‘ऑनर किलिंग’च्या निमित्तानं सर्व धर्मात स्त्रीच समाजाच्या टीकेचं लक्ष्य का होते याचा विचार करायला हवा. परजातीत किंवा परधर्मात लग्न करण्यामुळे घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळत नाही. आणि समजा अशी ‘चूक’ आपल्या मुलीकडून झालीच तर तिला ठार केल्याने ती प्रतिष्ठा परत प्राप्त होते असेही नाही. हे प्रतिष्ठेच्या खोटय़ा कल्पना बाळगणाऱ्या आई-बापांना कळायला हवे. शिवाय मुलीला मारून तिच्या घरचे जेव्हा तुरुंगात जातात तेव्हा त्यांनी घराच्या प्रतिष्ठेत कोणती भर घातलेली असते, हा प्रश्नही त्यांच्या मनाला पडायला हवा.

स्त्रियांच्या अभिव्यक्तीवरची बंधनं ही काही आपल्यासाठी नवी गोष्ट नाही. तिच्यासाठी असलेल्या विधीनिषेधांची यादी खूप मोठी आहे. काळ बदलला तरी तिच्याकडे बघण्याची दृष्टी आजही तीच आहे. आजही जेव्हा प्रेमविवाह करण्यास बंदी, घराबाहेर मोबाइलवर बोलण्यास बंदी, चाळीसहून ज्यांचं वय कमी आहे अशा स्त्रियांना खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची बंदी आणि त्याहून मोठय़ा स्त्रियांनी घराबाहेर पडताना डोक्यावर पदर घेतला नाही तर त्यांना कठोर शिक्षा.. असे फतवे म्हणूनच तर निघत राहतात. हे फतवे वाचताना आपण तालिबानमध्ये आहोत की काय, असा प्रश्न पडेल. पण नाही, ही भाषा फक्त तालिबानी नाही. ही भाषा आहे अहंकारी पुरुषसत्ताक व्यवस्थेची! ही भाषा केली आहे भारतातल्याच उत्तर प्रदेशातल्या आसरा गावातल्या खापपंचायतीने! स्त्रियांना जगायचं असेल तर त्यांनी पुरुषाच्या दहशतीतच जगलं पाहिजे हे स्पष्ट करणारा हा फतवा पुरुषाच्या मनातली स्त्रीवरची मालकीहक्काची भावना किती प्रबळ आहे याचा प्रत्यय देणारा आहे.
गेले कित्येक महिने ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली आपल्या मनाविरुद्ध वागणाऱ्या मुलींना त्यांचे पालकच मृत्युदंडाची कठोर शिक्षा देत असल्याचं वृत्त अधूनमधून आपल्या वाचनात येतंय आणि उत्तरेकडची खापपंचायतच कशाला, महाराष्ट्रासारख्या प्रगत, सुसंस्कृत राज्यातही आपल्या मुलींवरचा मालकी हक्क काही पालकांनी सिद्ध करून दाखवला आहे. महाराष्ट्रात घडलेल्या अशा घटनांत अलीकडचं उदाहरण आहे ते आशा िशदे या तरुणीच्या हत्येचं किंवा त्याहूनही अगदी ताजं उदाहरण म्हणजे जळगावातील मनीषा धनगरचं. या दोन्ही घटनांत या मुलींची हत्या केली आहे ती त्यांच्या जन्मदात्यांनीच. जन्मदात्यांच्या मते ही हत्या अगदी समर्थनीय आहे. परजातीतल्या मुलाशी लग्न करून घराण्याची इभ्रत धुळीला मिळवण्याचा या मुलींचा बेत त्यांच्या जन्मदात्यांनी हाणून पाडलाय, आपल्या मुलींनाच या जगातून नाहीसं करून!
हे फक्त आपल्याकडेच घडतं असं नाही. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत जगातल्या बहुतेक देशांत ‘ऑनर कििलग’च्या घटना घडलेल्या आहेत. राना हुसनी या जॉर्डनच्या स्त्री-पत्रकारानं लिहिलेल्या ‘मर्डर इन द नेम ऑफ ऑनर’ या पुस्तकातून हा प्रश्न तिथंही किती संवेदनशील प्रश्न म्हणून ओळखला गेला आहे हे आपल्यापर्यंत पोहोचतं. इजिप्त, जॉर्डन, लेबनॉन, पाकिस्तान, टर्की, येमेन, पर्शियन गल्फ, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, इटली, बांगलादेश, ब्राझील, इस्रायल, स्वीडन आणि भारत अशा जगातल्या बहुतेक साऱ्या देशांत ऑनर कििलगच्या घटना घडतात. म्हणजेच अशा तऱ्हेच्या घटना मागासलेल्या देशातच घडतात किंवा विशिष्ट धर्मच अशा घटनांना प्रोत्साहन देतो असं नाही. तर स्वत:च्या मनासारखं जगण्याचं, प्रेम करण्याचं, सोबती निवडण्याचं स्वातंत्र्य घेणारी स्त्री साऱ्याच धर्मात लक्ष्य ठरताना दिसते.
‘ऑनर किलिंग’च्या निमित्तानं सर्व धर्मात स्त्रीच समाजाच्या टीकेचं लक्ष्य का होते याचा विचार कराय्चा आहे. जातिबाह्य़ प्रेम करणाऱ्यांना मृत्युदंड द्यावा, असं  कोणत्याही धर्मात स्पष्टपणे नमूद केलेलं नाही. जातिबाह्य़, धर्मबाह्य़ असं प्रेम किंवा विवाह जेव्हा घडून येतात तेव्हा बहुतांश घटनांत शिक्षेची कुऱ्हाड मुलींवर कोसळलेली असते. क्वचित काही घटनांमध्ये मुलालाही मुलीबरोबर मारलं जातं, पण प्रत्येक घटनेमध्ये मुलीचा बळी मात्र हमखास घेतला जातो. आपल्या मुलीनं आपलं घराणं, घराण्याची अब्रू धुळीला मिळवली आणि आता तिला ठार करूनच प्रायश्चित्त करता येणार आहे, अशी समजूत जनमानसात अगदी प्राचीन काळापासून दृढ झालेली दिसते. ही समजूत कोणी प्रसृत केली?
‘ऑनर किलिग’च्या घटना, त्यात प्राधान्यानं मुलींच्याच होणाऱ्या हत्या आणि त्यामागची कारणमीमांसा या गोष्टी तपासल्या की ही मानसिकता पद्धतशीरपणेच घडवली गेलेली आहे हे लक्षात येतं. पुढे ती प्रवाही होण्यात कोणती अडचण असण्याचं काही कारणही नसतं. उलट त्यामुळे स्त्रियांवरची जरब अधिक पक्की होणार असते. तेव्हा या हत्या थांबवायच्या असतील तर ही मानसिकता घडण्याचं मूळ कशात आहे हे शोधायला हवं.
जातिबाह्य़ प्रेम करण्यानं घराची अप्रतिष्ठा कशी होते आणि अप्रतिष्ठा होण्यापासून त्या घराला वाचवायचे असेल तर त्यात मुलींचाच बळी का जातो? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं धर्मानं ठरवून दिलेल्या स्त्रीच्या जागेशी संबंधित आहेत, स्त्रीच्या वाटय़ाला आलेल्या पराधीन जगण्यात आहेत. ‘मुलगी’ म्हणून जन्म घेणारीनं मुळातच जन्म घेऊन आई-बापाच्या जिवाला घोर लावलेला असतो. तिला एकदा का आपल्या तोलामोलाच्या घरात लग्न लावून पाठवून दिली की आई-बाप केवढय़ा तरी मोठय़ा कर्तव्यातून मोकळे झाले हीच समाजाची मानसिक घडण असल्यामुळे मुलीच्या वर्तनाबाबत ते फारच जागरूक असतात. तिनं घराण्याचे संस्कार जपले पाहिजेत याबाबत आग्रही असतात.
 पुरुषप्रधान समाजांची स्त्रीच्या जगण्यासंबंधीची जी धारणा आहे, त्यातूनच ‘ऑनर किलिंग’चे प्रकार घडतात जगाच्या पाठीवर कुठेही जा, स्त्री ही पुरुषाच्याच ताबेदारीतील वस्तू! शारीरिक बळाच्या आधारावर आणि परंपरेनं समाजात प्रधानत्वच भोगायची सवय लागल्यानं पुरुष तिला आपल्या कह्य़ात ठेवत आला आहे. आपल्या मर्जीप्रमाणे वाकवत आला आहे. आणि शेकडो र्वष झाली तरी हे चित्र बदलायला तयार नाही.
मग यापुढेही ‘ऑनर किलिंग’च्या नावाखाली स्त्रियांचे असेच बळी घेतले जाणार? धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली होणाऱ्या स्त्रियांच्या या हत्या थांबवायच्या असतील तर त्यासाठी कोणताच मार्ग नाही? कायदे करूनही प्रश्न फारसे सुटतात असं नाही. कारण प्रश्न सुटण्यासाठी कायद्याची जागा सर्वात वर असावी लागते. कायद्यानं शिक्षा जाहीर झाल्यानंतरही राष्ट्रपतीच्या अधिकारात  शिक्षा रद्द होण्याचे प्रकार पाहता निदान आपल्या देशात तरी कायद्याची जागा सर्वात वर नाही हे स्पष्ट होतं. म्हणूनच परंपरेनं चालत आलेले गरसमज दूर होण्यासाठी, समाजाच्या मानसिकतेत बदल होण्यासाठी शिक्षेपेक्षा जनजागरणाचीच आवश्यकता आहे.
परजातीत किंवा परधर्मात लग्न करण्यामुळे घराण्याची प्रतिष्ठा धुळीला मिळत नाही. आणि समजा अशी ‘चूक’ आपल्या मुलीकडून झालीच तर तिला ठार केल्याने ती प्रतिष्ठा परत प्राप्त होते असेही नाही. हे प्रतिष्ठेच्या खोटय़ा कल्पना बाळगणाऱ्या आई- बापांना कळायला हवे. शिवाय मुलीला मारून तिच्या घरचे जेव्हा तुरुंगात जातात तेव्हा त्यांनी घराच्या प्रतिष्ठेत कोणती भर घातलेली असते हा प्रश्नही त्यांच्या मनाला पडायला हवा. आणि त्यासाठी त्यांचे प्रबोधन व्हायला हवे. जुन्या पिढीच्या मनातून या बुरसटलेल्या विचारांचं उच्चाटन फक्त प्रबोधनाच्याच मार्गाने होऊ शकते आणि या परिस्थितीत नव्या पिढीकडून खूप अपेक्षा आहेत. चांगल्या-वाईटाचं भान या पिढीकडे आहे. स्वत:ची मतं ही पिढी बाळगून आहे. जाचक रूढी-परंपरांना धुडकावण्याचं धाडस तिच्यात आहे. नशा आणि रेव्हपार्टी करणारे तरुणही आहेत पण हीच काही साऱ्या नव्या पिढीची ओळख नाही. हुंडय़ाच्या विरोधात उभी राहणारी तरुण मुलंही आहेत. त्यांची संख्या कमी असेल पण स्वत:च्या आणि दुसऱ्याच्याही जगण्याच्या हक्काचं भान या मुलांना आहे.
आगरकर म्हणायचे,‘ समाजात बदल होण्यासाठी त्या समाजातील पंचवीस वर्षांवरील सारी माणसे मरायला हवीत.’ पण माणसं मरून प्रश्न सुटत नसतात हे आगरकरांनाही ठाऊक होतं, त्यांच्या या व्यथित उद्गारांचा अर्थ इतकाच होता की, जुने समज, जाचक रीति-परंपरा मागे टाकता यायलाच हव्यात, मुलींच्या आवडी-निवडींचा, त्यांच्या मतांचा आदर करता यायलाच हवा.     
chaturang@expressindia.com

pappu yadav death threat
“सलमान खान प्रकरणापासून दूर राहा, अन्यथा…”; लॉरेन्स बिष्णोई टोळीची अपक्ष खासदाराला धमकी!
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
loksatta chatura Custody Of Infant To Breastfeeding Mother
स्तनपान करणार्‍या अपत्याचा ताबा आईकडेच!
woman in prison
स्त्री ‘वि’श्व : गजाआडच्या स्त्रियांचं जग
prakash ambedkar
“योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका
ias shailbala martin question loudspeakers in temples
“मंदिरांवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होतं, मग…” महिला IAS अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत!
Yogendra Yadav talk on Vanchits uproar says This is an attack on Babasahebs constitution
वंचितच्या गोंधळानंतर योगेंद्र यादव म्हणाले “हा तर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला”
womens in tribal and remote areas,
आईपण नको रे देवा?