अर्चना जगदीश godboleaj@gmail.com
राहीबाई पोपेरे यांनी कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन समितीची सुरुवात केली. आज त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली आहे. स्थानिक बियाणी आणि पारंपरिक शेती म्हणजे वैश्विक वातावरण बदलला तोंड देण्याचा उपाय आहे हे कदाचित त्यांच्या गावीही नसेल, पण आपल्या मातीशी, परिवाराशी, परिसराशी आणि लोकांशी त्यांचं नातं घट्ट आहे म्हणूनच कुठलाही आव न आणता त्या हा बदल घडवू शकल्या आहेत. मातीचं ऋण काही अंशी त्या फेडत आहेत.
‘‘माणसाचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सतत तपासून बघितला पाहिजे, कारण बुद्धी आणि औद्योगिक प्रगती यामुळे माणसाला निसर्गात ढवळाढवळ करण्याची, त्याचा नाश करण्याची शक्ती प्राप्त झाली आहे, पण माणूसदेखील निसर्गाचाच एक भाग आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. माणसाची निसर्गावर जय मिळवण्याची लढाई खरं तर स्वत:विरुद्धची लढाई आहे आणि निसर्गाबरोबरचं आपलं नातं विसरलं तर अंत ठरलेला आहे,’’ रॅचेल कार्सन या अमेरिकन संशोधक आणि लेखिकेनं मानवजातीला हा धोक्याचा इशारा १९६४ मध्येच दिला होता. आपण त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं आणि पन्नास वर्षांनंतर आज रसायनांच्या विळख्यातून मानवजातीला कसं सोडवायचं ही फार मोठी समस्या बनली आहे.
औद्योगिक क्रांती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगती आधीच्या काळात नैसर्गिक साधन संपत्ती जपून वापरली जात होती. रोजच्या जगण्यासाठी आपण निसर्गाशी जोडलेले होतो. पण उद्योग, विकास, तंत्रज्ञान आणि शहरीकरण, शहरी संस्कृती यांच्या रेटय़ात हे अलवार नातं कधी बिघडलं ते समजलंच नाही. शहरांमुळे बाजाराच्या आधिपत्याखाली असलेलं विकासाचं नाव प्रारूप हातपाय पसरायला लागलं. जागतिकीकरणामुळे शेतीप्रधान संस्कृतीपेक्षा शहरी संस्कृतीचं महत्त्व वाढलं. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी जास्त अन्नधान्याची गरज भासायला लागली. त्यामुळे स्थानिक शेती, त्यातली पारंपरिक वाणं आणि या सगळ्यावर आधारलेली ग्रामसंस्कृती यांच्या मुळावरच घाव पडायला लागले. पुढे तंत्रज्ञानाचा परिपाक म्हणून संकरित बियाणं, जास्त उत्पादन देणाऱ्या जाती आल्या आणि हरितक्रांती झाली म्हणून आपण निश्चिंत झालो. पण प्रगत शेतीसाठी जुनी पारंपरिक बियाणी नष्ट झाली, वाढीव उत्पादनासाठी रासायनिक खतं आणि कीटकनाशकं आली. सुरुवातीला मर्यादित असणारा त्यांचा वापर हळूहळू हाताबाहेर गेला. जमिनीचा कस कमी होत चालला, नवनव्या किडी यायला लागल्या. शिवाय संकरित, सुधारित बियाणे वापरून केलेल्या पिकावर पडणाऱ्या रोगांचं प्रमाणही जास्त होतं. मग त्यावर उपाय रसायनांचा वापर असं दुष्टचक्र तयार झालं. या विषारी रसायनांच्या अतिवापरामुळे धान्यातून, भाजीपाल्यातून ती आपल्या जेवणातून आपल्या शरीरात पोहोचली. शेतीला दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून भूजलात पोहोचली आणि पुन्हा आपल्या शरीरात पोहोचून साठवली जायला लागली. त्यामुळेच कर्करोगासारखे दुर्धर आजार वाढायला लागले. खायला कसदार अन्न नाही, कष्टही नाहीत, मग शरीर आजारांना, नवनव्या जिवाणूंना बळी पडायला लागलं नाही तरच नवल!
