योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com
समाजमाध्यमांचे असंख्य फायदे आहेत हे खरंच; पण याच व्यासपीठांवर एकमेकांचे विचार न पटल्यामुळे घडणारे वादविवाद, भांडणं आणि अगदी शिवीगाळही आपण पाहात असतो, कधी अनुभवतही असतो. आभासी जगातली ही भांडणं कधी अशा थराला जातात, की ज्या ‘पोस्ट’वरून ती सुरू झालेली असतात ती पोस्ट टाकायलाच नको होती, असं त्या व्यक्तीला वाटू लागतं. अशी माघार घ्यावी का? चर्चेचं दार बंद करावं का? हे नेमकं कु णाचं यश आणि कुणाचं अपयश?.. या गहन प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न त्या दोघांनी केला.
अगदी सकाळी सकाळीच त्याचा फोन आला. या वेळी त्याचा फोन येणं हे तिच्यासाठी अगदीच अनपेक्षित होतं. तशी त्या दोघांची मैत्री कॉलेजपासून, म्हणजे गेल्या वीस-बावीस वर्षांपासून होती. महिन्यातल्या एखाद्या शनिवारी किंवा रविवारी त्यांचा कॉलेजचा ग्रुप त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी नक्की भेटायचा. नेमकं काय झालं असेल, असा विचार करतच तिनं फोन उचलला.
‘‘तुला आज भेटता येईल? म्हणजे थोडा वेळ असेल तर. जरा महत्त्वाचं काम होतं.’’ पलीकडून तो शांत आवाजात म्हणाला; पण त्याच्या मनात विचारांचा कल्लोळ उडालेला आहे, हे तिच्या लक्षात आलं आणि आवाज जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा त्याचा प्रयत्नही जाणवला. मग दुपारी दोघंही त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटले. त्याला नक्की कोणत्या विषयावर बोलायचं असेल, याचा अंदाज तिला बराच विचार करूनही आलेला नव्हता. त्यानंही कोणत्याही अवांतर गोष्टीत वेळ न घालवता थेट मुद्दय़ाला हात घातला. आपला मोबाइल तिच्यासमोर ठेवून तो म्हणाला, ‘‘हे असं सगळं खरंच लिहिण्याची काही गरज आहे का?’’
तिनं तो फोन बघितला, तर आदल्या दिवशी सोशल मीडियावर तिनं केलेली पोस्ट त्यावर होती. नेहमीप्रमाणेच त्या पोस्टवरही प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. ती शांतपणे म्हणाली, ‘‘मला खरोखरच या विषयावर लिहावंसं वाटलं म्हणून मी ते लिहिलं. शिवाय मी जे काही लिहिलं आहे, ते पूर्णपणे अभ्यास करून लिहिलेलं आहे.’’
‘‘तू उगाच काहीही लिहितेस, अभ्यास न करता मतं मांडतेस, असं मी कुठे म्हणतोय? माझा प्रश्न अतिशय साधा आहे. मुद्दामहून भडक, जळजळीत विषय निवडूनच त्यावर का लिहितेस?’’ तो काहीसा अस्वस्थपणे म्हणाला.
‘‘कोणाच्या दृष्टिकोनातून ‘भडक आणि जळजळीत’? हा महत्त्वाचा विषय आहे. जे प्रश्न समोर दिसतात, पण त्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही, त्याबद्दल मी बोलते. शिवाय दर वेळी विषय शोधायचीही गरज नसते. जगताना अनेक गोष्टी जाणवत असतात. त्याबद्दल लिहून व्यक्त व्हावं असं वाटतं, तशी मी होते; पण लिहिताना जे संदर्भ देते, त्यामागे अभ्यास असतो. कोणावरही मी कधी वैयक्तिक टीका करत नाही. तरीही ते भडक आणि जळजळीत वाटत असेल तर त्याला मी काय करू?’’
तिच्या त्या बोलण्यावर तो काहीसा उसळून म्हणाला, ‘‘तुझं लिखाण वाचल्यावर लोक ज्या प्रतिक्रिया नोंदवतात त्या वाचूनसुद्धा तुला काही वाटत नाही? खरं तर मी खूप पूर्वीच तुला याबद्दल बोलणार होतो, पण स्वत:ला थांबवलं; पण कालपासून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, त्या वाचल्यानंतर मला राहावलं नाही. काही प्रतिक्रिया किती घाणेरडय़ा भाषेतल्या आहेत.. काहींनी तर त्यापुढे जाऊन धमक्याही दिलेल्या आहेत.’’
त्यावर मंदपणे हसून ती म्हणाली, ‘‘हे सगळं तू माझ्या काळजीपोटी बोलतो आहेस, हे माझ्या लक्षात आलं; पण गंमत बघ ना.. तुला त्या प्रतिक्रियांमुळे माझं लिखाण भडक आणि जळजळीत आहे असं वाटतंय. वास्तविक चित्रविचित्र प्रतिक्रिया देणाऱ्यांना कसं थांबवता येईल, हा विचार तू करायला हवास. ते सोडून तू मलाच मी माझं लिखाण बंद करावं असं सुचवतो आहेस? हे मी माझ्या लिखाणाचं अपयश समजू, की प्रतिक्रिया देणाऱ्यांचं यश?’’
त्यावर तो क्षणभर विचार करून म्हणाला, ‘‘मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही. तेव्हा आपल्या जे नियंत्रणात आहे, तेवढंच आपण करू शकतो. प्रकाशित झालेल्या लिखाणावर लोकांना प्रतिक्रिया नोंदवता येणार नाहीत, अशी सोशल मीडियावर तरतूद असते. कदाचित ती वापरूनही बरंच काही साध्य होऊ शकेल, नाही का? निदान लोकांची वायफळ बडबड तरी बंद होईल.’’
‘‘मी जे काही लिहिते त्यामागचा एक उद्देश लोकांनी ते वाचून व्यक्त व्हावं हाही असतो. फक्त मी लिहायचं आणि त्यावर लोकांना व्यक्त होण्याची संधीही द्यायची नाही, हे किती एकतर्फी आहे? शिवाय काही प्रतिक्रिया खरोखर खूप चांगल्या असतात. त्यातून नवीन माहिती मिळते, विषयाचे आणखी कंगोरे समजतात, लेखक म्हणून तो माझ्या शिकण्याचा आणि समृद्ध होण्याचा भाग असतो, त्याचं काय?’’ तिनं स्पष्टपणे विचारलं.
त्यावर तो काहीसा गोंधळून म्हणाला, ‘‘हा विचित्र गुंता आहे. ओल्याबरोबर सुकं जळतं तसंच ते होईल हे मलाही मान्य आहे; पण कोणतंही ताळतंत्र न ठेवता लोक वाटेल त्या पद्धतीनं व्यक्त होत असतील तर किती भयंकर आहे. सोशल मीडियावर अजून तुझी मुलं नाहीत; पण एक दिवस या असल्या प्रतिक्रिया जर त्यांनी वाचल्या तर?’’
त्यावर आपल्या पर्समधून एक वही काढून त्याच्यासमोर ठेवत ती म्हणाली, ‘‘काही लोक थेट संपर्क साधूनही विचित्र आणि घाणेरडय़ा प्रतिक्रिया देत असतात; पण माझं स्पष्ट मत आहे, की योग्य वेळी माझ्या मुलांनी या अशा प्रतिक्रिया वाचाव्यात. हे बघ, या वहीत मी दोन्ही टोकांच्या निवडक प्रतिक्रिया अगदी जपून ठेवलेल्या आहेत. मुलं सोशल मीडियावर आली, की जुन्या पोस्ट लॉक करणार आणि सर्वात आधी ही वही मुलांसमोर ठेवणार.’’
त्यानं उत्सुकतेनं ती वही उघडून बघितली, तर त्यात लिहिलेल्या मूळ मजकुराबरोबरच आलेल्या विविध प्रतिक्रियांचे ‘स्क्रीनशॉट्स’ चिकटवलेले होते. मात्र प्रतिक्रियेसमोरचं नाव खोडलेलं किंवा कापलेलं होतं. ते पाहून आश्चर्यानं तो म्हणाला, ‘‘इतकी मेहनत जर तू घेतलेली आहेस, तर प्रतिक्रिया देणाऱ्याचं नाव का खोडलं आहेस?’’
त्यावर ती शांतपणे म्हणाली, ‘‘कारण प्रतिक्रिया देणाऱ्याचं नाव खरोखर तेच आहे, याची पूर्ण खात्री आपल्याला तरी आहे का? शिवाय प्रतिक्रिया म्हणून जे काही समोर आलं आहे, ते वाचलं जाणं महत्त्वाचं. उगाचच नावं समोर करून, आपणच वाचणाऱ्याच्या मनात लिंग, ठरावीक आडनावं, विशिष्ट भौगोलिक प्रदेश, याबद्दल निष्कारण आकस का निर्माण करायचा? आपण मांडलेल्या एखाद्या मुद्दय़ावर काय स्वरूपाच्या प्रतिक्रिया येऊ शकतात, प्रतिक्रियेत किती विविध प्रकारच्या भावना दडलेल्या असतात, कोणत्या थराला जाऊन लोक व्यक्त होत असतात, हे त्यांना समजणं गरजेचं आहे. ते शिक्षण त्यांना मिळालं, की मग त्यांना येणाऱ्या अनुभवांकडे प्रगल्भ दृष्टिकोनातून पाहाता येईल किंवा किमान तशी शक्यता तरी निर्माण होईल असं मला वाटतं.’’
