जान्हवी पणशीकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘ बाबांना नवनवे प्रयोग करायची हौस होती. कन्नड शिकून ‘तो मी नव्हेच’चे निप्पाणी, बेळगाव, कारवार, हुबळी, सोलापूर येथे कानडी भाषेत त्यांनी प्रयोग केले. ‘अश्रूंची झाली फुले’चे गुजराती भाषेत प्रयोग केले. त्यांनी रंगभूमीला फिरता रंगमंच, सरकता रंगमंच, तीन फिरते रंगमंच तर दिलेच पण ‘संत तुकाराम’ नाटकातील पुष्पक विमान, ‘झाशीची राणी’मध्ये मोठी तोफेची प्रतिकृती, ‘महाराणी पद्मिनी’मध्ये जौहार प्रसंगातल्या आगीच्या ज्वाळा, ‘अश्रूंची झाली फुले’मध्ये प्रत्यक्ष तुरुंग, ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’ या नाटकात ज्यूंवर होणारा अत्याचार दाखवला. बाबा केवळ नट किंवा निर्माते नव्हते तर खऱ्या अर्थाने नाटय़ व्यावसायिक होते. अनेक ठिकाणी नाटय़गृहाची सोय नसताना तात्पुरती व्यवस्था करून नाटके केली, त्याच ठिकाणी आता नाटय़गृहे उभी राहिली. अनेक होतकरू युवकांना, नव्याने व्यवसायात पडणाऱ्याला त्यांनी सर्वतोपरी साहाय्य केले, प्रसंगी नुकसान सोसले. कारण ‘शो मस्ट गो ऑन’ हा त्यांचा मंत्र होता,’’  सांगताहेत जान्हवी पणशीकर आपले पिता प्रभाकर पणशीकर यांच्याविषयी..

नाटय़सृष्टीत सर्व कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ अगदी रंगभूषा व वेशभूषा करणाऱ्या सर्वाना एक मंत्र चांगला अवगत असतो तो म्हणजे, ‘शो मस्ट गो ऑन.’ हा मंत्र सर्व सदैव अंगीकारला तो आमचे बाबा नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांनी!

८ एप्रिल १९६३, हनुमान जयंतीला बाबांनी ‘नाटय़संपदा’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. पुढील पन्नास वर्षे ही संस्था चालवली. त्यात एकूण बेचाळीस नाटके, एकूण अंदाजे आठ हजारच्या वर प्रयोग, मानाचे २१ पुरस्कार मिळविले. ‘नाटय़संपदा’ हे आपलेच अपत्य आहे, या भावनेनेच त्यांनी शेवटपर्यंत तिचे पालनपोषण केले. ‘तो मी नव्हेच’मधील पंचरंगी भूमिका करून या नाटकाचे त्यांनी २८०० च्या वर प्रयोग केले व लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘तो मी नव्हेच’मधील लखोबा लोखंडे असो, ‘अश्रूंची झाली फुले’मधील विद्यानंद असो, ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील औरंगजेब असो, ‘मला काही सांगायचंय’मधील न्यायमूर्ती देवकीनंदन असो, ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’मधील जेलर मिस्टर ग्लाड असो, ‘महाराणी पद्मिनी’मधील अल्लाउद्दीन खिलजी असो आपल्या दमदार व कसदार अभिनयाने त्यांनी नाटय़रसिकांच्या हृदयावर अनेक वर्षे अधिराज्य गाजवले. बाबा म्हणजे नाटय़सृष्टीला मिळालेले अनमोल रत्नच होते. स्वत:च्या घरात संस्कृत पंडितांचा वावर व संस्कार असतानाही एक वेगळी वाट निवडायचं धाडस बाबांनी त्या काळात केलं. अतिशय देखणं व्यक्तिमत्त्व, खणखणीत आवाज व उच्चार. या भांडवलाच्या जोरावर बाबा कफल्लक अवस्थेत नशीब आजमावण्यासाठी बाहेर पडले. नेसत्या वस्त्रानिशी घर सोडलेल्या या मुलाने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमीवर अलौकिक कामगिरी करून एक इतिहास घडविला.

दहावीत असताना शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकात मुख्य भूमिका करण्याच्या निमित्ताने त्यांनी रंगमंचावर प्रथम प्रवेश केला आणि त्यानंतरचं त्यांचं आयुष्य म्हणजे चमत्कारच होता. प्रतिभेने ओथंबलेला व सर्वागाने बहरलेला असा ‘रंगनायक’ मराठी रंगभूमीवर तरी विरळाच. अशा बाबांची मी कन्या जान्हवी याचा मला खूप अभिमान वाटतो. पाच वर्षांची असल्यापासून मी बाबांबरोबर ‘नाटय़संपदा’त जायची. बाबांमुळेच माझी रंगभूमीशी ओळख झाली. या कलेशी जवळीक साधली गेली. लहान-मोठय़ा भूमिका करत करत नाटय़संपदेचा एक अविभाज्य घटक बनले. असंख्य नाटय़दौऱ्यांच्या निमित्ताने मला बाबांचा सहवास घराबाहेर सर्वात जास्त मिळाला. त्यांनी मला कधी अभिनय शिकवला नाही, ते स्वत:च अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ होते. लहानपणी वाटायचे, ‘तो मी नव्हेच’मधील वेणूची भूमिका जर बाबांनी मला करू दिली तर मी त्या भूमिकेचे सोने करीन. पण नंतर लक्षात आले की वेणूला जेमतेम दोन-तीन वाक्ये. त्यात मी सोने ते काय करणार? माझ्यानंतर तीस वर्षांनी वेणूची भूमिका माझी मोठी मुलगी मानसी हिने केली. मुलुंडच्या एका महोत्सवी प्रयोगात बाबा, मी आणि त्यांची नात मानसी यांनी एकत्र भूमिका करण्याचा त्रीपिढी योग साधला गेला. त्यानंतर मी ‘कटय़ार’मधील ‘उमा’, ‘येसूबाई’, ‘ताराराणी’ अशा अनेक भूमिका बाबांबरोबर केल्या. बाबांप्रमाणेच मीही ‘तो मी नव्हेच’मधील सर्व स्त्री भूमिका केल्या आणि त्यांच्याप्रमाणेच पंचरंगी भूमिका करण्याचा विक्रम केला. त्यातली सरकारी वकिलाची भूमिका ताकदीने सादर केली. त्यावेळी ‘टायटन’चे मनगटी घडय़ाळ बाबांनी भेट म्हणून दिले होते.

स्वतंत्र नाटके, पात्र, बॅक स्टेजचा विचार करणाऱ्या बाबांना आम्ही तेव्हा कितवीत होतो, शाळेचा निकाल काय लागला याची माहितीही नसायची. मला वाटतं त्याची गरजही नव्हती. कारण ध्येयाने पछाडलेल्या माणसांना स्वत:च्या संसाराचे भान नसते हा इतिहास आहे. त्यांनी आपला संसार रंगमंचाशी बांधला होता आणि म्हणूनच ते नाटय़सृष्टीतील दंतकथा होऊ शकले. आई आणि बाबांच्यात असलेले गुण आम्हा तिघा भावंडांमध्ये आले. मी जान्हवी, कलेच्या क्षेत्रात त्यांचा वारसा पुढे नेण्याचे काम करतेय. मधला रघुनंदन शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करून आता तो पंडित रघुनंदन पणशीकर म्हणून कीर्तिमान झालाय. तर धाकटय़ा तरंगिणीने पणशीकर घराण्याचा संस्कृतचा वारसा आणि आजोळचा शिक्षकी पेशा पुढे नेलाय. आम्ही सर्व कुटुंबीय बाबांच्या आशीर्वादाने ज्या क्षेत्रात आहोत तिथे पूर्ण समाधानी आहोत. आम्ही मुलांनी काय शिकावे, काय करिअर करावे याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांनी आम्हाला दिले होते. शिक्षण असो, लग्न असो, कोणताही निर्णय असो, ते आमच्या पाठीशी होते. बाबांनी जसे आमच्यावर प्रेम केले तसेच आमच्या चुलत भावंडांवरही स्वत:च्या मुलांसारखेच प्रेम केले. जावई

शक्ती सिंह, नरेंद्र खोत आणि सूनबाई अपर्णा यांच्यावरही पित्यासमान प्रेम केले आणि त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलेली सर्व नातवंडे अतिशय प्रिय होतीच, पण बाबांनी स्वत:च्या डोळ्यांनी बघितलेली चौथी पिढी पणती अनिका म्हणजे तर दुधातली साखर!

नाटकामुळे बाबांचे राजकारणातील अनेकांशी मत्रीचे संबंध होते. ते स्वत: हिंदुत्ववादी होते. पण पूजा-अर्चा, देव-धर्म यात त्यांनी स्वत:ला गुरफटून कधी घेतले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष लोभ होता. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे उत्तम नाटय़रसिक होते. बाबांच्या नाटकांना ते आवर्जून यायचे. वसंतदादा पाटील यांना ‘तो मी नव्हेच’ व ‘इथे ओशाळला मृत्यू’ या नाटकांविषयी मोठे आकर्षण होते. पंतांची औरंगजेबाची भूमिका पाहण्यासाठी ते रवींद्र नाटय़ मंदिरात एका महोत्सवी प्रयोगाला प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून हजर होते. पहिल्या अंकानंतर त्यांनी पंतांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले. सुशीलकुमार शिंदे हेही उत्तम नाटय़रसिक, त्यांनी पंतांची बहुतेक सारी नाटके बघितली आहेत. तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, निर्माते जसे हृषिकेश मुखर्जी, एस.डी.बर्मन, हेमंतकुमार, कन्हैय्यालाल आदी बाबांच्या नाटकाला येत असत.

बाबांना नवीन नवीन प्रयोग करायची भारी हौस होती. कन्नड भाषा शिकून ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचे कानडी भाषेतही प्रयोग केले. निपाणी, बेळगाव, कारवार, हुबळी, सोलापूर अशा अनेक ठिकाणी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. ‘अश्रूं..’चे पण गुजराती भाषेत प्रयोग केले. त्यांनी रंगभूमीला फिरता रंगमंच, सरकता रंगमंच, तीन फिरते रंगमंच तर दिलेच पण ‘संत तुकाराम’ नाटकात त्यांना घेऊन जाणारे पुष्पक विमान, ‘झाशीची राणी’मध्ये मोठी तोफेची प्रतिकृती, ‘महाराणी पद्मिनी’मध्ये जौहाराच्या प्रसंगात आगीच्या ज्वाळा, ‘अश्रू..’ मध्ये प्रत्यक्ष तुरुंग, विमानतळाची धावपट्टी लाइटिंगद्वारे हुबेहूब दाखवण्यात आली. ‘.. ग्लाड’ या नाटकात श्ॉडोप्लेच्या साहाय्याने ज्यूंवर होणारा अत्याचार दाखवण्यात आला. बाबा केवळ नट किंवा निर्माते नव्हते तर खऱ्या अर्थाने नाटय़ व्यावसायिक होते. खऱ्या अर्थाने नाटय़ व्यवसाय जगायचा असेल तर केवळ उत्तम संहिता, दिग्दर्शक आणि लेखक असणे पुरेसे नाही. नाटय़ व्यवसाय वृद्धिंगत व्हायचा असेल तर अनेक ठिकाणी नाटकाचे प्रयोग होणेही गरजेचे आहे. मुंबई-पुण्याबाहेरच्या शहरांमध्ये किंवा आडगावीसुद्धा प्रयोग होण्याकरिता नाटय़गृह कसे निर्माण होईल यासाठी ते प्रयत्नशील असत. अनेक ठिकाणी नाटय़गृहाची सोय नसतानासुद्धा तात्पुरती व्यवस्था करून त्यांनी नाटके केलेली आहेत आणि त्याच ठिकाणी आता नाटय़गृहे निर्माण झालेली आहेत. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन नाटय़गृहे निर्माण केलेली आहेत. म्हणूनच की काय महाराष्ट्रातल्या बऱ्याच नाटय़गृहांचे उद्घाटन बाबांच्या हस्ते झाले आहे. नाटय़गृहाइतकीच दुसरी महत्त्वाची निकड म्हणजे त्या त्या ठिकाणी स्थानिक जबाबदारी घेणारा व्यवस्थापक किंवा कॉन्ट्रॅक्टर. अनेक होतकरू युवकांना त्यांनी या व्यवसायात येण्यासाठी प्रोत्साहन दिलेच, प्रसंगी नुकसान सोसले. नव्याने व्यवसायात पडणाऱ्याला सर्वतोपरी धीर दिला आहे, साहाय्य केले आहे, प्रोत्साहन दिले आहे.

