‘अथासने दृढे योगी वंशी हितमिताशन ।
गुरूपदिष्ट मागेण प्राणायामान्समभ्यसेत् ।।
आसनात प्रस्थापित झाल्यावर आहार नियंत्रित करून शरीरावर नियंत्रण मिळविल्यावर गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच प्राणायामाचा अभ्यास करावा.
‘प्राणायाम’ म्हटले म्हणजे काहीतरी श्वसनाचा व्यायाम इतपतच आपल्याला माहिती असते. वास्तविक प्राणायाम हा शब्द प्र + अन् + आयाम असा तयार झाला आहे. प्र म्हणजे प्रकर्षांने, अन् म्हणजे श्वासोच्छ्वास करणे, आयाम म्हणजे लांबविणे, थांबविणे अथवा गती नियंत्रित करणे. आपण श्वासावाटे आत घेतो, ती नुसती हवा अथवा ऑक्सिजन वायू इतपतच दृष्टी मर्यादित न ठेवता, आपण श्वासावाटे प्राणशक्ती धारण करतो हे जाणणे महत्त्वाचे आहे. ही प्राणशक्तीच एखादी जिवंत व्यक्ती व कलेवर यांतील भेद स्पष्ट करते. आपल्या देहातील सर्व काय्रे या प्राणशक्तीच्याच अधीन असतात. या प्राणशक्तीचे नियंत्रण करणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. म्हणूनच प्राणायामाला ‘श्वासायाम’ असे म्हटलेले नाही. प्राणशक्तीला नियंत्रित करण्यासाठी श्वास हे माध्यम वापरले आहे. श्वसन नियंत्रण करायचे ते मनोनियंत्रणासाठीच, क्रमाक्रमाने हा विषय आपण पुढे समजावून घेऊ.
सुलभ चक्रासन
आज दंडस्थितीतील सुलभ चक्रासनाचा सराव करू या. दंडस्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. दोन्ही पायांत अंतर, हात शरीराच्या बाजूला शिथिल ठेवा.
आता सावकाश शरीर उजवीकडे झुकवा. उजवा खांदा खाली व डावा खांदा वर ठेवा. हात शिथिल ठेवा. दीर्घ श्वसनाची चार-पाच आवर्तने करा. पुन्हा मध्यभागी या. आता विरुद्ध बाजूने ही कृती करा. शरीर पुढे अथवा मागे झुकवू नका. अंतिम स्थितीत सरावानेच डोळे मिटता येतील. डोळे न मिटल्यास, एक काल्पनिक वर्तुळ डोळयापुढे कल्पून त्याच्या केंद्रिबदूवर मन एकाग्र करा.
कायदेकानू – वृद्धांसाठी निवाऱ्याची तरतूद
अॅड. प्रीतेश सी. देशपांडे – pritesh388@gmail.com
‘ज्येष्ठ नागरिक कायदा २००७’ ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वागीण फायद्यासाठी बनविण्यात आला आहे. त्यामुळे या कायद्यान्वये केवळ पोटगीची तरतूद करून पाल्यांवर जबाबदारी न टाकता कायदेकर्त्यांनी सरकारवरही ही जबाबदारी टाकली आहे.
ज्येष्ठांचा कायदा २००७ च्या भाग ३ मध्ये या कायद्याचे कलम १९चा समावेश असून त्याअंतर्गत राज्य सरकारवर ‘वृद्धांसाठी निवाऱ्याची’ सोय करण्याची जबाबदारी ठेवण्यात आली आहे. हा ‘निवारा’ प्रत्येक जिल्हय़ात एक याप्रमाणे उभारणे अभिप्रेत आहे. निवाऱ्याचे स्थान सर्वसामान्य वृद्ध नागरिकास सहजपणे पोहोचता येईल, अशा ठिकाणी असावे. या निवाऱ्याचे ठिकाण सर्वसामान्य माणसासाठी राहण्यास योग्य असेल अशा स्वरूपाचे असावे. त्याचप्रमाणे या ‘निवाऱ्यात’ साधारणत: १५० गरीब वृद्ध लोक राहू शकतील एवढे मोठे असावे.
या कायद्यान्वये ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ निवाऱ्याची सोय करण्याची तरतूद नसून, हा ‘निवारा’ ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांनी युक्त असणे अभिप्रेत आहे. त्यामुळे राज्य सरकारने केवळ निवाऱ्याची व्यवस्था न करता तेथे वैद्यकीय व इतर सुविधा पुरविण्याचीही तरतूद करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांस योग्य अशा करमणुकीच्या सोयीसुविधांची तरतूद करणेही कायद्यान्वये अभिप्रेत आहे.खा आनंदाने! – माझ्या आठवणीतले आजोबा..
