संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांनी आपल्या कारकिर्दीत सहा हजार नाटय़प्रयोग केले. २२ भूमिका केल्या. ‘मंदारमाला’ नाटकानं तर अनेक विक्रम केले. रामभाऊंचं बहारलेलं संगीत दिग्दर्शन, अभिनय सामथ्र्य तिथे अनुभवायला मिळालं. या नाटकाचे त्या काळात एक हजार प्रयोग झाले. रामभाऊंचा हा वारसा पुढे त्यांचे पुत्र अनंत मराठेंनीच नव्हे तर आजच्या पिढीनेही पुढे चालू ठेवला आहे. मुलगे, मुली, सुना, नातवंडं सगळ्यांनीच संगीतासाठी वाहून घेतलं आहे. आज मराठे कुटुंबीयातील २२ जण संगीताच्या क्षेत्रात आपलं योगदान देत आहेत, एका अर्थी ही संगीत ‘मराठेशाही’च.
ठाण्यात रंगलेली एक नाटय़संगीताची मैफल. ओजस्वी स्वरधारांनी चिंब रसिकगण. अध्यक्षस्थानी प्रभाकरपंत पणशीकर! पंत भाषणाला उठले आणि उत्स्फूर्तपणे म्हणाले,
‘गाण्यातून उसळे सूरतालाची बरसात
वेडात मराठे स्वर निनादले सात’
आणि रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हे मराठय़ांचे सात स्वर म्हणजे संगीतभूषण पंडित राम मराठे यांचे दोन पुत्र, दोन सुना आणि तीन नातवंडं. त्या कार्यक्रमात हे सातजण तळपले, ‘सातच जण’ असं म्हणू या, कारण रामभाऊंच्या मुली-जावई-नातवंडं आणि पतवंडंसुद्धा मोजली तर हे सारे कलाकार, मोजून बावीस होतात. पूर्ण घराण्यात एकही न-कलाकार नाही. प्रत्येक जण रंगमंचावर गाऊ किंवा वाजवू शकतो. अगदी नियम सिद्ध करण्यापुरतासुद्धा अपवाद नाही.
मराठे घराणं संगमेश्वरजवळच्या अरवलीचं! मूळ गाव कळंबुशी! रामभाऊंचे वडील, अण्णा मराठे बरीच वर्ष गावच्या उत्सवी नाटकात काम करत असत, तर चुलते नाटय़संगीत उत्तम गात असत. अण्णा आणि गणपतकाकांनी गावातले कलाकार म्हणून लोकप्रियता मिळवली होती. तिथपासून मोजलं तर आज मराठय़ांची पाचवी पिढी रंगमंच आणि अभिजात गायन-नाटसंगीताच्या क्षेत्रात गाजते आहे.
रामभाऊंचं बालपण पुण्यात गेलं. खेळता खेळता डब्यांवर ताल धरणाऱ्या बालकाला वडिलांनी चाणाक्षपणे तबल्याची तालीम सुरू केली, पण कुटुंबाचे दिवस फिरले आणि लहान वयातच रामभाऊंवर घराची जबाबदारी येऊन पडली आणि या हरहुन्नरी बालकाला ‘बालकलाकार’ म्हणून नोकरी मिळाली. विष्णुपंत पागनीसांनी या गुणी बालकाला हेरलं आणि बोट धरून ‘प्रभात’ कंपनीत नेलं. ‘प्रभात’मध्ये या हिऱ्याला पैलू पाडायला अनेक गुणवंत होतेच! मास्टर कृष्णराव तिथे छोटय़ा रामला पदं शिकवत. कुशाग्र बुद्धीचा राम ते एका तालमीत शिकून घेई आणि ध्वनिमुद्रणाला तयार होई. ते आटोपलं की चित्रीकरण! चित्रपती व्ही. शांताराम आणि पुढे मेहबूब यांसारख्या मातब्बर दिग्दर्शकांनी छोटय़ा रामला अभिनयाचे बारकावे शिकवले.
‘गोपालकृष्णा’तला हा निरागस कृष्ण त्या काळात आपल्या करंगुळीवर आपल्या कुटुंबाचा गोवर्धन तोलून धरत होता, हे सांगितलं तर खरं वाटणार नाही. रामचे धाकटे बंधू अनंत मराठे यांनीही एव्हाना चित्रसृष्टीत आपले पाय रोवले होते. आपल्या देखण्या रूपानं ‘रामशास्त्री’मधून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली.
