घरातच नाटकाचं वातावरण असल्यामुळे रत्ना पाठक रंगभूमीकडे वळल्या, मात्र सकस अभिनेत्री होण्याचा प्रवास लांबचा आणि भरपूर खाचखळग्यांचा होता. समांतर आणि प्रायोगिक नाटकं हा एक टप्पा होता आणि त्यानंतर सत्यदेव दुबेंनी तर अभिनेत्री म्हणून त्यांचा दृष्टिकोनच बदलून टाकला. पुढचा प्रभाव अर्थातच ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’चा. गेली ५० वर्षं त्या नाटक, चित्रपटांत काम करीत आहेत. या अर्धशतकाची कमाई ज्यात जपली आहे, ती ‘संदूक’ रत्ना पाठक शाह उघडताहेत, दर पंधरा दिवसांनी.
मी रत्ना पाठक शाह हे नाव ऐकल्यानंतर प्रथम आठवते, ती ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ मधील ‘माया ’! मालिकांनंतर अनेक चित्रपटांपर्यंतचा त्यांचा प्रवास ‘लोकप्रिय’ आहे. मात्र ‘संभोग से संन्यास तक’ या नाटकाच्या रंगपटात साहाय्यक म्हणून सुरू झालेल्या त्यांच्या ५० वर्षांच्या प्रवासातील ‘ डियर लायर’ , ‘व्हिलेज वूइंग’,‘अंटिगनी’ ,‘इस्मत आपा के नाम’ आणि सध्याच्या ‘ओल्ड वर्ल्ड’ नाटकांनी त्यांच्या अभिनयाचा आलेख वाढवतच नेला.
हेही वाचा…विकलांगतेचा स्त्रीवादी विचार
लहानाची मोठी झाले ‘बॅकस्टेज’ला! साठ आणि सत्तरचं दशक. माझी आई- दीना पाठक आणि मावशी तरला मेहता गुजराती नाटकांत काम करायच्या. बहुतेकदा त्या वेळची ही नाटकं कौटुंबिक रडारडीनं ठासून भरलेली असत. किंवा मग कोर्टातले नाट्यमय खटले किंवा ‘खुनाचे रहस्य’ छापाचा काही प्रकार असे. या नाटकांची निर्मितीमूल्यं आणि त्यात व्यक्तींकडून अभिनयाची असलेली अपेक्षा, दोन्ही सुमार असे. ज्याला स्वयंभू म्हणावं असं लिखाण फारच कमी होतं आणि अनेक गुजराती नाटकं म्हणजे गाजलेल्या मराठी नाटकांची भाषातरं असत.
मला ते सर्व अतिशय निरस वाटत असे. कित्येकदा तर अजिबात पाहू नये असं वाटे! मग मी सगळा वेळ ग्रीनरूम आणि विंगेत घालवायचे. नाटकाचा संसार कसा चालतो, हे बघत राहायचे. ही नाटकं व्हायची आठवड्यांच्या सुट्ट्यांच्या दिवशी. प्रत्येक नाटकाचा प्रयोग वेगळ्या रंगमंचावर. ‘तेजपाल’, ‘पाटकर’, ‘जयहिंद’, ‘बिर्ला’ या नावांबरोबर आजही विशिष्ट आठवणी दरवळतात. बटाटावडा आणि चहाची चव जिभेवर रेंगाळते! हे रंगमंच, प्रेक्षक बसण्याची जागा वगैरेंची ओळख आता पुसट झाली आहे. पण मला आत्तापर्यंतची प्रत्येक ग्रीनरूम आठवतेय. एक प्रसंग संपला की, पुढच्या प्रवेशासाठी कपडे बदलायला लगबगीनं आत येणारे कलाकार, त्यांची भडक रंगभूषा- त्यात गुलाबी, केशरी आणि हिरव्या रंगांचा मुक्तहस्ते होणारा वापर, खोट्या दाढी-मिश्या (घातल्यावरही खोट्याच- कित्येकदा विनोदी दिसणाऱ्या!) मी विंगेत उभी राहून हे सर्व बघत असायचे. एकदा का पुढच्या प्रवेशाचा पुकारा झाला आणि स्टेजवरचा प्रकाश अंगावर पडला, की मंडळी हा-हा म्हणता त्यांच्या त्यांच्या व्यक्तिरेखेत शिरायची.