वैदेही अमोघ नवाथे आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
‘चतुरंग’च्या निमित्ताने माझ्या रोजचे रुग्ण आणि त्यांचे आजार-पथ्य यांच्या परीघातून थोडा वेळ का होईना पण बाहेर पडते आणि विचारचक्र आजी-आजोबांच्या मार्गाने चालू लागतं. हजारो प्रकारच्या व्यक्ती, त्यांचे त्रास, योग्य आहार आणि जीवनशैलीद्वारे त्यांना केलेलं मार्गदर्शन याव्यतिरिक्त प्रत्येक रुग्णांकडून शिकण्यासारखं बरंच असतं. माझे पपा नेहमी सांगायचे, जे काम कराल त्यात पूर्णपणे मन लावायचं आणि आयुष्यभर ‘विद्यार्थी’ असलं पाहिजे. सतत शिकत राहावं. आज आठवण यायचं कारण ही लेखमाला लिहिताना ‘आता कोणत्या विषयावर लिहू’ हा प्रश्न अजून तरी पडला नाही. कारण वाचकांकडून येणारे अभिप्राय आणि रोजच्या रुग्णालयाच्या आयुष्यात भेटणारे आजी-आजोबा! आज अशाच एका आजोबांचा सहज म्हणून फोन आला. आमची भेट झाली साधारण ४- ५ वर्षांपूर्वी हॉस्पिटलमध्ये. पण काही ऋणानुबंध असल्याप्रमाणे वर्षांतून एकदा ते मला भेटायला येतात. वय वर्ष ८८. ‘कशी आहेस बेटा तू? आवाज क्षीण का वाटतोय?’ माझ्या आवाजावरून माझी तब्येत ठीक नसल्याचं आजोबांना लगेच जाणवलं. माझ्या ‘मानस-आहार’ लेखाविषयी अभिनंदन करायला त्यांनी फोन केला होता. आजोबा बोलतच होते- ‘बेटा आम्ही जुनी माणसं. पण आजकालच्या काही गोष्टी पटत नाहीत. सतत काम करत राहायचं, घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे पळत राहायचं, आई-बाबा ऑफिसमध्ये, मुले पाळणाघरात, आजी-आजोबा, काका-काकू फक्त फोनवर बोलण्यासाठी. इथे कोणाला वेळच नाहीये. आज मला किंवा तुझ्या आजीला आजार नाही कारण आम्ही आयुष्याचं गणित सांभाळलं. ठरलेल्या वेळी झोपणं, उठणं, योग्य पण मित आहार, देवळात जायच्या निमित्ताने रोज १-२ कि.मी. चालणं आणि हे तंत्र सांभाळून नातीचा अभ्यास घेणं, सुनेला जमेल तशी मदत करणं आणि मनाला न पटणाऱ्या गोष्टी झाल्या की आतापर्यंत आयुष्यात काय काय छान झालाय ह्याचा आढावा घेत गालातल्या गालात हसणं!’ खरंच या पद्धतीने जगून हे आजी-आजोबा जीवन किती सुकर करतात स्वत:चं आणि बरोबर दुसऱ्यांचंसुद्धा!
पचेल ते आणि तेवढंच खाणं, जिभेपेक्षा पोटावर प्रेम करणं आणि आला तो दिवस माझा म्हणून प्रत्येक दिवस साजरा करणं खरंच किती लोकांना जमत असेल? ‘साधुसंत येती घरा’ ही उक्ती ते तंतोतंत पाळत आहेत. आजोबा ही रेसिपी खास तुमच्यासाठी ..
चूर-चूर पापा (सासुबाईंची रेसिपी )
साहित्य : १-२ कप गव्हाचं पीठ, २ मोठे चमचे चण्याचं पीठ, २ मोठे चमचे तांदूळ-पीठ, दीड कप आंबट ताक, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, तेल
कृती : सगळी पिठं एकत्र करून त्यात ताक घालावं. गुठळ्या न होता पातळसर भिजवून घ्यावं. त्यात जिरं, मिरच्या, कोथिंबीर, मीठ घालून नीट ढवळून घ्यावं. नॉनस्टिक फ्राइंग पॅन गरम करून त्यात किंचित तेल घालून घावन घालावे. बाजूने तेल सोडल्यावर चुरचुरीत आवाज येतो आणि जाळीसुद्धा छान पडते.
