डॉ. नियती चितलिया यांचे ‘अभ्यासाशी मत्री’ हे सदर खूपच छान आहे. माझ्या शिक्षकी तसेच वैयक्तिक जीवनातही या लेखांतील अनुभवांचा मला खूप उपयोग होतो. मी सध्या विज्ञान विषय शिकवतो. ‘आयुष्यभरासाठीचा अभ्यास’ या आपल्या १७ नोव्हेंबरच्या लेखात डॉ. नियती म्हणतात- ‘प्रत्यक्ष पाहिलेलं मुलं साधारणत: विसरत नाहीत.’ लेखकेच्या या विधानाशी मी शंभर टक्के सहमत आहे. माझ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मला बऱ्याचदा याचा प्रत्ययही येतो; परंतु किती पालकांना स्वत:ला हे व्यवहारातील विज्ञान माहिती असेल? दुर्दैवाने जी मुलं अभ्यासात मागे पडतात त्यांचे पालक या विज्ञानाबाबत अनभिज्ञ असतात. असे पालक एखाद्या घटनेमागची कारणमीमांसा मुलांना सांगताना ‘विज्ञाना’ऐवजी ‘अज्ञाना’चाच आधार घेतात. अशा वेळी शिक्षणाची वाट अजूनच खडतर होते. ज्या पालकांपर्यंत ‘चतुरंग’ पोहोचत नाही अशा पालकांसाठी-पाल्यांसाठी काय करता येईल, याचेही मार्गदर्शन व्हावे.
एकटे राहण्याचा हक्क?
२७ ऑक्टोबरच्या पुरवणीतील मंगला आठलेकर यांच्या ‘एकटे राहण्याचा हक्क’ या लेखाच्या निमित्ताने ही प्रतिक्रिया. भारतीय समाजात एक फार गरसमज आहे की, विवाहित स्त्री सुरक्षित असते. सीता, तारा, द्रौपदी, अहिल्या, अनुसूया या सर्व पुराणातील स्त्रिया विवाहित होत्या तरीही परपुरुषांकडून त्या पिडल्या गेल्या होत्या, पण महाभारतातील अंबेने स्वबळावर तप करून भीष्माचा सूड घेतला, याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. नवऱ्याच्या उपस्थितीतच अनेकदा बायकांवर अत्याचार होतात. त्यांचे मंगळसूत्र ओढले जाते. विवाहित स्त्रीच्या असुरक्षिततेचा हाच एक मोठा पुरावा आहे!
सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक चार्लस डिकन्स यांच्या अनेक कादंबऱ्यांत तसेच मार्गारेट मिचेलची कादंबरी ‘गॉन विथ द विन्ड’ यात अविवाहित आणि सधन स्थितीतल्या पूर्णपणे एकटे राहणाऱ्या स्त्री पात्रांचा समावेश आहे, पण त्यांना त्यांच्या अविवाहित असण्यामुळे कोणाकडून त्रास झाल्याचे किंवा त्यांची प्रतिष्ठा कमी होण्याचे उल्लेख नाहीत. त्यांच्याकडे लग्न करणे- न करणे या वैयक्तिक बाबी मानल्या जातात. अमेरिकेत फक्त स्त्रियांचे असे मेडिकल कॉलेज होते, त्यांत आनंदीबाई जोशी शिकल्या. यावरून असे दिसते की, त्या काळी, शंभर-दीडशे वर्षांपूर्वी बऱ्यात मुली वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होत्या. त्या वेळी आपल्याकडे विधवेचे केशवपन होत होते व लहान मुलींची लग्ने होत होती.
जर अविवाहित स्त्री योग्य कारणासाठी कधी चिडली तर तिला वेडसर (वा अबनॉर्मल ) ठरवण्याकडे लोकांचा कल असतो, पण त्याच वेळी सासर व नवऱ्याकडून होणाऱ्या जाचापायी अनेक विवाहित स्त्रिया मानसिक संतुलन गमावतात याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. आमच्या परिचयातील एक विवाहित पुरुष डॉक्टर आहेत. पेशंटसच्या अतिसंख्येने ते चिडचिडे बनलेले आहेत, पण त्यांच्या जागी एखादी अविवाहित स्त्री डॉक्टर असती, तर लोकांनी त्या चिडचिडेपणाचे खापर तिच्या अविवाहित असण्यावर फोडले असते हे निश्चित.
