२४नोव्हेंबरच्या चतुरंग पुरवणीत ‘सौंदर्यासाठी वाट्टेल ते’ या शीर्षकाखाली दोन लेख छापून आले आहेत. त्यातला उदय भट यांचा लेख वैज्ञानिक स्वरूपाचा असून सावधपणे लिहिला आहे. मनीषा सोमण यांच्या लेखाच्या पूर्वार्धात ‘याची खरोखर गरज आहे का?’ असा गर्भित प्रश्न विचारून झाल्यावर सुहास अभ्यंकर यांच्या अनुभवाचे आणि मताचे सत्यकथांवर आधारित विवरण देण्यात आले आहे. त्यात मुले आणि मुली (किंवा स्त्री-पुरुष) दोन्ही सौंदर्यप्रसाधक शस्त्रक्रिया करण्यासाठी येतात अशा प्रकारची विधाने आढळतात. सरासरी बघितली तर मात्र सौंदर्यप्रसाधक शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येणाऱ्यांत स्त्रियांचे प्रमाण खूपच अधिक आहे ही गोष्ट मान्य करायला हवी आणि त्याची कारणमीमांसाही करणे योग्य ठरेल. ‘चतुरंग’ पुरवणी स्त्रियांसाठी, तिची सामाजिक, मानसिक स्थिती उन्नत व्हावी या दृष्टीने प्रसारित होते अशी माझी समजूत आहे. त्या दृष्टीने त्याच तारखेच्या पुरवणीत मंगला आठलेकर यांनी लिहिलेला ‘याची ‘त्यांना’ बोच का नाही?’ हा लेख मोठा वेधक आहे. स्त्रियांच्या माध्यमातून होणारे चित्रण आणि त्याचा स्त्रियांच्या आयुष्यावर होणारा परिणाम सौंदर्यप्रसाधक शस्त्रक्रियेच्या व्यवसायाला (धंद्याला) चालना देतो ही गोष्ट निर्विवाद आहे. सुहास अभ्यंकर आणि उदय भट यांना मी ओळखतो. त्यांनी या व्यवसायात अजून संपूर्ण बुडी घेतलेली नाही आणि अभ्यंकरांनी दिलेली उदाहरणेही सावधपणे दिलेली असली तरी त्या दोघांना या व्यवसायात घुसलेल्या अपप्रवृत्तीची जाण असणारच आणि त्याबद्दल त्यांनी विस्ताराने लिहिले असते तर ‘सौंदर्यासाठी वाट्टेल ते’ हे शीर्षक जास्त समर्पक झाले असते.
आद्य मानवाने पाण्यात आपले प्रतिबिंब बघून आपल्या बोटांनी केस सावरले असे चित्र माझ्या डोळय़ासमोर येते. ही जैविकता आदिमच. काळे नखशिखान्त चादोर नावाचे कापड नेसणाऱ्या स्त्रिया त्यावरही सोनेरी वेलबुट्टी काढतात आणि वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कडक खाकी वर्दीमधल्या स्त्रिया कानातली आभूषणे तशीच ठेवतात हीसुद्धा त्याच जैविकतेची लक्षणे आहेत. पूर्वी वेणीफणी आणि कुंकवाचा करंडा होता आणि काजळ होते. आता दसनूर कपडे घालून आणि जाडजूड रंगरंगोटी करून स्वागत समारंभाला तासभर उशिरा येणारी वधू अवतरली आहे आणि पुढच्या महिन्यात लंडनला एक कार्यक्रम आहे. त्यासाठी एक-दोन किलो चरबी काढण्याचे किती पैसे घ्याल, असे विचारणारी ग्राहक स्त्री निर्माण झाली आहे. याला सौंदर्याचा विकृत सोस म्हणतात. रेनासान्स नावाच्या युरोपमध्ये झालेल्या सांस्कृतिक उत्क्रांतीत देवादिकांच्या चित्रांव्यतिरिक्त जेव्हा इतर चित्रे काढली गेली तेव्हा त्यात तरुण, प्रौढ, पोक्त आणि वृद्ध स्त्रियांच्या काढलेल्या चित्रांतली गंमत अशी आहे, की त्या स्त्रिया त्यांच्या वयामुळे झालेल्या परिणामामुळे अवघडलेल्या नाहीत. त्यातली काही चित्रे तर अनावृत स्थितीत आहेत. त्याच्या चारशे वर्षे आधी सांगितलेल्या ज्ञानेश्वरीत नव्हाळी आणि वृद्ध लेकुरवाळी या दोन्ही प्रतिमा सौंदर्याच्या म्हणूनच सांगितल्या गेल्या आहेत. एवढेच नव्हे तर (स्त्रियांच्या) शरीरातले तारुण्याच्या उंबरठय़ावर होणारे बदल कर्मचक्राचा भाग म्हणून वर्णन केले गेले आहेत. विज्ञान आपल्याला असे सांगते, की जीवसृष्टीत लिंगभेद होण्याआधी फक्त मादीच होती. पुढे जनुकातल्या कणभरच बदलामुळे पुरुष तयार झाला आणि आदिमानवाने त्याला कानामागून आलेला असूनही शिरजोर होऊ दिला. पुढे समाज पुरुषप्रधान झाला. तीनचार शतकांपूर्वी या पुरुषांनी भांडवलशाहीवर आधारित अर्थसंस्कृती उभारली आणि त्या ओघात स्त्रीच्या स्वाभाविक जैविकतेचे अचूक निरीक्षण करत सौंदर्यप्रसाधन द्रव्याचा अब्जावधी डॉलर्सचा धंदा उभा केला आणि त्यातूनच सौंदर्यप्रसाधन शस्त्रक्रियेला जन्माला घालण्यात यश मिळवले. वरवरची रंगरंगोटी आणि आता आक्रमक शरीरांतर्गत घालण्याच्या/ काढण्याच्या गोष्टी असे याचे स्वरूप आहे. भारतात आर्थिक उदारीकरण सुरू झाल्या झाल्या इथल्या स्त्रिया आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सुंदरी बनू लागल्या हा योगायोग नव्हता. कट नसेलही कदाचित, परंतु योजनाबद्ध तऱ्हेने त्यांना निवडले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रचंड धंदेवाईक व्यवस्थापनामुळे काही स्त्रियांचा फायदा झाला, काही याच्या आहारी गेल्या आणि काही हकनाक बळी पडल्या अशी सरासरी काढता येईल. ‘शरीरावरच सगळे ध्यान, तर होणार कसे आत्मज्ञान’ अशी ज्ञानेश्वरांची ओवी आहे ती अवघड असे गृहीत धरले तरी आत्मज्ञानाच्या ऐवजी ‘आत्मभान’ असा शब्द वापरून ही ओवी लिहिता येईल. स्त्रियांचे सबलीकरण झाल्यावर त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य वाढले आणि त्याचबरोबर माध्यमांनी सुरू केलेल्या त्यांच्या शरीराचे प्रदर्शन प्रच्छन्नपणे मांडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्वाभाविक जैविकता आणि हा लोभस आणि फसवा देखावा यातून एक तिसरीच स्थिती निर्माण होऊन मानसिक न्यूनगंड जन्माला आला आणि आत्मसन्मान तर सोडाच, पण आत्मभानही हरवले आणि त्या स्त्रिया या शस्त्रक्रिया किंवा शस्त्रक्रियेशिवाय करण्यात येणाऱ्या उपचारासाठीच्या दुकानावर रांगा लावू लागल्या असे अस्पष्ट चित्र दिसू लागले आहे. आरोग्य (मानसिक आणि शारीरिक) विकत घेता येत नाही. हे मूलभूत सत्य हरपल्यातच जमा होऊ घातले आहे. ज्या देशात व्यंग असलेल्या लोकांची ऐंशी टक्के संख्या शहराबाहेर आहे त्याच देशात ऐंशी टक्के सुघटन शल्यचिकित्सक शहरात आहेत आणि या शहरातल्या तज्ज्ञांमधल्या ऐंशी टक्के तज्ज्ञांच्या नजरा या सौंदर्यप्रसाधक शस्त्रक्रियांवर खिळल्या आहेत याचे कारण वैद्यकीय अर्थव्यवस्था (खरेतर वैद्यकीय अव्यवस्था).
कॉस्मेटिक सर्जरी या वाक्प्रचारात कॉस्मॉस शब्द आहे. त्याचा अर्थ सुव्यवस्थित विश्व असा आहे. याच्या विरुद्ध इंग्रजीतला शब्द केऑस (ूँं२) असा आहे. त्याचा अर्थ विश्वनिर्मितीच्या आधीचा गोंधळ असा दिला आहे. कॉस्मेटिक सर्जरी करून घेणाऱ्या स्त्रियांच्या शरीरात व्यंग किंवा गोंधळ आहे, की त्या आजच्या सामाजिक परिस्थितीत गोंधळून गेल्या आहेत. या प्रश्नाचे उत्तर स्वत: स्त्रियांनीच शोधून काढायला हवे. चार पैसे टाकून अत्तर किंवा लुगडे घेण्याइतकी ही गोष्ट सोपी नाही असा विचार केलेला बरा! मी स्वत: प्लॅस्टिक सर्जन आहे, तेव्हा हे माझे लिखाण स्वत:च्या पायावर धोंडा पाडण्यासारखेच आहे. शिवाय मी आहे पुरुष, तेव्हा हल्लीच्या पद्धतीप्रमाणे ‘आम्ही आमचे बघून घेऊ’ असे उत्तर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते योग्य असेलही. परंतु माझे जडणघडण केले एका स्त्रीने, ती म्हणजे माझी आई. तिने केलेल्या संस्कारातून हे विचार निर्माण झाले आहेत एवढे नमूद करतो. तिच्या माहेरचे आडनाव होते मायदेव. तिने मला दिलेल्या जनुकामुळे मी माझे आडनावही बदलले आहे हेही नमूद करतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा