उत्तराखंडमध्ये आलेल्या पुराने तबाही माजवली आणि हजारो लोकांचे प्राण गेले.. पण या निसर्ग संहारातही दर्शन घडलं ते माणुसकीचं.. पुष्पा चौहान आणि तिच्या गणेशपूर या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन आठ दिवस रोज ९०० ते १००० लोकांना जेवण घालण्याचं पुण्यकर्म केलंय.. पुष्पाच्या या समजूतदार गावाची ही कहाणी..
पंधरा  जूनची ती रात्र.. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात मग्न असलेला.. चारधामच्या तीर्थयात्रेसाठी, गंगोत्रीच्या दर्शनासाठी निघालेले काही जण परमेश्वराचं नामस्मरण करत मार्गक्रमणा करताहेत.. पावसाचं वेळेवर आगमन झालेलं म्हणून सगळे खुशीत असतानाच त्याने मात्र अक्राळविक्राळ रूप दाखवायला सुरुवात केलेली.. त्याचा सुखद गारवा अनुभवत असतानाच त्याची दाहकता जाणवायला लागली.. त्या रात्री अचानक प्रचंड विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाचा वारा सुरू झाला.. उत्तराखंडमधली पुष्पा चौहान आपल्या गावातल्या घरात निसर्गाचं हे रुद्र रूप अनुभवत सचिंत बसलेली.. डोळ्यासमोर येत होता तो गेल्याच वर्षी गंगेला आलेल्या पुराने तिचा वाहून नेलेला फोटो स्टुडियो.. मोठय़ा मेहनतीने स्वत:च्या पायावर उभं राहून तिने हा स्टुडियो उभा केला होता.. इतकं नुकसान झालं की अजून तो स्टुडियो उभारायची हिंमत तिच्यात नाही. पण तिने हार मानलेली नाही.. फ्रीलान्सिंग करत तिने आपला सन्मान राखलाय.. पण त्या पावसाने इतकी तबाही केली.. आजचा हा पाऊस काही विपरीत घडवणार नाही ना याची तिला काळजी लागून राहिलेली.. इतक्यात वीज गायब झाली.. भयाण काळोखाची ती रात्र वैऱ्याची वाटत होती.. प्रत्येक जण जीव मुठीत घेऊन बसलेला.. आपलं काय होईल.. आपल्या कुटुंबाचं काय होईल.. हळूहळू एकेक बातमी येऊ लागली.. ढगफुटीची बातमी कळली आणि सोबत केदारनाथ मंदिर परिसरातील संहाराची.. तिचं गाव तसं तिथून खूप लांब. ती गणेशपूरची. उत्तर काशी परिसरातली.. गंगोत्रीचं दर्शन घेणारे यात्रिक तिच्या गावातून जाणारे..
१५-१६-१७ जुलै. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता.. सुदैवाने तिचं गाव या वादळाच्या तडाख्यातून वाचलं होतं.. शेतीपण शाबूत होती.. पण तिच्या आसपासची गावं विशेषत: गावांना जोडणारे पूल वाहून गेले होते.. एक एक रास्ते बाढ की चपेट में आ रहे थे.. तिच्या गावाच्या पलीकडचं एक गाव डिपसरी.. भागीरथीला  उधाण आलेलं.. इतकं की डिपसरीतल्या लोकांची शेती तर वाहून गेलीच, पण घरंही कोसळू लागलेली.. १७ तारखेला पुष्पाला काही घरात स्वस्थ बसवेना.. डिपसरीला जायचंच.. तिने ठाम निर्णय घेतला.. सोबतीला गावातले आणखी तीन जण.. किनाऱ्यावरून पाहिलं तर गावाला जोडणारा पूल वाहून गेलेला.. त्या गावात जायचा निश्चय तर केलेला.. त्यांनी जंगलचा रस्ता पकडला.. ट्रेकर ज्या वाटेने जातात तो.. साडेचार किलोमीटरचा रस्ता पार करत ती गावात पोहोचली.. अक्षरश: दुरवस्था होती.. पावसाने कहर केला होता.. गंगोत्रीकडे जाणारे आणि गंगोत्रीहून येणारे हजार एक यात्रेकरू मध्येच अडकलेले.. प्रौढ पुरुष, स्त्रिया त्यांची लहान लहान मुलं.. आणि वृद्धही.. ज्यांना पहाड चढणं शक्य नव्हतं.. ते शासनाच्या मदतीच्या अपेक्षेत बसलेले..  त्यांच्या आसऱ्याचं, त्यांच्या खाण्यापिण्याचं काय.. कुणी तरी त्यांना सांगितलेलं हेलिकॉप्टर येईल तुम्हाला घ्यायला.. त्याच्या आवाजाची प्रतीक्षा लागलेली..  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या सेवाआश्रमातर्फे गावातल्याच शाळेत तात्पुरती खाण्याची सोय केली होती.. आधीचे दोन दिवस यात्रेकरूंनी सोबत आणलेली बिस्किटं आणि इतर काही खाण्यात घालवली.. पुष्पा आणि तिचे साथीदारही भुकेलेले.. पण पर्याय नव्हता. नुसतं बघत राहण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हतं.. ती पुन्हा त्याच कच्च्या रस्त्याने जिवाची बाजी लावत गावात परतली..
