चैतन्यांचं तत्त्वज्ञान भक्तीच्या गाढतेनं भरलं- भारलेलं आहे. त्यांचा कृष्णवेध पूर्ण समर्पण मागणारा आहे. स्वत:ला विसरा आणि कृष्णरंगात रंगून जा. हृदय शुद्ध करा, त्यात भक्तीचा उदय होऊ द्या- इतकं साधं सोपं आणि तरी प्रत्यक्ष आचरणात सर्वस्व मागणारं हे तत्त्वज्ञान आहे.
बंगालमध्ये भक्ती आणि संगीत एकजीव होऊन गाजत राहिलं ते जयदेवाच्या ‘गीतगोविंदा’तून, विद्यापती आणि चंडिदासाच्या उत्कट, मधुर पदावलीतून. बौद्ध आणि शाक्त मतांच्या गलबल्यातून सहजसाध्या, निर्मळ आणि सरस अशा वैष्णवभक्तीनं बंगालच्या भूमीला बाराव्या शतकापासून प्रभावित केलं. गौड देश म्हणजे बंगाल; पण आपल्याकडे गौडबंगाल हा शब्द रहस्य, गुप्त गोष्ट या अर्थानं रूढ झाला तो बंगाल हे मुख्य केंद्र असणाऱ्या शाक्त तांत्रिकांच्या उपासनेमुळे. मद्य, मांस, मैथुनादींवर आधारलेल्या त्यांच्या उपासना पद्धतींना दूर सारून, अंत:करणपूर्वक भक्तीचा भाव गाणाऱ्या वैष्णवांनी हळूहळू बंगाल हे वैष्णवभक्तीचं एक प्रमुख क्षेत्र बनवलं.
चैतन्य महाप्रभू हे या संप्रदायाचे एक अध्वर्यू. बंगालमधल्या वैष्णव संप्रदायाचे जणू तेच प्रवर्तक आहेत असं पुढीलांनी म्हणावं इतका त्यांनी गौडीय वैष्णव संप्रदाय बलिष्ठ केला. पंधराव्या शतकात चैतन्य जन्मले. त्यांचं मूळ नाव होतं विश्वंभर. आई-वडील त्यांना लाडानं ‘निमाई’ म्हणत आणि लख्ख गोरे असल्यामुळे ते सगळ्यांचे ‘गौरांग’ही होते.
नवद्वीप हे त्यांचं जन्मस्थान. पंधराव्या शतकातलं ते एक महत्त्वाचं धार्मिक-सांस्कृतिक केंद्र होतं. शाक्तमताचा प्रभाव तिथल्या विद्वानांवर होता, पण संख्येनं कमी असले तरी तिथले वैष्णव कर्ते पारमार्थिक होते. संस्कृत विद्येचं माहेरघर म्हणून नवद्वीपाचा उल्लेख त्याकाळी होत असे. अनेक धर्मनिष्ठ विद्वान तिथे राहात होते. ग्रंथरचना करीत होते आणि धर्मचर्चाही घडवीत होते.
चैतन्य अशा वातावरणात मोठे झाले. शाळेची फारशी गोडी नसलेला एक खोडकर मुलगा म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी शिक्षण पुरं केलं. लग्न केलं. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा लग्नबंधन स्वीकारलं, पण गंभीरपणे ते संसारात गुंतले नव्हते. त्यांना ओढ होती ती वृंदावनाची. वृंदावनवासी कृष्णाची. दूरदूरच्या यात्रा त्यांनी केल्या. ते गयेला गेले आणि चमत्कार घडावा तसे ते उन्मन होऊन परतले. त्यांनी संन्यास घेतला आणि ते कृष्णभक्तीत दंग होऊन राहिले. त्या वेळी त्यांचं वय अवघं तेवीस वर्षांचं होतं.
चैतन्यांचं संन्यास घेतल्यानंतरचं आयुष्य म्हणजे बंगाल, ओरिसा आणि मथुरा-वृंदावनाचा परिसर इथे वैष्णवभक्तीला बहर आणणं. ओरिसाचा राजा गजपती प्रतापरुद्र आणि त्याच्या पदरी असलेले वासुदेव सार्वभौम हे वेदांती महापंडित असे दोघेही चैतन्यांच्या भावसंपन्न भक्तीकडे आकर्षित झाले. जगन्नाथाच्या रथोत्सवाच्या वेळी आपल्या दोनशे शिष्यांसह चैतन्यांनी सामूहिक संकीर्तन केलं. तो सोहळा केवळ अपूर्व असा होता. ओरिसात वैष्णव संप्रदाय दृढ करण्यासाठी राजा प्रतापरुद्रांना चैतन्यांविषयी वाटणारं आकर्षण, वासुदेव सार्वभौमांचं चैतन्यांविषयी अनुकूल झालेलं मत आणि शेकडो- हजारो भाविकांच्या काना-मनाची धणी पुरवणारी रथोत्सवाच्या वेळची संकीर्तनयात्रा या सगळ्याचा फार गाढ असा परिणाम झाला.
चैतन्यांचं आदर्श संन्यास जीवन आणि त्यांची आत्यंतिक अशी निर्मळ भक्ती यामुळे वैष्णवभक्तीचा एक मानदंड धर्मजीवनात उभा राहिला. त्यांनी वेळोवेळी ज्यांचा उच्चार केला त्या त्यांच्या धर्मतत्त्वांची व्याख्या करण्याचं आणि त्यांचे सिद्धांत, त्यांची आचारप्रणाली सुघटित करण्याचं काम त्यांच्या प्रमुख शिष्यांनी केलं. चैतन्यांनी आपली वचनं, पदं, धर्ममतं लिखित स्वरूपात एकत्र केली नाहीत की एखाद्या धर्मग्रंथाची रचनाही केली नाही.
चैतन्यांनी मुख्यत: प्रेरणा दिली ती नामसंकीर्तनाची. त्यांचा नामोच्चार साधा-सरळ पण श्रुतिमधुर संगीतानं परिपूर्ण होता. ते भक्तिगान ही चैतन्य संप्रदायाची महत्त्वाची खूण ठरली. त्या गाण्याला नृत्याचीही साथ त्यांनी दिली होती. चैतन्यांचं ते भक्तिभिजलं नृत्य-संगीतमय संकीर्तन ही त्यांनी बंगालच्या वैष्णव संप्रदायाला दिलेली एक थोर अशी देणगीच होती.
चैतन्यांचं तत्त्वज्ञान भक्तीच्या गाढतेनं भरलं- भारलेलं आहे. त्यांचा कृष्णवेध पूर्ण समर्पण मागणारा आहे. स्वत:ला विसरा आणि कृष्णरंगात रंगून जा. हृदय शुद्ध करा, त्यात भक्तीचा उदय होऊ द्या- इतकं साधं सोपं आणि तरी प्रत्यक्ष आचरणात सर्वस्व मागणारं हे तत्त्वज्ञान आहे. त्यांनी म्हटलं आहे,
नम्र व्हावं तृणासारखं
सहनशील व्हावं वृक्षासारखं

