीओ’ची स्थापना करून, विकासापासून वंचित असणाऱ्या घटकांच्या सर्वागीण उत्कर्षांसाठी काम करायचं, असं उद्दिष्टं मी ठेवलं. त्या वेळी मी ज्यांना खरंच शिक्षण घेणं परवडणारं नाही, अशा आठ मुलांची निवड केली व त्यांच्यासाठी निवासी शाळा सुरू केली. या मुलांना फक्त पाठय़पुस्तकी शिक्षण दिलं तर ते लिहू-वाचू शकतील पण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घ्यायचं असेल तर हे शिक्षण पुरेसं नाही. म्हणूनच त्यांना चारचौघात कसं बोलायचं, स्व-स्वच्छता कशी ठेवायची, मोठय़ांशी कसं वागायचं याचे पाठही देणं आम्ही सुरू केलं. त्यांना चांगल्या भविष्यासाठी तयार करणे गरजेचे आहे परीक्षांसाठी किंवा पदव्यांसाठी नव्हे.
निम्नस्तरातील कुटुंबांमध्ये फक्त कुटुंबातील एका घटकाचा विकास होऊन चालत नाही. म्हणूनच आम्ही या मुलांच्या शिक्षणाबरोबरच या कुटुंबांमधील महिलांना अर्थार्जन करण्यासाठी मदत केली. पण फक्त गरजूंना मदत हा काटेकोर निकष आम्ही सुरुवातीपासून ठेवला व आत्तापर्यंत पाळलाही. सुरुवातीला आठ मुलांपासून सुरू झालेली माझी निवासी शाळा नंतर अठरा, बावीस, तीस अशा विद्यार्थीसंख्येपर्यंत येऊन पोहोचली. त्यानंतर मात्र मी मुलांसाठीची मर्यादा तीस इतकीच ठेवण्याचा निर्णय घेतला.
पुणे-नगर मार्गावरील वाघोली, कोंढापुरी, लोहगावनजीकच्या झोपडपट्टी-टेकडय़ांचा भाग अशा ठिकाणी आमचे काम सुरू झाले. या भागातील महिलांसाठी आम्ही ‘स्वयंसिद्धा’ हे बचत गटांचं जाळं उभं केलं. बोटावर मोजण्याइतक्या महिलांपासून सुरू झालेली चळवळ आता दोन हजार महिलांपर्यंत पोहोचली आहे. यापकी निम्याहून अधिक जणी स्वत:चा छोटा-मोठा व्यवसाय करत आहेत. ७० टक्के बायका घरबसल्या साडय़ांना पिको-फॉल लावण्याची कामं करताहेत. यामुळे त्यांच्या गाठी पसे जमू लागले. पण महत्त्वाचं म्हणजे त्याचं मन गुंतून राहिलं आणि त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला. कुठलाही प्रोजेक्ट घेताना आम्ही आधी कार्यकर्त्यांच्या मदतीने सर्वेक्षण करतो. त्यानुसार या भागात केलेल्या पाहणीत असं आढळून आलं की एक हजार बायकांपकी फक्त २७ बायका निरक्षर आहेत, बाकीच्या किमान काही इयत्ता तरी शाळेत गेलेल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या मुलांना शाळेची वाट धरायला लावणं कठीण नव्हतं. फक्त त्यांना ते पटवून देणं आव्हानात्मक होतं. अशा वेळी आम्ही एकीकडे या महिलांना स्वावलंबी करत होतो तर दुसरीकडे त्यांची मुलं शाळेत गेली पाहिजेत, यासाठी प्रयत्नशील होतो. मला आनंद वाटतो की आम्ही यात नक्कीच यशस्वी ठरलो. कारण संधींचा अभाव असलेल्या या निम्नस्तरातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर केवळ शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याने प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यांच्यात आर्थिक स्थर्य येईल, याची काही तरी सोय केली पाहिजे, हे मी इथल्या अनुभवातून शिकले.
बचत गटानं परिस्थिती बदलायला फार मदत झाली. जेमतेम शिकलेली कल्पना पवार आज भाजीचा धंदा करते आहे, घाऊक बाजारातून भाजी आणते व विक्रीतून नफा मिळवते. त्यावर तिचं घर चालतं. तर संगीता पिसाळ साडय़ा विकते. आजूबाजूच्या बायकांना उधारीवर साडय़ा विकते व दर आठवडय़ाला या पशांची वसुली करते. त्यातून मुलांची शिक्षणं सुरू आहेत. वर्षां पगारे टेलरिंग करून उत्तम प्रकारचे ब्लाऊज शिवते. त्यात तिची मास्टरी झाली आहे. हे पाहून फार समाधान वाटतं. या स्त्रियांनी किती प्रगती केलीय हे जितकं महत्त्वाचं तितकंच त्यांनी कुठून सुरुवात केली, हेही फार महत्त्वाचं आहे. कारण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेल्या या बायका आहेत.
समाजसेवा ही माझी पॅशन होती. त्यामुळे मी या क्षेत्राला समर्पित झाले. व्यक्तिगत जीवनातील निराशेला आणि दु:खाला कवटाळून न बसता त्यालाच जर आपली प्रेरणा बनविलं तर या प्रेरणेतून समाजासाठी आणि देशासाठी काही ना काही काम करता येतंच. याच प्रेरणने मला इथवर आणलं. गेल्या सुमारे २०-२२ वर्षांच्या या काळात मी कटू अनुभवांपासून खूपच दूर आणि मानसिक समाधानाने काम करीत आहे. या कामात मी तृप्त आणि समाधानी आहे. या क्षेत्रामध्ये निर्भेळ यश किंवा निव्वळ अपयश असं नसतं. उदाहरणच द्यायचं तर आमच्या बचत गटातल्या एका महिलेच्या मुलाने आमच्या निवासी शाळेत शिक्षण घेऊन फाइन आर्ट्समध्ये पदवी मिळवली. त्याचं नाव दशरथ भंडलकर. तो सुंदर चित्र काढतोच पण त्याच्या रामोशी जमातीतून पदवीधर झालेला तो या वस्तीतला पहिलाच मुलगा आहे. विशेष म्हणजे त्याच्या आईने एकटीने त्याला वाढवलं आहे. त्याच्या या यशाने आमचाही ऊर अभिमानाने भरून आला आहे. तर दुसऱ्या बाजूचं उदाहरण म्हणजे आम्ही एका गावातील १५ मुलांना संस्थेत ठेवून त्यांना शिक्षण देण्याची योजना आखली. कारण त्या गावात सातवीच्या पुढे शाळा नव्हती. या मुलांचा वयोगट ६ ते १० र्वष असा होता. त्यातला एक ७-८ वर्षांचा मुलगा खूप हुशार आणि चुणचुणीत होता. खेळात आणि अभ्यासात त्याची प्रगती चांगली होती. गावातल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना हे कळल्यावर त्यांनी त्या मुलाच्या आईचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. संस्थेबद्दलची माहिती दिली. पण तरीही त्याच्या आईने संस्थेतून मुलाला काढून घेतलं. त्याच्या बरोबरची त्याच गावातील पण संस्थेत राहिलेली मुलं आज पदवीधर, द्विपदवीधर, पदविकाधारक होऊन उत्तम आयुष्य जगत आहेत, पण हा मुलगा मात्र सातवीपर्यंत शिकून अर्धशिक्षित राहिला. या एका मुलाचा अपवाद वगळता बाकी आमच्या प्रयत्नांना चांगली फळं आली, असं म्हणावं लागेल.
