जगातल्या अवकाशवीरांचं मला खूप कौतुक वाटतं. जिथं आत्तापर्यंत कोणीही गेलेलं नाही अशा ठिकाणी जाण्याची आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ते अतिशय कठीण असं प्रशिक्षण घेतात. त्यांची ही इच्छा एवढी जबरदस्त असते की, त्यासाठी ते आपल्या इतर सर्व आवडीनिवडी बाजूला ठेवतात. बाहेरच्या अवकाशात काही काळ राहता यावं आणि ताऱ्यांच्या समुद्रात सुटी तरंगत असलेली पृथ्वी पाहायला मिळावी या एकाच वेडाने झपाटलेले हे अवकाशवीर कुठलीही नवीन कौशल्यं आत्मसात करायला आणि इतर किती तरी गोष्टींपासून वंचित राहायला तयार असतात.
खोल समाधीच्या अवस्थेत पूर्णचंद्राप्रमाणे चमकत असलेल्या आत्म्यापर्यंत पोहोचण्यासाठीदेखील अशाच प्रकारच्या प्रशिक्षणाची आणि त्यागाची आवश्यकता असते. आणि इथंदेखील इच्छाशक्ती हेच रहस्य असतं. आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षांची शक्ती जर आपल्याला तिथं पोहोचण्यापासून रोखू शकत असली तर तीच शक्ती मोकळी करून आपल्या कामाला जुंपली तर उच्च अशा समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी ती इंधनसारखं काम करील.
याचा वापर करण्यासाठी आपल्याला आपल्यालाही बूस्टर रॉकेटची गरज पडणार आहे, आणि सर्व धर्मातील संत-माहात्म्यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित असे बूस्टर्स पुरवलेले आहेत. इंग्लिशमध्ये त्याला डिटॅचमेंट असं म्हणतात. याचाच अर्थ आहे निर्ममत्व- कमी महत्त्वाच्या गोष्टींवरून आपली वासना काढून घेण्याची कला, त्या वासना आपोआप गळून पडतील असे बदल आपल्या मनात करणं. म्हणजे मग माणूस पोहोचू शकतो अशा सर्वात अधिक उंचीवर जाण्यासाठी लागणाऱ्या शक्तीची गरज या वाचलेल्या शक्तीमधून भागू शकेल.
या सर्व गोष्टींचा व्यावहारिक मथितार्थ फारसा आश्वासक वाटत नाही हे मी मान्य करतो. अहंकाराशिवाय जगणं म्हणजे विस्मृतीकडे जाणं असंही काही जणांना वाटेल, पण प्रत्यक्षात मात्र तो रस्ता प्रेमाकडे, चैतन्याकडे आणि निरंतर अशा आनंदाकडे जाणारा आहे.
महात्मा गांधींना एकदा एका पाश्चिमात्य वार्ताहराने विचारलं होतं, ‘‘तुमच्या जीवनाचं रहस्य तुम्ही मला तीन शब्दांत सांगू शकाल?’’ आपल्याला माहीतच आहे की गांधींना अशा आव्हानांना तोंड देण्यात खूपच मजा येत असे. ‘‘तीन शब्दांत?’’ ते उत्तरले, ‘‘सांगतो की.  रिनाऊन्स अ‍ॅण्ड एन्जॉय- सर्वसंगपरित्याग करा आणि मग जीवनाचा आनंद लुटा.’’
त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, जर तुम्हाला खरोखरच जीवनाची मजा लुटायची असेल तर तुम्ही स्वत:च्या वैयक्तिक सुखासाठी ज्या काही मागण्या जीवनाकडे करता त्या सगळ्या सोडून द्या. इतर लोकांनी तुमच्या मनाप्रमाणे वागावं आणि परिस्थितीही सदैव तुम्हाला अनुकूल अशी राहावी असा आग्रह सोडून द्या. आपल्या वैयक्तिक आनंदासाठी आणि फायद्यासाठी असलेल्या इच्छा-आकांक्षा सोडून द्यायला शिका. यासारखं क्षुद्र समाधान हे चवली-पावलीसारखं असतं किंवा माझी एक लहान मैत्रीण ज्युलिया म्हणायची त्याप्रमाणे त्याला एका लाकडी नया पैशाएवढीच किंमत असते. त्यामुळे असे छोटे छोटे आनंद सोडून द्यायला जेव्हा आपण शिकतो तेव्हाच आपल्या अंतरंगात खोलवर असलेला, एखाद्या विश्वस्त निधीप्रमाणे जपलेला कोटींचा ठेवा आपल्याला मिळू शकतो.