गोपालकृष्ण ते संगीतभूषण पंडित राम मराठे हा प्रवास फार खडतर.. अपार कष्टाचा होता. अनेक गुरू केले. स्वाभिमानाने पण नम्रतेने जे जे भावलं ते ते टिपून घेतलं. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर तीनही घराण्यांची गायकी आत्मसात करून स्वत:ची एक विशेष शैली विकसित केली. अभिजात संगीतात किती खोल उतरले तरी त्यांचं नाटय़संगीतावरचं आणि नाटय़ प्रयोगांवरचं प्रेम कायम राहिलं. १९५० ते १९८८ या कालखंडात रामभाऊंनी जवळजवळ सहा हजार नाटय़प्रयोग केले. चार हजार मैफली रंगवल्या आणि सारं सांभाळून शेकडो शिष्यही घडवले. रामभाऊंच्या ताना जितक्या आक्रमक, पल्लेदार तितकीच त्यांची कष्टांची तयारीही अफाट आणि चौफेर असे. दिवसभराचे तीन नाटय़प्रयोग करून आल्यानंतरही रात्री २ वाजता ते पं. विश्वनाथ बागुलांसारख्या जिज्ञासू शिष्याला शिकवत.
पहाटे चार वाजता स्वत:ची ‘ओंकार साधना’ करत. सकाळी ६ पासून शिष्यवर्गाची तालीम. मग सकाळी ११ ते १ थोडी विश्रांती असा त्यांचा दिनक्रम.
या साऱ्यातून आपल्या चार मुलांना रामभाऊंनी कधी आणि कसं शिकवलं असेल? ज्येष्ठ कन्या मंगल आणि दुसरी रतन (वीणा नाटेकर) या दोघींच्या कानावर सतत बाबांचं शिकवणं पडत राहिलं, पण ते इतरांना शिकवताना, बाबांचे दौरे आणि मैफली यातून आम्हाला थेट तालीम फारच कमी मिळाली, अशी दोघींची हुरहुर. पण या दोन्ही मुली संगीत शिक्षिका झाल्या. अनेक कार्यक्रमांमध्ये हौसेने भाग घेतला आणि दोघींची सर्व मुलं उत्तम संगीत शिकली. मंगलताई आणि पती रघुवीर ओक यांनी रामभाऊंचं स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेम आणि समाजसेवेचा वारसा सांभाळला, तर दुसरे जावई म्हणजे पंडित प्रदीप नाटेकर हे रामभाऊंचे पट्टशिष्यच! नाटेकरांना रामभाऊंचा भरपूर सहवास लाभला. कारण सुरुवातीपासूनच गुरूसोबत तंबोरा घेऊन बसायची संधी त्यांना मिळाली.
नाटेकर म्हणतात, ‘‘रामभाऊ गुरू म्हणून इतके थोर होते की शब्दात सांगणं कठीण. स्वत:जवळचं गानवैभव तर भरभरून दिलंच, पण दौऱ्यांमुळे शिकवायला वेळ कमी पडतो म्हणून नाटकांचे दौरे सुरू झाले की दादरला किंवा साहित्यसंघात प्रयोग झाला की, त्यानंतर अपरात्रीही गिरगावात नाटेकरांच्या घरी गुरू हजर. ‘उठ.. दोन तास गा’ आणि ही शिकवणी करून पहाटेनंतर रामभाऊ घरी परत जात.’’ मैफल रंगवायची कशी हे गाण्याच्या शिकवणीत कधीच कळत नाही, तर साथ करताना ते बारकावे आत्मसात करता येतात. नाटेकरांच्या सुदैवाने त्यांनी रामभाऊंना शेकडो मैफलीत साथ केलीय. आता पूर्ण मराठे कुटुंबाला शिकवून ते गुरूऋणातून उतराई होत आहेत.
रामभाऊंचे पुत्र.. संजय आणि मुकुंद.. दोघांनी रामभाऊंच्या कारकिर्दीचा सुवर्णकळस अनुभवला. अगदी लहानपणी वडिलांनी त्यांना फारसं समोर बसवलंच नाही. रामभाऊंचं म्हणणं होतं, ‘आधी शिक्षण!.. उपजीविकेचं साधन निर्माण करा, आणि शिवाय गाणं करा. काळ बदलत असतो..’ विनामूल्य संगीत शिकवणाऱ्या रामभाऊंनी मानधन किंवा व्यावहारिक गोष्टींना कधी जास्त महत्त्व दिलं नाही.