परंतु अगदी त्या वेळीही त्यांचा हा अभिनय मला गोंधळात पाडत असे. स्त्री कलाकारांना भरपूर रडून दाखवायचं असे आणि पुरुष नट आपला अभिनय दुसऱ्याच्या वरचढ कसा ठरेल, या चढाओढीत असत. या सगळ्याचा उपयोग काय, हे मला समजत नसे. नशिबानं मला एका दुसऱ्या प्रकारचं नाटकही पाहायला मिळालं आणि ते मात्र मला आवडू लागलं. विजया मेहता, डॉ. श्रीराम लागू, सुलभा देशपांडे यांची नाटकं. ‘आविष्कार’ आणि ‘थिएटर अकॅडमी’ची नाटकं. या नाटकांचं लेखन खूपच उजवं असे. नाटकात आणि सादरीकरणातही तोचतोचपणा नसे. त्यांतला अभिनय अप्रतिम असायचा. ‘थिएटर ग्रुप’ची इंग्लिश नाटकं पाहिली. त्यांचीही निर्मितीमूल्यं उत्तम असत. (नंतर मला समजलं, की ही नाटकं म्हणजे पुष्कळदा परदेशी नाटकांची नक्कल असे.) मात्र त्यात भारतीय कलाकार मंडळी ‘युरोपियन’ किंवा ‘अमेरिकन’ दिसण्याचा आटोकाट प्रयत्न करत. आणि नंतर अर्थातच ‘थिएटर युनिट’ आणि सत्यदेव दुबे!
सत्यदेव दुबे यांनी माझी ज्या नाटकाशी ओळख करून दिली, ते आपल्याला करायला आवडेल असं मला वाटू लागलं. त्यात कथा आणि अभिनेते नाटकाचा प्राण होते. गिमिक्स आणि मेलोड्रामाला जागा नव्हती. गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, बादल सरकार, मोहन राकेश यांच्या दुबेंनी केलेल्या सर्वच नाटकांमध्ये काही तरी नवीन, ताजा विचार होता. डामडौल नसलेलं, पण अतिशय सुंदर नेपथ्य होतं आणि खरा वाटावा असा अभिनय होता. नाटक कसं दिसावं, कसं ऐकू यावं, याची दुबेंना असलेली जाण विलक्षण होती. ते नाटकातले प्रसंग जिवंत करीत. हे मी त्यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. उदा. ‘हयवदन’मध्ये नेपथ्य काही नव्हतंच. एक फोल्डिंगची खुर्ची होती आणि दहा कलाकार (त्यात माझी आईही होती). त्या दहा जणांना पाहणं हा खिळवून ठेवणारा अनुभव असे. अंबरीश पुरीचा ‘कपिल’ आणि अमोल पालेकरचा ‘देवदत्त’ एकमेकांहून अगदी म्हणजे अगदी वेगळे होते. पण नाटकात जेव्हा त्यांना परस्परांची डोकी प्राप्त होतात, तेव्हा ते सहजपणे त्या दुसऱ्यासारखे भासायचे. हे सर्व कोणत्याही ‘प्रॉस्थेटिक्स’शिवाय घडायचं. त्यांचं वागणं आणि देहबोलीमधूनच ते मंचावर उतरायचं.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मी आईलाही कधी असा अभिनय करताना पाहिलं नव्हतं. अगदी उत्स्फूर्त! त्यात तिला फक्त एकच प्रसंग होता,‘काली माँ’चा. पण त्यासाठी तिनं वागणं, दिसणं, आवाज प्रचंड बदलला होता. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगात तिनं ज्या खळाळत्या उत्साहानं काम केलं, तो पुढच्या प्रत्येक प्रयोगात होता. मी आतापर्यंत स्टेजवर पाहिलेली भावुक, डोळ्यांतून गंगाजमुना वाहणारी आई ही नव्हती! तिचा ‘काली माँ’ म्हणून असलेला वावर ऊर्जेनं भरलेला होता, काहीसा भीतीदायक, काहीसा विनोदी असा भव्यदिव्य अवतार ती ल्याली होती. त्या नाट्यलेखनात, नेपथ्यात असं काय होतं, ज्यामुळे कलाकारांनी त्यांचे ‘नेहमीचेच यशस्वी’ मुखवटे बाजूला ठेवले आणि काही तरी नवं करायला धजावले?… या आणि आणखीही तालमी, प्रयोग पाहता पाहता माझं या प्रश्नांची उत्तरं शोधणं सुरू झालं.
हेही वाचा…नव्या वर्षाचं स्वागत करताना…
तोपर्यंत मी रंगमंचावर फारसं काम केलेलं नव्हतं. माझे काका डॉ. विपिन गांधी मुलांसाठी ‘बालोद्यान’ क्लब चालवायचे. जवळपासच्या मुलांना त्यांच्यातली उसळ्या मारणारी ऊर्जा कारणी लावायला एक व्यासपीठ! तिथे मला नाटकांत कामं करायला मिळाली. (बघा- ‘घराणेशाही’चा माझ्या आयुष्यात मोठा वाटा आहे!) परंतु मला फारसा आनंद वाटला नव्हता. पहिल्या नाटकात माझी पियानो शिक्षिकेची भूमिका होती. स्टेजवर पाय ठेवताच, प्रेक्षकांना बघताच माझी घाबरगुंडी उडाली आणि दातखीळच बसली. रडत रडत मी स्टेजवरून पळ काढला होता. हे अभिनय वगैरे आपलं काम नव्हे, अशी मी स्वत:ची समजूत घातली. पण त्यानंतर शाळेत झालेल्या एकपात्री स्पर्धेत मी भाग घेतला आणि आईनं पढवलेलं ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हे भाषण जोरदार सादर केलं. तेव्हा मात्र मला माझ्याकडे बघणाऱ्या डोळ्यांची भीती वाटत नव्हती. मी त्यांच्याशी समरस होऊन, त्यांचा प्रतिसाद बघून संवाद साधू शकत होते. मी जिंकतेय की नाही, याची मला चिंताच नव्हती. भाषण ऐकताना वर्गमैत्रिणींचे खुललेले चेहरे, शिक्षकांच्या चेहऱ्यांवरचं समाधान, हे बक्षीस पुरेसं होतं. मग माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की मी या स्पर्धेसाठी भरपूर तयारी, तालीम केली होती. (आता मला माहीत झालंय, की तालमी हा अभिनेत्याचा मोठा आनंदाचा भाग असतो.) इथे मला एक रस्ता सापडला. त्यावर पुढे पुढे जायचा, नवी ठिकाणं शोधायचा मोह होऊ लागला. अर्थात त्यासाठी बरीच वर्षं जायची होती! पुढे मला मार्ग दाखवायला दुबेच अवतरले. सत्यदेव दुबेंनी ‘संभोग से संन्यास तक’नामक नाटक लिहिलं होतं. ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’साठी (आयपीटीए) ते हे नाटक करत होते. या संस्थेच्या ‘मिट्टी की गाडी’ या एम. एस. सत्यू दिग्दर्शित नाटकात मी एक लहानशी भूमिका केली होती. तरी काम करताना मला मजा आली होती. शमा झैदी दुबेंसाठी रंगपट पाहात होत्या आणि मला ‘बॅकस्टेज’ला साहाय्यक म्हणून घेतलं होतं. ‘संभोग से संन्यास तक’साठी दुबेंनी अनेक ‘पहिलटकरां’ना आणि दिल्लीच्या ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालया’तून (एनएसडी) बाहेर पडलेल्या काही जणांना घेतलं होतं. मी त्या संचात आहे, याचा मला फार आनंद होता. ‘आयपीटीए’ला लवकरच आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप झाला. त्यांना समजेल, पचेल असं ते नाटक नव्हतं. त्यामुळे काही प्रयोगांनंतर ते