वैवाहिक जीवनातील शरीरसंबंधात बलात्कार शक्य आहे का? बायकोची इच्छा नसताना, तिच्या मर्जीविरुद्ध नवऱ्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तो बायकोवर बलात्कार होतो का? नवऱ्याबरोबरच्या शरीरसंबंधास नकार देण्याचे स्वातंत्र्य, इतका अधिकार स्त्रीचा स्वत:च्या शरीरावर असतो का? लग्नानंतर हा अधिकार तिच्या एकटीचा असू शकतो का ? दिल्ली उच्च न्यायालयाच्या या विषयावरील निकालामुळे निर्माण झालेले हे काही प्रश्न.
विवाहानंतर नवऱ्याने बायकोशी तिच्या इच्छेविरुद्ध किंवा जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्यास त्याला ‘बलात्कार’ म्हणता येत नाही, अशा अर्थाच्या दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या त्रोटक बातमीने स्त्री हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. ज्या बातमीमुळे हा प्रश्न चच्रेत आला त्या बातमीतील दावा भारतीय दंड संहितेखालील ‘बलात्कार’ या कलमाच्या अंतर्गत होता. त्या दाव्यात दिलेल्या आणि सिद्ध झालेल्या घटनांच्या संदर्भातच हा निर्णय वाचायला हवा. त्या कलमात दिलेल्या मुद्दय़ांची वादातीत सिद्धता, त्या दाव्यातील घटना, त्यांचा पुरावा यावर आधारित निर्णय इतर दाव्यांना लागू करताना त्यासाठीच्या काटेकोर चाचण्या लावण्यात येतीलच, पण यानिमित्ताने वैवाहिक जीवनातील शरीरसंबंधातील बलात्कार हा विषय पुन्हा एकदा चच्रेसाठी समोर आला आहे. वैवाहिक शरीरसंबंधात बलात्कार शक्य आहे का? बायकोची इच्छा नसताना, तिच्या मर्जीविरुद्ध नवऱ्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तो बायकोवर बलात्कार होतो का? नवऱ्याबरोबरच्या शरीरसंबंधास नकार देण्याचे स्वातंत्र्य, इतका अधिकार स्त्रीचा स्वत:च्या शरीरावर असतो का? हे स्त्री हक्क चळवळीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत.
स्त्री आणि तिचा स्वत:च्या शरीरावरील हक्क हा कायमच वादाचा मुद्दा राहिला आहे. ‘स्त्रीचा स्वत:च्या शरीरावर हक्क असणे’ हे तत्त्वत: आणि व्यक्तिगत पातळीवर अमान्य असण्याचे काहीच कारण नाही, पण ते केवळ स्त्रीचाच, किंबहुना एकटय़ा स्त्रीचा विचार केला तर. सर्वोच्च न्यायालयाने काही विशेष निर्णय दिले आहेत त्यामध्ये वेश्येलादेखील कोणी, कसे व कधी तिच्याशी शरीरसंबध ठेवावेत याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे इथपासून ते अगदी ३ महिन्यांच्या बालिकेतही ‘स्त्रीत्व’ आहे अशा प्रमुख निर्णयांचा समावेश आहे; पण विवाहित स्त्री म्हटली की हा विषय तिच्या एकटीपुरता मर्यादित राहत नाही. संपूर्ण विषयच अतिशय गुंतागुंतीच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या समस्येचे रूप धारण करतो.
‘बलात्कार’ या शब्दाला एक वेगळाच अर्थ आणि घृणास्पद परिमाण आहे. तेच परिमाण विवाहोत्तर शरीरसंबंधांना लावणे हा विचारही करवत नाही. विवाहोत्तर शरीरसंबंधाबाबतीत वेगळा आणि जास्त सावध काळजीपूर्वक विचार करावा लागतो. विवाहानंतर स्त्री आणि पुरुष – एक जोडपं म्हणून एकत्र सहजीवनाला सुरुवात करतात. या संदर्भात सामाजिक उतरंड, नियम, प्रथा आणि प्रस्थापित नात्यांची पाश्र्वभूमीदेखील आपल्याला विचारात घ्यावी लागते.
