स्वहिताबरोबरच परहित जपणे आणि त्याप्रमाणे आचरण करणेही आवश्यक असते. यातूनच ‘मी’च्या व्यक्तिरूपाला ‘आम्ही’मध्ये ओवणारा सहकार्याचा विचार पुढे येतो. विद्यार्थ्यांच्या स्वकेंद्रित भावनांना परकेंद्रित करायचं आणि पुढे सर्वकेंद्रित करायचं. या ध्येयामुळे अधिकाधिक कल्पना विकसित होत गेल्या. प्रत्यक्षात आल्या आणि यातून साकारला ‘प्रज्ञा परिसर’.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण भल्या विचारानं उपकारक कृती करायला निघतो तेव्हा आपण ‘एकटे’ आहोत असं वाटेल आपल्याला. पण ते खरं नसतं. महाविद्यालयाच्या विकासासाठी ज्यांनी श्रम घेतले ते सारे आपल्या साथीला असणार… आत्ता या क्षणाला, मला माझ्या वडिलांसारखे असणारे प्राचार्य त्यांच्या कल्पनाशक्तीसह आपल्यासोबत आहेत.’’ माझ्यासमोर १३ महाविद्यालयांतून आलेले ७० प्रतिनिधी होते. त्यांच्याशी मी बोलत होतो. ‘प्रज्ञा परिसर प्रकल्पा’चा हा दुसरा गट. स्थळ पुणे. काळ तीन वर्षांपूर्वीचा. तारीख १ ऑगस्ट.

‘‘भला विचार ओळखायचा कसा?’’ एक प्रश्न.

‘‘स्वहित जपणारा, पण परहित जाणून त्याप्रमाणे वागणारा. ‘मी’च्या व्यक्तिरूपाला ‘आम्ही’मध्ये ओवणारा सहकार्याचा विचार. तुम्ही विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर हे काय करणार तर ‘स्व’केंद्रित वागणं ओळखून त्यावर उपाय काढणार. महाविद्यालयाच्या रिकाम्या वेळात प्रत्येकाचे डोळे स्क्रीनमध्ये न अडकवण्यासाठी आकर्षक अनुभव निर्माण करणार. त्यातून परिसरातील सर्वांची भावनिकता सुदृढ करायची आपल्याला.’’

‘‘त्यामुळे काय होईल?’’

‘‘परिसर आणि तो वापरणारे यांचं नातं घट्ट झालं की त्या परिसरातल्या सवयी टिकतात. त्यात कल्पक बदल घडतात. आपण आज महाविद्यालयांची ‘संस्कृति’ बदलत जाते आहे म्हणतोय. म्हणजे नेमकं काय?… तर माझ्या विषयासाठी, गुण मिळवण्यासाठी, अपरिहार्यपणे वर्गात बसायचं आणि निघून जायचं. पण आपण पदवी महाविद्यालयांमधली तीन वर्षं अधिक उत्साही करू शकतो,’’ मी म्हणालो.

आमच्या प्रशिक्षणाच्या पाचव्या दिवशी प्रत्येक महाविद्यालयाचा गट सादरीकरण करायचा. त्यातून खूप कल्पना निघायच्या. अशा प्रकारे पहिल्या वर्षाचं तिसरं सत्र अमरावतीला झालं. आता दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कळून आलं की, ३९ महाविद्यालयांपैकी साधारण १८ महाविद्यालयांनी हा प्रकल्प गंभीरपणे घेतला आहे. दरम्यानच्या महिन्यांमध्ये आम्ही ऑनलाइन बैठका घेऊन पाठपुरावा करतच होतो. दुसऱ्या वर्षाचे एकूण तीन दिवसांचे तीन कार्यक्रम झाले. त्यामध्ये भर होता ‘भावनिक जाण-भान’ वाढवण्याचे अनुभव नेमके ‘डिझाईन’ कसे करायचे. रेखायचे कसे?… ‘डिझाईन थिंकिंग’ या विषयाचा अभ्यास करून एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार केला. शैक्षणिक वर्षातील वेगवेगळ्या समारंभांना, अनुभवांना कसं वेगळं वळण देता येईल, याच्या कल्पना निघाल्या. हिंदी चित्रपट गीतांच्या द्वारे भावनिक-नियोजनाची तत्त्वं सांगणं, रोल प्लेज्-नाट्यछटा वापरून महाविद्यालयाच्या परिसरात मनआरोग्याची अर्ध्या तासाची ‘हॅपनीगज्’ म्हणजे छोटे कार्यक्रम करणं. नेहमीच्या समारंभातील औपचारिक समारंभांना कात्री लावून ज्या हेतूसाठी समारंभ आहे, त्यासाठी तो वेळ पूर्णपणे वापरणं अशा योजना निघाल्या. दीप प्रज्वलन, सत्कार, आभार प्रदर्शन, अहवाल वाचन, लांबच लांब परिचय या सर्वांचे कल्पक पर्याय काढले गेले.

