‘‘माझ्या दृष्टीने नसीर माझे केवळ पती नाही तर माझा भक्कम आधार आहेत. माझ्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रंगभूमी आम्हा दोघांना बांधून ठेवणारा घट्ट गोफ आहे. माझ्या प्रत्येक भूमिकेविषयी मी नसीरजींशी चर्चा करते. त्यामुळे भूमिकेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. आपली भूमिका आपल्या पद्धतीने करण्यापेक्षा किंवा कुणाची कॉपी करण्यापेक्षा, त्या कथानकाला पुढे नेण्यात आपली भूमिका किती मदत करते, असा विचार करण्याची सवय त्यांनी मला लावली. त्याचा मला खूप उपयोग होतो.’’ सांगताहेत प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शहा आपले अभिनेते पती नसीरउद्दीन शाह यांच्याबरोबरच्या ३२ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
नसीरची आणि माझी ओळख दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्याकडे झाली. मी त्यांच्या नाटकात काम करत होते आणि नसीरजी तेव्हा पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकत होते. ते दुबेजींच्या शिबिरात भाग घेण्यासाठी मुंबईत आले होते. तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो, १९७५ च्या सुमारास. त्याआधी मी त्यांना कधी पहिले नव्हते की भेटलेही नव्हते. आम्ही दुबेजींच्या ‘संभोग से संन्यास तक’ या नाटकाची तालीम करायला सुरुवात केली आणि या तालमीतच आमचे सूर जुळले. आणि ते सूर आजही तितक्याच निर्लेपपणे,अखंडपणे आमच्या संसारात आमची साथसोबत करत आहेत..
नसीरजी मुंबईत आले ते अभिनयाच्या ओढीने. दुबेजींच्या नाटकाच्या निमित्ताने तेव्हा आम्ही दिवसच्या दिवस एकत्र घालवत असू. नाटकाच्या तालमीशिवायही आमच्या बऱ्याच गप्पा होत. वांद्रे येथील नॅशनल कॉलेजच्या बाहेर आमचा अड्डा असायचा. नसीरजी तेव्हा वांद्रे येथेच एके ठिकाणी पेइंगगेस्ट म्हणून राहायचे. पण नाटकाच्या तालमीत ओमजी (पुरी) आणि नसीर या दोघांचा अभिनय बघून मात्र आपण खूप कमी आहोत, याची जाणीव झाली आणि मी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घ्यायचे ठरविले.
खरे तर मला अभिनयाच्या क्षेत्रात अजिबात यायचे नव्हते. कारण घरात माझी आई दिना पाठक, माझी बहीण सुप्रिया (पाठक), माझी मावशी अभिनयाच्या क्षेत्रात होत्या, त्यांना मी लहानपणापासून बघत होते आणि घरातच अभिनय आहे म्हटल्यावर मी आपोआपच या क्षेत्रात जाईन असे सगळ्यांना वाटत होते. पण मला मात्र साधारण त्या वयात मुलींना जे वाटते तसे डॉक्टर, शिक्षिका किंवा एअरहॉस्टेस व्हावेसे वाटत होते. माझी एक मावशी शांता गांधी ही शिक्षणतज्ज्ञ होती आणि तिचा माझ्यावर खूप प्रभाव होता. पण माझी आई दुबेजींच्या नाटकात काम करत असे, त्यामुळे ते मला लहानपणापासून ओळखत होते म्हणून आणि केवळ करायचे म्हणून मी नाटकात काम करायला सुरू केली, पण नंतर मला ते आवडायला लागले. मी खूप एन्जॉय करू लागले.
सत्यदेव दुबे यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. जवळपास १२-१३ वष्रे मी त्यांच्याकडे शिकत होते. त्यांच्या विविध नाटकांतून मी भूमिका केल्या. नसीरजींचं तर नाटक हे पहिले प्रेम आहे. आम्हा दोघांनाही दुबेजींकडे खूप शिकायला मिळाले. आम्ही दोघेही प्रगल्भ होत होतो. नाटकाची सगळी अंगे हाताळत होतो. ती एक वेगळीच मजा होती. ते वयही असे भारून जाण्याचे, झपाटून जाण्याचे होते. मी ‘ईप्टा’च्याही काही नाटकांतून भूमिका केल्या. या नाटकाच्याच साक्षीनेच आम्ही दोघे एकमेकांकडे आकर्षति झालो. तिथेच आमच्या मत्रीचे रूपांतर प्रेमात आणि मग विवाहात झाले.
