माझी स्वत:ची काही किरकोळ पण फालतू दडपणं आहेत.. बँकेत पैसे काढायला गेल्यावर पूर्वी मी तो पितळी बिल्ला हातात गच्च धरून ठेवायची. माझा नंबर आला किंवा पुकारा झाला तर पर्समध्ये नेमका कुठल्या कप्प्यात तो दडलाय हेच सापडायचं नाही. रेल्वेच्या डब्यात तिकीटचेकर जवळ यायला लागला की चटकन तिकीट सापडेल का नाही, या कल्पनेनं मला घाम फुटायचा..
दडपण-टेन्शन हे प्रकरण असं असतं की ते कुठून, कसं आणि केव्हा तुमच्यासमोर येऊन उभं राहील, याचा नेम नसतो. ते घरात येतं, बाजारात येतं, आजारपणांत येतं. तिकीट विंडोवर येतं. कुठेही येतं. आणि एकदा का ते आलं की शरीराला सूक्ष्म कंप सुटतो, ओठ कोरडे पडायला लागतात. आपल्या शरीर-मनाला ते व्यापून टाकतं. वानगीदाखल माझी काही दडपणं सांगते. तुम्ही तुमची आठवून पाहा.
 बत्तिशी – तशी मी जरा हळव्या प्रकृतीचीच आहे. दाताचा डॉक्टर असं नुसतं कुणी म्हटलं तरी मी अंतर्बाह्य़ भेदरून जाते. त्यांनी ‘सोमवारी या’ म्हटलं की माझी गुरुवारपासूनच झोप उडते. या बाबतीतली माझी सध्याची स्थिती विचारता, तर माझ्या तोंडात अर्धे दात खरे आहेत आणि अर्धे खोटे! माझ्या दवाखान्यातून असंख्य फेऱ्या मारून झाल्या आहेत. आणि दर वेळी मला दरदरून घाम फुटला आहे.
तो प्रसंग चांगलाच आठवतो. तोंडातल्या बत्तिशीचं आज जे पानिपत झालं आहे, त्याची सुरुवात त्या दिवशी झाली. शेजारच्या मीनूला जरदाळूच्या आतली बी फोडून हवी होती. मी मोठय़ा फुशारकीने दाढेखाली काडकन फोडून दिली. माझा पराक्रम पाहून तिने डोळे विस्फारले, आणि इकडे माझे डोळे पांढरे झाले. अशी काही मस्तकात कळ गेली की ब्रह्मांड आठवलं. आधी घरगुती उपाय सुरू झाले. लवंगेचा अर्क लावून झाला. वेखंड उगाळून त्याची गोळी दाढेत धरून झाली. पुन्हा अशी फुशारकी मारणार नाही, अशी परमेश्वराला ग्वाही देऊन झाली, तरी कळ म्हणून थांबेना. रविवार असल्यामुळे डॉक्टर उघडे (सॉरी) नव्हते..
..शेवटी प्रॅक्टिस सोडून ज्यांना २० र्वष झाली आहेत आणि ज्यांच्या स्वत:च्या तोंडाचं बोळकं झालं आहे, अशा शेजारच्या पाध्ये दंतवैद्यांना मुलांनी अक्षरश: उचलून आणलं. त्यांना पाहिलं मात्र, माझ्या दातांतली कळ जाऊन ती डोक्यात उठली. आल्या आल्या त्यांनी ऑर्डर सोडली, ‘घरात कसला चिमटा असला तर आणा’. .. आमचे चिरंजीवही इतके लहान आणि दीडशहाणे की त्यानं कोळशाचा चिमटा आणला. आपल्या आईचा दात म्हणजे त्याला बहुधा हत्तिणीचा दात वाटला असावा.. शेवटी आकांडतांडव करून मी सर्वाना खोलीबाहेर घालवलं, आणि शांत पडून राहिले.. परंतु दुसऱ्या दिवशी जेव्हा गोरिलासारखं तोंड झालं तेव्हा मात्र डॉ. भीमरावांकडे जावंच लागलं. त्यांच्या दवाखान्यात भिंतीवर लावलेली चित्रं इतकी भयावह होती, की दात काढायला गेलेल्यांची दातखीळच बसावी. प्रत्येक चित्रात जबडा वासलेला, प्रत्येक दाताच्या मागची शीर अन् शीर उठून वर आलेली, चित्रविचित्र हिरडय़ा, किडलेले दात! मी चित्रांवरून नजर काढून घेतली. समोरच्या खुर्चीवर दोघे जण विव्हळत होते. एकाचा दात आधीच काढून झाला होता. त्यामुळे विव्हळत असतानाही ‘सुटलो एकदाचा’ भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. दुसरा मात्र बळी द्यायला निघालेल्या कोकरासारखा केविलवाणा भाव लेवून बसला होता. इतक्यात बंद दाराआडून एक हाऽऽय आवाज आला, आणि आमच्यापैकी ‘आणखी एक जण सुटला’, याचं ज्ञान झालं.