गावात पोहोचायला रात्रीचे १० वाजलेले.. रस्त्यातच तिची आणि तिच्या साथीदारांची बोलणी झाली आणि त्यांनी प्रत्येकाचं घर ठोठवायला सुरुवात केली.. पुराच्या तबाहीची कहाणी सांगायला सुरुवात केली.. सगळं जगणं शेतीवर अवलंबून असल्याने प्रत्येकाच्या घरात अन्नधान्याचा मुबलक साठा होता.. प्रत्येकाने शक्य तेवढा आटा-चावल-सब्जी इथे इथे जमा करावी, ज्यांना रोख रक्कम द्यायची त्यांनी यांच्या जवळ द्यावी.. गावातल्या प्रत्येक घरातल्या एका तरी व्यक्तीने आमच्या मदतीसाठी यायचंच.. तिने ताकीदच दिली.. २१५ कुटुंबांच्या त्या समजूतदार गावानं तिचं म्हणणं ऐकलं.. बघता बघता ढाई िक्वटल गेहू का आटा आणि १ क्िंवटल आलू जमा हो गये.. गावात शेतीबरोबर भाजीपण पिकत होती.. त्यामुळे हिरवी भाजीपण मिळाली.. आता प्रश्न होता तो तेल-मसाला-मिठाचा. पण गावातल्याच काही दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे तर काहींनी उधारीवर तेही दिलं.. या गावाची एक गोष्ट चांगली, गावात कोणताही कार्यक्रम असो सारे एकत्रित येऊन करतात.. मग लग्न असो की सण-उत्सव. जेवण बनतं ते गावासाठी. साहजिकच मग मोठमोठी भांडी आणली गेली..  शिवानंद मंदिराजवळ कार्यक्रमासाठी उपयोगात आणले जाणारे तंबू उभारले गेले.. तिथेच लोकांच्या आसऱ्याची आणि आवश्यकता असल्याच उपचारांची सोय केली गेली.. कारण पुढचा जवळजवळ ५०० मीटरचा रस्ता वाहून गेलेला.. आणि जवळजवळ अर्धा किलोमीटर चढण होती.. घरी परतायला बेचैन असलेले लोक मग काही काळ या तंबूत आसरा घ्यायचे.. जरा विसावू या वळणावर.. म्हणत सोबतीच्या कुटुंबीयांना विसावा घेऊ द्यायचे.. आता गावही सज्ज झालं लोकांना जेवण द्यायला.. अर्थात पाऊस होताच. घरची प्रत्येकाची शेती होती, तेव्हा त्याची काळजीही घ्यावी लागतच होती.. अनाजकी ‘रोपाई’ शुरू हुई थी.. गावातल्या बायका भातशेतीसाठी जात होत्या.. मग गावातली तरुण मुलं कामाला आली, सात-आठ जणांचीही टीम.. पुष्पाबरोबर आणखीही स्त्रीवर्ग होताच जेवणावर मुख्य देखरेख करायला.. शिवाय यात्रेकरूंना घेऊन आलेल्या बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टरही मदतीला धावून आले. दिवसातून सुमारे ९०० ते १००० लोक तिथे येत. त्या साऱ्यांना जेवण देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. संध्याकाळचे सात-आठ वाजले की, आसऱ्याला आलेल्या आणि येत असलेल्या अनेकांना तंबूत आसरा मिळू लागला.. जेवण मिळू लागलं.. लोकांचे मन भरून आशीर्वाद मिळू लागले.. कारण गेल्या दोन दिवसांचा त्यांचा अनुभव असतो. ‘ना प्रशासनने ना स्थानिक लोगोंने पुछा हमकों.. रस्ता दाखवायलाही कुणी तयार नव्हतं..’ त्याचं सांगणं असतं. दरमजल करत ते गणेशपूरला पोहोचलेले. तीन तीन दिवस जेवण मिळालेलं नव्हतं.. ‘‘मैने आज तक मर्दोको इतना इमोशनल होते नही देखा. मर्द रोते थे. ‘क्या दुर्दशा हुई हमारी. कैसे लौंटेगे घऱ?’ अनेक पुरुष बोलत, रडत,’’ पुष्पा सांगते. यात मुलंही होती, बायकाही आणि वृद्धही. अनेकांना पहाडी चढणं शक्य नव्हतं मग त्यांना स्थानिक पहाडी, नेपाळी लोकांची मदत मिळवून दिलेली. त्यांना उचलून नेणारेही काही होते.. पैसे घेत, पण निदान पुढचा मार्ग निश्चित होत होता. अनेक ठिकाणचे लोक होते, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश.. पण बहुतेक सगळे मध्यमवर्गीय.. कुठल्या कुठल्या बातम्या येत होत्या.. लोकांना पुरेशी मदत मिळत नव्हती.. अचानक आलेल्या पुराने, ब्रिज वाहून गेल्याने रस्त्यातच अडकलेली एक गरोदर स्त्री.. दिवस भरत आलेले.. वेणा सुरू झालेल्या.. भागीरथीचा प्रलय डॉक्टरांना तिच्यापर्यंत पोहोचवू नाही शकला.. बाळ आणि ती बाई वाटेतच मरण पावली.. दीर्घ सुस्कारा टाकण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. .. दरम्यान सरकारी मदत, लष्कराची मदत मिळायला सुरुवात झाल्याचं कळत होतं.. पण वीज नसल्याने टीव्ही, वर्तमानपत्र काहीच नव्हतं..
पुष्पा आणि तिच्या गाववाल्यांनी मात्र आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परतीच्या मार्गावरील या  यात्रेकरूंना उपाशी पाठवायचं नाही हा निर्धार होताच.. दिवसाला ९०० ते १००० लोक त्यांच्या ‘लंगर’मध्ये जेवत होते आणि पुढे निघत होते.. रोज नवे यात्रेकरू. असे सतत आठ दिवस.. हळूहळू यात्रेकरू कमी झाले.. आज त्यांचा लंगर थांबलाय पण गावात अजूनही (हा लेख लिहून होईपर्यंत) दिवे नाहीत.. पावसाचा कहर सुरूच आहे.. धनधान्याने संपन्न गाव असल्याने त्यांची खाण्याची पंचाईत नाही.. पण दिवे नाहीत.. पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि मुख्य म्हणजे गॅस संपत आलाय.. त्यामुळे सगळ्या रात्री सच्िंात जाताहेत.. विज्ञानाचा शोध उपकारक ठरलाय. या समजूतदार गावाने आत्तापर्यंत दिलजमाईने इतर लोकांसाठी केलंच, आता वेळ आहे ती गावातल्या लोकांसाठी करायची.. गावात एकाकडे डिझेलवर चालणारी पवन्चक्की अर्थात मिनी पॉवर जनरेटर आहे. पीठ दळता दळता ती वीजही निर्माण करतेय.. १० किलोव्ॉट वीज पुरेशी नक्कीच नाही पण गावातल्या  २५ घरांना एकेक दिव्याने का होईना तिनं उजळलंय.. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोबाइल चार्जिगची सोय झालीय.. जगाशी संपर्काची सोय झालीय.. त्यामुळे संध्याकाळ झाली की सगळे त्यांच्या घरी जमतात.. एकेकाचा मोबाइल चार्ज होईपर्यंत सुख-दु:खाच्या गप्पा होतात.. आठवणी निघतात त्या ऑक्टोबर १९९१ मध्ये आलेल्या भूकंपाच्या.. गावातले ४९ लोक डोळ्यादेखत मृत्युमुखी पडलेले.. तेव्हा ना मोबाइल होते ना आधुनिक यंत्रणा.. पुष्पा सांगते, ‘आमचं घर पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं.. रात्री गाढ झोपेत असताना पहाटे दोन वाजता हा भूकंप झालेला.. त्यामुळे काहींना बाहेर पडता आलं काहींना नाही.. सगळ्यांचीच तशीच तऱ्हा.. मृत नातेवाईकांचं दु:खं बाजूला ठेवून पुन्हा एकदा गाव सगळ्यासाठी एकत्र जमा झालं.. तेवढय़ातल्या तेवढय़ात लाकडी खांबाचा आडोसा करून तात्पुरतं हेल्थ सेंटर उघडून जखमींना उपचार सुरू झाले.. ती सांगते, ‘त्या दिवशी आम्ही सगळे गावकरी खुले आस्मान के नीचे बैठे थे.. किसी की मदत नहीं.. खाना-पिना नहीं.. अपनेही लोंगो की जाने गई थी.. मातम मनाए की जखमींयोंकी मदत करें..’ त्या एका उघडय़ा रात्रीने तिलाच नव्हे तर गावाला शिकवली माणुसकी.. तो अनुभवच आजच्या या तबाहीत उपयोगी आला.. घरदार नसणं, अन्नपाणी नसणं म्हणजे काय याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता.. त्या वेळचा आणखी एक अनुभव.. बाईने अर्थीला कंधा देणे फारच दूरची बाब. पण इथे तोही संकेत मोडला गेला. पुष्पा म्हणते, ‘माझ्यासारख्या काही बायकांनी तेही केलं.. कारण त्या वेळी बाई-पुरुष यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीची गरज होती..  नंतर अर्थात एनजीओ, सरकारी मदत पोहोचली पण या निमित्ताने गाावाची एकी पाहायला मिळाली.. ’ गावात एकी असेल, भाईचारा असेल तर अशा नैसर्गिक आपत्तींवर मात करणं लवकर सुरू होतं, अन्यथा इतरांच्या मदतीची वाट पाहणं सुरू होतं..
