रजनी परांजपे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील (२३ नोव्हेंबर) लेखात पाहिल्याप्रमाणे ‘प्रयत्न करूनही मुले शिकत नाहीत,’ असा अनुभव अनेकांना येतो. ‘मुळात मुलं स्वस्थ बसत नाहीत, अभ्यासात त्यांचे लक्ष नसते’ या तक्रारी नेहमीच्याच. मुले अशी वागतात हे खरे. त्यांना स्वस्थ बसण्याची सवय लावण्यासाठी निरनिराळे उपाय करावे लागतात.
आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी त्याचा कधी विचार केलेला नसतो किंवा त्याविषयी आपल्याला माहिती नसते. आपण शिकलेले आहोत, मात्र शिक्षणापासून वंचित असणारी काही मुले आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचे आईवडील त्यांना शिकवू शकत नाहीत. आपल्याला वेळ आहे, गरज असलेली मुलेही समोर आहेत, मग आपण त्यांना शिकवायला काय हरकत आहे, असा साधासरळ विचार करून आपण उत्साहाने कामाला सुरुवात करतो. मुलेही सुरुवातीला उत्साह दाखवतात; पण तो उत्साह टिकत नाही. आपण हट्टाला पेटतो; पण मुले काही बधत नाहीत, येत नाहीत, आली तरी बसत नाहीत आणि बसली तरी शिकत नाहीत. यावर काय उपाय शोधता येईल?
त्यासाठी आपणही आत्मपरीक्षण केले पाहिजे. नियमितपणामध्ये आपणही पुष्कळदा कमी पडतो. तसेच मुलांच्या लहरीपणाकडे दुर्लक्ष करणे, त्यांना शांतपणे पण अधिकारवाणीने स्वस्थ बसवणे आपल्याला जमत नाही. अगदी स्वत:च्या मुलांच्या बाबतीतही ते न जमणारे पुष्कळ पालक असतात; पण आपली मुले ही आपली असतात. ती बारा महिने, चोवीस तास आपल्या सोबतच असतात. ती आपल्याला ओळखतात आणि आपण त्यांना ओळखतो. तरीही आजच्या जमान्यात ‘सुजाण पालक’ होण्यासाठी काही धडे आपल्याला घ्यावे लागतात, किंबहुना सर्वच पालकांनी ते घ्यावेत असेच बालमानसशास्त्रज्ञांना वाटते. मग या मुलांना समजून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न निश्चित लागणारच.
मुलांना कसे वाढवावे हे जसे शास्त्र आहे, तसेच कसे शिकवावे हेही शास्त्रच आहे. केवळ आपल्याला आवड आणि सवड आहे म्हणून आपण ते करू शकू असे आपण गृहीत धरू शकत नाही. अर्थात, त्यासाठी प्रत्येकाने कुठे तरी जाऊन धडे घेतले पाहिजेत असे मुळीच नाही. गरज आहे ती फक्त आपल्यासमोर बसलेल्या मुलांना जाणून घेण्याची. मुले शिकली तर त्यांचे भविष्य सुधारेल असे आपल्याला वाटते. त्यांना तसे वाटते का, त्यांनी ते स्वप्न पाहिलेले आहे का, हा खरा प्रश्न. आपण जी स्वप्ने बघतो ती कशावर आधारित असतात? थोडा विचार केला तर असे दिसते, की प्रत्येक स्वप्नाला अनुभवाचा भक्कम पाया लागतो.
उदाहरणार्थ, माणसाने उडण्याचे स्वप्न बघितले, कारण त्याने पक्ष्यांना उडताना पाहिले. आपल्या रोजच्या बघण्यातलीच गोष्ट. घराघरांत काम करणाऱ्या कमला, मंगला, सावित्री या साऱ्या जणी त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी धडपडताना आपण पाहतो. त्या ते स्वप्न बघतात, कारण त्या जेथे काम करतात त्या घरांतली मुले, मोठी माणसे, शिकून कशी बदलतात, कसे पैसे मिळवतात आणि कसे खर्च करतात, त्यांचे आयुष्य कसे समृद्ध होते हे सर्व बघतात. आपल्या मुलानेही तसेच शिकावे असे त्यांना ज्या तीव्रतेने वाटते तितक्या तीव्रतेने ते भंगार गोळा करणाऱ्या, डोक्यावर विटांचे ओझे वाहणाऱ्या, दगडखाणीत रात्रंदिवस दगड फोडणाऱ्या स्त्रियांना वाटत नाही. त्यांनी जे जगच पाहिलेले नसते त्याची स्वप्ने त्यांना पडत नाहीत.
या मुलांची पार्श्वभूमी निराळी, हे जसे खरे तसेच त्यांना ज्या वयात आपण शिकवायला घेऊन बसतो ते वयही निराळे. अगदी पाच-सहा वर्षांचे मूल शिकण्यासाठी आपल्यापर्यंत येत नाही. ते आठ दहा वर्षांचे किंवा थोडे मोठेच झालेले असते. त्याला शाळेत काही येत नाही. ‘त्याला गणित येत नाही, त्याला वाचता येत नाही,’ अशा त्याच्या तक्रारी येऊ लागतात तेव्हा ती आपल्यापर्यंत पोहोचतात. तोवर मुलांचे मन शिक्षणातून उडालेले असते. स्वस्थ बसणे कठीण होते. त्याला अगदीच ‘अ, आ, इ..’ शिकण्यात रस वाटत नाही. जास्तीचे काही शिकवावे म्हटले तर गाडी पहिल्या पायरीवरच अडकलेली असल्याने पुढे नेणे जमत नाही, शिकवताना ओढाताण होते. आपण त्यांच्या ‘न कळण्याची’ पातळी बघून हतबुद्ध तर होतोच, पण हतबलही होतो. मग एक वेळ अशी येते, की आपण ‘समोरच्याला शिकण्यात रस नाही’ असा शिक्का मारून आपला प्रयत्न सोडून देतो. दुसरा काही पर्याय आहे असे आपल्याला वाटत नाही.
