मुग्धा गोडबोले

 ‘भय ही सर्वाचीच सर्वात नावडती भावना आहे. अनेकांना ‘मला भीती वाटते’ हे उघडपणे सांगण्याचीही लाज वाटते. मला असलेल्या ‘क्लॉस्ट्रोफोबिया’मुळे लिफ्टनं जाणं मी टाळते, इतकी की तीस, चाळीस मजलेसुद्धा चढत जाते. पूर्वी मी हे कुणालाही सांगत नसे, परंतु नंतर लक्षात आलं, की ज्या अनेक गोष्टींनी आपलं व्यक्तिमत्त्व घडतं, त्यातली ती एक गोष्ट आहे. तिचा सहज स्वीकार व्हायला हवा. थोडा विचार करायला हवा, लोकांना हॉरर चित्रपट पाहायला का आवडतात? भयाला अंत:प्रेरणा का मानलं जात असावं?  का महत्त्वाचं आहे, डरना जरूरी हैं!’

Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Israel Hamas war marathi news
विश्लेषण: इस्रायल आणि हमासला खरोखर युद्ध थांबवायचे आहे का? कोणताच तोडगा का निघू शकत नाही?
y chromosomes men wiped out
जगातून पुरुष कायमचे नष्ट होणार? Y गुणसूत्र नामशेष होण्याच्या मार्गावर; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा
If we want to end rape from the root we have to finish male power
पुरुषसत्तेला ‘फाशी’ द्या…
What Supriya Sule Said About Badlapur Crime
Badlapur Crime : “भर चौकात नराधमांना फाशी देत नाही तोपर्यंत..”, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
crop damage by snail attack
Snails Damage Crops : शंखी गोगलगायींचापिकांवरील प्रादुर्भाव
Loksatta kutuhal A revolution in robotics Japan
कुतूहल: यंत्रमानवशास्त्रातील क्रांती

एक मुलगी होती. तिचं नाव होतं, भीती. अपुरी माहिती आणि कमकुवत मन यांचं ते अपत्य. भीती जेव्हा लहान होती तेव्हा तिचंसुद्धा इतरांसारखं कौतुक व्हायचं. ‘वाघोबा कसं करतो. खाऊऊऊऊ..’ असं म्हणून ती डोळे मोठे करायची, तेव्हा लोकांना फार मौज वाटायची. पुढे भीती मोठी व्हायला लागली. हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं, की आपल्यात कोणतीतरी वेगळीच शक्ती आहे. काही लोकांना आपण नको आहोत, तसे काहींना आपण हवेही आहोत. आपण जरा आवाज वाढवला, की लोक आपलं ऐकतात. लोकांच्या मनावर आपला जबरदस्त पगडा असतो. आपला शस्त्र म्हणून ते वापर करतात, लोकांवर अधिकार गाजवायला आपल्याला पुढे करतात. आपल्या मदतीनं मोठे मोठे लोक राज्यबिज्यही करतात. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ सारखाच ‘भीतीचा वापर करा आणि राज्य करा,’ हाही एक सर्वमान्य प्रकार आहे. आपण एकूण फारच कामाची चीज आहोत. प्रेम ही जगातली सगळय़ात महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे हे झूठ आहे, भीती हीच जगातली सगळय़ांत महत्त्वाची आणि निर्णायक गोष्ट आहे, हे आपण सिद्ध करून दाखवलं आहे.. आणि अशा रितीनं आता ही भीती ‘जगाची राणी’ म्हणून विराजमान झालेली आहे. तिनं संपूर्ण जगाला आपल्या अंमलाखाली ठेवलेलं आहे. बॉम्बस्फोटांपासून जैविक शस्त्रांपर्यंत कशाहीमुळे आपला जीव जाऊ शकेल, या विचारानं माणसं कायमची धास्तावलेली असतात. आणि या भीतीमुळे आपलं आयुष्य,आपले निर्णय, छोटय़ा छोटय़ा बाबतीतलं आपलं स्वातंत्र्य, सगळय़ाशी तडजोडी करत राहतात.  

हेही वाचा >>> मुलांना हवेत आई आणि बाबा!

