आपल्या १३ ऑक्टोबरच्या पुरवणीत शुभा परांजपे यांचा ‘गरज बौद्धिक सबलीकरणाची’ हा लेख वाचला. नेहमीच्या पठडीबाज लेखनापेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून लेखिकेने आपले विचार मांडले आहेत. त्यामुळे हा लेख आपल्या शहरी स्त्रियांना नक्कीच विचार करायला लावणारा आहे. माझे कोल्हापूर व पुणे या दोन्ही ठिकाणी सारखेच वास्तव्य होते. त्या काळातील अनुभवांनुसार, कोल्हापुरातील मुली, महिला या पुणेरी मुलींपेक्षा मला अधिक चुणचुणीत वाटतात. विशेषत: महाविद्यालयात त्या अधिक आत्मविश्वासाने वावरत असतात, सभाधीटपणाही त्यांच्यात अधिक असतो. शहरी मुलींपेक्षा या मुली काही बाबतीत नक्कीच भारी पडतात. त्या मानसिकरीत्या जास्त घट्ट असतात, मुलांनी त्रास दिला तर त्या ते प्रकरण चांगल्यारीतीने हाताळू शकतात. एकटय़ा प्रवासाला घाबरत नाहीत. असा फरक का पडतो याचा अभ्यास होण्याची गरज आहे. शहरी स्त्री म्हणजे ‘सबकुछ आलबेल’ या आपल्या विचारसरणीला धक्का देऊन शुभाताई यांनी एका नव्या विचाराला चालना दिली आहे हे नक्की!
-सागर पाटील, कोल्हापूर

शहरी ‘स्त्री’सबलीकरण गरजेचे!
लेखिका शुभा परांजपे यांनी ‘गरज बौद्धिक सबलीकरणाची’ या लेखातून एका वेगळ्याच विषयाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन! अनेक वेळा समाजकार्य करताना, तथाकथित गरीब गरजू महिलांसाठी काम करत असताना, आपल्यातील कमतरतेकडे आपले लक्ष जात नाही याची जाणीव हा लेख वाचून झाली. काही वेळा अनेक महिलांना, आपल्यातील अशा या त्रुटींची जाणीव झालेली असतेही, पण ही किरकोळ बाब आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सबलीकरण हे सर्वच पातळीवर व्हायला हवे, हा लेखिकेने मांडलेला मुद्दा प्रस्तुत उदाहरणांनी चांगलाच ठसवला आहे.
विशेषत: शहरी मुलींवर होणारे मध्यमवर्गीय संस्कार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत असतील, पण त्यांना स्वावलंबी आणि स्वतंत्र माणूस होण्यापासून वंचित ठेवतात याचा प्रत्यय मी अनेकदा घेतला आहे. भित्रेपणा हा एका दुर्गुणामुळे माणसाच्या अनेक चांगल्या गुणांची शिकार होते. मग त्यातून निर्माण होणाऱ्या असुरक्षिततेतून कुटुंबातील माणसांशी तुटक वागणे, आत्ममग्नतेत रमणे, नवे काही स्वीकारायला कचरणे, कितीही झाले तरी आपण स्त्री आहोत या गंडाने पछाडणे, असे दुर्गुण वाढीस लागतात. या लेखाच्या निमित्ताने समाजात स्त्रियांच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या संघटनांनी या विषयावार कार्यशाळा घेऊन या प्रश्नाचा वेध घ्यावा, कदाचित यातून आपण शहरी स्त्रीलासुद्धा खऱ्या अर्थाने मत्रिणी गं मत्री असे म्हणू शकू.
-अनघा गोखले, मुंबई</p>

दुबळा यक्तिवाद
डॉ. आठलेकर यांचा ‘एकटं राहण्याचा हक्क’ हा लेख वाचला. आठलेकर यांनी स्त्रीला दुर्बल म्हटले आहे,  हे पटत नाही. भारत व (तुर्कस्तान वगळता) मुस्लिम राष्ट्रांमधील समाज स्त्रीला माणूस समजतच नाही. त्यामुळे तिच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी मदानी खेळ खेळणे तिला अशक्यच असते. छेडछाडीची भीती व जन्मदात्यांचा तिला सोबत करण्याचा निरुत्साह तिला खेळण्यापासून परावृत्त करतो. शिवाय बाई म्हणजे मुले जन्माला घालायचे ‘मशीन’ समजले जात असल्यामुळे वारंवारच्या बाळंतपणाने बायका शरीराने व मनाने खचतात. अशी बाई प्रतिकार तो काय करणार?
खरे तर पुरुषाचे गुप्तांग अतिशय नाजुक असते. त्याच्यावरचा थोडासा आघात त्याला मृत्यूजवळ नेऊ शकतो हे मी कराटे शिकत असताना पाहिले आहे. त्यामुळे मुलींना सुदृढ करण्याबरोबरच त्यांना कराटे किक शिकवावी. हा एक स्वसंरक्षणाचा चांगला मार्ग आहे. बायका-मुली लवचिक राहतील तर हे उपाय त्यांना अवघड नाहीत.
उर्वरित लेख खूपच चांगला आहे. आमच्याकडे एक भटजी येत. ते आम्हा मुलींच्या लग्न न करण्याबद्दल वारंवार मुक्ताफळे उधळीत असत. एकदा मी त्यांना विचारले की, ‘तुम्हाला आमच्या लग्नाचे एवढे पडले आहे, तर तुम्ही विधवांच्या लग्नासाठी प्रयत्न का करत नाही?’ त्यावर भटजी निरुत्तर झाले व ओशाळे हसू लागले. जे नातेवाईक व परिचित आम्हाला आमच्या अविवाहित राहण्याच्या निर्णयावरून प्रदीर्घ काळपर्यंत बोलत राहिले किंवा ज्यांच्याकडून अप्रिय अनुभव आले त्यांना आम्ही आमच्या घराचे दरवाजे ‘स्पष्टपणे’ बंद केले. अविवाहित स्त्रियांच्या इस्टेटीवर नातेवाईकांसह काही परिचितांचे लक्ष असते. या स्त्रियांच्या मृत्यूनंतर ती मालमत्ता कुणाला मिळेल याचे आडाखे बांधणे त्यानंतर ओघाने आलेच.
आता हंसा पांडेंच्या पत्राकडे वळू. त्या म्हणतात की स्त्रियांवर या देशात अत्याचार होतात म्हणून मुलगी कशाला हवी? मग त्यांना सुनेवर अत्याचार झालेले चालतील का? खरे तर इतकी वाईट परिस्थिती असलेल्या देशात आपले अपत्यच नको असे म्हटले पाहिजे. पण नकारात्मक विचार करणारे लोक सोयीस्करपणे मुलीचा जन्म नाकारतात. अनेकदा असा वाद केला जातो की आपण ज्या बाळंतपणाच्या कळा सोसल्या तशा आपल्या मुलीला सोसायला लागू नयेत म्हणून मुलगी नको असते. पण मुलगा चालतो, हवाच असतो. मग प्रश्न पडतो की मुलगा लग्न करणार नसतो का? त्याच्या बायकोला म्हणजेच सुनेला बाळंतपणाच्या कळा सोसायला लावणे न्यायाचे आहे का ?
हे तर मुलीचा जन्म नाकारायचे दुबळे कारण आहे.
-स्मिता पटवर्धन, ई-मेलवरून