माझ्या नावाचा पुकारा झाल्यावर ‘ह्यांच्या’ हाताला धरून मी आत गेले. डॉक्टरांनी खटक् खटक्  करून खुर्ची उंच करायला सुरुवात केल्यावर स्वर्गाच्या पायऱ्या सुरू झाल्या की काय असं वाटलं.. तपासून झाल्यावर दात काढावाच लागेल, हे नक्की झालं. डॉक्टर पुढे सरसावले. हिरडय़ांमधून दोन-चार सुया खुपसून बाहेर काढल्या गेल्या. शेवटी माझं तोंड दुसऱ्या कुणाचं तरी आहे, असं वाटण्यापर्यंत मजल गेल्यानंतर त्यांनी चिमटा हातात घेतला. मी मनातल्या मनात राम-राम, राम -राम म्हणत होते. एवढय़ात दात बाहेर निघाला. एवढय़ा सुया खुपसूनही कळ उठायची ती उठलीच. मी हाऽऽय ओरडले. बाहेरच्यांना कळलं, आणखी एक जीव सुटला.. ह्य़ा डॉक्टरांकडे ‘दात’ होता कधी आणि गेला कधी हे अगदी समजत नाही, असं कुणी तरी सांगितलं होतं. पण मनात आलं, यांच्याकडे जीवदेखील ‘होता केव्हा आणि गेला केव्हा’, हे कळणार नाही.
प्लास्टिक –  प्लास्टिकच्या सामानाच्या दुकानात एकदा कहर झाला होता. मला एक प्लास्टिकची बादली विकत घ्यायची होती. माझं म्हणजे काय आहे, की मला वस्तूतले भेद फार ढोबळ मानाने समजतात. सोनं, चांदी, तांबे, पितळ, कथिल, अ‍ॅल्युमिनियम, प्लास्टिक, चिनीमाती, काच आणि स्टेनलेस स्टील- ही माझी रोजची परिचित मंडळी. या ज्ञानाला जमेस धरून ‘अहो, एक प्लास्टिकची बादली द्या हो,’ असं सरळ, साधं आणि शुद्ध वाक्य मी उच्चारलं. आता ह्य़ात काही चुकलं होतं का? त्या दुकानदारानंदेखील चटकन बादली देऊन मला मोकळं केलं असतं तर त्याचं काही बिघडलं असतं का? पण नाही. दुकानदाराचा एक तरुण मुलगा नुकताच प्लास्टिक विषयातलं ज्ञान घेऊन बाहेर पडला होता. त्यानं त्या ज्ञानाची उजळणी करून इम्प्रेशन मारायचा प्रयत्न केला. म्हणाला – ‘‘बाई, या ज्या तुमच्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या सर्वाना ‘प्लास्टिक’ नाही म्हणायचं.’’
‘‘म्हणजे?’’ – माझा एक निष्पाप प्रश्न!
‘‘त्याचं काय आहे, की गिऱ्हाइक जरी सगळ्याला नुसतं ‘प्लास्टिक’ म्हणत असलं तरी त्यात अनेक पोटभेद आहेत. हवं तर सांगतो.’’
‘‘हो का? सांगा.’’ माझा एक आवंढा आणि केविलवाणा उद्गार! .. ‘‘लॅम्पशेड्स, ट्रेज वगैरे आहेत ते मिथाइल मिथॅक्रिलेटचे आहेत.’’ त्याचं लेक्चर सुरू झालं. ‘‘त्यावर चरे पडणार नाहीत, ते कधीही पिवळे होणार नाहीत.’’
..‘‘कपबशा मेलामाइन फॉरयलंडहाइच्या! ..बादल्या, मग्ज हे हाय डेन्सिटी पॉलिएथलीनपासून बनवलेले असतात. आणि बाहेर रेक्झीन, शॉवर कर्टन्स वगैरे मिळतात ते प्लॅस्टिसाइज्ड पॉली व्हिनाइल क्लोराइडचे असतात.’’
विक्रेता श्वास घ्यायला जरा थांबला, आणि ती संधी साधून मी दुकानाच्या पायऱ्या उतरून चालायला लागले. रस्त्याला लागल्यावर विचार केला, यापेक्षा सासूबाईंच्या वेळची घरात असलेली पितळेची बादली परवडली. चिंचेचा हात फिरवला की आरशासारखी लख्ख! पुन्हा दोन पिढय़ा तरी बघायला नको.
   वाङ्मय – सगळ्या बाजूनं डोकं चिवचिवलं म्हणजे विरंगुळा म्हणून एखादं पुस्तक वाचायला घ्यावं, तर तिथंही अलीकडे बऱ्याच गोष्टींचे उलगडेच होत नाहीत. नवकथाकार आणि नवकवी यांना नेमकं काय म्हणायचं असतं, याचा उलगडाच होत नाही. परवा एक जाडजूड पुस्तक हातात घेतलं. त्यात बडे मोठाले आणि जाड शब्द खिरापतीप्रमाणे वाटलेले होते. ‘प्रक्रिया, व्यक्तिकेंद्रितता, शोषणयुक्त, परिमाणस्थिरता, गतिरूपात्मक अवकाशकास संबंध, संप्रेषणाचा सिद्धांत, नादरूपात्मक गुणवत्ता, वस्तुरूपाची इंद्रियगोचरता आणि कलात्मक पृथकात्मकता!! काही कळलं तुम्हाला? मलाही नाही कळलं! शेवटी डोक्याला मुंग्या यायला लागल्यावर पुस्तक बंद केलं..
कधी कधी शब्द सोपे असतात, तरी अर्थ कळत नाही; ‘जांभळी नीज, तांबडी स्वप्ने आणि पिवळे मन’ असं काही तरी सुरू झालं की माझे ‘डोळे पांढरे’ व्हायला लागतात. एकदा या ‘पिवळ्या मनानं’ मला दिवसभर सतावलं होतं. कथानकांत कुठंही ऊन पडलेलं नव्हतं. वसंत ऋतू नव्हता. मग पिवळं मन म्हणजे काय? .. शेवटी माझं मीच उत्तर शोधलं, की ‘नायकाला बहुधा कावीळ होणार असावी.’
   शाळा – मुलांच्या शाळांचं आजकालच्या आयांना असंच एक नव्यानं दडपण आलंय. त्यांना शाळेत पोचवणं-आणणं, डबा पाठवणं आणि गृहपाठ घेणं यात बाईची अर्धी शक्ती आणि हयात निघून जाते. आमच्या लहानपणी आम्ही कधी शिकलो आणि मोठे झालो, तेही आमच्या घरच्यांना कधी कळलं नाही. आम्ही नेमके कोणत्या इयत्तेत शिकत होतो, ते तरी चटकन त्यांना सांगता आलं असतं का नाही, शंकाच आहे.