परगावी होणाऱ्या प्रयोगांची आणखीन एक महत्त्वाची गरज म्हणजे रात्री उशिरा नाटक संपल्यानंतर होणारी भोजनव्यवस्था. त्यांची गुणग्राहक नजर अशाच चुणचुणीत होतकरू मुलांच्या शोधात असायची. एखादा सामान्य परंतु धडपडय़ा चहावाला जरी दिसला तरी ते त्याला आपुलकीने विचारत ‘काय रे रात्री जेवण देशील का?’ नाटय़ व्यवसायाशी निगडित अशा अनेक छोटय़ा-मोठय़ा उद्योजकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. कधीही प्रसिद्धीच्या झोतात न येणाऱ्या परंतु नाटय़ व्यवसायाला अत्यंत आवश्यक असणाऱ्या या सर्व घटकांची त्यांना कृतज्ञ जाणीव होती. ही मंडळी उभी राहिली तरच नाटय़ व्यवसाय तगेल, टिकेल याची त्यांना खात्री होती.

सुमारे चार दशकं चाललेल्या आमच्या ‘तो मी नव्हेच’ नाटकात चारशे-पाचशे कलाकारांनी भाग घेतला. पुष्कळदा आदल्या प्रयोगाचे कलाकार पुढील प्रयोगात येऊ शकत नसत. त्यामुळे या नाटकाने बदली कलाकारांचा अगदी उच्चांकच गाठला होता. पात्रांची सारखी अदलाबदली करावी लागायची तरीही रंगत कुठेही कमी झाली नाही. बाबा गमतीने म्हणायचे आजच्या प्रयोगाची टीम नाटकाआधी एक तास जाहीर होईल. स्थानिक पातळीवर आमच्याकडे किती वेणू, तबलजी, गायक, वादक झाले असतील याची  गणतीच नाही.  बाबा म्हणायचे, ‘‘या नाटकाचा झेंडा हातात घेऊन या चारशे-पाचशे वारकऱ्यांच्या साक्षीने आमचीही नाटय़िदडी सर्वत्र दुमदुमत होती. सोबत ३६ वर्षे हातात धरलेल्या ‘अश्रूंची झाली फुले’च्या चिपळ्या आणि गेली ३८ वर्षे झंकारत असलेली औरंगजेबाची वीणा. हे सगळे याची देही याची डोळा बघितल्यावर माझे मन अभावितपणे त्या प्रेक्षकरूपी मायबाप विठ्ठलासमोर नतमस्तक होते. प्रतिवर्षी नवीन नाटक करणारे अभिनेते आहेत. पण चाळीस वर्षे याच वारकऱ्याच्या वेशात या नाटय़वाळवंटी नाचणारा बहुधा मी एकटाच असेन.’’

‘नाटय़संपदा’ने बदलत्या काळाप्रमाणे नवीन कार्यपद्धती अवलंबली. ‘संगीत अवघा रंग एकची झाला’ हे नाटक रसिकांना नवीन काहीतरी लागते याचे भान ठेवून बाबांनी रंगमंचावर आणले. ज्येष्ठ अभिनेते प्रसाद सावकार यांचा त्यात मोलाचा वाटा होता. या नाटकाचे साडेतीनशे प्रयोग झाले.  यातील ‘रघुनंदन पणशीकर’याचे फ्युजन संगीत खूप गाजले.