आजचा विद्यार्थी स्क्रीनवर जे कार्यक्रम पाहतो, त्यात एकही मिनिट फुकट गेलेला नसतो. महाविद्यालयात मात्र प्रमुख पाहुण्यांचे भाषण येईपर्यंत सारेच कंटाळलेले असतात. या साऱ्यावर पर्याय काढताना, आपण भावनिक प्रतिसाद देणाऱ्या, ‘क्यू आरटी’ म्हणजे ‘जलद प्रतिसाद संघ’ तयार करायचं ठरलं. युवामनांशी निगडित घटना घडली की ४८ तासांत त्यावरचा प्रतिसाद परिसरात आला पाहिजे. ‘नाट्य-संगीत-गद्या-पद्या’ वापरून हे तयार करायचं असं ठरलं.

काही महाविद्यालयांनी त्यांची प्रवेश प्रक्रिया अधिकाधिक आस्थापूर्वक बनवण्यासाठी योजना बनवल्या. परिसराच्या इतिहासाबद्दलची सादरीकरणं, खुसखुशीत भाषेतल्या परिसराच्या परिचय सफरी होऊ लागल्या. काही ठिकाणी परीक्षेच्या आधी क्षणिक आणि भावनिक मार्गदर्शनासाठी, ‘कम्फर्ट झोन्स’ तयार केले गेले. परीक्षेच्या दिवसांत हॉस्टेलमधल्या मुलांनी ही जबाबदारी घेतली. विदर्भातल्या एका महाविद्यालयात, लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, गावात राहाणारी मुलं डबा आणायला लागली. शिळी भाकरी घेऊन सकाळीच मुली २०-३० कि.मी. प्रवास करून यायच्या. त्यांच्यासाठी या मैत्रिणी ताजी भाजी-डाळ आणायच्या.

नंदुरबारच्या आमच्या गटाने पाड्यापाड्यांवर पालक सभा घेऊन वर्गातली उपस्थिती वाढवली. मराठवाड्यातल्या पाचोडच्या महाविद्यालयातील कार्यकर्त्यांनी, प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या मुलींचं शिक्षण थांबवून त्यांचं लग्न लावू नका यासाठी प्रयत्न सुरू केले. जळगावच्या प्राचार्यांनी परिसराच्या वेगवेगळ्या भागांत मुलांसोबत नियमित ‘चाय पे चर्चा’ सुरू केली. अनेक शिक्षक सातत्यानं मुलांबरोबर डबा खाऊ लागले. परळच्या एमडी महाविद्यालयाच्या संघाने, आईवडिलांच्या व्यवसायाला मदत केल्यामुळे सकाळच्या वर्गाला न येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हाती घेतला.

शिक्षकेतर मंडळींच्या कुटुंबासाठी ‘परिसर परिचय’ हा उपक्रम खूप गाजला. या सर्व मंडळींनी बनवलेल्या पदार्थ आणि वस्तूंचा मासिक बाजार एका महाविद्यालयाने नियमित चालवला. काही जणांनी ‘सेंड ऑफ’च्या कार्यक्रमाचं रूप बदललं. रांगोळी स्पर्धेला, ‘रंग भावनांचे’ हे सूत्र दिलं. क्रीडा स्पर्धांच्या आधी, भावनिक क्षमता वाढवणारी सत्रे ठेवली. परीक्षेत अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास भावनिक-शैक्षणिक उभारीचे कार्यक्रम तयार झाले. एका हॉस्टेलमध्ये, ‘आजी-आजोबा शेकोटीला आले’ हा कार्यक्रम तुफान रंगला. मनआरोग्याचा फिल्म क्लब करून तो सातत्याने भरवण्याचं काम पनवेलच्या ठाकूर महाविद्यालयाने केलं. मुलुंडचे वझे-केळकर महाविद्यालय, ठाण्याचे जोशी-बेडेकर महाविद्यालय यांनी सातत्याने नव्या योजना राबवल्या. ठाण्याच्या आय.पी.एच. संस्थेच्या जवळच असल्याने या महाविद्यालयांबरोबर काही दीर्घकालीन उपक्रम योजत आहोत. कॅम्पसमधल्या स्वकेंद्रित भावनांना परकेंद्रित करायचं आणि पुढे सर्वकेंद्रित करायचं या ध्येयाला पुढे नेणाऱ्या शंभराहून अधिक कल्पना निघाल्या. प्रत्यक्षात आल्या. त्या सर्वांना एकत्र करून पुस्तक बनवण्याचं काम सुरू झालं.

तिसऱ्या वर्षी साधारण १४ महाविद्यालये उरली. उरलेली सहा का गळली त्याची कारणं मजेदार होती. काही महाविद्यालयांनी पहिल्या वर्षी पाठवलेले प्रतिनिधी दुसऱ्या वर्षी पाठवलेच नाहीत. काही ठिकाणी सहाच्या ठिकाणी दोनच मंडळी आली. असो. या वर्षात मी महाविद्यालयाच्या भेटी घ्यायला लागलो. साधारणपणे तीन मोठे कार्यक्रम घ्यायचे. मुंबईच्या रुईया महाविद्यालयाने माझ्याशी केलेल्या गप्पांचा सभागृहातील कार्यक्रम आठ वर्गांमध्ये त्याच वेळी प्रक्षेपित केला. त्या दिवसांत मी शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्याशीसुद्धा गप्पा मारतो. प्राचार्यांशी बोलतो. एम.एस.एफ.डी.ए.ची टीमही आता सोबत असते. येत्या वर्षांत किमान सहा भेटी वेगवेगळ्या परिसरांमध्ये योजल्या आहेत.