आज ३२ वर्षांनी मागे वळून पाहताना वाटते, की आयुष्य इतके पुढे कसे गेले हे लक्षातही आले नाही. लग्नानंतर आयुष्य बदलते, ते अधिक सुंदर होते असे ऐकून होते, पण विवाहानंतरच्या आयुष्यात इतकी मजा येईल असे वाटले नव्हते. आमचा हा आंतरधर्मीय विवाह. त्यामुळे विवाहाला घरून विरोध होईल असे वाटले होते. माझ्या आई-वडिलांना आधी थोडा धक्का बसला, पण त्यांनी विरोध केला नाही. त्यांना माझी काळजी वाटणे स्वाभाविकच होते. तसेच नसीरच्याही घरून फारसा विरोध झाला नाही. नंतर तर नसीर म्हणजे माझ्या आईचा मुलगाच झाला. नसीरचे आई – वडील, भाऊ, त्यांचे कुटुंबीय यांच्याशी माझंही खूप छान नातं जुळलं. अभिनयात करिअर करण्यासाठी नसीरजी त्यांच्या वडिलांचा विरोध पत्करून घर सोडून लखनौहून मुंबईला आले होते. त्यामुळे त्यांचे वडिलांशी तणावाचे संबंध होते. त्यामुळे त्यांना पुन्हा जवळ आणणेही खूप महत्त्वाचे होते. आम्ही कुणालाही कधीच दुखावले नाही.
आमचे लग्न पारसी कॉलनीतल्या माझ्या माहेरच्या घरी नोंदणी आणि अगदी साध्या पद्धतीने झाले. आम्ही दोघेही धर्म मानत नाही. किंवा तसा विचारही करत नाही. त्यामुळे आमच्या दोघांचाही धर्म वेगळा आहे, याची आम्हाला जाणीवही होत नाही. एक तर प्रेमाच्या आड धर्म येत नाही आणि आम्ही दोघेही पाश्चिमात्य पद्धतीने शिक्षण घेतले. नसीरजी तर ननितालच्या बोìडग स्कूलमध्ये होते. त्यामुळे रोजच्या व्यवहारात धर्म कुठेही येत नाही. आम्ही ईद आणि दिवाळी सारख्याच उत्साहाने साजरी करतो. हा, आता कधी कधी मला दिवाळीच्या माझ्या घरच्या वातावरणाची आठवण होते. ते घराचे डेकोरेशन, रांगोळ्या, दिव्यांची सजावट वगरे, हे सगळे मी ‘मिस’ करते.
नसीरच्या आणि माझ्यात पती-पत्नीपेक्षा मित्र-मैत्रिणीचे नाते अधिक आहे आणि ते जास्त जवळचे आहे. भावनिकदृष्टय़ा आम्ही एकमेकांवर अवलंबून आहोत. प्रत्येक गोष्ट, समस्या, आम्ही शेअर करतो. पण पती-पत्नीप्रमाणे आमच्यात भांडणे, वादही खूप होतात. आणि मला वाटते हे नॉर्मल असावे. नसीरजींच्या मते, मी खूप ऑर्गनाइज्ड आहे, तर त्यांना रुटीन काही आवडत नाही. मला नीटनेटकेपणा खूप आवडतो, घरातली प्रत्येक गोष्ट जागच्या जागी असावी असे मला वाटते. त्याउलट नसीरचा स्वभाव! त्यांचे धुवायचे कपडे, नेमके माझ्या टॉवेलवर किंवा बेडवर टाकून जाणार. मी लवकर चिडते, त्यामुळे असे बारीकसारीक स्फोट घरात होतच असतात. पण असे स्फोट घडणे आणि मग त्यातून बाहेर येणे यातही एक वेगळीच मजा आहे.
माझ्या दृष्टीने नसीर माझे केवळ पती नाही, तर माझा भक्कम आधार आहेत. माझ्या प्रत्येक समस्येवरचा उपाय आहे. माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे रंगभूमी हा आम्हा दोघांना बांधून ठेवणारा घट्ट गोफ आहे. नसीरजींची गणना एका दुर्मीळ किंवा दुर्लभ व्यक्तींमध्ये होते. अशा व्यक्ती सहसा भेटत नाहीत आणि भेटल्या की त्यांना धरून ठेवावे वाटते, सोडावेसे वाटत नाही. आमच्यात कुठलीही स्पर्धा नाही. खरे तर नसीरजींना समांतर सिनेमापासून आतापर्यंत अनेक व्यावसायिक चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका मिळाल्या. ‘निशांत’, ‘अर्धसत्य’, ‘मंथन’ अशा कलात्मक चित्रपटांत, त्यांना श्याम बेनेगल किंवा गोिवद निहलानीसारख्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. तसेच अगदी अलीकडे, ‘डर्टी पिक्चर’, ‘फाईंडिंग फेनी’सारखे चित्रपटही त्यांनी केले. मला मात्र काही ठरावीकच भूमिका मिळाल्या.