‘नाटय़संपदा’च्या पसाऱ्यात बाबांची कोणी जाणीवपूर्वक पाठराखण केली असेल तर ती त्यांचे धाकटे बंधू दाजी पणशीकर यांनी. त्यांनी सांस्कृतिक धुरा आपल्या खांद्यावर शिस्तशीरपणे सांभाळली. आमचा भाऊ नंदू पणशीकर याची सर्व व्यवस्थापनात, नियोजनात, कलाकारांची जुळवाजुळव करण्यात मोलाची मदत झाली. आमचा धाकटा मामा अशोक कुलकर्णी त्याचे उत्तम हस्ताक्षर आणि जनसंपर्कात रुची त्यामुळे त्या काळातल्या ‘नाटय़संपदा’च्या सर्व समारंभात त्याची उपस्थिती अपरिहार्य होती.

आमची आई विजया पणशीकर नाटय़सृष्टीत वहिनी म्हणून परिचित आहे. ‘नाटय़संपदा’ची संचालिका म्हणून तिने आर्थिक बाजू समर्थपणे सांभाळली. सर्वाचे स्वागत व आदरातिथ्यापर्यंत सर्व आई अतिशय तन्मयतेने करायची. ज्या ज्या वेळी बाबांना आर्थिक चणचण भासायची, त्या त्या वेळी तिची द्रौपदीची थाळी कायम मदतीला येत असे. सर्व कुटुंबीयांना एकत्र जोडून ठेवायचे काम आमच्या आईने केले. तिने प्रसंगी मोठी होऊन मोठेपणाने सर्वाना जे जे हवे होते ते दिले. परमेश्वर तिला उदंड आयुष्य देवो !

बाबा घरी आले की सारे घर भरलेले असायचे. नातेवाईकांची पण गर्दी असायची. त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक घरी जेवायला यायचे. नाटय़सृष्टीतील कलावंत, नाटय़लेखक, दिग्दर्शकांची मांदियाळीच आमच्या दादरच्या घरी असायची. विशेष म्हणजे आमच्या घरी डायिनग टेबल नव्हते. बाबांबरोबर सर्व पाहुणे, घरचे नातेवाईक खाली अंथरलेल्या गालिच्यावर मांडी घालून मजेत जेवायला बसायचे. बाबांना हॉटेलमध्ये जेवायचे मुळीच आकर्षण नव्हते. आमची आई तर मस्त सुगरण. तऱ्हेतऱ्हेच्या पदार्थानी ताट भरून जायचे. बाबांना घरचे जेवण पसंत. मांसाहार तर वज्र्यच. नाटकाच्या दौऱ्यामुळे कोणत्या शहरात, काय चांगले मिळते, हे त्यांना चांगले ठाऊक असायचे. पूर्वी तर एकदम १०० किलो तांदूळ, ५० किलो गहू असं भरपूर आणायचे. नंतर नंतर आईचा क्रुद्ध चेहरा बघून हळूहळू ५०, २५, ५ किलोवर आले. जे काही पैसे मिळायचे त्यातले अध्रे पैसे आधीच खर्च करून यायचे.

नाटकांची भव्य निर्मिती करणारे बाबा घरच्या सजावटीत उदासीन होते. डोळे फिरतील असा दिवाणखाना असावा अशी काही आमची अपेक्षा नसायची. घरातील वस्तू नीटनेटक्या, जिथल्या तिथे असाव्यात एवढीच होती, पण उलट घरातल्याच वस्तू केव्हाही पटकन नाटकासाठी घेऊन जात. मध्येच केव्हातरी गोडाऊनमधून चार माणसे यायची आणि ‘सोफा मागितलाय’ असे म्हणून सोफा घेऊनही जायची. त्याजागी दुसरा कुठलाही ऐतिहासिक, सामाजिक, पौराणिक काळातील सोफा आणून ठेवायचे. दौऱ्यावर त्यांना भेटण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता असायची. वास्तविक त्यांचा पेहराव हा एखाद्या मोठय़ा अभिनेत्यासारखा रुबाबदार नसायचा. लुंगी, झब्बा, डोक्यावर एखादी रंगीबेरंगी (आसामी) टोपी, डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा, खांद्यावर नॅपकीन अशा वेशातच असत. पण त्यांना पाहण्यापेक्षा त्यांच्याशी बोलण्यास लोक अधिक उत्सुक असायचे.

बाबांचे दौऱ्यावर जाणे म्हणजे आम्हाला दिव्यच वाटायचे. त्यावेळी नेहमीपेक्षा जास्त फोन खणखणायचे. ‘‘आज मी दौऱ्यावर निघालो आहे जरा गडबडीत आहे,’’ असे म्हणून प्रत्येकाशी बराच वेळ बोलत बसायचे. त्या घाईगर्दीच्या वेळात त्यांना बाबा नवीन नाटकाचे कथानक, दौऱ्याचा पुढील कार्यक्रम ऐकवत असत. त्यांच्या सामानाशेजारी असंख्य प्रकारच्या औषधांच्या बाटल्या, चूर्ण, पुडय़ा इत्यादी अ‍ॅलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक अशी औषधांची भली मोठी रांग लागलेली असायची. कोणी काही त्याबाबतीत बोलायला गेलो तर पटकन खेकसायचे. ज्या औषधांवर त्यावेळी त्यांची मर्जी असेल ती औषधे ते घेत असत. बऱ्याचशा सामानाची तयारी केलेली असायची. पण त्या वस्तू जागच्या जागी ठेवण्याचे काम मात्र ते आपल्या हातानेच करायचे. अशा रीतीने जेव्हा त्यांची तयारी पूर्ण व्हायची, तेव्हा निघण्याच्या वेळेपेक्षा एक तास उलटून गेलेला असायचा. सवयीने आमचे कलाकार एक तास उशिराच यायचे, गमतीचा भाग सोडा.

गिरगावातल्या काळाराम मंदिरात उभे आयुष्य घालवल्यानंतरही बाबांनी कधी देव देव केले नाही. पण घरातून निघताना मात्र हात जोडून त्यांच्या माता-पित्यांच्या तसबिरीला ते नमस्कार करायचे. नाटकाची बस दौऱ्यावर असताना मात्र जवळपासच्या देवस्थानापाशी हमखास थांबवायचे. दौरा असेल त्याप्रमाणे गणपतीपुळे, पावस, शिर्डी, शेगाव, पंढरपूर, तुळजापूर या ठिकाणी गाडी थांबायची. गरजेनुसार वेळोवेळी सहकाऱ्यांना मदत करत असत.

बाबांनी किती तरी कलावंत शोधून आणले, त्यांना काम दिले, तो मोठा होताना त्याला नेहमीच त्यांनी उत्तेजन दिले. त्यांच्या जनसंपर्कात आलेली माणसे समृद्ध झाली. त्यांना नवीन दिशा मिळाली. आजचे कितीतरी आघाडीचे कलाकार ‘नाटय़संपदा’तून घडले. प्रभाकर पणशीकर, डॉक्टर काशिनाथ घाणेकर, सुधा करमरकर, चित्तरंजन कोल्हटकर या मंडळींनी तो काळ गाजविला होता. सुधाताईंच्या भूमिका बघत बघत मीसुद्धा घडत गेले. शब्दफेक, हावभाव, चालणे या सर्वावर बारीक नजर ठेवून असायचे मी. ‘आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ असे वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून दिसू लागले ते बाबांच्या कल्पनेतूनच. बाबांनी घाणेकरांवर प्रेम केले. मोठय़ा भावाप्रमाणे सांभाळून घेतले.

