एखादं नातं काही एका क्षणात तुटत नाही. काही तरी चुकतं आहे, असं वाटत असतं, ते दुर्लक्षत गेलं तरी एके दिवशी समोर उभंच ठाकतं! पावसाचं आणि माझं तसं काहीसं होत चाललं आहे. ते मला स्पष्ट दिसतं आहे. पण त्याचं काय करावं कळत नाहीये. त्या दिवशीच्या म्हणजे  २६ जुलैच्या त्या ढगफुटीनंतर मी त्याला प्रचंड घाबरते. त्यानंतरची कितीतरी वर्षे जोरात पाऊस आला की ‘२६ जुलै नाही ना’ असं वाटतं.
त्या दिवशीच्या त्या पावसाची पडायची सुरुवात नेहमीसारखीच झिमझिम होती. मी आणि माझा नवरा संदेश चक्क घरी होतो. दुपारचं छान जेवण करून, जडावून, मस्त पांघरुण घेऊन झोपण्याइतका निवांतपणा मिळाला होता खूप दिवसांनी. त्या सुस्त जेवणाला आणि जड सुखाच्या ‘साखरझोपे’ला त्याच्या अविरत झिमझिमण्याचं पाश्र्वसंगीत होतं.
आमचं घर इमारतीत सगळ्यात वरच्या मजल्यावर. घरावर थेट गच्चीच. त्यामुळे दरवर्षी बाहेरच्या हॉलमध्ये गळायचं. छान रंग लावून घेतलेल्या बाहेरच्या खोलीचे पावसात हमखास पोपडे पडायचे. कुठल्या कुठल्या चोरवाटांनी गच्चीत साचलेलं पाणी गच्चीतून वाट शोधत घरी यायला बघायचं. आम्ही काय काय उपाय करून त्याला अडवायचो तरी ते हट्टानं भिंतीत घुसून शेवटी भिंती फुगवायचं. त्याच्या त्या हट्टानं दरवर्षी बाहेरच्या खोलीतल्या छपरावर आणि भिंतीवर फुगवटय़ाचे वेगवेगळे आकार तयार व्हायचे. त्याची आधी लाज वाटायची, पण नंतर मी आणि संदेश त्या आकारांना ‘म्युरल्स’ म्हणायला लागलो. गमतीनं आमच्या मित्रमंडळींना आम्ही सांगायचो, ‘फार मोठय़ा कलाकारानं आमच्या भिंतीवर ही अदाकारी केली आहे. आम्ही हे सगळं त्याच्याकडून खास बनवून घेतलं आहे आमच्या घरासाठी!’ पण कधी कधी खूप रागही यायचा, मुंबईच्या पावसाच्या आडवेतिडवेपणाचा. धसमुसळेपणाचा. उन्हाळ्यात भरपूर खर्च करून केलेलं वॉटरप्रूफिंग फार तर दोन पाऊस टिकायचं. तिसऱ्या पावसालाच पुन्हा बाहेरच्या पांढऱ्याशुभ्र छतावर आधी ओल आणि मग झिरपून आलेल्या पाण्याच्या मण्यांची माळ उमटायला लागायची की मग पराभवानं खचल्यासारखं वाटायचं. विषण्ण मनानं बाथरूममधल्या सगळ्या बादल्या, तांबे, स्वयंपाकघरातील विविध आकाराची पातेली वरनं पडणारे थेंब झेलायला दबा धरून बसवली जायची. मग त्यांचं ते थेंब झेलतानाचं ‘टिप..टिप..’ संगीत ऐकताना भर मध्यरात्री टक्क जाग यायची. अशा काही वेळांना पावसाला काही तरी फेकून मारावंसं वाटायचं. त्या पडणाऱ्या पावसाशी मी एकतर्फीच धुसफुसत बोलत राहायचे, ‘बास झालं आता! थांब आता पडायचा! तू फक्त शेतकऱ्यांच्या शेतावर आणि शहरांबाहेरच्या आमच्या जलसाठय़ांवर पड ना! भर शहरात तू पडतोस आणि तसाही वायाच जातोस. कंटाळा आला बाबा तुझा.’ तो हे ऐकत निमूट पडत राहायचा. जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मुंबईच्या आडव्यातिडव्या पावसांत ‘मढ आयलंड’सारख्या ठिकाणी चित्रीकरणाला जाणं जिवावर यायचं. अंधेरीला भर पावसातही ‘मढ’ला जाणारी ‘जेट्टी बोट’ खचाखच भरलेली असायची. त्या बोटीवर चढण्यासाठी एक लाकडी फळी घसरगुंडीसारखी लावलेली असायची (अजूनही असते). पावसात ती निसरडी होऊन जायची. ओल्यापिच्च चपलांनी पावसात त्या घसरगुंडीचा चढ चढणं िंकंवा उतरणं हे एक दिव्यच. घनघोर पावसात ‘जेट्टी’ उलटेल अशी भीती वाटायची. कधी नाइलाजानं ‘जेट्टी’ बंद पण करत असतील तेव्हा बस पकडून आपापल्या लांबच्या घरांना गाठणं यासाठी एक चिवट धाडस पाहिजे. ते मुंबईकरांमध्ये आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर त्या दिवशी माझ्या घरातल्या दुपारच्या साखरझोपेत बाहेर कोसळणारा पावसाचा आवाज ऐकून मला आज ‘मढ’ काय, कुठेच जायचं नव्हतं म्हणून मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि कूस बदलली. झोपताना कुठे तरी वाटायला लागलं हे बाहेरचं पडणं आता झिमझिमणं उरलं नाही. बाहेर काहीसं वेडवाकडं, आडवंतिडवं होत आहे..      