सर्वप्रथम ‘विवाहसंस्था’ दोन व्यक्तींच्या (येथे स्त्री-पुरुष असेच अभिप्रेत आहे.) शरीरसंबंधाला असलेली सामाजिक मान्यता उद्धृत करते. लग्न करतानाच पती व पत्नी स्वेच्छेने एकमेकांशी शरीरसंबंध ठेवण्यास मान्यता देतात हे या बाबतीत पायाभूत गृहीतक मानायला हवे. विवाह करतानाच आपण एकमेकांना जन्माचे सोबती म्हणून स्वीकारताना शरीरसोबती म्हणूनही स्वीकारत आहोत याची प्रत्येकास जाणीव असणे अपेक्षितच असते. एकदा हे गृहीतक मान्य केले की एकटय़ा स्त्रीचा किंवा एकटय़ा पुरुषाचा स्वत:च्या शरीरावर असलेला अधिकार सीमित होतो. विवाहविषयक कायद्यामध्ये विवाहानंतर जोडीदारांचा एकमेकांबरोबर वैवाहिक शरीरसुख व संसारसुख उपभोगण्याचा हक्क तसेच अधिकार ‘वैवाहिक जीवनाची पुनस्र्थापना’ करण्याच्या तरतुदीतूनही अधोरेखित केला आहे. वरील गृहीतक मान्य केले की पती/पत्नीची एकमेकांना आपसांतील शरीरसंबंधास संमती असणे व इच्छा असणे अध्याहृत आहे, पण जेथे मानवी संबंधांचा प्रश्न येतो तेथे सगळ्या गोष्टी कधीच इतक्या साध्या सोप्या आणि सरळ नसतात.
वैवाहिक शरीरसंबंधात एकमेकांना वाटणारे एकमेकांविषयीचे प्रेम, परस्परांचा शारीरिक स्वीकार, ओढ-आकर्षण इ. गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात. जोडप्यापकी एकाच्याही मनात या भावना नसल्या, त्यांच्या नात्यात कोणत्याही कारणाने दुरावा असला, अनैर्सिगक शरीरसंबंधांची वा क्लेशकारक/वेदनादायी शरीरसंबंध सातत्याने केले जात असतील तर वैवाहिक शरीरसंबंध निश्चितच नकोसा वाटू शकतो. शरीरसंबंध नकोसे वाटण्याची अनेक कारणे असू शकतात, पण प्रत्येक वेळेलाच नको असताना किंवा इच्छा नसताना पती-पत्नीत झालेल्या शरीरसंबंधास ‘बलात्कार’ म्हणता येईल का?
शरीरसंबंधाची इच्छा नसण्याची अनेक कारणे असू शकतात. लहान जागा किंवा घरात जास्त माणसांचा सतत वावर अथवा तत्सम कारणाने एकांताचा अभाव, आयुष्यातील इतर ताणतणाव, शारीरिक दमणूक, तब्येतीची तक्रार यामुळेही जोडीदारांपकी एखाद्याची शरीरसंबंधाची इच्छा नसू शकते. घरातील किंवा नोकरीतील काही ताणतणावांमुळे अनेक जोडप्यांच्या शरीरसंबंधावर परिणाम होतोच. अगदी नवरा-बायकोत सतत वाद घडत असले तरी त्यामुळेदेखील जोडीदाराशी संबंध ठेवण्याची इच्छाच नसल्याचे महिलाच काय, पण पुरुषही सांगतात; पण असे प्रसंग साधारणत: तात्कालिक असतात. बऱ्याच काळापर्यंत सातत्याने अशा घटना घडल्या तरच सहसा याबद्दल तक्रार केली जाते, पण अशा घटनांना बलात्कार म्हणणे योग्य ठरणार नाही.