निर्ममत्वामुळे नुसता आनंद मिळतो असं नाही. चांगल्या आरोग्याचंही तेच रहस्य आहे. जगातला तो सर्वात चांगला तसा वैद्यकीय विमा आहे. आपल्या चैतन्यावर घाला घालणाऱ्या वाईट सवयी त्यामुळे दूर राहतात म्हणून केवळ मी असं म्हणतोय असं नाही. बहुतेक आजारपणाच्या मुळाशी लक्षणीय अशी मानसिक कारणं असतात. कोणत्याही रोगात शरीरावर केलेले वैद्यकीय उपचार तर महत्त्वाचे आहेतच; परंतु मला आशा आहे की, माझ्या डॉक्टर मित्रांच्या मदतीने मी वैद्यकीयदृष्टय़ा हे दाखवून देईन की, शांत, निश्चिंत मन आणि अत्यंत प्रेममय हृदय यामुळे पुनरारोग्य देणारा चैतन्याचा झरा खळाळू लागतो आणि शरीराला उभारी येते. अनेक वर्षांच्या भावनिक असंतुलनानंतरही आपली ताकद परत मिळवता येते.
ममता म्हणजे भावनिक गुंतवणूक, आणि या गुंतवणुकीमुळे आपल्या चैतन्यशक्तीवर आणि पर्यायाने प्रकृतीवर अत्यंत विपरीत परिणाम होतात. आपल्या अलिप्ततेची परीक्षा तुम्ही एका साध्या चाचणीने घेऊ शकता. स्वत:कडे एक नजर टाका आणि तुम्हाला समजेल की किती सहजपणे तुम्ही वस्तूंमध्ये, अगदी गळ्यापर्यंत गुंतत जाता.
उदाहरणार्थ, कठोर परिश्रम करणारे बहुतेक लोक- म्हणजे या देशातील जवळजवळ सगळेच स्त्री-पुरुष पायात विनाकारण घोटाळत भुंकणाऱ्या कुत्र्याप्रमाणे, जरूर नसताना त्यांचं कार्यालयातील काम घरी आणतात. जेवणाच्या टेबलवर बसल्यावरही त्यांच्या डोक्यात त्यांच्या जबाबदाऱ्या आणि हातातलं काम दिलेल्या वेळेत पूर्ण होतंय की नाही याबद्दलची काळजी घोळत असते. झोपतानाही ही माणसं या सगळ्या चिंता मनात ठेवूनच झोपतात आणि वेळेवर देता न आलेल्या अहवालांबद्दल आकडेवारीबद्दल, उत्तर न आलेल्या एखाद्या पत्राबद्दल काळजी करीत राहतात. कामाचं असंच असतं. याउलट अलिप्ततेमुळे अशी क्षमता प्राप्त होते. आपण कामावर संपूर्ण लक्ष एकाग्र करू शकतो आणि कार्यालयाच्या दाराच्या बाहेर पडलो की त्याबद्दल सगळं काही संपूर्णपणे विसरून जाऊ शकतो.
अलिप्त वृत्तीच्या कामगारावर आपण अधिक विश्वास टाकू शकतो, तो अधिक आनंदी आणि मनमिळाऊ असतो आणि अशा तऱ्हेने संध्याकाळी घरी येताना जेव्हा तुम्ही सगळं काम कार्यालयातच सोडून येऊ लागता त्यामुळे घरी आल्यावर आपल्या परिवाराला आणि मित्रांना तुमचं प्रेम देण्यासाठी तुमच्याजवळ भरपूर वेळ असतो.
कृपया माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावू नका! ऐहिक गोष्टी आपल्याजवळ असणं किंवा अगदी पैसा मिळवणंसुद्धा चुकीचं आहे असं अजिबात नाही. पण त्यासाठी आपल्या आयुष्याची किंमत मोजू नका. पण अलिप्तता नसेल तर आपण अशा गोष्टींची व्यवस्थित मजाही लुटू शकत नाही आणि त्या शहाणपणाने वापरूही शकत नाही. मी गरिबीची बाजू घेतोय असं नाही, तर साधेपणाची स्तुती करतोय. मी जर ई.एफ. शूमाकरप्रमाणे पुस्तक लिहिलं असतं तर त्याला नाव दिलं असतं, ‘साधेपणा हेच सौंदर्य’ आपल्या मालकीच्या कमीत कमी वस्तूंसह, माफक प्रमाणात आरामदायी असं साधं आयुष्य जगण्याला, जगण्याच्या कलेमध्ये फार उच्च स्थान आहे. प्रेम करणं, मदत करणं, सेवा करणं आणि काही तरी देणं यांसारख्या जीवनाचं मोल वाढवणाऱ्या गोष्टींसाठी आवश्यक असलेला वेळ, मनाची मुक्तता आणि साधनसंपत्ती या गोष्टींचा त्यामुळे आपल्याला लाभ होतो.
इंग्लिशमधला डिटॅचमेंट हा शब्द नाकर्ता, निष्ठुर आणि भावनाहीन असा वाटतो. पण प्रत्यक्षात मात्र त्याचा अर्थ बरोबर उलट आहे आणि तो कसा, ते आपण त्याचा वापर वैयक्तिक संबंधात करतो तेव्हा चांगलं दिसून येतं.
निर्ममता अंगी बाणवण्याचा तुम्ही जेव्हा सतत प्रयत्न करीत राहता- घरी, कामावर, मित्रांबरोबर असताना, आणि विशेषत: ज्या लोकांबरोबर जमवून घेणं तुम्हाला कठीण जातंय अशा लोकांबरोबर असताना – तेव्हा तुम्हाला समजून येईल की त्यामुळे आपल्या संबंधांत केवढी सुरक्षिततेची भावना निर्माण होते आहे. आध्यात्मिकदृष्टय़ा अलिप्त झालेला मनुष्य हा माझ्या दृष्टीने सर्वात प्रेमळ मनुष्य असतो. असा माणूस आपल्या मनाच्या चुकीच्या प्रेरणेला आणि प्रतिसादाला अनुसरून संबंध बिघडू देत नाही. याची चाचणी साधी आहे : तुम्ही माझ्यावर रागावलेले असतानादेखील मी शांत राहून तुमच्याशी प्रेमाने वागू शकतो का आणि तुमचा राग कमी व्हावा म्हणून तुम्हाला मदत करू शकतो का? तुम्हाला जरी मी आवडत नसलो तरी तुम्ही मला आवडतच राहावं असा प्रयत्न मी करू शकतो का? कारण जेव्हा मी तुम्हाला सातत्याने आवडत नसतो तेव्हाच प्रामाणिकपणा म्हणजे काय हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी तुमच्याशी प्रामाणिक राहण्याची अधिक गरज असते.
हल्ली सगळीकडेच आढळून येणारा माणसं न आवडण्याचा प्रश्न हा खरं म्हणजे आपण आपल्या मनात त्यांच्या ज्या प्रतिमा तयार केलेल्या असतात त्या न आवडणं असा असतो. या गोष्टीचा परिणाम त्यांच्यावर होण्यापेक्षा आपल्यावरच अधिक होत असतो. कारण बहुतेक मानवी संबंधात ती माणसं कशी आहेत, यापेक्षा आपल्याला ती कशी दिसतात, कशी वाटतात, याला आपण अधिक महत्त्व देतो. मात्र, आपल्याला जशी वागणूक मिळते आहे तशाच पद्धतीने आपण वागू नये ही शिकवण निर्ममतेमुळे आपल्याला मिळते. मानवी संबंधांतील प्रश्न सोडवण्याचा हा सर्वात सुलभ आणि सर्वात परिणामकारक असा मार्ग आहे.
बक् मिन्स्टर फुलरचं एक चांगलं सूत्र एकदा माझ्या वाचनात आलं होतं. तो मार्मिकपणे म्हणतो, ‘आपण नामं नसून क्रियापदं आहोत’. जे लोक इतरांविषयी स्वत:च्या मनात पक्क्या प्रतिमा तयार करून ठेवतात ते स्वत:ला आणि इतरांना नामं किंवा वस्तू समजतात. जे इतरांच्या जवळ जाण्याचा, त्यांना समजून घेण्याचा आणि त्यांचं कौतुक करण्याचा सतत प्रयत्न करतात ते क्रियापदं असतात : कार्यक्षम, निर्मितिक्षम आणि चैतन्यमय आणि जरुरीप्रमाणे स्वत: बदलण्याची आणि ज्या जगात ते राहताहेत ते जग बदलवण्याची क्षमता असलेले असे ते असतात.
( मेहता पब्लिशिंग हाउसच्या ‘मनावर विजय’ या पुस्तकातील वैशाली जोशी यांनी केलेला हा अनुवादित भाग, साभार)

International Space Center vidarbh Maharashtra
आज सायंकाळी अंतराळातील आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र डोळ्यांनी पाहता येणार….शुक्र, शनी, गुरुजवळ….
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता
Elon Musk interferes in politics around the world
अमेरिकेपाठोपाठ जर्मनी, ब्रिटनच्या राजकारणातही इलॉन मस्कची लुडबूड? युरोपला उजव्या वळणावर नेण्याची योजना?
Aviation students career
निवडणूक होताच सरकारला आश्वासनाचा विसर…वैमानिक प्रशिक्षणार्थींसमोर मोठे संकट…
Ramkal Path project begins work for Simhastha Kumbh Mela nashik news
रामकाल पथ प्रकल्पाने सिंहस्थ कामांची सुरुवात; नाशिक महापालिकेला ६५ कोटींचा निधी प्राप्त
Story img Loader