संदेशला आणि मला दोघांनाही जाग आली. विचित्र अंधारलेलं वाटत होतं. ‘‘जरा जास्तच पडतोय नं हा आज,’’ असं काहीसं पुटपुटत बाहेरच्या खोलीचे पडदे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून दोघांच्याही पोटात क्षणात खड्डा पडला. घरासमोरचं एम.आय.जी. क्लबचं मैदान नुसतं पाण्याखालीच नव्हतं, अर्धा पुरुष पाण्याखाली होतं. वाचा बसल्यासारखी झाली. एखाद्या माणसाचं वागणं आपल्याला पटत नाही म्हणून रोज आपण त्याला कुरबुरत धुसफुसत बोलत असावं, ते माणूस आपलं बोलणं रोज ऐकून घेऊन स्वत:ला हवं तसंच वागत असावं, आपण अजून चिडावं, समोरून काही उलट उत्तर नाहीच येणार या रोजच्या विश्वासानं जोशात धुसफुसायला जावं आणि समोरच्यानं एकदम जोरदार आवाजच लावावा. भीतीनं पाणीच होऊन जावं आपलं. तसं काहीसं झालं माझं. समोरच्या मैदानावर उसळलेलं पाणी पाहून! क्षणात् गर्भगळीत. आमच्या दुसऱ्या मजल्यावरच्या प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस घरासमोरच्या गॅलरीत होता. घाईनं मीही गॅलरीत धावले तर घराखालचा रस्ता म्हणजे एक खळाळता झराच झाला होता पाण्याचा! मी झोपलेली असताना आमचं घर उचलून कुणी इटलीत वगैरे नेऊन ठेवलं का काय? इटलीत व्हेनिसमध्ये  घराखाली बोटी पार्क केलेल्या असतात त्यात बसूनच दुसरीकडे जायचं! संदेशनं घाईघाईनं टीव्ही लावला आणि तत्क्षणी आमची ‘साखरझोप’ खाड्कन उतरली. मुंबईत रस्ते पाण्याखाली गेल्याचं दृश्य कधीच नवीन नसतं, पण हे काहीतरी भलतंच घडत होतं. मुंबईकर कशालाच घाबरत नाहीत. बॉम्बस्फोटच्या दुसऱ्याच दिवशी धाडसानं लोकलमध्ये बसून लोक ऑफिसला निघतात. या शहरानं त्यांना वळण लावलेलं आहे. कशालाही न घाबरता चालतच राहण्याचं. जसं माझे टोकियोतले मित्र सांगतात, टोकियोत भूकंप होऊन इमारती गदागदा हलत असताना, ऑफिसेस मोकळी करा अशा सूचना टाहो फोडत असताना त्या हल्लकल्लोळातही जपानी माणूस शिस्त सोडत नाही. लिफ्टस् बंद पडलेल्या असतात. उंच-उंच इमारतीतली माणसं शांतपणे, ओळीनं पायऱ्या उतरत खाली धावत सुटतात. गोंधळ नाही, चेंगराचेंगरी नाही. टोकियो असेल किंवा मुंबई, दोन्ही शहरांना प्रचंड वेग आहे. तो वेग तिथे राहणाऱ्या माणसांमध्येही भिनत जात असावा. त्यामुळे आसपासचं कितीही काहीही क्षणात बदललं तरी चटकन जुळवून पुढे निघतात ही माणसं. त्या दिवशीच्या त्या पावसात लोकल्सबरोबर बसेसही बंद पडल्या, तशी पाय ओढत मुंबईकर चालत घरी निघाले. सगळं बंद पडलं. मोबाइल्सही बंद झाले तेव्हा बेफिकीर मुंबईकर सावध झाला, पण चालायचा थांबला