वर नमूद केलेल्या कारणांव्यतिरिक्त स्त्रीस नैर्सिगकरीत्याच पुरुषांपेक्षा संभोगेच्छा ((Libido ) कमी असते असे मानले जाते. यातील वैज्ञानिक खरेखोटेपणा बाजूला ठेवला तरी दोन स्वतंत्र व्यक्तींच्या इच्छांमध्ये फरक असणे साहजिकच आहे. जोडप्यापकी एकाची संभोगेच्छा तीव्र असेल व दुसऱ्याची नसेल तर प्रत्येकच वेळेस एकाची इच्छा नसताना घडलेला शरीरसंबंध ‘बलात्कार’ मानावा का? मग दुसऱ्या बाजूस अशा वेळी त्यापकी एकास ‘मन मारून’ शरीरसंबंध न ठेवता राहावे लागत असेल तर त्याला काय म्हणायचे? इच्छा असणे आणि संमती असणे या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. वैवाहिक शरीरसंबंधात दोन्ही गोष्टींचा विचार करणे अपरिहार्य आहे!
साधारणत: आपल्याकडील सामाजिक पाश्र्वभूमी बघितली तर असं दिसतं की, मुलींच्या मानाने मुलांना सेक्सविषयीची माहिती खूप जास्त आणि खूप सहज मिळत असते. याविषयी मोकळेपणे बोलणे, पोर्न वेबसाइटसना भेट किंवा अगदी ब्लू फिल्मस पाहणे मुलांना जास्त सहज शक्य असते. मुलींच्या मानाने मुलांच्या ‘मर्दानी’, ‘पुरुषी’ असण्याच्या संकल्पनेत ‘शरीरसंबंधात जास्त पुढाकार घेणे, त्याचे जास्त आकर्षण असणे’ हा एक महत्त्वाचा भाग असतो. त्यामानाने मुलींना याविषयी माहितीही कमी असते आणि त्यांना अशी माहिती नसणे हे त्यांच्या ‘कुलीन’, ‘शालीन’ असण्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे पौगंडावस्थेपासूनच्या शरीरसंबंधाविषयीच्या स्वप्नांची पूर्तता विवाहानंतर करण्यासाठी उत्सुक असलेला मुलगा आणि शरीरसंबंधाविषयी फारशी माहिती नसण्यातच जिची गुणवत्ता आहे अशा मानसिकतेची मुलगी यांच्यातील शरीरसंबंध सुखावह आणि दोघांनीही पूर्तता वाटेल असे होण्यासाठी, दोघांनाही काही तडजोडी कराव्या लागणारच. आपापल्या मनाला, आपल्या स्वप्नांना मुरड ही घालावी लागणार, काही काळ जाऊ द्यावा लागणारच.
घटस्फोटासाठी येणाऱ्या पक्षकारांशी चर्चा करताना महिला पक्षकार हमखास करत असलेल्या काही तक्रारी म्हणजे नवऱ्याला त्याच्याबरोबर बायकोने ब्ल्यू फिल्म बघून तसे तिनेही वागावे असे वाटते, जे बायकोला अजिबात आवडत नाही. बायकोच्या मते नवरा वेळी-अवेळी तसेच मासिक पाळीतही शरीरसंबंधाची मागणी करतो. भांडण झाले तरी शरीरसंबंध मात्र नेहमीसारखेच त्याला हवे असतात, अशी अनेक कारणे सांगितली जातात. याउलट पुरुष अनेक कारणे देतात- बायको थंड राहते किंवा प्रतिसादच देत नाही, आयत्या वेळी जुने वाद उकरून अडवणूक करते, त्यामुळे त्यांना इच्छाच राहत नाही, बायको काही तरी कारण सांगून सारखेच शरीरसंबंध टाळते, त्यामुळे त्यांना शरीरसुखापासून वंचित राहावे लागते आदी. साधारणत: या प्रमुख तक्रारी पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल वरीलपकी सर्व कारणे स्त्री-पुरुषाच्या दोन वेगळ्या मानसिकतेतून निर्माण होणारी असल्याने योग्य समुपदेशनातून किंवा एकमेकांना समजावून घेण्यातूनही सुटू शकणाऱ्या समस्या आहेत.