मोहन वाघकाकांची दोस्ती, बिपीन तळपदेंसारखा मित्र, राजाराम चव्हाणसारखा सहकारी, प्रसाद सावकार, फैयाज, आशा काळे, उषा सराफ, सुलभा पंचवाघसारख्या अनेक कलावती. शशिकांत निकते, छोटू सावंत, सतीश दुभाषी, मधू कांबीकर, अशोक समेळ, गिरीश ओक, सविता प्रभुणे, कुलदीप पवार, रमेश भाटकर, सुमित राघवन, चिन्मयी राघवन, राघवेंद्र कडकोळ, वासुदेव चंद्रचूड अप्पा गजमल, सीताराम सावंत, धनंजय भावे असे किती तरी त्यांचे सहकारी ज्यांच्याबरोबर मीसुद्धा काम केले. अलीकडची आमची ‘नाटय़संपदा’ची ‘तो मी नव्हेच’ची एवर ग्रीन टीम म्हणजे बापूसाहेब सुरतकर, विघ्नेश जोशी, दिनेश कोयंडे, शमा वैद्य, सुनील दातार, वासुदेव जोशी, प्रतिभा कुलकर्णी, चित्रा, जय, शशी सकपाळ, प्रभाकर महाडिक, गोटय़ा सावंत, अमोल बावडेकर, नितीन चौधरी, रमेश भिडे.

१९८१ मध्ये त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी घेतलेल्या सक्तीच्या विश्रांतीच्या काळात आत्मचरित्राच्या लिखाणाला सुरुवात केली, परंतु पुन्हा आत्मचरित्राचा लिखाणाचा योग आला तो २००० मध्ये तब्बल वीस वर्षांनंतर. ‘ओपन हार्ट सर्जरी’ करून घेतलीत तर आणखी दहा वर्षे काम करू शकाल, अशी ग्वाही डॉक्टर नीतू मांडके यांनी दिल्यानंतर ते शस्त्रक्रियेला तयार झाले. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर पुन्हा घ्याव्या लागलेल्या सक्तीच्या विश्रांतीच्या काळात आत्मचरित्र पुढे लिहावे असा विचार पुन्हा मनात डोकावू लागला. बाबांची स्मरणशक्ती अतिशय तल्लख होती. त्याचा प्रत्यय त्यांच्या आत्मचरित्र लिखाणाच्या वेळेला जाणवला. लहानपणापासूनचे कितीतरी बारीकसारीक  उल्लेख तारीख, वार तपशिलांसह त्यांना लक्षात होते. भेटलेली माणसे, घडलेले प्रसंग, नाटकांच्या जन्मकथा, अगदी पहिल्या प्रयोगापासून विक्रमी महोत्सवी प्रयोगांपासूनच सगळे तपशील त्यांच्या अगदी बरोबर लक्षात होते. परंतु आता हात थरथरू लागला होता आणि लिहिण्याची इच्छा असूनही लिहिता येत नव्हते. नेमके याच वेळी पुण्यातल्या आप्पा कुलकर्णीशी ओळख झाली आणि ते बाबांचा लिहिता हात बनले. ‘राजहंस प्रकाशन’च्या दिलीप माजगावकर यांनी अतिशय दिमाखदारपणे या आत्मचरित्राचे प्रकाशन केले. आत्मचरित्राचे प्रकाशन होऊनही अशा कितीतरी सुंदर आठवणी, प्रसंग बाबांच्या चांगल्याच  स्मरणात होत्या. तब्बल ४३ लेख ‘चाफा डॉट कॉम’ नावाच्या वेबसाइटवर लिहिले गेले आणि ही लेखमाला चालू असतानाच बाबा गेले. त्यांच्या आकर्षक कथनशैलीला, लेखनशैलीला की आठवणींना दाद द्यावी असाच रसिकांना प्रश्न पडावा. या आठवणी लोकांपर्यंत पोहोचाव्यात या हेतूने आमचा मामा ‘राजेंद्र प्रकाशन’चे सर्वेसर्वा राजेंद्र कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन ‘आठवणींचे मोती’ हा लेखांचा संग्रह त्यांनी त्या बाबांच्या प्रथम स्मृतिदिनाला प्रकाशित केला. बाबांच्या आत्मचरित्राच्या आणि या आठवणींच्या निमित्ताने त्यांच्या अचाट आणि अफाट  स्मरणशक्तीत साठवले गेलेले बरेच काही  लेखनाच्या स्वरूपात शिल्लक राहील.

