आषाढ संपून श्रावणाचं आगमन होतं ते उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरण घेऊनच. या महिन्यातला राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा दिवस. भावाबहिणीला प्रेमाच्या अतूट धाग्यात बांधणारा. संकटाच्या, अडचणीच्या वेळी धावून जाण्याचे वचन भाऊ तिला देतो खरं, पण आज मुलीसुद्धा भावाच्या कठीण प्रसंगात त्याचं रक्षण करतात. अशाच एका तडफदार बहिणीची भावासाठी दाखवलेल्या धाडसाची ही गोष्ट खास आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने.तनुजा प्रमोद चौधरी. दोन भावांच्या पाठीवरची बहीण. अर्थातच लाडकी. शिक्षण, नोकरी, लग्न अशा पायऱ्या ओलांडत सगळी भावंडं आपापल्या आयुष्यात स्थिरावली. सगळं सुरळीत चालू असताना मधला भाऊ (जयंत कमलाकर झांबरे) वारंवार आजारी पडू लागला. ‘हेपॅटायटीस सी’चं निदान झालं. पंचवीस वर्षांपूर्वी त्याला झालेल्या अपघाताच्या वेळी दिल्या गेलेल्या रक्तातून हा संसर्ग होऊन शरीरात त्यानं आपलं बस्तान बसवलं होतं. औषधोपचार चालू होते, पण फारसा गुण येत नव्हता. लिव्हर वा यकृताचं कार्य अत्यंत वेगानं क्षीण होऊन यकृत निकामी होत चाललं होतं. अशातच डॉक्टरांनी सांगितलं की यकृतरोपण शक्य तितक्या लवकर होणं गरजेचं आहे अन्यथा..
दादाच्या तब्येतीच्या निमित्तानं तनुजा कायमच डॉक्टरांच्या संपर्कात असे. त्यामुळे तिला या गोष्टीची कल्पना डॉक्टरांनी दिली होती. यकृतरोपणासाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवणं, दाता मिळण्याची वाट पाहणं, एवढाही वेळ हातात नव्हता. त्यामुळे जवळच्यांपैकीच कोणी यकृतदान केलं तर वाचण्याची शक्यता जास्त होती. दरम्यान ‘आपणच हे दान करूया’ असा विचार तनुजाच्या मनात येत होता. मोठा भाऊ आणि तनुजाचे पती यांचीही यकृतदानाची तयारी होती. पण वैद्यकीय कारणांमुळे ते जमलं नाही. योगायोगाने तनुजाच्या मनातल्या विचारांना डॉक्टरांनीच मूर्त रूप दिले. ते म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत दादाची सगळी जबाबदारी तू निभावली आहेस. तेव्हा तुझ्या यकृताचा काही भाग देऊन तूच दादाला जीवन देण्याचं काम करू शकतेस.’’ निर्वाणीचा क्षण आल्यावर मात्र तिची थोडी चलबिचल झाली. आपला संसार, दोन छोटी मुलं व पती, सगळं डोळ्यासमोर आलं. भावासाठी हे दान करण्याच्या नादात आपलंच काही बरंवाईट होऊन मुलं पोरकी तर होणार नाहीत ना? अशी भीतीही वाटली. पण क्षणभरच. आपल्या मनातले विचार तिनं निग्रहानं दूर केले. खरं तर तनुजा आणि तिचे पती प्रमोद यांची याबाबतीत चर्चा होऊन प्रमोद तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.
आईवडील आणि भावाच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर त्यांनी मात्र पूर्णपणे विरोध केला. एकाचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं त्यांना कसं रुचणार? पण दादाचा जीव वाचवणं हा आणि हाच विचार महत्त्वाचा आहे आणि आपल्याकडे वेळ थोडा आहे, बाकीच्या वाटा बंद आहेत हे तनुजाने त्यांना समजावून सांगितलं. डॉक्टरांनीही यकृतरोपणाची सगळी प्रक्रिया समजावून सांगून त्यांना आश्वस्त केले. आणि मग आवश्यक अशा सगळ्या वैद्यकीय चाचण्या आणि इतर सोपस्कार होऊन दोघेही गुरगाव येथे मेदांता हॉस्पिटलमध्ये भरती झाले . शस्त्रक्रिया होऊन तनुजाच्या यकृताचा काही भाग तिच्या भावाला जोडण्यात आला. डॉ. ए. एस. सोईन यांचे कौशल्य खरंच वाखण्ण्याजोगं!त्या वर्षी रक्षाबंधनाच्या महिनाभर आधी तनुजानं भावाला जीवनदान दिलं, तेही वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी ! एक अनोखं रक्षाबंधन साजरं झालं. भावाबहिणीच्या प्रेमाचं एक आगळं परिमाण लाभलेलं!
असंही रक्षाबंधन
आषाढ संपून श्रावणाचं आगमन होतं ते उत्साही आणि चैतन्यपूर्ण वातावरण घेऊनच. या महिन्यातला राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा दिवस.
आणखी वाचा
First published on: 29-08-2015 at 01:59 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan