जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने १८ मेच्या पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेले ‘पाश्चात्यांना ओढ लग्नसंस्कारांची’ आणि  ‘गतिमान काळांतील कुटुंबसंस्था’ हे दोन लेख वाचले. दुसऱ्या लेखात प्रचलित पारंपारिक कुटुंबसंस्थेला यापुढे हादरे बसणार आहेत, असे म्हटले आहे. तर पहिल्या लेखावरून कुटुंबाचे कितीही नवीन प्रकार अस्तित्वात आले तरी बहुतांशी पारंपारिक लग्नसंस्थेवर आधारित पति-पत्नी-मुलं ही कुटुंबसंस्था आपलं स्थान टिकवून ठेवणार आहे असे दिसते. शेवटी रक्ताची नाती महत्वाची ठरणार आहेत.
दोन्ही लेखांवरून असे दिसते की आधुनिक युगात विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सुखसोयी उपलब्ध झाल्या आहेत, तरीही मानवी जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मुळात विवाहसंस्था ही पुढील पिढी स्वतंत्र आयुष्य जगायला सक्षम होईपर्यंतच्या काळात आवश्यक ते संरक्षण व आधार मिळावा यासाठी निर्माण झाली. त्यातून कुटुंबसंस्था निर्माण झाली. कुटुंबसंस्थेतून परंपरा निर्माण झाली. परंपरांमुळे प्रत्येक नव्या पिढीबरोबर ज्ञानाच्या कक्षा विस्तारत गेल्या. मानवेतर प्राण्यांमध्ये कुटुंबसंस्था नसल्यामुळे त्यांच्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यांचे व्यवहार नि त्यांची आयुष्यं बऱ्याच प्रमाणात निसर्गाच्या हुकमतीखाली चालत असतात. कुटुंबसंस्थेचे हे दृश्य फायदे पटकन लक्षात येत नसले तरी याअभावी मानव समाजात व मानवेतर प्राण्यांत फरक राहीला नसता. त्याशिवाय कुटुंबात अगोदरच्या पिढीतल्या वृद्धावस्थेमुळे अकार्यक्षम झालेल्या व्यक्ती असतात. तर कधी कधी रक्ताच्या नात्याचे इतर स्त्रीपुरुषही असतात. कुटुंबात त्यांना सुरक्षित वाटत असतं. इतके सर्व फायदे असतांना केवळ काही क्षुल्लक त्रुटी आहेत म्हणून लोक प्रचलित कुटुंबसंस्था आणि तिचा पाया असलेली पारंपारिक विवाहसंस्था मोडीत काढण्याचा विचार करतील असं वाटतं नाही.
– शरद कोर्डे, ठाणे

‘यथार्थ अभिव्यक्ती’ कौतुकास्पद
१८ मेच्या पुरवणीतील ‘एक उलट..एक सुलट’ या सदरातील अमृता सुभाष यांचा ‘अनुसूया’ हा लेख अनेकार्थानी वेगळा वाटला. मानवी स्वभावातल्या सूक्ष्म, मानवतेची पातळी घसरवणाऱ्या, आपल्या अंतरमनातल्या भावनांना आपण सामोरं जाणं टाळतो, त्यामुळे त्या अधिकच जोराने उसळतात- हे सारं शब्दांत एका लेखाद्वारे व्यक्त करणं खूप कठीण आहे परंतु लेखिकेने ते अगदी समर्थपणे साकारलय. ‘तुमची समजुताभिलाषि’ पासून सुरु झालेला हा प्रवास मानवी स्वभावाच्या सूक्ष्म कंगोऱ्यांचं भेदक वास्तव समोर आणण्यात पूर्ण यशस्वी झालाय आणि त्याचं श्रेय अर्थातच लेखिकेच्या तरल जाणिवांना अणि त्या जणिवांच्या यथार्थ अभिव्यक्तीला आहे.
-राजीव मुळ्ये, दादर

Story img Loader