परित्यक्तांच्या बाबतीतले आमचे अनुभव खूप वेगळे आहेत. नवऱ्याने सोडल्यानंतर त्या महिलेची जबाबदारी घ्यायला अनेकदा सासर-माहेरचं कुणीही तयार नसतं. त्यात तिला मुलं असतील तर प्रकरण गुंतागुंतीचं होऊन बसतं. १९९७ मध्ये अशीच एक खेडय़ातली महिला आपल्या दोन लहान मुलांसह आमच्याकडे आली. आठवडाभर आम्ही तिला मुलांसह संस्थेतच ठेवून घेतलं. नंतर तिला २४ तास घरकामासाठीची नोकरी मिळाली. मुलांना संस्थेत ठेवून तिने नोकरी केली. वर्षां-दोन वर्षांत तिचे
सुमारे ७० हजार रुपये साठले. तिच्या भावाला त्याची कुणकुण लागताच दोन मुलांसह तिचा सांभाळ करण्याची त्याने तयारी दाखविली. तरीही आमच्या आग्रहाने भावाच्याच घरावर तिच्यासाठी एक स्वतंत्र खोली आम्ही बांधून घेतली. खोली बांधण्याचा खर्च वजा करून आता उरलेले पैसे घेऊन ती मुलांसह भावाकडे राहावयास गेली. ४-५ महिन्यांतच पैसे संपले आणि भावाने तिला मुलांसह परत घराबाहेर काढलं. आता ती आणि तिची दोन मुलं कुठे आहेत हे आम्हालाही माहीत नाही. असेही अनुभव येतात. त्यामुळे काहीशी निराशा येते. पण लवकरच हे मळभ दूर होतं, माझ्या आतला आवाज सांगतो, तुला काम करायचंय, तर निराश होऊन चालणार नाही. काम करणाऱ्याकडे हतबल होणं हा पर्यायच नसतो बहुधा!
महिलांसाठी कायदेशीर सल्ला मिळण्याची सोयही आम्ही केली आहे. आम्ही लग्न टिकवण्याला प्राधान्य देतो. पण प्रयत्नांनंतरही प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं तर आम्ही आवश्यक ती सर्व मदत घटस्फोटितेला देतो. वस्तीतील लोकांमध्ये विवाहबाह्य़ संबंध, प्रेमविवाहानंतर नवऱ्याने सोडून दिलेल्या मुली यांच्या समस्या अनेकदा समोर येतात. शबनम नावाची एक मुस्लीम महिला नवऱ्याच्या जाचाने त्रस्त होती. पण काही केल्या तो तिला घटस्फोट देत नव्हता. आम्ही तिला मार्गदर्शन केलं व घटस्फोट मिळवून दिला. आज ती नर्स म्हणून काम करत असून तिच्या मुलासह सुखी आहे.
आणखी एक आव्हान म्हणजे निवासी शाळेत दाखल करून घेतलेल्या अनाथ आणि कुपोषित मुलांचं. त्यांना सांभाळणं, फारच अवघड असतं. आम्हाला त्यांची आई व्हावं लागतं, त्यांचं संगोपन करावं लागतं. विशेष म्हणजे कुठलंही दुर्लक्षित मूल, अनाथ मूल आणि परित्यक्ता किंवा घरगुती हिंसाचाराला बळी पडलेली बाई यात एकासारखी दुसरी केस नसते. प्रत्येक केस हे एक नवं आव्हान असतं. त्यामुळे गीतेत सांगितल्याप्रमाणे हा एक कर्मयोगच आहे आणि तो माझ्या सहकाऱ्यांनी व मी डोळसपणे स्वीकारला आहे.
ज्येष्ठ असूनही कार्यरत असणारे, आरोग्य चांगलं असणारे, काहीही न करणारे आणि आला दिवस रेटणारे, प्रत्यक्ष काम न करताही आर्थिक स्वयंपूर्ण असणारे, गरीब, मध्यम आणि श्रीमंत वर्गातले, भरपूर मालमत्ता असणारे आणि रोजच्या जेवणासाठी कपडय़ालत्त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असणारे असे जितके वर्ग-उपवर्ग मोजावेत तितक्या प्रकारच्या समस्या. भविष्याची भीती, संपत्तीच्या संरक्षणाबाबत अनिश्चितता, नवीन पिढीच्या जीवनशैलीबरोबर जुळवून घेण्यातील अडचणी आणि रोजच्या रोज कमी होणारा आत्मविश्वास यातून ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या उद्भवतात. समुपदेशनासाठी येणाऱ्या वृद्धांमध्ये तीनचतुर्थाश महिला असतात, ही बाब मला फार अस्वस्थ करते. कारण या बायका आधी कधीच घराबाहेर पडलेल्या नसतात आणि आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचं जीवन असं सैरभैर झाल्याने त्या त्रस्त असतात. पण समुपदेशन करताना आम्ही एक नियम पाळतो. ‘समस्या असणारच आहेत, त्यांना स्वीकारून त्यावर काय उपाय करता येईल, हे ज्येष्ठ नागरिकांनाच शोधायला सांगतो.’ त्यांची मुलं व ज्येष्ठ नागरिक यांच्यातील दरी मिटवण्याचं काम आम्ही करतो.