नाटक करत असताना मला टीव्ही मालिका मिळाली. त्यावेळी दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. ‘इधर-उधर’ नावाच्या मालिकेत मी चक्क कॉमेडी रोल केला होता. त्यात माझी बहीण सुप्रियानेही काम केले होते. ती मालिका खूप गाजली. त्यानंतर मी काही मालिकांमध्ये आणि काही सिनेमांत काम केले. ‘साराभाई वेस्रेस साराभाई’ ही अलीकडेच गाजलेली मालिका. त्यासाठी मला अनेक पुरस्कारही मिळाले. पण माझी खरी नाळ जुळली ती रंगभूमीशी. नसीरजींनी स्थापन केलेल्या ‘मोटली’ या संस्थेतर्फे आम्ही अनेक नाटके केली . ‘वॉक इन दि वूड्स’, ‘डीअर लिअर’, ‘इस्मत आपा के नाम’ अशा अनेक नाटकांचे प्रयोग केले. त्यात केवळ निर्मिती किंवा अभिनय न करता मी कधी वेशभूषा, कधी दिग्दर्शन सहाय्य अशी सगळी कामे केली. सध्या आमचे ‘आईनस्टाईन’ नाटकाचे प्रयोग चालू आहेत. मी आणि नसीरजींनी नाटकात एकत्र भूमिका केल्या तशाच चित्रपटातही केल्या. ‘जाने तू या जाने ना’ , ‘पहेली’, ‘परफेक्ट मर्डर’, ‘मिर्च मसाला’, ‘मंडी’ हे त्यातले काही. अभिनयाच्या या सगळ्या प्रवासात त्यांच्याकडून शिकायला खूप मिळाले. नसीर म्हणजे माझा बॉिन्सग बोर्ड आहे. प्रत्येक गोष्ट, चांगली-वाईट त्यांना सांगितल्याशिवाय मला चन पडत नाही. मग ती सेटवर घडलेली एखादी गोष्ट असो किंवा दुसरी काही. त्यावर त्यांचे मत जाणून घेण्यात मला रस असतो.
व्यक्ती म्हणून ते अतिशय समंजस आहेत, पारदर्शक आहेत, त्यांच्या मनात एक आणि बाहेर दुसरे असे कधीही नसते. आपल्या कामावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. ते अतिशय ‘फोकस्ड’ आहेत. अभिनय आणि रंगभूमी हेच विषय सतत त्यांच्या डोक्यात असतात आणि नवनवीन प्रयोग करणे त्यांना आवडते. त्यांच्याबरोबर काम करणे ही एक मेजवानीच असते. माझ्यासाठी ते अतिशय स्पेशल आहेत. पण ते ‘डिफिकल्ट’ आहेत. मला वाटते आगळ्या स्पेशल व्यक्ती या डिफिकल्ट असतात.
अजूनही माझे हे शिकणे चालूच असते. मी गेली ४० वष्रे अभिनयाच्या क्षेत्रात आहे, पण अजून मला माझे शिक्षण पूर्ण झाले आहे असे वाटत नाही. माझ्या प्रत्येक भूमिकेविषयी मी नसीरशी चर्चा करते. त्या भूमिकेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळतो. प्रत्येक भूमिका काही नवीन शिकवून जाते. आपली भूमिका आपल्या पद्धतीने करण्यापेक्षा किंवा कुणाची कॉपी करण्यापेक्षा, त्या कथानकाला पुढे नेण्यात आपली भूमिका किती मदत करते, असा विचार करण्याची सवय मला नसीरजींनी लावली. त्याचा मला खूप उपयोग होतो. आज माझी आई नाही, पण प्रत्येक टप्प्यावर मला तिची आठवण येते, कारण माझ्या प्रत्येक भूमिकेचे ती परखड परीक्षण करीत असे.
नसीरजींचे मला नेहमीच प्रोत्साहन असते. आमच्या संस्थेचे ‘वॉक इन वूड्स’ हे नाटक दिग्दíशत करण्याही संधी त्यांनी मला दिली. त्यात ते स्वत: आणि रजित कपूर काम करत होते. त्यानंतर त्यांनी अनेकदा मला आमच्या नाटकांचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली. जसे आता रंगभूमीवर आलेले ‘आईनस्टाईन’ हे नाटक.
माझ्या माहेरी माझी आई, मावशी, बहीण सुप्रिया, तिचे पती पंकज कपूर सगळेच अभिनयाच्या क्षेत्रात. तसेच आता आमच्याही घराचे झाले आहे. आम्हा दोघांबरोबरच आमची तिन्ही मुले, हिबा, इमाद आणि विवान याच क्षेत्रात करिअर करत आहेत. आम्ही दोघे आणि हिबा नाटकाच्या दौऱ्यासाठी टोरँटोलाही जाऊन आलो. इमाद खरा तर संगीतकार आहे, पण त्यालाही अभिनयाची आवड आहे. विवानचा नुकताच शाहरुखबरोबरचा ‘हॅपी न्यू इअर’ हा चित्रपट प्रदíशत झाला. त्यामुळे सतत नव्या नव्या नाटकांच्या आणि चित्रपटांच्या चर्चा आमच्या घरात घडत असतात.