संजय मराठे सांगतात, ‘‘मॅट्रिक झाल्यानंतर मात्र वडिलांनी पद्धतशीर गाणं शिकवलं. भल्या पहाटे मुलांना उठवत ते. आवाज लावायला शिकवत. गाण्याचं पावित्र्य जपणं हे असं नकळत अंगात मुरत होतं. दोन्ही मुलं गाण्यापूर्वीच तबला-पेटी शिकू लागली आणि दोघांनी कोवळ्या वयात आपल्या वडिलांना पेटी-तबल्याची साथही केली. रामभाऊ तर लयकारीचे बादशहाच! ते स्वत: तबला वाजवून ख्यालगायनही करू शकत. त्यांच्याबरोबर तबला वाजवायचा म्हणजे मोठमोठय़ा तबलावादकांना घाम फुटायचा अशी आठवण तालयोगी पंडित सुरेश तळवलकरही सांगतात. हे तबलाप्रेम मुकुंद आणि नातू रोहित यांच्यात उतरलं.
कोकणात नाटकाचा दौरा असला की खुल्या रंगमंचावर गाताना खाऱ्या हवेचा त्रास रामभाऊंच्या गळ्याला व्हायचा. पण गाण्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर मात केलीच पाहिजे, असा रामभाऊंचा आग्रह. मुकुंद मराठे सांगतात, ‘‘गळ्याला खाऱ्या हवेची सवय करायला रामभाऊ ६ महिने पहाटे ४ वाजता चौपाटीवर जात असत. बरोबर दोन्ही पोरांना घेऊन जायचे. वाळूत किल्ले करता करता सूरज्ञान पक्कं झालंच, पण कलेसाठी किती अपार मेहनत घ्यावी लागते आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्याची जिद्द बाळगावी लागते याचे बाळकडूच मुलांना मिळालं.’’ आपल्या कुशाग्र बुद्धीनं आणि अनुभवानं रामभाऊ प्रत्येकाची आवड आणि कुवत जोखत असत. ‘वादीसंवादी’ हे आपले विठ्ठल रखुमाई.. त्यांचं पावित्र्य राखा’ ही त्यांची शिकवण.. त्यांनी संजयला त्याची आवड ओळखून आलापी आणि स्वरप्रधान गायकी दिली तर मुकुंदाला आग्रा शैलीनं गाणं सोपं जातं हे हेरलं. त्याला लयकारी.. बोलताना शिकवल्या. प्रत्येकाची बलस्थानं हेरून रामभाऊंनी फुलवली. ते कधी रागावले नाहीत, मारलं नाही. पण रियाज चुकवला की संतापायचे.
संजयनं शाळेत संगीत शिकवण्याचं व्रत घेतलं तर मुकुंदानं चौफेर संचार केला. बँकेतली नोकरी- खगोल विज्ञानाचे कार्यक्रम, शिकवण्या, संगीतनाटकात कामं करून त्यानं अलीकडे संगीत नाटकं बसवली. जुना अभिजात आणि नाटय़संगीताचा खजिना मिळवून त्यानं रसिकांना खुला केला. नादब्रह्म संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम केले.
मंगला ओक यांच्या तीनही मुलींनी गाणं खूप गंभीरपणे घेतलं. धनश्री-भाग्यश्री-राजश्री इतकं की राजश्रीला (आताच्या पल्लवी पोटे) यंदा प्रतिष्ठेच्या सवाई गंधर्व गानमहोत्सवात संधी मिळाली. रामभाऊंनंतर सवाई-गंधर्व महोत्सवात गाताना लोकांच्या अपेक्षा तिच्यावर केंद्रित झाल्या होत्या आणि तिनंही त्या पूर्ण केल्या. पल्लवीचे पती मिलिंद पोटे हेही उत्कृष्ट तबलावादक आहेत. भाग्यश्री-ओक केसकरनं नाव मिळवलंच पण ती आणि ध्वनीतंत्रज्ञ पती आशिष केसकर यांनी पुण्यात ‘ओरायन’ हा अत्याधुनिक स्टुडिओ काढला.
संजयचा मुलगा भाग्येश आणि मुलगी प्राजक्ता, तर मुकुंदाची मुलगी स्वरांगी. प्राजक्ता आणि स्वरांगीनं अनेक पारितोषिकं-शिष्यवृत्त्या मिळवून गाणंच करायचं ठरवलं, तर भाग्येशनं सुरुवातीला तबला, नंतर विदेशी तालवाद्य असा प्रवास केला. आता तो वडील आणि पंडित केदार बोडस आणि पं. सुहास व्यास यांच्याकडे ५-६ तास गाणं शिकतोय. स्वरांगीनं मध्यंतरी अनेक मालिकांमध्ये अभिनय करून आजोबांचा हाही वारसा घेतल्याचं सिद्ध केलं. मग गुरू अश्विनीताई भिडे यांच्याकडे शिकण्यासाठी साऱ्या दैनंदिन मालिका एका क्षणात सोडूनही दिल्या. पण चित्रपट आणि चांगलं संगीत नाटक मिळाल्यावर ते स्वीकारलं. ‘अवघा रंग एकचि झाला’ म्हणत अनेक पुरस्कार मिळवले. नाटेकरांच्या मृणालनं आपल्या वडिलांची म्हणजे पर्यायानं आजोबांची गायकी उचलली. सध्या ती रामभाऊंच्या प्रसिद्ध जोड-रागांचा रियाज करतेय.