बंद करण्यात आलं. पण त्या कालावधीतही मला अनेक मूलभूत गोष्टी आत्मसात करता आल्या. महत्त्वाची जाणीव झाली, ती म्हणजे, मला अजून खूप शिकायचंय! त्या चमूत नसीरुद्दीन शाह आणि राजेंद्र जसपाल होते. दोघंही ‘एनएसडी’तून शिकून आलेले. ते ज्या पद्धतीनं काम करत होते आणि मी जसं काम करायचे, यात फार अंतर आहे, हे मला जाणवलं. दुबे नेहमी नवख्या मंडळींना प्रशिक्षित करायला नवनवे मार्ग शोधायचे. या वेळी नव्या मंडळींचा भरणा खूपच होता, त्यामुळे त्यांनी नसीर आणि जसपाल यांना आमच्याबरोबर अभिनयाचा सराव करायला सांगितलं. तिथे माझ्यातल्या सर्व त्रुटी माझ्यासमोर आल्या आणि मलाही त्या भरून काढायला ‘एनएसडी’मध्ये जावं लागेल, याची जाणीव झाली. आश्चर्य असं, की माझ्या कुटुंबातून आणि दुबेंकडूनही याला विरोध झाला. (दुबेंचं इब्राहिम अल्काझींशी आणि दिल्लीशी असलेलं ‘हाडवैर’ सर्वश्रुत आहे!) तिथे असं काय होतं, जे मुंबईत राहून मला शिकता आलं नसतं?… ‘नटांना थिएटरमध्ये आयुष्य काढायचं असतं आणि त्या दृष्टीनं ‘एनएसडी’ तुम्हाला बिघडवतं,’ असं दुबेंचं म्हणणं होतं. शिवाय मला जर व्यावसायिक अभिनेत्री व्हायचं असेल, तर मी चित्रपटांत काम मिळवण्याच्या प्रयत्नात राहायला हवं, असं त्यांचं मत. एका मित्राचा सल्ला मात्र मला योग्य वाटला- की तसं पाहता हळूहळू आपल्याला हवं ते शिकता येतं; पण त्याला शाळेची शिस्त लागली, तर शिकण्याचा कालावधी कमी होऊ शकेल. शिवाय कुटुंबापासून दूर राहणं हे तर एक वेगळ्या प्रकारचं शिकणं आहेच. त्यामुळे मी ‘एनएसडी’ची वाट धरली. आणि तो माझा सर्वोत्तम निर्णय होता. तिथली तीन वर्षं म्हणजे मी आतापर्यंत जे पाहात, अनुभवत आले होते, त्याचं विस्तारित रूप होतं. पण पूर्वीपेक्षा व्यापक, उत्कट आणि लक्ष्याची जाणीव असलेलं!
माझा नाट्य प्रवास सुरू झाला होता. मला याची जाणीव होती, की मी निवडलेल्या मार्गावर पैसा विशेष नाहीये, नटाला अभिनयाव्यतिरिक्त रंगमंचावरची आणि मागची तमाम कामं करावी लागतात आणि माणसांची काही विशिष्ट उतरंड ठरलेली नाहीये. पण तरीही हे ठिकाण मला माझं वाटू लागलं. जीवनाचं एक उद्दिष्ट असलेल्या माणसांची मोट इथे बांधली गेली होती… आणि मी त्यातली एक होते. लोकांनी अभिनेत्री म्हणून आपल्याला ओळखावं, कौतुक करावं, या आंतरिक इच्छेपेक्षा यात वेगळंच एक दीर्घकालीन समाधान मला दिसत होतं. प्रवासातला पुढचा मुक्काम होता- ‘एनएसडी.’ इथे माझी ही समजूत पक्की झाली, पुढचा रस्ता कसा शोधायचा, याची साधनं गवसली. पण त्याची गोष्ट पुढच्या लेखात!