भारतात ज्या कर्तबगार स्त्रिया झाल्या त्या अविवाहित किंवा विधवा होत्या. उदा. रझिया सुलतान, झाशीची राणी, चांदबीबी, कित्तुर चन्नम्मा इ. यावरून असे वाटते की, नवरा, भाऊ हे स्त्रीच्या प्रगतीतील धोंडे तर नाहीत? सुशिक्षित नोकरदार स्त्रिया जेव्हा वटसावित्री व हळदीकुंकू यांसारखे कार्यक्रम करतात तेव्हा त्यांच्या बौद्धिक दारिद्रय़ाची कीव येते. आम्ही आमच्या घरातल्या अशा अनेक प्रथा केव्हाच मोडीत काढल्या.
अविवाहित स्त्रिया सुस्थितीत व निवांत राहत असलेल्या पाहणे स्त्रियांना व विशेषत: पुरुषांना आवडत नाही, पण आताच्या काळात त्यांना हे पाहावेच लागते.
-प्रतिभा पटवर्धन, सांगली</strong>
आवडीमुळे मिळाली सवड!
२७ ऑक्टोबरच्या लेखातील ‘पालकत्वाचे प्रयोग’मधील ‘एकटेपणाला दिशा मिळाली’ हा लेख वाचून माझ्या आठवणी ताज्या झाल्या. माझी मुलगी शिल्पा लहान असतानाची गोष्ट. तिसरी-चौथीत असताना तिला एका परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून तिच्या वर्गशिक्षिकेने मला भेटायला बोलावले. मी त्यांना सांगितले की, शिल्पाला एका जागी बसून अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. तिला सारखे काही तरी नवे हवे असते. तिला वर्गात बसून रटणे अजिबात करता येत नाही. तिला विशेषत: नाचणे, गाणे, खेळ अशा गोष्टी आवडतात. तेव्हा त्यांनी मला शाळेतल्या पी.टी.च्या शिक्षिका देत असलेल्या अॅथलेटिक प्रशिक्षणाविषयी सांगितले. शिल्पासाठी आम्ही ते लगेच सुरू केले आणि काय सांगू? तिचे आयुष्यच बदलून गेले. जी मुलगी अभ्यासाला कंटाळायची, ती शुक्रवारी दुपारी होम वर्क संपवून शनिवारी सकाळी कटकट न करता लवकर उठू लागली. सारे आटोपून केव्हा एकदा धावायला जाऊ याची वाट पाहू लागली. एवढेच नाही तर, तिची भूक व खाणेही सुधारले. हळूहळू एकंदर तिचे व्यक्तिमत्त्व बदलले. अर्थात हे प्रशिक्षण घेतल्यामुळे ती वर्गात पहिली येऊ लागली असे नाही, तसा माझा उद्देशही नव्हताच! मला तिचा शाळेबद्दल व अभ्यासाबद्दलचा कंटाळा व उदासीनता काढून टाकायची होती. ते नक्की साध्य झाले.मला असे वाटते की, मुलांना त्यांच्या आवडीचे करायला मिळाले की ते लगेच न आवडत्या गोष्टी करायला तयार होतात.
– लता रेळे, दादर
प्रभावित करणारा लेख
१७ नोव्हेंबरच्या अंकातील ‘संरक्षण’ हा सायली वैद्य यांचा लेख वाचून मी व माझे यजमान प्रभावित झालो. एका तरुण मुलीने संरक्षण दलात काम करण्याचं स्वप्न बाळगावं व प्रयत्नपूर्वक त्या तटरक्षक दलात पहिली लेडी ऑफिसर म्हणून रुजू व्हायचं हा निर्णयच फार धाडसी वाटतो. म्हणूनच लेखाचा प्रभाव एखाद्या ललीत लेखाइतका मर्यादित न राहता तो प्रेरणादायी वाटतो. अधिकारी पदावरील समीराच्या भावना व तिची बांधीलकी या भावनिक छटांचे अचूक वर्णन लेखिकेने केले आहे. सशस्त्र दलाशी संबंधित ललित लेखन फार अपवादाने आढळते. म्हणूनच सायली वैद्य यांच्या प्रयत्नांचे कौतुक..
-उषा गौर, ई-मेलवरून
chaturang@expressindia.com