तिसऱ्या टप्प्यावर महत्त्वाचे विषय होते, पालकांना परिसराशी जोडायचं कसं, या सूत्रावरचे उपक्रम. त्याचे परिणाम जूनपर्यंत कळतील. दुसरा विषय होता ‘संतत बदलांचे नियोजन’ (dynamic change management) परिसरातील सर्व घटकांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे. या टप्प्याचं प्रशिक्षण देताना मला जाणवत होतं की, हे सारे आता आपले घट्ट कार्यकर्ते बनताहेत. प्रकल्प पुस्तकाला आकार तेच देणार आहेत. येत्या वर्षात त्यांच्यासाठी ‘नाट्यानुभव’ प्रशिक्षण खासपणे योजणार आहोत.

अशी धावपळ सुरू असताना एक अघटित घडलं. काही महाविद्यालयांनी आता अशी विनंती केली की, आम्हाला स्वच्छेने हा प्रकल्प करायचा आहे. जानेवारीमध्ये या स्वेच्छेने आलेल्या ४० कार्यकर्त्यांचं पाच दिवसांचं प्रशिक्षण संपन्न झालं. येत्या जुलैमध्ये तीन दिवस आणि पुढच्या जानेवारीमध्ये तीन दिवस अशी ही बॅच पूर्ण होईल. दुसऱ्या वर्षी मार्च अखेरीस, भारतातला कोणताही महाविद्यालयीन परिसर, ‘भावनिक मैत्रीपूर्ण’ कसा बनवायचा याचे सर्व तपशिलांसकटचे पुस्तक प्रसिद्ध होईल. या प्रवासात आय.पी.एच. टीम आणि एम.एस.एफ.डी.ए. टीम यांचे चांगलेच सूर जुळले.

आतापर्यंत झालेले प्रशिक्षणाचे ३५ दिवस मी एकट्याने घेतले. या वर्षी त्यात अजून ११ दिवसांची भर पडेल. ४६ दिवस, रोजचे आठ तास हा कार्यक्रम मी कसा पूर्ण करतो याचे आदरसहित आश्चर्य आमचे सर्व प्रतिनिधी कार्यकर्ते व्यक्त करतात. आम्ही दीड तास शिकवून थकतो, असं प्राध्यापक म्हणतात. आम्ही अर्ध्या तासात ‘बोअर’ होतो असं विद्यार्थी म्हणतात. आमच्या प्रशिक्षणात मात्र सतत धमाल सुरू असते, प्रयोग होत असतात, कधी संगीत, कधी साहित्य, कधी फिल्मस्, कधी खेळ, कधी मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, व्यवस्थापन, इतिहास, अध्यात्म अशा अनेक विषयांचं ‘डिझाईन’ उलगडत जात असतं. हे सारे रंगून करताना मनात असतं की पितृऋण, परिसरऋण आणि समाजऋण या तिन्ही ऋणांशी अंशत: उतराई होण्याची ही संधी आहे.

बालपणापासून अनुभवलेल्या अनेक महाविद्यालयीन परिसरांच्या प्रतिभा मला ऊर्जा देतात. वडिलांबरोबर पाहिलेले हे परिसर कधी शिंगटे काकांचे वारणानगर महाविद्यालय, कधी कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालय, कधी रत्नागिरीचे गोगटे महाविद्यालय, कधी पुण्याचे सप महाविद्यालय, कधी डोळे सरांचे महाविद्यालय, कधी नगरचे बार्नबस् सरांचे महाविद्यालय, आर.ए. कुलकर्णी काकांचे रुईया, डॉ. आयरन काकांचे विल्सन, किती सांगू… जळगाव, अंबाजोगाई, ठाणे या मातृपरिसरांव्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या अशा अनेक परिसरांनी मला सांभाळलं आहे, मला सामावून घेतलं आहे. ते सारं प्रेम माझ्या शिकवण्यामध्ये आपोआप झरत असावं.

भूदान यात्रेदरम्यान विनोबा त्यांचा अनुभव सांगतात… ‘पदयात्रेत पुढे राम चालले आहेत, पाच पांडव चालले आहेत, बुद्ध, महावीर, शंकर, रामानुज, कबीर, नामदेव… सगळे चालत आहेत. त्यांच्या मागे मी चालतो आहे असा अनुभव येतो. त्यांची सोबत असते.’

प्रज्ञा परिसराच्या शिक्षण यात्रेमध्ये, विनोबांच्या पायाशी बसून घेतलेलं हे शिक्षण मी आणि या प्रवासातले सारेच जण अनुभवत आहोत.