मात्र त्याच बरोबर हेही लक्षात घ्यायला हवे की आता बदलत्या काळाबरोबर सर्वच नात्यांची, प्रेमाची व्याख्या बदलू लागली आहे. युनिसेक्स जीम, सलोन्सबरोबरच स्त्री-पुरुषांच्या मोकळेपणाने एकत्र येण्याच्या संधी झपाटय़ाने वाढत आहेत तसे विचारही बदलत आहेत. मला आठवतंय, एका कौटुंबिक कार्यक्रमात वेगवेगळ्या वयांच्या महिलांच्या गप्पा रंगल्या असताना त्यातील एका नवविवाहित तरुणीने लाडिक तक्रार केली, ‘हा मला ‘आय लव्ह यू’ म्हणतच नाही.’ तेव्हा त्यातल्या एका आजींनी तिला सांगितले की, ‘शरीरसंबंध ठेवणे म्हणजेच पुरुषांच्या मते ‘आय लव्ह यू’ म्हणणे असते ते वेगळे कशाला म्हणायला हवे?’ या जुन्या विचारापासून आजची स्त्री स्वत:च्या सेक्सविषयक गरजांची जाणीव असणे, त्या अपेक्षा तिने स्पष्टपणे व्यक्त करणे, सेक्सविषयी तिची स्पष्ट मते असणे इथवर पोहोचली आहे. ‘व्हजायनल मोनोलॉग्ज’च्या मराठी सादरीकरणास मोठय़ा संख्येने उपस्थित राहणाऱ्या आणि दाद देणाऱ्या सर्व वयोगटांतील महिला याचा पुरावा आहे. तसेच किमान शहरी उच्चभ्रू वर्गातून विवाहाअगोदर पुरुष मित्र जसे बॅचलर पार्टी करतात तशा जिगोलो बोलावून पाटर्य़ा करणे, इंटरनेटवर अशा साईटसचं सर्फिग करणे,मोकळेपणे लिव्ह इन रिलेशन्सचा पर्याय चोखाळून पहाणे, कॉलेजवयीन मुलीला बॉयफ्रेंड असणारच हे स्वीकारणे असे घडताना दिसू लागले आहे. असे दाखवणारे सिनेमेही युवावर्गात लोकप्रिय होताना दिसत आहेत. हे झपाटय़ाने बदलणारे भविष्य आपल्यापासून फार दूर नाही. शरीरसंबंधविषयक जास्त जागरूक झालेली स्त्री स्वत:च्या शरीराबद्दल, शरीरसंबंधांबद्दल, तिने शरीरसंबंध कसे ठेवावेत, त्यातून तिला सुख कसे मिळेल, तिला नेमके काय नको आहे याबद्दल निश्चितच आग्रही असणार आहे. तिच्या शरीरसुखाच्या कल्पनांबद्दल ती ठाम असेल. स्त्री म्हणून तिच्या भावना आणि विचारही हळूहळू जास्त तरल आणि संवेदनशील होत जाणार आहेत. तेव्हा ‘जबरदस्तीचे वैवाहिक शरीरसंबंध बलात्कार ठरू शकतो की नाही’ या विषयाला खरे तोंड फुटेल.
पण हा संपूर्ण विषयच अतिशय नाजूक, गुंतागुंतीचा आणि खासगी असल्याने यावरील चर्चासुद्धा जणू ‘टाइट रोप वॉक’ आहे. या विषयावर कायदा झालाच तरीदेखील असे दावे चालवणे, त्यावर निर्णय देणे हे कठीणच असणार आहे. अशा दाव्याशी संबंधित पक्षकार, वकील आणि न्यायालय या साऱ्यांच्याच भावनाशीलतेची, सामाजिक आणि सांस्कृतिक समजांची ती कसोटीच असणार आहे.