रत्ना पाठक शाह यांचा चित्रपट प्रवास उशिरा सुरू झाला खरा पण, तो उपकारकच ठरला, कारण यामुळे त्यांना अभिनयातलं कौशल्य अधिक विकसित करायला वेळ मिळाला. योगायोगाने, याच काळात नवीन दिग्दर्शक आणि नवीन विचारांचे लोक या क्षेत्रात येत होते, ज्यांच्याकडे वयोवृद्ध अभिनेत्यांसाठी अशा भूमिका होत्या, ज्या त्यांच्या आईला आणि त्यांच्या समकालीनांना कधीच मिळाल्या नाहीत. कलाकारांनाही काम करत असतानाच त्याचा अभ्यास करण्याचे मार्ग नव्या तंत्रज्ञानाने खुले केले होते. थोडक्यात, रत्ना योग्य वेळी, योग्य ठिकाणी होत्या, हे त्यांचं नशीब!
१९८२मध्ये मी पहिल्यांदा चित्रपटात काम केलं. ‘मर्चंट आयव्हरी प्रॉडक्शन्स’च्या ‘हीट अँड डस्ट’नामक इंग्लिश चित्रपटात मी अजिबात लक्षात न राहाण्याजोगी भूमिका केली होती. त्यानंतर ‘मंडी’ (१९८३), ‘मिर्च मसाला’ (१९८७), ‘द परफेक्ट मर्डर’ (१९८८) आणि इतर चित्रपटांत अशाच बिनमहत्त्वाच्या व्यक्तिरेखा मी करत राहिले. अनेक दिग्दर्शकांनी माझा अभिनय नाटकांमध्ये बघितला होता, त्याचं कौतुक केलं होतं आणि माझ्यापर्यंत कसं पोहोचायचं हेही त्यांना माहिती होतं. पण मग आपल्या चित्रपटांसाठी त्यांनी मला कधी का बोलवलं नाही, याचं मला आश्चर्य वाटत असे. हे समजायला मात्र खूप वेळ लागला, की त्या वेळी मी अभिनयात खरोखरच तितकीशी चांगली नव्हते. त्यात सुधारणा होईपर्यंत वाट बघणं गरजेचंच होतं. त्या सुधारणेसाठी या मधल्या काळात टीव्ही आणि नाटकांनी मला वाव दिला.
अखेर २००५मध्ये घराणेशाही पुन्हा एकदा माझ्या मदतीला धावून आली! ‘व्हॉट इफ?’ किंवा ‘यूँ होता तो क्या होता?’ या नसीरनं (नसीरुद्दीन शाह) दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटात त्यानं मला थोडा तरी दम असलेली भूमिका दिली. तोपर्यंत मी ज्या ‘सवर्ण’, ‘सुसंस्कृत’, ‘सोफेस्टिकेटेड’ भूमिका साकारल्या होत्या, त्यापेक्षा ही व्यक्तिरेखा अगदी वेगळी होती. चित्रपटात ‘ज्युनियर आर्टिस्ट’ म्हणून काम करणारी तारा. शैक्षणिक, सामाजिक असं कोणतंही पाठबळ नसलेल्या ताराला कसं तरी तगून राहाणं हेच माहिती आहे. तालमींच्या सुरुवातीलाच (हो, आम्ही या चित्रपटातील प्रसंगांच्या तालमी केल्या होत्या. तेव्हाच्या बहुतेक चित्रपटांत तसं करत नसत.) नसीरनं सांगितलं की, माझी संवादफेक फार ‘उच्चभ्रू’ आहे आणि आमच्या घरी कामाला येणारी बाई कसं बोलते हे मी आठवावं. क्षणार्धात तारा माझ्यासमोर स्पष्टपणे उभी राहिली. माझ्या वागण्या-बोलण्यात काय बदलायचंय हे मला कळलं आणि आधी ऐकलेली एक गोष्ट प्रकर्षानं आठवली, की आव्हानात्मक भूमिका पेलण्यासाठी नटाची संवादफेक आणि देहबोली दोन्ही अतिशय भक्कम आणि हवं तेव्हा बदलता येण्याजोगी हवी. भूमिकेसाठी स्वत:ला ‘बदलताना’ व्यक्तीचं सौंदर्य, लालित्य किंवा पिळदार स्नायू, यातलं काहीही आड येता कामा नये. नटांना आधी स्पष्ट वाणीत आणि अचूक बोलता यायला हवं, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. नंतर भूमिकेच्या गरजेनुसार वेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळे हेल काढून बोलता येतं, पण भूमिकेची गरज म्हणून स्वच्छ बोलणं मात्र अवघड असतं. हे या ठिकाणी माझ्यासाठी परत सिद्ध झालं. नसीरला मी हे अनेकदा करताना पाहिलं होतं.

यानंतर मी अनेक चित्रपट केले. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटानं मला ‘मॉडर्न आई’ म्हणून प्रस्थापित केलं. ‘गोलमाल ३’ या चित्रपटानं एका वेगळ्या प्रेक्षक वर्गाला माझी ओळख झाली. भाजी आणायला जाणं हे माझं अतिशय आवडतं काम; पण या चित्रपटानंतर ते अवघड होऊन बसलं, कारण दुकानदार मला ओळखू लागले. या चित्रपटानंतर अनेक वेगवेगळे लोक माझ्याशी येऊन बोलू लागले आणि तो एक वेगळा अनुभव होता. ‘खूबसूरत’ या चित्रपटात मी अभिनेता फवाद खानची आई आहे, हीच प्रसिद्धीच्या दृष्टीनं मोठी गोष्ट ठरली.

… आणि २०१६मध्ये मला आव्हानात्मक वाटणाऱ्या दोन भूमिका माझ्या वाट्याला आल्या. ‘कपूर अँड सन्स’ आणि ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’. प्रामाणिकपणे सांगायचं, तर असे चित्रपट या काळात बनताहेत, हे मला खरंच वाटत नव्हतं! असं वाटत होतं की, जणू अचानकच मंडळींना ‘आउट ऑफ द बॉक्स’ चित्रपट करण्याचा आत्मविश्वास आणि कौशल्य प्राप्त झालंय.

साखरेत घोळवलेले ‘मेलोड्रामा’पट करणाऱ्या ‘धर्मा फिल्म्स’नं दुरावलेली कुटुंबं आणि समलैंगिकतेसारख्या विषयांवरच्या ‘कपूर अँड सन्स’वर पैसा लावायचं ठरवलं होतं. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणखीनच वेगळा होता. वेगवेगळ्या वयाच्या चार स्त्रियांच्या गोष्टींमधून आधुनिक स्त्रीचं वास्तव आणि तिची कामेच्छा यावर बोलणारा हा चित्रपट. मागच्या काही वर्षांमध्ये मी जे काही शिकले होते, त्याच्या बळावर या भूमिका साकारताना मला कसलंही दडपण आलं नाही. नाटक, टीव्ही मालिका आणि चित्रपट या सगळ्या माध्यमांत काम करण्याबाबत मला मुलाखतींमध्ये वारंवार विचारलं जातं. पण त्यात काही अवघड नाहीये, कारण अभिनेत्याचं काम कोणत्याही माध्यमात जवळपास सारखंच असतं. प्रत्येक ठिकाणी वापरायची कौशल्यं थोडी वेगळी असली, तरी संहितेच्या आधारे कल्पकता वापरून एखादी व्यक्तिरेखा उभी करणं सारखंच असतं.

‘कपूर अँड सन्स’मधले प्रसंग खरे वाटावेत असे जमले होते. चित्रीकरणात शॉटस्मध्ये तरलता असावी यावर दिग्दर्शक शकुन बात्रा यांचा भर होता. लोक एकमेकांशी बोलत असताना कॅमेरा त्यांच्या मागे मागे, आजूबाजूनं फिरत राहतो. अशा वेळी तो कॅमेरासुद्धा त्या चित्रपटातलं पात्र होऊन जातो. या चित्रपटात एक प्लंबरच्या कामाचा प्रसंग आहे. घरात प्लंबर काम करतोय आणि त्याच वेळेला घरातला प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टींवरून दुसऱ्याशी वाद घालतोय. कपूर कुटुंबात किती दुरावा निर्माण झालाय, याचं हा प्रसंग उत्तम दर्शन घडवतो. आमच्या तरुण, उत्साही कॅमेरामॅनबरोबर आम्ही या प्रसंगाच्या तालमी केल्या होत्या. आमच्या घरात आम्ही अशा प्रसंगी कसे वावरू, तसेच आम्ही या सीनमध्ये वावरलो आहोत. यात प्लंबरचं काम करणारा मूळचा कलाकार हजर राहू शकला नव्हता. पण त्याचा बदली कलाकारही उत्तम होता आणि पुरत्या गोंधळाचा हा प्रसंग चांगला वठला. या चित्रपटात विनोद, संताप, वर्षानुवर्षं मनात कुढत राहिलेल्या एकमेकांविषयी खटकणाऱ्या गोष्टी आणि ताणतणावांमध्ये बांधलेलं प्रेम याचं मिश्रण होतं. अभिनेत्यांना त्यात खूप काही करण्यासारखं होतं. चित्रीकरणात लांबलचक टेक्स देताना आणि तुमच्या लहानशा चुकीनं अख्खा टेक पुन्हा घ्यावा लागेल, ही भीती मनात असतानाही आम्हा कलाकारांसाठी ती प्रक्रिया मोकळं करणारी होती. यातील सुनीता कपूरची भूमिका करताना मी तिच्यासारखा विचार करू लागले. माझ्या प्रतिक्रिया तिच्यासारख्या येऊ लागल्या आणि त्याचं मलाही आश्चर्य वाटलं. ज्या प्रसंगात सुनीताच्या नवऱ्याचा मृत्यू होतो आणि ती एकटी पडते; अशा वेळी ती काय करेल, यावर आम्ही वेगवेगळ्या गोष्टी करून पाहिल्या होत्या. शेवटच्या तालमीच्या वेळी तिच्या नवऱ्याच्या चपला मला तिथे पडलेल्या दिसल्या आणि मी (म्हणजे सुनीतानं) एकदम त्या आपल्या पायांत घातल्या. अचानक तिच्या नवऱ्याचं नसणं माझ्यासाठी अधोरेखित झालं आणि मी अभिनयातून खरीखुरी प्रतिक्रिया देऊ शकले. एखादं पात्र कोणत्या मनस्थितीत आहे, हे संवादांपेक्षा त्याच्या देहबोलीतून, वागण्यातून अधिक स्पष्ट होतं.

‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ची संहिता वाचली, तेव्हा तो विषय आणि सहसा लपूनछपून राहणाऱ्या गोष्टींवर त्यात किती उघडपणे बोललं गेलंय, हे बघून मला आश्चर्य वाटलं होतं. मध्यमवयीन स्त्रीच्या लैंगिकते- विषयी लेखक-दिग्दर्शक अलंक्रिता श्रीवास्तव यांनी जे लिहिलंय ते आगळंवेगळं आहेच, पण या चित्रपटात विवाहित स्त्रीवर पतीकडून होणारा बलात्कार, हा विषयही संवेदनशीलतेनं हाताळलाय. हा निर्णय ‘बोल्ड’च होता, कारण या वास्तवाकडे आपण समाज म्हणून सोईस्कर दुर्लक्ष करतो.