यावर उपाय म्हणून सेंद्रिय पद्धतीने पिकलेले धान्य आणि भाजीपाला यांना महत्त्व यायला लागलं. मात्र खरंच ते सेंद्रिय आहे का? त्यासाठी काही मानकं आणि प्रमाणपत्र या गोष्टी आहेत का? पण या गोष्टी बाजाराने पोहोचू दिल्याच नाहीत सामान्य ग्राहकांपर्यंत. नुसती लेबलं लावून सेंद्रिय पदार्थाचाही एक नवा बाजार सुरू झाला, आपल्या आरोग्याबद्दलच्या भीतीवर आधारलेला. पण ग्रामीण आणि शहरी भागातल्या काही शहाण्या स्त्रिया मात्र स्वस्थ बसल्या नाहीत, त्यांनी स्वत:च पुन्हा नव्याने आपली पूर्वीची बियाणी आणि पारंपरिक शेती पद्धत यावर काम सुरू केलं, त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कंबर कसली.
गेल्या वर्षी बीबीसीने १०० प्रेरणादायी स्त्रियांच्या यादीत अहमदनगर जिल्ह्य़ातल्या राहीबाई पोपेरे या भारतीय ग्रामीण स्त्रीचा आवर्जून समावेश केला. कोंभाळणे या अकोले तालुक्यातील छोटय़ाशा गावातल्या राहीबाई गेली अनेक वर्षे स्थानिक पिकांची वाणं जपण्याचं काम करतात. ‘जुनं ते सोनं’ यावर यांचा संपूर्ण विश्वास आहे. ग्रामीण भागात चांगले आरोग्य हवं असेल तर आपल्या मातीतल्या स्थानिक वाणांना आणि त्यावर आधारित उत्पन्नांना पर्याय नाही, असं त्या ठामपणे सांगतात. आपल्या पुढच्या पिढीला कसदार अन्न कसं मिळेल या काळजीने राहीबाईंनी स्थानिक जाती लावायला सुरुवात केली, सुरुवातीला थोडा विरोध झाला, पण हळूहळू पटलं घरातल्यांना. मग त्यांनी हे काम गावपातळीवर नेलं. तालुक्यातल्या पस्तीसहून अधिक बचत गटांना पारंपरिक शेतीचं महत्त्व समजावून सांगितलं. त्यातून ‘कळसूबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन समिती’ची सुरुवात केली. ‘बायफ’ संस्थेच्या मदतीने त्या, या भागातल्या शेकडो स्थानिक वाणांचे संवर्धन करतात, लोकांना ते लावण्यासाठी प्रेरणा देतात. स्थानिक जाती या दुष्काळाला, किडींना तोंड देण्यात अधिक यशस्वी असतात हे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले आहे. दुष्काळामुळे, कमी पावसामुळे, शेतीत नाही पिकलं तर जंगल आपल्याला देतं हा विश्वास राहीबाईंनी पुन्हा लोकांच्या मनात जागा केला. भारंगी, चंदनबटवा, म्हैसवेल अशा रानभाज्या आपण विसरून गेलो आहोत; त्यांचीही वाणं जपण्यासाठी राहीबाई प्रयत्न करतात. नुसतं जपत नाहीत तर दरवर्षी अशा स्थायिक बियाणांचं वाटप त्या करतात. या डोंगराळ भागातल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये त्यांनी स्थानिक पारंपरिक वाणांबद्दल पुन्हा आत्मीयता निर्माण केली आहे. त्यातून चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे दाखवलं आहे. जवळपास नाहीशा व्हायला आलेल्या तुरीच्या नऊ जाती, भाताच्या पंधरा-वीस जाती आणि साठहून अधिक रानभाज्या त्यांच्या प्रयत्नाने टिकून राहिल्या आहेत. पीक आल्यानंतर त्यातलं बियाणं म्हणून कोणतं ठेवायचं, गाडग्यात नाहीतर कणगीत राख आणि कडुिनबाचा पाला घालून ते कसं साठवायचं याचंही त्या प्रशिक्षण देतात. जंगल, शेती आणि परंपरा यांची सांगड घालणाऱ्या आणि शेकडो स्त्रियांना, शेतकऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या राहीबाईंना अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांचं काम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे. स्थानिक बियाणी आणि पारंपरिक शेती म्हणजे वैश्विक वातावरण बदलला तोंड देण्याचा उपाय आहे हे कदाचित त्यांच्या गावीही नसेल, पण आपल्या मातीशी, परिवाराशी, परिसराशी आणि लोकांशी त्यांचं नातं घट्ट आहे म्हणूनच कुठलाही आव न आणता त्या हा बदल घडवू शकल्या आहेत.