पण इतक्या वर्षांच्या समुपदेशनानंतर ज्येष्ठांबाबत मी एक मत नोंदवू शकते, की कोणत्याही धर्माचा, जातीचा ज्येष्ठ नागरिक जर आध्यात्मिक प्रवृत्तीचा असेल तर तो अधिक जमवून घेणारा असतो. साठी पार केलेल्या सगळ्यांचीच मानसिकता बदलायला खूप वेळ लागतो. हे ज्येष्ठ नागरिक खूप आडमुठे, हट्टी आहेत, असं प्रथमदर्शनी दिसलं तरीही जुन्या विचारसरणीतून आणि जीवनशैलीतून बाहेर पडताना त्यांना होणारा त्रास त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसत असतो, हे मी जवळून पाहिलं आहे. पण काहींची मानसिकता बदलण्यात मला यशही आलं. एक बोहरा मुस्लीम ज्येष्ठ महिला नेहमी निराश आणि उदास राहायची. तिला उत्तम विणकाम आणि काशिदाकाम येत होतं. पण ती हे विसरलीच होती. तिची कला पुनरुज्जीवित करायला मला ३-४ र्वष लागली. पण आता ती तर काम करतेच, पण इतरांनाही ही कला शिकवते. माझ्या संपर्कात येण्यापूर्वी ज्या महिलेला एकटेपण भेडसावत होतं ती आता पूर्णपणे समाजाभिमुख, उत्साही व्यक्ती झाली आहे. तिचा उत्साह तरुणांनाही लाजवणारा आहे.
आज इतकी र्वष या लोकांसाठी काम केल्यानंतर मी नक्कीच खूप समाधानी आहे. पण आपण कुणाच्या तरी आयुष्यात बदल घडवून आणू शकतो, ही भावना मला अधिक क्षमतेने कार्यरत राहण्याचं बळ देते. कुठलाच समाज कधीच समस्याविरहित असणार नाही. एखाद्या प्रकारची समस्या बदलेल कदाचित पण नव्या स्वरूपात, अधिक जटील समस्या निर्माण होणार. मग माझ्यासारख्यांनी थांबून कसं चालेल, हा विचार मला स्वस्थ बसू देत नाही. एक गोष्ट मला माझं मन कायम सांगत असतं, ‘समुद्राच्या लाटेबरोबर अनेक मासे किनाऱ्यावर येतात. आपल्याला जमेल तितके आपण पाण्यात परत सोडले तर काही मासे तरी जिवंत राहू शकतील. भलेही माझ्या दोन हातांनी मी सगळ्या माशांना वाचवू शकणार नाही. पण काहींना तर जीवदान मिळेल, थोडा तरी बदल होईल.’ हाच बदल घडवण्याचा वसा मी घेतला आहे. आणि तो पुढे चालवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
(शब्दांकन – भारती भावसार)
संपर्क-पूर्णिमा गदिया
पत्ता- दिशा इन्सिटय़ूट, २३-३२/ १, उबाळे नगर, वाघोली, पुणे ४१२ २०७
भ्रमणध्वनी-९८२२२४७७०४
ई मेल- poornima_disha@yahoo.co.in
वसा वंचितांच्या विकासाचा
समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलं, महिला आणि वृद्ध यांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘दिशा एनजीओ’ची स्थापना करून, विकासापासून वंचित असणाऱ्या या घटकांच्या सर्वागीण
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poornima gadiya of disha ngo