नाही. संध्याकाळी सहाच्या दरम्यान आमची दुसऱ्या मजल्याची गॅलरी आणि घर माणसांनी तुडुंब भरून गेली होती. इमारतीचा पहिला मजला पूर्ण पाण्याखाली गेला होता. तिथले राहणारे पाण्याच्या रेटय़ातच कसंबसं दार लोटून, कुलपं लावून नेसत्या कपडय़ानिशी वर आले होते. त्यानंतरचा दीड दिवस मुंबईकरांनी पाहू नये ते सगळं पाहिलं. कुणी वाहून गेले. कुणी पोहत हातपाय मारत राहिले. पोहता न येणारे कितीतरी जण चक्क रात्रभर झाडांवर चढून बसून राहिले. गाडय़ा वाहून गेल्या. गाडय़ांमध्ये अडकलेली माणसं गुदमरून गेली. किती तरी माणसं घरी पोचण्याच्या आशेनं रात्रभर मैलोन्मैल चालत राहिली. घरी सुखरूप असणारी माणसं पाऊस कमी होताच पाणी तुडवत रस्त्यांवर जाऊन गाडय़ांमध्ये रात्रभर अडकलेल्या माणसांना खाणं-पिणं पुरवत राहिली. कुणीसं म्हणालं, ‘कुठेसा चित्रीकरण करत असलेला हृतिक रोशन आत्ता त्या तमुक रस्त्यावरून पाण्यातनं चालत चालला आहे. आसपासच्या कुणाला त्याच्याकडे ढुंकून बघायचं सुचत नाहीये? कुणीच कुणाकडे न पाहता पाय ओढत फक्त चालत आहेत. चालत आहेत. दोन दिवसांनी ढगफुटी थांबल्यावर ‘दूध नाही, भाजी नाही’ म्हणून मी आणि संदेश बाहेर पडलो. पाणी वाहून गेल्यावरचा चिखल रस्त्यावर होता. काही अंतर पुढे गेलो असू तोच कुठूनसा गलका ऐकू आला. काही माणसं धावत पुरून येत होती. त्यातलं कुणीसं ओरडलं, ‘‘माहीमच्या खाडीची भिंत फुटली, पाण्याचा लोंढा येतो आहे, धावा!’’ याच्या शक्याशक्यतेच्या पलीकडे मला माझ्या डोळ्यासमोर एक लोंढा दिसला. लहानपणी पुण्यातल्या घराच्या खिडकीतनं तसा लोंढा पाहिला होता. पाऊस पडून गेल्यावर घराखालचा कोरडाठक्क ओढा अचानक प्रकटला होता. समोरच्या वळणावरनं अचानक वेगानं पाण्याचा लोंढा आला आणि ओढा तुडुंब वाहायला लागला. तो लोंढा आठवून मीही त्या रस्त्यानं धावणाऱ्या माणसांबरोबर धावायला लागले. ‘‘संदेश.. पाणी.. मरणार आपण!’’ असं काहीसं अस्फुट किंचाळत. त्या गलक्यातही संदेश भानावर होता, तो ओरडून मला सांगत राहिला, ‘अमृत, हे खरं नसणार. ही अफवा असणार. थांब, शांत हो! थांब!’ भेदरल्यासारखी जिवाच्या आकांतानं वेडीवाकडी धावले आणि अचानक जाणवलं, ‘हे खरं नसेल!’.. त्या जाणिवेनंतर हायसं वाटण्याऐवजी मोडून पडेन, असं वाटायला लागलं. संदेशचा हात हातात घट्ट धरून घराच्या दिशेनं चालताना जाणवलं, गेल्या दोन दिवसांमुळे मी आतून पुरती भेदरली आहे. त्या भीतीनं डोळ्यातनं पाणीही गळत होतं आणि ‘अशा अफवेवर कसा विश्वास बसला माझा’ म्हणून भेसूर भीतीचं हसूही येत होतं.