पुष्कळदा या मुलांना शिकवावे असे आपल्याला का वाटते, याचाही आपण विचार करणे गरजेचे असते. आपण केवळ आपल्याला सवड आहे म्हणून हे काम हाती घेतले आहे, की आपल्याला खरंच या विषयाची आवड किंवा तळमळ आहे हे तपासून बघायला हवे. समाजकार्याची आवड असणे किंवा नसणे
यात कुठलाही मोठेपणा किंवा कमीपणा नाही. कारण मनापासून आवड नसताना आपण एखादी गोष्ट करायला घेतली तर आपण ती फार काळ निभावू शकत नाही.
आवड असलेली गोष्ट करण्यासाठी आपण कसेही करून वेळ काढतो. नाही तर आपल्याला वेळच नाही हे आपण आपल्यालाच पटवून देतो आणि हाती घेतलेले काम तडीस न नेता मधेच सोडून देतो. मुलांना शिकवण्याच्या बाबतीतही बरेचदा असेच होते. दुसऱ्याला शिकवायचे असेल तर शिकणाऱ्याने नियमित येणे जरुरीचे असते तसेच शिकवणाऱ्यानेही. किंबहुना, ज्या मुलांना आपण शिकवणार असतो त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता शिकवणाऱ्याने नियमित आणि वक्तशीर असणे जास्त महत्त्वाचे.
महानगरपालिकांच्या शाळांतून वर्गावर शिक्षक नसणे हे पुष्कळ वेळा घडते. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना इतर सरकारी कामे पुष्कळ. आज निवडणुका, उद्या जनगणना, परवा आणखी काही, कधी वरिष्ठांनी बोलावलेली बैठक, कधी प्रशिक्षण, असे पुष्कळ. असं म्हणतात की जनगणना, निवडणुका, ही कामे शिक्षकांनी शाळेच्या वेळात करण्याची नाहीत. ती शाळा सुटल्यावर किंवा शाळा भरण्यापूर्वी अथवा सुट्टीच्या दिवशी करावयाची आहेत. सरकारी कामांशिवायही वैयक्तिक कारणांसाठी रजेवर असल्याने किंवा शिक्षकभरतीच न झाल्यामुळे वर्गात शिक्षक नसणे हे घडतेच. अशा वेळेला मुले नियमित येतील हे कसे होणार? शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे मुले येईनाशी होण्याची शक्यताच जास्त. मुद्दा नियमितपणा आणि वक्तशीरपणाचा. स्वमर्जीने, स्वयंसेवक म्हणून काम करणारे बरेच स्वयंसेवक या बाबतीत कमी पडतात असा अनुभव आहे. मात्र त्यात नवल काहीच नाही. जे हे काम नियमितपणे आणि वक्तशीरपणे करतात त्यांचे खरोखरच कौतुक करण्यासारखे आहे.
मागच्या लेखात उदाहरण म्हणून घेतलेला स्वयंसेवकांचा गट आठवून पाहा. आठवडय़ातून ते फक्त दोन दिवस या कामासाठी जाणार हे एक. शिवाय सर्वच स्वयंसेवक प्रत्येक वेळी जाणार असे नाही. त्यांच्यातही अनेकदा अनियमितता असते. ही गोष्ट जास्तच नुकसानकारक ठरते, कारण काय शिकवायचे आणि कसे शिकवायचे याचे नियोजन किंवा कृती-कार्यक्रम नसतो. मुलांना किती येते आहे हे पूर्णपणे समजून न घेता शिकवायला सुरुवात केली जाते.
मुलांना शिस्त लावणे हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जी शिक्षा करू असे मुलांना सांगतो, ती शिक्षा म्हटल्याप्रमाणे करणे. खरे तर, हा कुणालाही शिस्त लावण्यासाठी आवश्यक नियम. वाहतुकीचे नियम मोडले तर अमुक-अमुक करू, असे आपण म्हणतो; पण प्रत्यक्षात तसे करत नाही. मग कोण कशाला नियम पाळणार? मुलांचे तसेच असते. न रागावता पण न चुकता घातलेले नियम पाळले जातील हे बघितलेच पाहिजे.
मुले आपल्याला वाटते त्यापेक्षा बरीच चलाख असतात. कोणाचे ऐकायचे आणि कोणाचे नाही ते त्यांना बरोबर कळते. पुष्कळदा मुलांची शिकण्याची गती आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते. कदाचित आपण त्यांच्याकडून फारच अपेक्षा करत नाही ना याचा विचार करणेही गरजेचे असते.
निरनिराळ्या ठिकाणी जे स्वयंसेवक असे काम करताहेत त्यांचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा म्हणून त्यांना एकत्र आणावे, आपल्या अनुभवाचा त्यांना कसा उपयोग होईल हे पाहावे, इत्यादीचा बारकाईने विचार करून त्याची एक पद्धत शोधून काढण्याची आज आम्हाला खूप गरज आहे, हेच खरे.
rajani@doorstepschool.org
chaturang@expressindia.com