हा साराच परिसर हिमालय क्षेत्रात येतो. त्यामुळे क्षेत्र पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील मानलं गेलाय. हा प्रदेश इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्याचं सरकारने ठरवलंय.. गंगोत्रीचं हिमशिखर तीन किलोमीटर आत सरकलंय.. भीती आहेच.. गावातल्या लोकांनी म्हणूनच एक कायमस्वरूपी समिती बनवायचं ठरवलंय. डिझास्टर मॅनेजमेंट करणारं.. तिथल्या पॉवर प्लांटला विरोध झालाय.. कारण त्यामुळे दरडी कोसळायच्या घटना सुरू झाल्यात.. गावातली ही एकी या मानवनिर्मित संकटांवर मात करण्यासाठी एकत्र आलीय.. कारण या समजूतदार गावात पुष्पा चौहानसारख्या स्त्रिया आहेत..  पुष्पाने समाजशास्त्र घेऊन एम.ए. केलंय.. आणि समाजासाठीच जगायचं म्हणून लग्नही केलेलं नाही.. ती म्हणते, लग्न केलं असतं तर अशी रात्री-बेरात्री मला कुठे जाता आलं असतं का? तुम्हीच सांगा.. अर्थात संकटाच्या वेळी एक होणारं हे गाव स्त्रियांवरील अन्यायाबाबतीत काहीसं असमजूतदार आहेच.. घरच्या बाईला घरगुती हिंसाचाराचा त्रास आहे.. म्हणूनच गावातल्या स्त्रियांना एकत्र करून तिने ‘उतराखंड महिला पंचायत’ सुरू केली आहे. सध्या २० जणीं  त्याचं काम बघतात.. अत्याचारग्रस्त स्त्रियांना पोलिसांपर्यंत जाण्यात आणि न्यायालयीन प्रक्रियेत मदत करण्यासाठी या सक्रिय आहेत.. आत्तापर्यंत अनेकींना त्यांची मदत झालेली आहे.. हे गाव याही बाबतीत समजूतदार होईल याची तिला खात्री आहे.. याचं कारण त्यांना जवळून घडलेलं मृत्यूचं दर्शन !
छाया-वीरेंद्रसिंग नेगी

Ancient tunnel discovered while building a house
ऐतिहासिक ठेवा! घराचे बांधकाम करताना आढळले प्राचीन भुयार…
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
koyapunem festival started on monday february 10 on magh purnima at kachargad shrine of tribals it will last for five days
आदिवासींचा “कोयापुनेम” महोत्सव काय आहे? आजपासून सुरुवात
pune Dasnavami celebrations loksatta news
आनंदाश्रमातील दासनवमी उत्सवाची शंभरीकडे वाटचाल
karjat loksatta news
कर्जत : व्यापाऱ्यावर चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ बाजार समितीचे लिलाव, सर्व व्यवहार बंद
ganesh temple in Sangli beautifully decorated for Ganesh Jayanti attracting huge crowd
माघी गणेश जयंतीनिमित्त सांगली गणेश मंदिरात गर्दी
Ten citizens of Bondgaon have gone bald to show sympathy towards patients of village who suffering from hairloss
मनोबल वाढविण्यासाठी सामूहिक मुंडन!
Bhandara, woman deadbody , tiger attack, tiger ,
भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास संतप्त ग्रामस्थांचा नकार, पोलीस ठाण्यात…
Story img Loader