तुमच्यातल्या सकारात्मकतेला शतश: प्रणाम!आनंदाची निवृत्ती – योगासनांतून समाजसेवा
अॅड्. नारायण टेकाळे
मे २००० मध्ये मी ४० वर्षांच्या दीर्घ शासकीय सेवेतून निवृत्त झालो. मात्र, निवृत्तीनंतर काय हा प्रश्न माझ्यापुढे नव्हता. कायद्याचा पदवीधर असल्यामुळे ‘पॅनल अॅडव्होकेट’ म्हणून पाटबंधारे खात्याकडून नियुक्त झालो. तेथे कामाचा व्याप मोठा असल्याामुळे व्यग्रच राहिलो. जबाबदीरचे काम होते. दरम्यान, दररोज पहाटे फिरावयास जाणे चालूच होते.
एकदा दूरचित्रवाणी वाहिनीवर रामदेवबाबांचा योग-प्राणायामचा कार्यक्रम पहाण्यात आला. सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळाली आणि त्या विषयी अधिकाधिक ज्ञान मिळावे याची ओढ निर्माण झाली. हरिद्वार, मुंबई, नागपूर, पुणे इत्यादीं ठिकाणी योग-प्राणायाम शिबिरात भाग घेऊन ज्ञान संपादन केले.
‘पतंजली योगपीठ’ हरिद्वार येथे प्रशिक्षण घेऊन ‘योगशिक्षक’ झालो आणि परतलो ते ध्येय निश्चित करूनच. लातूर जिल्ह्य़ातील गावोगावी जाऊन प्राणायाम योगाचे वर्ग घेऊन सुदृढ आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.
समाजसेवेचा हा एक वेगळा आनंद मिळत होता. नियमित पहाटे ४.३० ला उठून नित्य वर्ग चालविल्यामुळे दिवसभर थकवा येत नव्हता.
२००५ ते २००९ मध्ये उभयतांनी योग-प्राणायामचे ठिकठिकाणी शिबिरे घेतल्यामुळे पतंजली योगपीठाकडून युरोपला जाण्याचा योग आला.
ग्लासगो येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय योगपीठाच्या उद्घाटनास उभयता उपस्थित होतो. निवृत्तीनंतर मिळणारा आनंद आपणच शोधला पाहिजे.
मी तो शोधला म्हणूनच माझी आनंदाची निवृत्ती ठरली आहे.
वृद्धाश्रमाची स्थापना
यशवंत मराठे
ग्रामीण भागातील शाळेत शिक्षक म्हणून दोन तपाहून अधिक काळ काम केल्यानंतर मी २० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालो. निवृत्तीनंतरचा काळ समाजोपयोगी उपक्रम राबवून कसा आनंददायी करायचा याचेही मी नियोजन केले होते. निवृत्तीनंतर ग्रामीण भागातच एका नोंदणीकृत देवस्थानच्या ट्रस्टमार्फत सहकाऱ्यांच्या साहाय्याने शासकीय मदतीशिवाय एक वृद्धाश्रम सुरू केला. दानशूर व्यक्तींच्या मदतीने तो व्यवस्थित व नियोजनबद्ध चालू असून, त्यामध्ये आज ३० निवासी वृद्ध आहेत. त्यांच्यासोबत विविध उपक्रम कार्यान्वित करताना खूपच मानसिक समाधान लाभते. अनेक व्यक्ती आज हा वृद्धाश्रम पाहण्यासाठी, तसेच काही काळ राहण्यासाठीही येत असतात. यामुळे परिसरातील गरिबांना रोजगार मिळाला, हा दुहेरी फायदा झाला.
माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूनंतरही माणसांना लाकडाची गरज लागते. हा विचार मनात पक्का होता. यासाठी डोंगर उतारावरची ओसाड असणारी सुमारे दीड एकर जागा खरेदी करून तेथे फलोद्यान केले आहे. या जागेला लागून शासकीय संरक्षित जंगल असल्यामुळे हा परिसर अतिशय रमणीय झाला आहे. त्या ठिकाणी लहानसे मजबूत घर बांधून पाणी व विजेची सोयही केली आहे.
सामाजिक जाणिवांचे भान ठेवून आपला आनंद आपण जपून तो इतरांनाही देऊ शकतो हे निश्चित हेच मला अनुभवायला मिळाले आहे.