रामभाऊंच्या दोन पतवंडांनी अलीकडेच या क्षेत्रात आपल्या घराण्याची नवी पताका रोवली आहे. अद्वैत केसकर आणि आदिती केसकर या भाग्यश्रीच्या मुलांनी बालकलाकार म्हणून नाव मिळवलं होतंच. पण लता मंगेशकर म्युझिक्सतर्फे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘सचिन मी होणार’ या सीडी संचात दोघं गायले आहेत.
संगीताचं ज्ञान असणं, अभ्यास करणं, आपल्या सांगीतिक प्रतिभेनं प्रत्येक मैफल रंगवणं आणि संगीत शिकवणं या तीनही गोष्टी अगदी वेगवेगळ्या आहेत. त्यासाठी प्रज्ञा, प्रतिभा आणि संस्करणक्षमता या गुणांचा संयोग गरजेचा आहे. रामभाऊंमध्ये हे गुण प्रकर्षांनं होते आणि नवलाची गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंब सदस्यांमध्ये गाणं शिकवण्याची आवडसुद्धा झिरपली आहे हे विशेष. संजय-मुकुंदा, प्रदीप नाटेकर हे नामांकित गुरू आहेत. इतर कोणत्याही व्यापात असले तरी शिकवण्याच्या वेळाशी तडजोड नाही हे तत्त्व ते पाळतात. स्वरांगीच्या जोपासनेसाठी केतकीनं स्वत:चं संगीत थोडं बाजूला सारलं तरी मराठय़ांची ही सून अतिशय कडक शिस्तीची गुरू आहे.
रामभाऊंच्या सर्व नातवंडांनी संगीत शिक्षणासाठी असणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या मिळवल्या. स्वरांगीला तर संगीत आराधनेसाठी केंद्र शासनाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. स्वरसंस्कार जपताना आपल्या आजोबांचं नाव मोठं करण्याची जिद्द साऱ्या मुलांमध्ये आहे. तसंच अभिज्ञात संगीतात आणि नाटय़ संगीतात तरुणाईला आवडेल असं काही तरी करायची इच्छा भाग्येशनं बोलून दाखवली.
रामभाऊंनी सहा हजार नाटय़प्रयोग केले. २२ भूमिका केल्या. पूर्ण मराठे घराण्यातले गाते गळे मोजले तर ते २२ भरले (पुढे ते वाढतीलच) ‘मंदारमाला’ नाटकानं अनेक विक्रम केले. रामभाऊंचं बहारलेलं संगीत दिग्दर्शन, अभिनय सामथ्र्य तिथे अनुभवायला मिळालं. या नाटकाचे त्या काळात एक हजार प्रयोग झाले. यंदा मंदारमालेला पन्नास वर्ष होत आहेत. रामभाऊंचीही कामगिरी तर इतिहासात नोंदली गेलीच. पण त्यांचे शिष्य आणि कुटुंबीय मिळून तीन क्षेत्रात त्यांचा वारसा जपताहेत हे अधिक मोलाचं.
रामभाऊंच्या ठाणे शहरातल्या बंगल्याचं नाव आहे ‘नादब्रह्म!’ इथे पहाटे चारपासून संगीताची आराधना सुरू होते. पूर्वी रामभाऊंच्या लहान घरातही मोठमोठे कलाकार प्रेमानं येत. आता सुसज्ज हॉल झालाय. सारे कलाकार गुरूऋण मानून इथं गाऊन जातात. संजय, मुकुंदा, केतकीचे शिष्यगण दुरून शिकायला येतात. रामभाऊंनी घर बांधल्यावर म्हटलं होतं, ‘इथे २४ तास तंबोरे वाजत राहायला हवे’ साऱ्या कुटुंबानं ते शब्द खरे ठरवले. ‘मराठेशाही’ म्हणतात ती हीच असावी, नाही का?
संगीत ‘मराठेशाही’
संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे यांनी आपल्या कारकिर्दीत सहा हजार नाटय़प्रयोग केले. २२ भूमिका केल्या. ‘मंदारमाला’ नाटकानं तर अनेक विक्रम केले.
आणखी वाचा
First published on: 13-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व कुटुंब रंगलंय... बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rambahu marathe and his family