..काही वेळा शाळांतून शिक्षा देतात, त्याही अशा काही भयानक असतात की त्यापेक्षा येरवडय़ाला चार दिवस सक्तमजुरी परवडली. माझा मुलगा एकदा गणिताची वही न्यायला विसरला. ‘मी गणिताची वही आणायला पुन्हा कधीही विसरणार नाही’ हे वाक्य शंभर वेळा लिहून आणण्याची शिक्षा मास्तरीण बाईंनी ठोठावली. आमचे चिरंजीव शिक्षा लिहायला विसरले. मला कसलाच पत्ता नव्हता. दुसऱ्या दिवशी १००चा आकडा ५००वर गेला. रात्री १२ पर्यंत ‘मी गणिताची वही आणायला विसरणार नाही’ या वाक्यानं एक जाड वही भरून गेली. मध्ये कंटाळा आला म्हणून त्यानं फक्त मी.. मी.. मी.. मी.. लिहिलं. मग गणिताची.. गणिताची.. गणिताची लिहून झालं. करता करता ५००चा आकडा पुरा झाला. हे सारं करताना गृहपाठ राहिला, म्हणून पुन्हा पहाटेपासून मी आणि तो बसलोच. परंतु हे सर्व जागरण आवश्यक होतं, कारण तिसऱ्या दिवशी ५००चा आकडा हजारावर गेला असता तर शिक्षा लिहायला दोन कारकून बसवावे लागले असते. मी म्हणते, अभ्यासाचा वेळ असा फुकट घालवण्यापेक्षा ‘वही आणली नाही’ म्हटल्यावर पाश्र्वभागावर दोन थपडा का नाही लगावल्या?.. आमच्या लहानपणी आम्ही शाळेत आणि घरी काही कमी शिक्षा नाही भोगल्या. चांगला मार खाल्ला आणि काही वाईट झालं नाही आमचं! पण अलीकडे ते मुलांचं ‘मानसशास्त्र’ का काय ते बोकाळलाय ना? त्यांच्या कलानं घ्यायचं म्हणे!.. बाकी ‘असो’ म्हणून गप्प बसण्याखेरीज गत्यंतरच नाही. जाऊ दे. शिक्षणशास्त्रासारख्या पवित्र क्षेत्राबद्दल अधिक अनादरानं बोलणं बरं नव्हे.
मी लहानपणी शाळेत भोगलेली एक गमतीदार शिक्षा सांगते. मी फार बडबड करायची आणि शेवटी बाई मला भिंतीजवळ उभ्या करायच्या. असं दोन-तीनदा झालं आणि बाईंच्या लक्षात आलं, की अशी शिक्षा दिली तरी ही खुशीत असते. शेवटी एक दिवस त्यांना राहवेना. त्यांनी मला  विचारलं की- ‘पेंडसे, तुला भिंतीशी उभं केलं तरी त्याचं तुला काही वाटत नाही, असं कसं?’ त्यांनी दोन-तीनदा तोच प्रश्न विचारला तेव्हा एकदा मी त्यांना सांगून टाकलं की – ‘बाई, इथे उभं राहिलं की इथून घंटेवाला दिसतो. मग खुणा करून सगळ्यांना सांगता येतं.’
या सर्वाशिवाय माझी स्वत:ची काही किरकोळ पण फालतू दडपणं आहेत.. बँकेत पैसे काढायला गेल्यावर पूर्वी मी तो पितळी बिल्ला हातात गच्च धरून ठेवायची. माझा नंबर आला किंवा पुकारा झाला तर पर्समध्ये नेमका कुठल्या कप्प्यात तो दडलाय हेच सापडायचं नाही. रेल्वेच्या डब्यात तिकीटचेकर जवळ यायला लागला की चटकन तिकीट सापडेल का नाही या कल्पनेनं मला घाम फुटायचा. घरातसुद्धा थर्मामीटर, बामची बाटली, सुई-दोरा, कात्री, टेप, लाँड्रीच्या रिसीट्स, औषधाची प्रिस्क्रिप्शन्स या गोष्टी ज्यांना चटकन् सापडायच्या त्यांच्याविषयी मला मनातल्या मनात आदर वाटायचा. आजही वाटतो. आजकाल यातली बरीचशी दडपणं माझ्या बाबतीत कमी झाली आहेत. कारण मी ती पुढच्या पिढीवर सोपवली आहेत.

Story img Loader