तिचं उत्तर ऐकून तो काहीसा विचार करून म्हणाला, ‘‘पण लोक इतक्या आक्रमकपणे का व्यक्त होतात? तू याबद्दलही विचार केला असशील ना?’’ त्यावर सुस्कारा सोडत ती म्हणाली, ‘‘एकाच विषयाकडे वेगळ्या दृष्टीनं बघता येऊ शकतं हे मान्य नसणं, आपल्याला जितकं जग माहिती आहे, त्यापलीकडेही जग आहे याची जाणीव नसणं, विषयाचा अभ्यास नसतानाही व्यक्त होण्याची घाई असणं, प्रत्येक विषयावर मत मांडलंच पाहिजे हा अट्टहास असणं, असं अगदी कोणतंही कारण असू शकतं! शिवाय समोरच्याला चार शिव्या देऊन त्यात आनंद शोधण्याची वृत्ती असणं, आपलं मत एरवी कोणीही ऐकत नाही, तेव्हा ते सोशल मीडियावर मांडून ठळकपणे वाचलं जावं यासाठी काही तरी विकृत उपाय करणं, आयुष्य जगताना होणारी घुसमट- दुसऱ्या कोणावरचा तरी राग काढण्यासाठी प्रतिक्रिया लिहिणं, असंही काही लोक करतात. असंख्य पूर्वग्रह असणं, काळ बदलतो आहे हे मान्य नसणं, काही विषयांवर फक्त आपली मक्तेदारी आहे अशी भावना असणं, कोणताही विषय असला तरी त्याचा संबंध ठरावीक दोन-तीन मुद्दय़ांशी लावणं किंवा फक्त त्याच मुद्दय़ांच्या चष्म्यातून विषयाकडे बघणं.. अशी आक्रमकपणे व्यक्त होण्यामागची अनेक कारणं आहेत. अर्थात काही वेळा लिहिताना माझ्याकडूनही एखादा मुद्दा लिहायचा राहातो. कुठे तरी शब्दांची निवड चुकते. विषयात मांडलेल्या प्रश्नाचा थेट अनुभव कमी पडतो. तेव्हा त्या प्रश्नामुळे तावून सुलाखून निघालेले लोक स्पष्टपणे त्यांची प्रतिक्रिया देतात आणि मी निसटलेल्या गोष्टी लगेच मान्यही करते; पण असे प्रसंग फारच थोडे.’’
‘‘पण जे आक्रस्ताळी वृतीनं प्रतिक्रिया नोंदवतात, त्यांच्यामुळे मूळ प्रश्न बाजूला पडतो. त्यावर साधकबाधक चर्चा तर होतच नाही. उलट भलतेच मुद्दे चर्चेत येऊन भांडणं वाढत राहतात. हे किती मोठं अपयश आहे! अशामुळे उत्तरं तर मिळतच नाहीत, उलट कोण किती वेगवेगळ्या शिव्या देऊ शकतो याचीच स्पर्धा सुरू होते. कालपासून तेच सुरू आहे. हे बघ, आपण भेटल्यापासून अजून दहा-बारा तरी लोकांनी तावातावानं आपली मतं मांडली आहेत. हे असं सगळं बघितल्यावर कदाचित लेखकालाही आपण हे का लिहिलं, असा प्रश्न पडत असेल.’’ तो हताशपणे म्हणाला.
तेव्हा ती कमालीच्या शांतपणे म्हणाली, ‘‘तू म्हणतो आहेस त्या दहा-बारा लोकांच्या प्रतिक्रिया एकदा नीट बघ. मी माझ्या अनुभवानं सांगते, तावातावानं मतं मांडणाऱ्या त्या लोकांबरोबरच एखादी तरी अशी प्रतिक्रिया असेल, जी ‘का लिहीत राहिलं पाहिजे?’ याचं उत्तर देण्यासाठी पुरेशी असेल. दुसरं म्हणजे वाचणारा प्रत्येक जण त्याची प्रतिक्रिया लगेच नोंदवतोच असंही नसतं. योग्य वेळी, योग्य ठिकाणी हे लोक बोलते होतात; पण त्यासाठी तुम्ही सातत्यानं लिहून त्यांच्यापर्यंत पोहोचत राहाणं अतिशय गरजेचं असतं. फक्त प्रतिक्रिया देणारा म्हणजेच आपला वाचक असं समजून चालत नाही. व्यक्त न होणाऱ्यांचंही एक मोठं पाठबळ लेखकाच्या मागे असतं.’’
त्यावर एक दीर्घ सुस्कारा सोडत तो म्हणाला, ‘‘ठीक आहे. तू इतकं म्हणते आहेस म्हणजे त्यात काही तरी तथ्य नक्कीच असेल; पण हा सगळा गुंता फार विचित्र आहे हे नक्की.’’ त्यावर ती हसून म्हणाली, ‘‘गुंता कितीही अवघड वाटत असला, तरी कायम एक टोक आपल्या हातात घट्ट धरून तो सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा. काही गुंते यशापयशाचा विचार करण्यापेक्षा प्रयत्न करत राहण्यानेच सुटू शकतात.’’