असंच काम राजगुरुनगरच्या वाडय़ाच्या ‘जे. कृष्णमूर्ती फाऊंडेशन’च्या ‘सह्य़ाद्री स्कूल’मधल्या दीपा मोरे भीमाशंकर परिसरात करतात. दीपाचं वैशिष्टय़ असं की ती स्वत: अभियांत्रिकी पदवीधर आहे आणि सह्य़ाद्री स्कूलमध्ये येण्याआधी तिने ऊर्जा व्यवस्थापन आणि पर्यायी ऊर्जा क्षेत्रात काम केलेलं आहे. शहरी असूनही आता ग्रामीण भागातल्या कामात आणि सह्य़ाद्री शाळेच्या वेगळ्या शिक्षण पद्धतीत ती रमली आहे.
भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरातल्या महादेव कोळी आदिवासी तसेच स्थानिक शेतकऱ्यांना खरं तर पारंपरिक शेती आणि स्थानिक जाती यांचं भरपूर ज्ञान होतं. पण काळाच्या ओघात, विकासाच्या शहरी कल्पना राबविण्याच्या नादात ते जवळजवळ नष्ट होत आलं होतं आणि अगदी काही अपवाद सोडता सर्व शेतकरी संकरित बियाणे वापरायला लागले होते. स्थानिक जाती, त्याबद्दलची माहिती हे आता फक्त आठवणीत उरलं होतं. शाळेतल्या मुलांना सकस अन्न मिळावं आणि शेतीची माहिती व्हावी म्हणून दीपाने लोकांशी बोलायला सुरुवात केली. सह्य़ाद्री शाळेच्या स्थानिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून तिने भाताच्या स्थानिक जातींना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. त्यातून मिळणारं उत्पन्न शाळेसाठी विकत घ्यायला सुरुवात केली. शाळेच्या छोटय़ा शेतीच्या तुकडय़ावर स्थानिक लोकांच्या मदतीने शेतीची सुरुवात केली आणि त्यातूनच आजूबाजूच्या दहा गावांमध्ये स्थानिक वाणांचं महत्त्व सांगणं, वेगवेगळ्या वैशिष्टय़पूर्ण वाणांची माहिती संकलित करणं असं काम सुरू केलं. दीपाच्या पाठपुराव्यामुळे गुंडाळवाडीच्या रामदास लांडगेंनी पहिल्यांदा भाताच्या स्थानिक जाती लावल्या आणि शाळेने ते सगळे तांदूळ विकत घेतले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. दरवर्षी खरीप हंगामात पूर्वीच्या चवदार भाताच्या जाती शेतकऱ्यांनी लावाव्यात म्हणून २०१६ पासून काम सुरू आहे. लालभात, झिनी, जावयाची गुंडी, रायभोग, जोंधळी जिरगा अशा भाताच्या जातींचे पुनरुज्जीवन होऊ लागले आहे.
दीपाच्या प्रयत्नाने आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे हा कार्यक्रम आता २७ गावातल्या ४०० आदिवासी आणि स्थानिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. सह्य़ाद्री शाळेमध्ये या चवदार तांदळांच्या विक्रीचे केंद्रही आहे आणि गावातल्याच एका शेतकऱ्याची मुलगी काजल कोबळ ते केंद्र चालवते, सगळ्या नोंदी ठेवते. शाळेतल्या मुलांचे पालक आधी हौसेने आणि आता त्याचे महत्त्व समजून हे तांदूळ विकत घेतात कारण याच्या कसदारपणाची आणि चवीची, रसायनमुक्त असण्याची त्यांना खात्री आहे. दीपाने अथक प्रयत्नांनी शेतकऱ्यांना एकत्र करून या जातींची वाणे लावणाऱ्या तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची ‘भीमशंकर फार्मर्स प्रोडय़ुसर्स सोसायटी’ स्थापन केली आहे. तिचं व्यवस्थापन कौशल्य आणि समाजात शेतकऱ्यांमध्ये बदल घडवून आणण्यासाठीची धडपड, यातूनच आता हा व्यवसाय मूळ धरू लागला आहे. स्त्रिया जमिनीशी घट्ट जोडलेल्या असतात. मोठं संकट आलं तरी त्या धीराने मार्ग काढू शकतात, फक्त स्वत:साठी नाही तर समाजासाठीदेखील बदल घडविण्याच्या प्रक्रियेत त्या झोकून देऊ शकतात. म्हणूनच पर्यावरण बिघडत चाललं असलं तरी छोटासा दिवा घेऊन राहीबाई किंवा दीपा वाट दाखवत असतात. फक्त दूरवरचा तो दिवा बघण्याचे कष्ट केले पाहिजेत.
chaturang@expressindia.com