कोहळा म्हटले की पेठा आठवतो. उन्हाळ्यातले विकार, मूत्रमार्गाचे विकार यावर कोहळा उपयुक्त आहे. शरीराची प्रतिकारशक्ती आणि ताकद वाढवायला कोहळ्याचा उपयोग होतो. तरीही भाजी म्हणून कोहळ्याचा उपयोग क्वचितच केला जातो.
कोहळ्याचा पॅनकेक
साहित्य:
एक वाटी कोहळ्याचा कीस, अर्धी वाटी तांदळाचे पीठ, प्रत्येकी एक मोठा चमचा रवा, बेसन, दही आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, पाव वाटी बारीक चिरलेला गूळ, चवीला मीठ, पाव चमचा इनोज फ्रूट सॉल्ट, तेल.
कृती:
तेल आणि इनोज सोडून बाकी सर्व जिन्नस एकत्र करावे. लागेल तसे पाणी घालून पीठ तयार करावे, इनोज मिसळावे आणि तव्यावर तेल सोडून पॅनकेक करावे.
कोहळ्याचे सांबार
साहित्य:
दोन वाटय़ा कोहळ्याच्या फोडी, प्रत्येकी पाव वाटी भिजलेले शेंगदाणे, चण्याची डाळ आणि काजू, एक मोठा चमचा बेसन, चवीला मीठ, तिखट, चिंचेचा कोळ आणि गूळ, एक चमचा गोडा मसाला, फोडणीसाठी १ मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता.
कृती:
कोहळा, शेंगदाणे, काजू कुकरमध्ये शिजवून घ्यावे. तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्ता, शिजलेले दाणे, कोहळा, मीठ, तिखट, चिंच, गूळ, मसाला आणि बेसन पाण्यात कालवून घालावे, लागेल तसे पाणी घालावे आणि सांबार उकळू द्यावे.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com

Story img Loader