|| डॉ. मीनल माटेगावकर
ती विचार करायला लागली, आज झाला तो ‘रियाज’. सर्जनाचा आनंद देतो तो रियाज. दोन स्वरांमधला रेशमी धागा शोधणं म्हणजे ‘रियाज’. शास्त्र राखून भाव निर्माण करणं म्हणजे रियाज. तिथे तुमचे तुम्हीच असता. शब्दांचा फक्त आधार. बाकी स्वरांची जादू..
संध्याकाळ झाली होती.. मृणाल एकटीच घरात होती.. अस्वस्थ.. सगळं नीट चाललंय असं वाटत असतानाच न उमगणारी अस्वस्थता तिचा कब्जा घेत होती. घर, नोकरी, लेक नीव याचा ताळमेळ नीट होता. ताणाचा प्रश्नच नव्हता. सगळ्या आवडत्या गोष्टीच करत होती ती. तरी कळत नव्हतं काय नेमकं होतंय ते. कुणाशी बोलावं तर नेमका धागा हाती येत नव्हता. मुळात कुणाशी बोलायची इच्छाच नव्हती.
तिने रियाजासाठी तंबोरा काढला. मारवा सुरू केला आणि रिषभाचा वेध घेत राहिली. ‘कौन नगर में जाय बसीरवा’ गाता गाता तास-दीड तास गेला. तानेत जरा अडकायला होत होतं, पण हळूहळू साधत गेलं तेही. धैवतावरचा न्यास सुखावत होता. ती जरा शांत झाली. पुरुषी गांभीर्य आणि गूढता आहे या रागाला. एक अथांगता पसरते हा राग गाताना. तंबोरा ठेवला तरीही स्वत:शी काही तरी बोलणं चालू होतं तिचं..
रात्री आवडतं पुस्तक वाचता वाचता तिला झोप लागली. दुसऱ्या दिवसावर आदल्या दिवशीचं सावट अजिबात नव्हतं. जरा लवकरच आटोपून ती कॉलेजला गेली. विद्यार्थी, लेक्चर्स आणि रोजच्या कामांमध्ये दिवस भर्रकन उडून गेला. दुपारी एक पेपर लिहायला घेतला तिने. बरेच दिवसांपासून तसाच ठेवला होता. डोक्याला खाद्य हवंच होतं. काही खास हाती लागलं नाही तरी पुस्तकांमध्ये आणि संदर्भामध्ये ती गुंतून गेली. केतकर सरांनी सांगितलेले सगळे संदर्भ जुळत होते तरी नेमकं आणि नेटकं काही उतरत नव्हतं. थोडय़ा नाखुशीनेच तिने काम संपवलं आणि थोडी शांतता मिळावी म्हणून तिने टॅक्सी केली.
मुलींना शिकवलेला ‘श्री’ तिच्या मनात आणि डोक्यात घोळत होता. या रागाला एक स्वत:चं वलय आहे. गंभीर तरी त्याचं राग-चित्र आनंददायी आहे. निबद्ध तरी अनेक वाटा असलेला हा राग पटकन साधत नाही. ताईंनी छानच शिकवला होता. सगळी सौंदर्यस्थळं शोधून दिली होती. तरी मुलींना शिकवताना त्याची आस आणि आवाका लक्षात येत होता आणि त्या रागाची खोली जाणवत होती. अनेक वाटा सापडत होत्या. राग सुटत होता. बंदिश गुणगुणताना घर कधी आलं हे कळलंच नाही. ड्रायव्हर जरा विचित्र नजरेने बघत होता त्याकडे तिने दुर्लक्षच केलं.
घर गाठताच नीव पटकन बिलगला आणि त्याच्या दिवसभराच्या गमती सांगायला लागला. त्याचा आवडता खाऊ खाऊन खेळायला पळाला देखील. आता मानस घरी येईपर्यंत ती तिचीच होती. तिने परत तंबोरा काढला. हा ‘श्री’ काही पाठ सोडायला तयार नव्हता. पंचम, रिषभ आणि मध्यमाच्या खेळात ती रमली आणि स्वत:वरच खूश झाली. बंदिश जरी ‘लगत साँझ उदास’ अशी असली तरीदेखील कालची उदासी या संध्याकाळभर नाही पसरली. सुरांमध्ये दडलेले भाव तिला उमगायला लागले. काही तरी गवसल्याचा आनंद भरून राहिला होता. एक वलय पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं.
कालचा ‘मारवा’ आणि आजचा ‘श्री’. प्रासादिकता हा या दोन्हीचा प्राण. ते तसेच मांडले गेले पाहिजेत तरच मजा. सुरुवातीला शिकताना अशी व्हायब्रेशन्स कधी जाणवली नाहीत. शिकताना त्यातील आरोह, अवरोह आणि चलन याकडेच जास्त लक्ष होतं. प्रत्येक रागाचा असा एक स्वभाव असतो. तो समजायला वेळ द्यावा लागतो आणि सतत गात राहावं लागतं आणि असं सुरांशी नातं जुळायला रियाजच लागतो आणि यासाठी एक जन्म अपुरा आहे.
ती विचार करायला लागली, की रियाज आणि प्रॅक्टिस यात किती फरक असतो नाही. प्रॅक्टिस केली जाते आणि रियाज होतो. प्रस्तुतीसाठी प्रॅक्टिस केली जाते. लोकांना आवडतील अशा काही सुरावटी मध्ये घालाव्या लागतात. कारण हे परफॉर्मिग आर्ट आहे याचं भानही ठेवावं लागतं. लोकांना ‘प्रेयस’ काय याचाही विचार करावा लागतो. त्यात लोकरंजन अभिप्रेत असतं.
आज झाला तो ‘रियाज’. सर्जनाचा आनंद देतो तो रियाज. दोन स्वरांमधला रेशमी धागा शोधणं म्हणजे ‘रियाज’. शास्त्र राखून भाव निर्माण करणं म्हणजे रियाज. तिथे तुमचे तुम्हीच असता. शब्दांचा फक्त आधार. बाकी स्वरांची जादू. अस्वस्थतेचं कारण तिला आता उमगायला लागलं. आतून प्रसन्नता जाणवायला लागली. ‘याचसाठी केला अट्टहास’ अशी अवस्था. सगळ्या भौतिक गोष्टींचा विसर पडून ‘एक सूर’ साधण्यासाठी ही सगळी धडपड. हीच तर निर्गुणाची शक्ती.
मनाची प्रसन्नता साधण्यासाठीही जरा वेगळ्या प्रकारचा रियाज लागतो अशी काहीशी गमतीशीर थिअरी ती मांडत असतानाच दारावरची बेल वाजली. तिने दार उघडलं. मानस आला. ती त्याच्याकडे बघून प्रसन्न हसली. बायकोचा नूर पाहून मानसला नेमकं कारण कळलं नाही, पण संध्याकाळ रोमँटिक होण्याची चाहूल मात्र लागली..
meenal.mategaonkar@gmail.com