दुर्गोत्सवात विविध क्षेत्रांतील व विविध लढय़ांशी जुळलेल्या नऊ चण्डिकांबाबतची संपूर्ण मालिका (‘चतुरंग’ २० ऑक्टोबर) नावीन्यपूर्ण असून उद्बोधक आहे. डॉ. सुनीता कृष्णन् (लैंगिक गुलामगिरी), बीना लक्ष्मी नेप्राम (शस्त्रसंधीसाठी कार्य), छोटीसी गुडिया बीना (बालविवाहाच्या विरोधात संघर्ष), अ‍ॅड. पल्लवी रेणके (भटक्या विमुक्तांची सामाजिक प्रतिष्ठा), रोशनी परेरा (स्त्री-पुरुष भेदविरहित समान न्यायप्रणाली), प्रीती सोनी (संस्कृतीच्या समृद्धीचे संरक्षण), सोनी सोरी (नक्षलग्रस्त उपेक्षितांचे हक्क), तेरेसा रेहमान (लेखणीचा प्रताप आणि संघर्ष) आणि कौसल्या पेरियास्वामी (एचआयव्हीग्रस्तांचा आधार) या नऊ नवदुर्गाची कहाणी वाचनात आली. कहानी व ‘आपबीती’ एकच आहे. त्याची जडणघडण होण्यास प्रामुख्याने काटेरी परिस्थिती कारणीभूत आहे आणि त्यांनी भोगलेल्या वेदनांमुळे त्यांच्या कार्याला धार आली आहे.
त्यातल्या त्यात ‘मूर्ती लहान कर्तृत्व महान’ म्हणजे हैदराबादच्या डॉ. सुनीता कृष्णन् यांनी प्रामुख्याने मन वेधून घेतले. त्यांनी स्वत: भोगलेले तसेच पीडित मुलींबाबतचे कथन केलेले प्रसंग बीभत्स आणि कल्पनेपल्याड आहे. वेश्यावृत्ती या संघटित गुन्हेगारीचे निर्मूलन करण्यासाठी आजपर्यंत इतस्तत: काही तुरळक लढे झाले. त्यात सुनीताचा लढा आगळावेगळा व रोमांचकारी असून अव्वल क्रमांकावर आहे, असेच म्हणावे लागेल. ‘जान हथेलीवर’ ठेवून संघर्ष करणाऱ्या सुनीताचे कार्य जगावेगळे आहे. ‘रेस्क्यू ऑपरेशन’अंतर्गत हजारो तरुणींची आणि स्त्रियांची सुटका, त्यांची पुनस्र्थापना, त्यासाठी त्यांना अनेकदा जीवघेण्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. त्याबाबत त्या म्हणतात- ‘‘आजपर्यंत मी जिवंत आहे, म्हणजे माझे काम पूर्ण झालेले नाही. माझे काम पूर्ण झाल्याशिवाय मला मृत्यू येणार नाही.’’ या मूर्ती लहान असूनही निडर असलेल्या तरुणीच्या वरील निर्धारपूर्वक वक्तव्यात सारंच काही आलेलं आहे.

‘नवदुर्गा’विशेषांक फार आवडला
२० ऑक्टोबरच्या नवदुर्गा विशेष ‘चतुरंग’ पुरवणीबद्दल हार्दिक अभिनंदन. त्यातील ‘नवदुर्गा’ शीर्षकाखालील प्रत्येक लेख केवळ वाचनीयच नव्हे तर मननीय होता. शोधपत्रकारिता कशी असावी याचा तो उत्तम नमुना होता. त्यातील प्रत्येक ‘दुर्गेचे’ अनुभव आणि आपल्या लक्ष्याच्या दृष्टीने त्यांनी विपरीत परिस्थिती असूनही घेतलेले परिश्रम याला तोड नाही.
वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी आठवडय़ाला किमान एक अशी ‘कथा’ प्रसारित केली तर अशा कित्येक अद्याप अंधारात असलेल्या समाजसेवकांच्या कार्याला उजाळा मिळू शकेल. इतकेच नव्हे, तर त्यापासून प्रेरणा घेऊन अन्य लोक प्रेरित होऊ शकतील.
– सुरेंद्र कुलकर्णी, नवी दिल्ली