एखादं नातं काही एका क्षणात तुटत नाही. काही तरी चुकतं आहे, असं वाटत असतं, ते दुर्लक्षिलं गेलं तरी एके दिवशी समोर उभंच ठाकतं! पावसाचं आणि माझं तसं काहीसं होत चाललं आहे. ते मला स्पष्ट दिसतं आहे. पण त्याचं काय करावं कळत नाहीये. त्या दिवशीच्या म्हणजे २६ जुलैच्या त्या ढगफुटीनंतर मी त्याला प्रचंड घाबरते. त्यानंतरची किती तरी वर्षे जोरात पाऊस आला की, ‘२६ जुलै नाही ना’ असं वाटतं. पाय थरथरायचे. पण आता पूर्वी इतक्या बेमुर्वतीनं मी त्याला अद्वातद्वा बोलूही धजत नाही. तरी मनातनं राग येतोच. मी ‘जाता जाता पावसाने’ नावाची माझी गाण्यांची ध्वनिफीत गायले तेव्हा त्यातली पावसाशी हळुवार नातं सांगणारी  गाणी गाताना मी मनातनं म्हणत राहिले,‘‘असा रुमानी, हळवा आता गाण्यांमधनंच फक्त तू. प्रत्यक्षात घाबरवतोस फक्त मला. आता तू राहिला नाहीस होतास तसा..’’
आणि या वर्षी आता हे असं होऊन बसलं आहे.. पावसाळ्याच्या किती तरी आधी सोसायटीनं इमारतीच्या गच्चीवर ताडपत्रीचा मंडप घातला. ‘आता या पावसाळ्यात गळणं शक्यच नाही’ म्हणून मी मनातल्या मनात ‘हुश्श’ केलं आणि तो आलाच नाही. एक थेंबही. आधी वाटलं, ‘उशीर झाला या वेळी, न येऊन जातो कुठं!’ पण मी हे लिहीत असेपर्यंत त्याचा पत्ताच नाही. तो असा न सांगता निघूनच गेल्यावर त्याचं माझं किती काय काय गुंतलं आहे एकमेकांत ते उदमसतं आहे. ७ जूनची नेहमीची तारीख उलटून आता किती तरी दिवस उलटून गेले आहेत. आसपासचं पिवळं टक्क ऊन पाहून वाटतं आहे हा कायमचा गेला की काय?
 परवा, कुठल्याशा नात्याविषयी कुणाशी तरी बोलताना समोरचा म्हणाला, ‘‘हे बघ, नातं, मग ते कुठलंही असो जेव्हा फिस्कटतं ना, तेव्हा टाळी कधीच एका हातानं वाजलेली नसते..’’ मी माझ्या कोरडय़ाठक्क हाताकडे टक लावून पाहते आहे. ‘‘तू असा आहेस, तू असा आहेत’’ असं किती दिवस म्हणत राहणार मी? ‘‘तो न सांगता गेला’’ असं तरी कसं म्हणून? ढगफुटी झाली, गारपीट झाली, तेव्हा तो सांगतंच होता काहीसं.. टाळी एका हातानं नाहीच वाजत. टाळी माझ्याही हातानं वाजली आहे. त्यानंच तो निघून गेला आहे. ‘आता तुझी पाळी वीज देते..’’ ही ओळ अर्धवट सोडून.. आता उशीर झाला आहे, तरी त्याची भाषा ऐकावीच लागेल. आता तो नसताना एकटं वाटण्याचा हळवेपणाही काही कामाचा नाही. हळवेपणातही एक पळपुटेपणा असतो. पाहणं नसतं, जबाबदारी नसते. ती घ्यावी लागेल. जबाबदारी. कारण आता मला फार भीती वाटते  आहे. त्याच्याशिवाय कसं होणार? माझं? आपलं सगळ्यांचंच? याची खूप भीती. आता आयुष्य पणाला लागलं आहे. माझं, आपलं सगळ्यांचच.. मला तो परत हवा आहे. मी त्याला शरण आहे. मी त्याचं सगळं ऐकेन. माझा कोरडाठक्क हात पसरून मी केव्हाची आभाळाखाली उभी आहे. सगळे रागलोभ मागे टाकून मी आता अविरत प्रार्थना करते आहे. तो येण्याची.. त्यानं यावं म्हणून.. अविरत प्रार्थना!!
ताजा कलम-  मी हे लिहिल्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तो आला. पहाटे चारच्या सुमारास. आधी वाटलं स्वप्नातच पडतोय, पण तो खरंच पडत होता.. पण आता मी सगळ्याकडे लख्ख डोळ्यांनी पाहायचं ठरवलं आहे. ‘पाणीकपात’ या शब्दामुळे मी खडबडले. माझ्या प्रार्थनेचं मूळ माझी भीती आहे हे मी जाणते. तो आला आहे दुसऱ्याच कुणाच्या तरी निर्भय, स्वत:पलीकडे जाणाऱ्या प्रार्थनेने. त्या पहाटेच्या अंधारात मी त्याचं पडणं ऐकते आहे. मला आशा आहे त्या ऐकण्यात मला ती अनाम स्वत:पलीकडे जाणारी नि:संग प्रार्थना ऐकू येईल. मला ती ऐकायची आहे.