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घाव घालून तोडला तरी
तक्रार करत नाही वृक्ष
सुकून वठू लागला तरी
पाणी मागत नाही वृक्ष

ज्याला गरज असते त्याला
फुला-फळांचं धन देतो
ऊन-पाऊस सारे काही
दुसऱ्यासाठी सहन करतो

त्यांच्या लेखी वैष्णव म्हणजे प्रत्येक जीवमात्रात कृष्ण पाहणारा आणि कृष्णमय होऊन जाणारा. वैष्णव तोच, पूर्ण निरभिमान असणारा, प्रत्येक जीवाला कृष्णरूपात पाहणारा, प्रत्येकाला मान देणारा, स्वत:चा मान विसरणारा, सतत कृष्ण स्मरणारा, कृष्ण जपणारा, आणि त्यातूनच कृष्णप्रेम मिळवणारा.
वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी १५३३ मध्ये चैतन्यांचं लौकिक जीवन समाप्त झालं. पण त्यांच्यामुळे वैष्णव संप्रदायात जी ऊर्जा, जो उत्साह निर्माण झाला होता, त्यानं बंगालचं धर्मजीवन आणि साहित्य पुढे अनेक दशकं, अनेक शतकं प्रभावित झालं.
‘राधाकृष्ण उपासना’ हा त्यांच्या संप्रदायाचा गाभा होता. मात्र चैतन्यांनी त्यांच्या एका प्रमुख शिष्याला- स्वामी नित्यानंदांना आदेश दिले होते ते साऱ्या दीनदलितांना, तळागाळातल्या माणसांना, जातीच्या उतरंडीत खाली दबलेल्यांना वर उठवण्याचे, जवळ घेण्याचे आणि कृष्णभक्तीच्या एका विशाल प्रांगणात साऱ्यांना समभावाने प्रेम देण्याचे. बंगालमधल्या वैष्णवसंप्रदायी आंदोलनाचं हे वैशिष्टय़ नित्यानंदांनी चैतन्यांच्या प्रेरणेनंच निर्माण केलं होतं. वृंदावनातल्या सगळ्या पवित्र ठिकाणांचा जीर्णोद्धार चैतन्यांनी आपल्या शिष्यमंडळाकरवी केला होता. राधाकृष्णाच्या स्मृती जागवणारी अनेक सुंदर मंदिरं आणि स्मारकं वृंदावनात उभी राहिली ती चैतन्यांमुळे. त्या प्राचीन परिसराला स्मरणसुंदर बनवण्याचं मोठं कार्य चैतन्य संप्रदायानं केलं आहे.
आज चैतन्य महाप्रभू म्हटलं की आठवतं तेच सोळाव्या शतकात नवरूप झालेलं वृंदावन, तेच भक्तिधुंद असं सामूहिक नृत्य-गायन, नामस्मरण आणि जातिभेदातीत असा तोच कृष्णभक्तीचा जिव्हाळा.
डॉ. अरूणा ढेरे -aruna.dhere@gmail.com