जशा पूर्वीही आमच्या घरात नाटकाचा विषय, स्क्रिप्ट, कॉस्च्युम, नाटकातली पात्रं यावरून गरम गरम चर्चा, वादविवाद घडत, तशाच आताही घडतात. पण त्यातही एक मजा आहे आणि त्या चच्रेचा आनंद आम्ही सगळेच घेत असतो. खरंच, माझे आयुष्य इतके छान, आनंददायी असेल असे मला वाटले नव्हते. या सगळ्यामुळे एक तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि कामातही फायदा होतो. आमची ‘मोटली’ ही नाटय़संस्था आम्ही १९७९ मध्ये सुरू केली. आम्ही प्रामुख्याने बेकेट, चेकोव आणि बर्नार्ड शॉ यांची इंग्लिश क्लासिक नाटके करतो.
मी एक कडक आणि शिस्तप्रिय आई आहे. मुलांना आम्ही शिक्षणासाठी डून स्कूलला पाठविले होते. खरे तर नसीरजी स्वत: बोìडग स्कूलमध्ये होते, त्यामुळे त्यांना सुरुवातीला थोडा त्रास झाला. मुलांना वाढताना अनुभवणे आपण ‘मिस’ केले, असे त्यांना वाटत होते. पण आज आमची मुले स्वतंत्र विचार करू शकतात, स्वतंत्र राहू शकतात. आणि त्यांचे व्यक्तिमत्त्वही चांगले झाले आहे. जसे आम्हा दोघांचे नाते मित्रत्वाचे आहे, तसेच मुलांचे आणि आमचे नातेही मित्रत्वाचेच अधिक आहे. लहानपणी एकदा माझ्या मुलाने प्रश्न विचारला, ‘आपण कोण आहोत?’ मी त्याला सांगितले ‘भेळ-पुरी.’ जसे भेळेत वेगवेगळे सगळे पदार्थ घातल्यावर चविष्ट, चटकदार भेळ तयार होते, तसेच आपले आहे. त्याला हा विचार पटला. आम्ही मुलांना कुठलाही धर्म पाळण्याची सक्ती केली नाही. आम्ही त्यांना आयुष्यात काय करायचे याच निर्णय त्यांनीच घ्यावा, असे सांगितले आहे. त्यांनी स्वत:हून अभिनयाच्या क्षेत्रात यायचे ठरविले आहे. त्यामुळे आमच्या ‘मोटली थिएटर ग्रुप’मध्येही पुढची पिढी कार्यरत आहे.
माझ्या व्यक्तिमत्त्वावर नसीर यांचा खूप प्रभाव आहे. त्यांच्या सहवासात माझी एक अभिनेत्री म्हणून, एक दिग्दíशका म्हणून खूप वाढ झाली. पण मी त्यांच्या आयुष्यात फारसे काही विशेष घडविले असेल, असे मला वाटले नव्हते. प्रत्यक्ष बोलून दाखवणे हा नसीर यांचा स्वभावही नाही, पण नसीरजींचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले आहे ‘अॅंड देन वन डे’ या नावाचे. त्यामध्ये रत्ना म्हणजे माझा भावनिक आधार आहे आणि तिच्यामुळे मला कुटुंबाचे महत्त्व कळले, तिच्यामुळे मी कुटुंबावर प्रेम करायला शिकलो, असे म्हटले आहे. तिने माझे सगळे कुटुंब एकत्र आणले. रत्ना नेहमी दुसऱ्याचा विचार आधी करते त्यामुळे माणूस म्हणून ती खूप संवेदशील आहे. फक्त थोडी चिडकी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. खरे तर नसीरजींना आमच्यी खासगी आयुष्याची चर्चा करायला अजिबात आवडत नाही. काही गोष्टी पडद्याआडच राहणे इष्ट असते, असे त्यांचे मत आहे. त्यांच्या या मताचा मी आदरच करते.
खरे तर मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे. माझ्यावर दुबेजींचा जसा प्रभाव आहे तसाच बर्नार्ड शॉ यांच्या नाटकांचाही आहे. जर मी अभिनेत्री नसते तर मी शिक्षिका झाले असते. मला शिकवण्याची खूप आवड आहे. आणि आजच्या शिक्षण पद्धतीत खूप सुधारणाही घडवून आणणे गरजेचे आहे. आताही मी ‘अवेही’ या संस्थेसाठी काम करते. आम्ही गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य पुरवितो. आज मागे वळून बघताना असे वाटते, की हा ३२ वर्षांचा प्रवास म्हणजे एक सुंदर आनंदयात्राच ठरली आहे.