बाबांची पंच्याहत्तरी २००७ मध्ये तीन दिवस सात ते नऊ एप्रिलला यशवंत नाटय़मंदिरात आम्ही साजरी केली. पन्नास वर्षांहून अधिक काळ एकनिष्ठपणे रंगभूमीच्याच सेवेमध्ये तन-मन-धन वाहिलेल्या एका मनस्वी कलाकाराला कृतज्ञ रसिकांनी दिलेली ती मानवंदनाच होती. आणि या सगळ्यावर कळस म्हणून सत्कार समारंभात त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शासनातर्फे दिला जाणारा पहिला ‘रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार’ नटवर्य प्रभाकर पणशीकर यांना देत असल्याचे जाहीर केले; एवढेच नव्हे तर त्यानंतर हा पुरस्कार ‘प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार’ म्हणून दिला जाईल असे घोषित केले. आणि आता लवकरच गोरेगाव टोपीवाला मंडई येथे ‘नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर नाटय़गृह’ बनवणार आहे असे महापालिकेने घोषित केले व ३० जुलै २०१८ ला त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमसुद्धा थाटामाटात झाला. ही खूप खूप आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे.  सलग दोन वर्षे नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद बाबांकडे होते.

त्यानंतर प्रकृतीची बंधने आल्यावर काही मालिकांमध्येही काम केले. त्यांचे मित्र गणेश सोळंकी यांचे चिरंजीव शशांक सोळंकी यांनी आपल्या  ‘वादळवाट’ या त्यावेळच्या लोकप्रिय मालिकेत कुटुंबातल्या सर्वात थोरल्या भावाची भूमिका करायची गळ घातली आणि त्यांच्याकडून उत्तमरीत्या करवून घेतली. शशांकजींनी जुने स्नेहसंबंध अजूनही बांधून ठेवले आहेत.

बाबांचे शेवटचे दिवस माझ्या डोळ्यांसमोर येतात. बाबा विश्रांतीसाठी जांभुळपाडा येथे गेले. तिथून परत आल्यावर तीन -चार दिवसांतच त्यांची तब्येत बिघडली. १३ जानेवारी २०११ रोजी ठसक्याचे निमित्त होऊन बाबा आमच्यातून निघून गेले. माहीत होते पण तरीही अनपेक्षित होते. आयुष्यभर सगळ्यांना आनंद वाटत राहिले. आपल्या सहकाऱ्यांना प्रेम देत राहिले. नवीन नवीन कल्पना बोलत राहिले.

बाबा फक्त माणसे जोडत गेले. आमचे आजोबा  विष्णुशास्त्री पणशीकर यांनी जाताना त्यांना सांगितले होते, ‘‘मुलांनो, मी तुमच्यासाठी बँकेत पैसे ठेवले नाहीत, माणसे ठेवलीत.’’ ही माणसे ठेवलीत म्हणजे काय? याचा अनुभव ते अहर्निशपणे गेली पन्नास वर्षे घेत राहिले. गोंदियापासून ते बेळगावपर्यंत, गोव्यापासून ते कारवापर्यंत आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व, जिथे जिथे मराठी नाटके होतात, तिथे तिथे ते माणसे जोडत राहिले. ते म्हणायचे मी एक होतो तो हजारांत वाटला गेलो. या माणसांच्या शोधातच त्यांनी ‘तो मी नव्हेच’मधील लखोबा साकारला, याच पद्धतीने प्रिन्सिपल विद्यानंद, शहेनशहा औरंगजेब, जस्टिस देवकीनंदन, ‘बेईमान’मधील चंदर आणि ग्लाड साकारला. या विविध प्रकृतीच्या भूमिका साकारणारे पणशीकर मात्र तेच राहिले. त्यांचे आयुष्य ते जगले. कृतार्थपणे जगले. जाता जाता त्यांनी परमेश्वराकडे एकच मागणे मागितले की, ‘मला पुन्हा नटाचा जन्म दे.’ तोही या मराठी भूमीतच!

singhjanhavi7@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prabhakar panashikar janhavi panshikar ashroonchi zhali phule abn