ही झाली एकूण मानवजातीलाच असलेली भीती. पण मुळात ‘भय’ ही माणसाची एक अत्यंत मूलभूत भावना आहे आणि एका अभ्यासानुसार सर्वात नावडती भावना आहे. राग, चिडचिड, भांडणं यातही रमणारी अनेक माणसं असतात. त्यातही त्यांना काहीतरी समाधान मिळतं. ‘मी कशी जिरवली’, ‘मी कसा स्पष्ट बोललो,’ यातही कुठेतरी स्वत:विषयीचा अभिमान वाटलेला असतो. पण घाबरायला कुणालाच आवडत नाही. कारण त्यात हतबलता असते. कुणीतरी आपल्याला पूर्णपणे काबूत ठेवलेलं असतं. भीती माणसाला मागे खेचते, भीती धाडस करू देत नाही, पाऊल पुढे टाकू देत नाही, जिंकू देत नाही, स्वत:च्या मर्यादा ओलांडून पुढे जाऊ देत नाही, बंधनात अडकवते, माणसाची वाढ खुंटवते.. आणि म्हणून भीती मनातून नष्टच झाली पाहिजे.. ‘कसं जगावं’ हे शिकवणारे असं सतत सांगत असतात. हे शंभर टक्के बरोबर आहे, पण तरीही आपल्या सर्वसामान्य दैनंदिन जगण्यात आपल्या मनात असंख्य गोष्टींबाबतचं भय असतंच. आणि ते असतं म्हणून आपण जसे जगतो तसे जगतो. ही भीती आपल्याला काही प्रमाणात विवेकी वागायला भाग पाडत असते. मग तरीही, ही जी इतकी नैसर्गिक मानवी भावना आहे, ती कटाक्षानं नाकारली का जाते? इतर भावनांसारखं तिच्याकडे प्रांजळपणे का नाही बघता येत? ‘मला भीती वाटते’ हे उघडपणे म्हणण्याची लाज का वाटते?

मला ओळखणाऱ्या बऱ्याच लोकांना हे माहीत आहे, की मला बंद जागांची भीती वाटते. याला ‘क्लॉस्ट्रोफोबिया’ असं म्हणतात. लिफ्टनं जाणं मी टाळते. त्याचा इतका प्रचंड पगडा माझ्या मनावर आहे, की अनेकदा तीस,चाळीस मजलेसुद्धा चढत जाते. एक काळ असा होता, जेव्हा मला हे कुणालाही सांगायचीसुद्धा लाज वाटायची. पण मग हळूहळू मी त्यातली लाज बाजूला ठेवली. एरवी मी जगभर एकटी फिरू शकणारी बाई आहे. पण मी लिफ्टमध्ये अडकले तर माझं काय होईल, या विचाराचीच मला खूप भीती वाटते, हे मी उघडपणे मान्य करू लागले. त्यावर उपाय म्हणून मी तज्ज्ञ माणसांकडे जाऊन थेरपीही घेण्याचा प्रयत्न केला आणि मुख्य म्हणजे या निमित्तानं मी ‘भीती’ या गोष्टीचा थोडा अभ्यास करू लागले त्या वेळी माझ्या हाताला लागलं, गॅव्हीन डे बेकर यांचं जगप्रसिद्ध पुस्तक, ‘द गिफ्ट ऑफ फिअर’.

भीती हे निसर्गानं माणसाला बहाल केलेलं एक फार मोठं शस्त्र किंवा ढाल आहे. माणसाच्या मनातली चोवीस तास कार्यरत असलेली ती एक अद्भुत संरक्षण यंत्रणा आहे. पण इतर अनेक समाजमान्य, ‘चांगल्या’ समजल्या जाणाऱ्या भावनांमुळे आपण भीती दडपतो. ती वाईट आहे, निष्कारण आहे, निरुपयोगी आहे, असं म्हणून आपण तिला आपल्या मेंदूच्या सॉफ्टवेअरमधून काढून टाकायलाच धडपडत असतो. अनेकदा ज्याला आपण भय समजतो, ती अंत:प्रेरणा किंवा ‘इन्स्टिक्ट’ असतं. कधी कधी ही अंत:प्रेरणा ओरडून काहीतरी सांगते. आपण तिच्याकडे दुर्लक्ष करून, तिला ओलांडून पुढे जातो, कारण आपल्याला जे वाटतंय ती एक ‘निष्कारण भीती’ आहे, अशी आपण स्वत:चीच समजूत घालतो. या पुस्तकातलं एक उदाहरण द्यायचं झालं, तर अपहरण झालेल्या बहुतेक मुलींनी नंतर असं सांगितलं, की ‘त्या क्षणी मला असं वाटून गेलं होतं, की या अनोळखी माणसाला मदत करू नये. पण आपण अडल्यानडल्याला मदत करणं हा गुण मानतो, म्हणून मी ती करायला गेले आणि त्यानं माझ्यावर हल्ला केला.’ थोडक्यात, भीतीकडे गांभीर्यानं पाहिलं, तर कदाचित पुढच्या संकटापासून वाचणं शक्य असतं. योग्य वेळी वाटलेल्या भीतीमुळे खूप मोठे अपघात टळू शकतात. कडय़ाच्या टोकाला उभं राहून सेल्फी काढणं, पोहता येत नसताना खोल पाण्यात जाणं, हेल्मेट न घालता प्रचंड वेगानं बाइक चालवणं, यात काहीही शौर्य नाहीये, यहाँ डरना जरूरी हैं! तरच आपला जीव वाचणार असतो.