नोकरदार स्त्रीच्या ‘सुरक्षे’चे दुष्टचक्र
मुंबईसारख्या मेट्रो सिटीत वावरताना दिवसेंदिवस स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी दररोज काही ना काही ऐकायला, वाचायला मिळतं आणि धास्ती वाटते. या विषयामुळे ३०-३२ वर्षांपूर्वी के.ई.एम. हॉस्पिटलमधील अरुणा शानभागवर झालेला हल्ला अन् अत्याचाराची घटना आठवली. आजही नर्सेसच्या सुरक्षेत काही वाढ झाल्याचं फारसं जाणवत नाही. त्या घटनेनंतरसुद्धा नर्सेस जीव मुठीत घेऊनच डय़ुटी करत होत्या. जी नर्सेसची कथा तीच थोडय़ाफार फरकाने महिला होमगार्ड, महिला पोलिसांची. इथे त्या भररस्त्यात स्टेशन- स्टॅण्डवर असतात अन् फक्त हातात दंडुका असतो. नुकत्याच घडलेल्या ११ ऑगस्टच्या मोर्चाने अन् लालबागच्या राजाच्या मंडपात घडलेल्या प्रकाराने महिला पोलीस किती सुरक्षित आहेत ते सप्रमाण सगळ्या जगासमोर आले.
कायद्याच्या तरतुदीनुसार ‘वुमेन्स सेल’ किंवा ‘महिला अत्याचारविरोधी मंच’ इ. मंडळे या वरील क्षेत्रात अस्तित्वात असणारच; परंतु जेव्हा एकटीदुकटी स्त्री ‘पीडित’ ठरते तेव्हा या सगळ्याचं भान राहणं शक्यच नसतं अन् जेव्हा आठवण करून दिली जाते तेव्हा पुरुषधार्जिण्या पळवाटा अन् न्यायासाठी विलंब असेच चित्र आजपर्यंत तरी दिसतंय. तशातच अब्रू अन् नाचक्कीच्या कल्पनांनी स्वत:लाच दोषी मानण्याकडे कल वाढीस लागतो अन् हे दुष्टचक्र संपतच नाही.
तशात प्रसारमाध्यमांच्या तावडीत सापडली तर मग संपलंच सगळं. अतिरंजित घटना दाखवून त्याचं पुरेपूर मार्केटिंग केलं जातं. वास्तविक ‘लोकसत्ता’ने आतापर्यंत कित्येकदा स्त्रियांच्या हक्कांची अन् विशाखा कायद्याबद्दलची अशी आशादायक माहिती सांगून एका वेगळ्या अर्थाने स्त्रियांच्या सन्मानाची जपणूक केली.
विशाखा कायदा असासुद्धा कायदा आहे याची दखल घेऊन किमान गावागावात महिला मंडळांत, स्त्रियांच्या बचत गटांत जर ‘चतुरंग’मधील अ‍ॅड. मनीषा तुळपुळे यांचा ‘महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा फक्त कागदावरच?’ हा लेख वाचन करून दाखवला तरी अशा बेलगाम नराधमांविरुद्ध आवाज उठवण्याचं बळ एखाद्या तरी महिलेत संचारेल अन् भविष्यात कोणी ‘अरुणा शानभाग’सारखे जीवन कंठणार नाही, ही अपेक्षा ठेवू.
– चित्रा नानिवडेकर, वडाळा

Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
Threat to bar owner Chikhli , Chikhli bar Loot ,
बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…
Nitin Gadkari
Nitin Gadkari : “आमदारांना आणि त्यांच्या लोकांना…”, संभाव्य पालकमंत्र्यांना नितीन गडकरींचा सल्ला!
rss focus on families
संघाचे आता कुटुंब प्रबोधनावर लक्ष
Two men commit unnatural torture on a minor child in Buldhana district
आता…बालकेही सुरक्षित नाहीत!…खामगावच्या शाळेत अंध मुलावर…
tarkteerth Lakshman Shastri Joshi
तर्कतीर्थ विचार : ‘गुरुकुल’चे दिवस
Story img Loader