राष्ट्रवादी युवती काँग्रेसचा ५० वा राज्यस्तरीय मेळावा नुकताच औरंगाबादमध्ये झाला. व्यासपीठावरून मुलींनी ज्या निर्भीडपणे विचार मांडले त्यावरून या मुलींमध्ये आत्मभान निर्माण होण्याची सुरुवात झाल्याची खात्री पटते. ही सुरुवात आहे.. राष्ट्रवादी युवती काँग्रेसने राजकीय अजेंडय़ाच्या पलीकडे जाऊन युवतींमध्ये जाणीव-जागृतीची ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवली, तर भविष्यात त्यातून चांगल्या गोष्टी निश्चितच दिसतील.
रा ज्यात हुंडाबळीविरोधी कायदा आहे, पण आजही हुंडा मागितला जातो. अशा मागणाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे हा कायदा अजून कठोर करावा, अशी माझी विनंती आहे.. अमरावतीहून आलेल्या आरतीनं राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडेच थेट ही इच्छा व्यक्त केली.
मी अत्यंत गरीब घरातली आहे. माझ्या आईवडिलांनी कर्ज घेऊन मला शिकवलं, त्यामुळं मी आज डी.एड.पर्यंत शिकू शकले.. मला त्यांच्यासाठी काही करायची इच्छा आहे, पण नोकरी हवी असेल तर पसे भरा, असं सांगितलं आहे. मी काय करू?.. बीडच्या सुरेखानं प्रश्नच उपस्थित केला.
ताई, माझे पालक अत्यंत गरीब आहेत. दोघेही मोलमजुरी करून आम्हाला वाढवत आहेत. घरची प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यातच आम्ही खुल्या वर्गातील असल्याने आम्हाला शिक्षणात कोणतीही सवलत मिळत नाही. त्यामुळे इच्छा असूनही पुढचे शिक्षण घेऊ शकत नाही. शिक्षण फुकट घेणे मलाही मान्य नाही, पण आमच्यासारख्या आíथकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही सवलत सरकारने द्यावी.. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून आलेल्या राणी गाडने आपले गाऱ्हाणे मांडले.
वाशीमहून आलेल्या एका मुलीने विचारले की, मला पाच दिवस कॉलेज बुडवून रोजगाराला जावे लागते. माझ्यासारख्या मुलींसाठी सरकार काही करणार आहे की नाही?..
औरंगाबादला नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ५० व्या मेळाव्याच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मुलींनी व्यक्त केलेली ही मते, मांडलेले प्रश्न. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व्यासपीठांवर अनेकदा शहरी भागांतील युवतींना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरच अधिक चर्चा केली जाते आणि त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न होताना दिसतो, पण ग्रामीण भागांतील या सावित्रींच्या लेकींच्या प्रश्नांची मुंबई-पुण्यासारख्या महानगरातल्या लोकांना कल्पनाही येणे कठीण, पण या मेळाव्याच्या निमित्ताने हे वास्तव समोर आले. या मेळाव्यात या युवतींनी मांडलेले हे प्रश्न ऐकून शैक्षणिक, सामाजिकबाबतीत महाराष्ट्र किती मागासलेला आहे, याचे दर्शन घडते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी युवतींना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि राजकीय प्रश्नांबाबत जाणीव-जागृती व्हावी आणि त्यातून सक्षम राजकीय नेतृत्व उभे राहावे, या उद्देशाने राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने हे व्यासपीठ उभे केले असल्याची राजकीय टीका होत असली किंवा आणखी राजकीय हेत्वारोप होत असले तरी त्यापलीकडे जाऊन विचार केला तर अनेक सकारात्मक बाबी दिसून येतात. विशेषत: राजकारणाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी म्हणजे तरुणींसाठी हे व्यासपीठ आहे. एकूण महिलांच्या राजकीय सहभागाकडे उपेक्षेनेच पाहिले जाते, त्या पाश्र्वभूमीवर या व्यासपीठाचे महत्त्व वेगळे आहे. म्हणूनच जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून आलेली राणी गाड आपले म्हणणे मांडत होती की, ‘‘सध्या शिक्षणाचा बाजार झाला आहे. गरिबीमुळे अनेक जण योग्य शिक्षणापासून वंचित राहतात. मुलीच्या शिक्षणासाठी वडील कर्ज घेतात. त्यानंतर तिच्या लग्नासाठी कर्ज घ्यावे लागते. शेवटी कर्जाचाच डोंगर वडिलांच्या डोक्यावर राहतो. त्याचमुळे मुलगी ही वडिलांना ओझे वाटते. म्हणून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी सरकारने ठोस काही केले पाहिजे..’’ या मनोगताने उपस्थितांच्या मनाचा ठाव तर घेतलाच, पण तिच्या या भावनांची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी तिच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली.
 समाजात अशा किती तरी राणी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठीही अशाच मदतीची गरज आहे. त्यांचीही दखल कुणी घेईल का? हा खरा प्रश्न आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने निदान त्या गरजेला आवाज फुटला.
 सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून आलेल्या मीता परब आणि पल्लवी रेगे म्हणाल्या, ‘‘या मेळाव्यामुळे आमचा आवाज ऐकणारे कुणी तरी आहे याची जाणीव झाली. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या मेळाव्यातही आम्ही सहभागी झालो होतो. राज्यातील स्त्री भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण, हुंडय़ासारख्या वाईट रूढींमुळे निष्पाप मुलींना आपले जीव गमवावे लागतात. ते जाऊ नये यासाठी काय करायला हवे याचे भान आम्हाला मेळाव्यातून मिळाले. भविष्यात आमच्या सभोवताली घडणाऱ्या अनिष्ट प्रथांना आम्ही ठामपणे विरोध करू शकतो, याची जाणीव आमच्यात निर्माण झाली आहे. भविष्यात आम्हीदेखील हुंडा न देता लग्न करू, त्यासाठी कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.  इतकेच नाही तर आमच्या पालकांनाही आम्ही आमची भूमिका निश्चितपणे समजावून सांगू.’’ हे सांगताना या दोघींच्या डोळ्यांत आत्मविश्वास दिसत होता.
औरंगाबादेत शिक्षण घेणाऱ्या सोनाली मापारी आणि आरती लाडवाणी या दोघीजणी पहिल्यांदाच युवती मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सांगितलं, ‘‘आम्ही दोघीजणी शिक्षणाच्या निमित्ताने आमच्या घरापासून दूर आलो आहोत. आमचा असा अनुभव आहे की, महाविद्यालयातील मुलींना अनेकदा छेडाछेडीसारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. या प्रसंगांमध्ये मुलींची काहीही चूक नसताना त्यांचा अवमान केला जातो. पोलिसांकडूनही अशा घटनांची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात नाही. ती दखल घेऊन अशा समाजविघातक वृत्तीविरोधात कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी अपेक्षा आहे. ही दखल न घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे संकेत आर.आर. पाटील यांनी दिले आहेत. त्यांनी दिलेल्या या आश्वासनामुळे अशा अकार्यक्षम अधिकाऱ्यांविरोधात आपणही कारवाई करू शकतो हे भान यानिमित्ताने आम्हाला आले आहे आणि हे भान आम्ही इतरांनाही देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या मेळाव्याच्या निमित्ताने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार नोकरी मिळून त्यांना स्वत:च्या पायांवर सक्षमपणे उभे राहण्यासाठी मार्गदर्शनही केले जावे. राज्यात स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले आहे. मुलगी म्हणजे परक्याचे धन ही मनोवृत्ती अजूनही आपल्या समाजात मूळ धरून आहे. त्याच्याविरोधात महिलांनीच सक्षमपणे पुढे येणे गरजेचे आहे. महिलांसाठी जे हक्क आहेत त्याची जाणीव प्रत्येकीला होणे आवश्यक आहे. ती जाणीव अशा मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येकीला होईल, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्य़ातून मेळाव्यासाठी आलेली अमृता मगर व्यक्त करते. मेळाव्याच्या व्यासपीठावरून सक्षणा सलगर, रूपा बोरकर, कोमल मतसागर, कोमल डांगे, राणी शेळके, रंजना झोबडे, आदिती नलावडे, भाग्यश्री पवार, गीता दाबके, हिना गावीत, अस्मा कौसर अशा अनेकींनी स्त्री भ्रूणहत्या, युवती व लोकप्रतिनिधी, ग्रामीण मुलींचे प्रश्न, कौटुंबिक िहसाचार, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आदी विविध विषयांवर आपले विचार व्यक्त केले.
 मुंबईत राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली. तेव्हापासून सुप्रिया सुळे यांनी राज्यभर युवतींचे मेळावे घेतले. औरंगाबादला घेतलेला हा पन्नासावा मेळावा. याचाच अर्थ सुमारे दहा ते पंधरा लाख युवती मेळाव्याच्या निमित्ताने वैचारिक अभिसरणातून गेल्या. या मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील स्त्री भ्रूणहत्यांचे वाढते प्रमाण, कौटुंबिक िहसाचार, हुंडय़ाची प्रथा, युवतींची होणारी छेडछाड, एसटी प्रवासात होणारा त्रास अशा किती तरी समस्यांची चर्चा झाली. मेळाव्याच्या निमित्ताने सुप्रिया सुळे यांनी मुलीशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आपले म्हणणे ऐकून घेणारे कुणी तरी आहे, हा दिलासा या  मुलींसाठी खूपच महत्त्वाचा होता. मेळाव्यांच्या माध्यमातून मुलींमध्ये आत्मविश्वास आणि आत्मभान जागृतीचे काम होऊ लागले आहे. गावाच्या वेशीबाहेर न गेलेल्या आणि बाहेरच्या जगाची फारशी माहिती नसलेल्या या मुलींना या मेळाव्याच्या माध्यमातून नवीन जगाची दारे खुली असल्याची जाणीव झाली आहे.
मेळाव्यात सहभागी झालेल्या या युवतींशी संवाद साधल्यानंतर आणि व्यासपीठावरून मुलींनी ज्या निर्भीडपणे विचार मांडले त्यावरून या मुलींमध्ये आत्मभान निर्माण होण्याची सुरुवात झाल्याची खात्री पटते. ही सुरुवात आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसने राजकीय अजेंडय़ाच्या पलीकडे जाऊन युवतींमध्ये जाणीव-जागृतीची ही प्रक्रिया निरंतर सुरू ठेवली, तर भविष्यात त्यातून काही चांगल्या गोष्टी निश्चितच दिसतील, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे; परंतु तिथे येणाऱ्या महिलांना मूलभूत प्रशिक्षणच नसते. या पाश्र्वभूमीवर अशा राजकीय प्रक्रियेतून आलेल्या मुली स्थानिक सत्तेत सहभागी झाल्या, तर तळागाळाचे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी युवती काँग्रेसने एक वाट दाखवली आहे. अन्य राजकीय पक्षांनीही त्या दृष्टीने काही पावले उचलली तरी ते स्वागतार्ह ठरेल.

Story img Loader