या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेचा हस्तमैथुनाचा प्रसंग आहे. तो वाचल्यानंतर मला तो प्रत्यक्ष साकारण्याबद्दल काहीही संकोच वाटला नव्हता. पण हा प्रसंग एका लहानशा न्हाणीघरात चित्रित होणार होता आणि त्या वेळी माझ्या आजूबाजूला चित्रपटाच्या संचातली अनोळखी मंडळी असणार होती. त्या विचारानं मात्र मला जरा कसंतरीच वाटायला लागलं. फक्त मी साकारत असलेलं पात्रच नव्हे, तर या चित्रपटातल्या इतर तीन स्त्रियांनाही असेच अवघड प्रसंग होते. अलंक्रितानं तिच्या सगळ्या ‘क्रू’ला समोर बसवलं आणि त्यांना पटकथा समजावून सांगितली. त्यातले प्रसंग आणि ते उभे करणारे कलाकार यांच्याकडे आपल्याला संवेदनशीलतेनं पाहायचंय, हे तिनं सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं. मी आतापर्यंत ज्या चित्रपटांत काम केलंय, त्यांपैकी हा एक सर्वांत सुरक्षित सेट होता. आमचं चित्रीकरण महिनाभर चाललं, पण एकदाही मला तिथे काही अप्रिय अनुभव आला नाही. माझ्या सहकलाकारांवर माझा विश्वास तर होताच, पण माझा अभिनय अधिक चांगला वठावा, यासाठी त्यांची मला मदत होत होती.

या चित्रपटातल्या शेवटच्या प्रसंगात माझ्या व्यक्तिरेखेचं- म्हणजे उषाचं स्वप्न धुळीला मिळालंय आणि तिला घरातून बाहेर काढलं गेलंय. चौकात उषा गुडघ्यांवर बसलीय आणि तिचं बाहेर फेकून दिलेलं सामान गोळा करतेय. तिची अंतर्वस्त्रंदेखील तिच्या अंगावर फेकली जातात. उषाची अवस्था कळलेली तिची शेजारीण शिरीन (कोंकणा सेन शर्मा) लगबगीनं ती अंतर्वस्त्रं गोळा करायला धावते. त्या वेळी कोंकणाच्या चेहऱ्यावर जो काही भाव आहे, तो बघताना मी उषा म्हणून पूर्णत: उन्मळून पडल्याचा अभिनय करू शकले.

अभिनेता म्हणून तुमची प्रगती होण्यासाठी चित्रपट हे माध्यम नाटकापेक्षा वेगळ्या प्रकारे फार मदत करतं. कारण कॅमेरा जे बघतो, ते दाखवतो! त्यात कुठे दयामाया नसते. टीव्हीच्या मॉनिटरवर किंवा सिनेमाच्या स्क्रीनवर स्वत:ला पाहताना मला माझ्यातले दोष ठळकपणे दिसले. काय केल्यानं अभिनय खरा वाटतो आणि काय खोटं वाटतं, हे लक्षात आलं. मी जेव्हा अभिनय क्षेत्रात आले, तेव्हा तुमची भूमिका पडद्यावर कशी दिसतेय, हे थेट डबिंगच्या वेळी कळत असे. तेव्हा अर्थातच फार काही सुधारणा करता येत नसत. आता चित्रपटांच्या सेटवर सगळीकडे मॉनिटर असतात आणि कुठे अभिनय कमी पडतोय, हे लगेच बघून सुधारता येतं. पण त्याचा एक तोटाही आहे. दोन व्यक्तिरेखांचा संवाद सुरू असताना समोरचा काय म्हणतोय, याकडे अभिनेत्याचं लक्ष हवं, त्याऐवजी ‘मी कशी दिसतेय,’ याकडे नको तितकं लक्ष जायला लागतं!

माझ्या मते, जर दिग्दर्शकानं ‘कट’ म्हटल्यावर अभिनेता लगेच मॉनिटरकडे पळत असेल, तर त्याचा स्वत:वर आणि जे काम तो करतोय त्यावरही पुरेसा विश्वास नसतो. कसलेले अभिनेते क्वचितच मॉनिटर बघतात. आपण काय करतोय, याची त्यांना पूर्ण जाणीव असते.