 भयाची चेष्टा करणं कमी झालं, घाबरणाऱ्या माणसाकडे थोडं आपुलकीनं पाहिलं गेलं, तर कदाचित त्याला उघडपणे त्याच्या भीतीबद्दल बोलण्याचं ‘धाडस’ करता  येईल. एखादं लहान मूल ‘अगदी घाबरत नाही’ म्हणून त्याला नको इतकं डोक्यावर बसवायचं आणि दुसरं ‘घाबरटच आहे बाई’ असं म्हणून त्याला सतत हिणवायचं, यात खरं तर नुकसान दोघांचं असतं. अविवेकी धाडसापेक्षा सावध करणारी भीती परवडली.

 भय कशाकशाचं असतं? अपयशाचं, अपमानाचं, नुकसानाचं, नकाराचं. थोडक्यात, इथून पुढचं आपलं आयुष्य मनासारखं नसेल याचं. अर्थातच भीती भविष्यकालीन असते. तिचा विचार किंवा कल्पना वास्तवापेक्षा जास्त घाबरवणारी असते. पण असा प्रसंग प्रत्यक्ष आल्यावर आपण अजिबात विचार करत बसत नाही. तेव्हा ‘फाइट, फ्लाइट ऑर फ्रीज,’ म्हणजे लढणं, पळून जाणं किंवा गारठून एका जागी उभं राहणं या तीन प्रतिक्षिप्त क्रिया होतात, यांपैकी कुठलीतरी एक आपण तत्क्षणी निवडतो. आणि मनुष्यप्राण्याला आपला जीव प्यारा असल्यामुळे बहुतेक वेळा तो लढतो किंवा पळून जातो.

जगभर जेवढय़ा रोमँटिक, अ‍ॅक्शन आणि कॉमेडी फिल्म्स तयार होतात, तेवढय़ाच हॉरर फिल्म्ससुद्धा तयार केल्या जातात आणि बघितल्याही जातात. हे असे सिनेमे बघून मुद्दाम भीती का वाटून घेत असतील लोक? यामागचं शास्त्रीय कारण असं आहे, की भीती निर्माण करणारा चित्रपट पाहिला की आपल्या मेंदूमधली अशी काही संप्रेरकं काम करायला लागतात, ज्यामुळे मेंदू ताजातवाना होतो. ‘जागा’ होतो. ‘आपण स्वत:च एक भीतीदायक परिस्थिती धैर्याने हाताळली,’ असं वाटून आपल्या सबकॉन्शिअस माइंडला किंवा अवचेतन मनाला काहीतरी मोठं यश मिळवल्याचा आनंद मिळतो. नियंत्रित परिस्थितीमध्ये भीतीचे चित्रपट पाहून माणसाला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो, असं अभ्यास सांगतो. थोडक्यात काय.. राग, लोभ, प्रेम यांच्याइतकीच भीतीसुद्धा महत्त्वाची आहे.  

सध्या ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’ची जागा ‘ऑनेस्ट थिंकिंग’नं घेतलीय. सतत सकारात्मक विचारच केला पाहिजे, ही अपेक्षाच अवास्तव आहे. सतत आनंदात नसतो आपण. तसेच सतत बेधडक, बिनधास्तसुद्धा नसतो आपण. त्या त्या वेळी ती ती भावना जोखावी, आयुष्यातलं तिचं महत्त्व मान्य करावं, ती व्यक्त करावीशी वाटली तर करावी आणि त्या भावनेचा पूर्ण निचरा होऊ द्यावा. अर्थात यात कुठलीही समाजविघातक भावना नसेल हे गृहीत धरलेलं आहे. जो माणूस समाधानानं एकटा जगू शकतो तो जगातला सगळय़ांत सामथ्र्यवान माणूस असतो, असं म्हणतात. कारण तो भावनिकदृष्टय़ा स्वतंत्र असतो, त्याला कुणी त्याच्यापासून दूर जाण्याची भीती नसते. तो मनातल्या भुतांना दूर ठेवू शकतो. अंधारात एकटं असण्याची भीती नसते.

ही सगळी शाब्दिक हुशारी दाखवूनही मी पुढच्या वेळी पंचवीसाव्या मजल्यावर लिफ्टनं जाईन का, याची मला खात्री नाहीच. लिफ्टमध्ये चढताना ऐनवेळी माझे हातपाय गार पडून मी मुकाटय़ानं पायऱ्या चढत जाईनही कदाचित. पण माझ्या मनातलं भय हा माझा दुबळेपणा आहे असं मला वाटत नाही. ज्या शेकडो गोष्टींनी माझं स्वत:चं असं एक व्यक्तिमत्त्व विकसित झालं आहे त्यातली ती एक गोष्ट आहे. तेव्हा तिची लाज न बाळगता ती स्वीकारायला हवी, आणि ती जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवायला हवेत. भय इथले संपत नाही.. मग निदान सध्याच्या भाषेत सांगायचं तर ते ‘नॉर्मलाईज’ करूया. त्याला थोडं प्रकाशात आणूया. त्याची कारणं डोळसपणे जाणून घेऊया. तरच ते जिंकण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकू शकू. कारण शेवटी. डरके आगे जीत हैं,च!

  godbolemugdha2@gmail.com