मुलांना एका मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य दिलं पाहिजे हे पालकांना समजत नाही, समजून घेण्याची त्यांची वृत्ती-बौद्धिक कुवत नाही, असं गृहीत धरून लिहिलेले असे लेख घरोघरच्या पालकांबरोबर त्यांची कच्च्या वयातली मुलंही वाचतात आणि पालकांसमोर किती अडचणीची व अपमानास्पद परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा लिहिणाऱ्यांना अंदाज नसावा. मुलांची मनं समजून घेण्याबरोबर पालकांना इतर किती तरी तणावांना तोंड द्यायचं असतं, त्याबद्दल कुणी काही लिहित नाही. पालकांच्या मानसिकतेबद्दल तरुण पिढीला दोन शब्द समजून सांगणारे लेख कधी कुणी लिहिलेले वाचनात आलेले नाहीत. तरुण झालेल्या आणि तरुण होऊ घातलेल्या समस्त पिढीचं भलं आपल्याशिवाय कुण्णी कुण्णी करू शकणार नाही, अशा गाढ विश्वासाने लिहिलेले हे लेख वाचून किती पालकांच्या विचारात फरक पडतो त्याची पाहणी एकदा व्हायला हवीच.
तरुण पिढीचे स्वघोषित हितचिंतक, सिनेमा नट, निर्माते, दिग्दर्शक- कुणीही उठावं आणि पालकांना शहाणपणाचे डोस पाजावे हे हल्ली फारच वाढत चाललंय. त्यात आता काही वेगळं वाटत नाही. लिहिता हात बदलला की शैली थोडी बदलते, इतकाच फरक. पालकांची बाजू पुढे आणणारे, त्यांनी समजून घ्या म्हणणारे लेख छापायचं धाडस कुणी दाखवलं तर दोन्ही बाजूंच्या व्यथा समोर येतील आणि त्यातून या समस्येवर काही वेगळा उपाय कदाचित सापडू शकेल, निदानपक्षी एका वेगळ्या दिशेने विचार मंथन तरी सुरू होईल.
-राधा मराठे, ई-मेलवरून
तृतीय पंथीयांना कामाला लावा
‘एक टाळी..’ हा ८ जूनच्या चतुरंगमधील लेख वाचून मी हा विषय येथे मांडीत आहे. हा विषय थोडय़ा गांभीर्याने अभ्यासण्याची व हाताळण्याची गरज आहे. शासनस्तरावरील अनास्था सोडाच, परंतु समाज म्हणूनही आपण याकडे गंभीरतेने पाहात नाही. त्यांच्याविषयीच्या तिटकाऱ्याच्या भावनेपलीकडे जाण्याची गरज आहे. आपल्याला रेल्वेमध्ये टाळ्या वाजवीत पसे वसूल करण्यासाठी अंगलट करणारे हिजडे अनेक वेळा दिसतात. रस्त्यावर दुकानासमोर उभे राहून पशासाठी हुज्जत घालणारे हिजडे आपण पाहतो. हिजडा समोरून येत आहे असे दिसले की आपण दुसरीकडे तोंड करून पळ काढण्याची तयारी करतो, याच्यापलीकडे आपण काहीच विचार करीत नाही.
आता जनगणनेचे काम शासनाने पूर्ण केले आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात लाखो हिजडे असल्याचे आकडे प्रसिद्ध होतील. त्यावरून हिजडय़ांची संख्या नगण्य मानून सोडून देण्याइतकी कमी गृहीत धरता कामा नये, म्हणून या हिजडय़ांना असेच भीक मागत ठेवणे, त्यांना फुकट पोसणे योग्य होणार नाही.
त्यांना भीक मागण्यापासून परावृत्त करायचे असल्यास त्यांना कामे मिळवून दिली पाहिजेत. त्याना करता येतील अशी असंख्य कामे आहेत. कष्टाची-हमालीची कामे ते सहज करू शकतील. शिपायाची नोकरी, धुणी- भांडी घासण्याची, बालकांची व वृद्धांची सेवा करण्याची कामे ते करू शकतील. एवढेच नाही तर रहदारीच्या रस्त्यावर सिग्नलच्या जवळ बेशिस्तीने वागणाऱ्याकडून दंड वसूल करण्याची कामेही ते करू शकतील. मला वाटते कोणतेही क्षेत्र त्यांना निषिद्ध नसावे. पूर्वी राजे रजवाडय़ांच्या आणि सुलतानांच्या जमान्यात राण्यांची सेवाचाकरी करण्यासाठी एक विश्वासू म्हणून त्यांची नेमणूक केली जात असे. हे उदाहरण पुरेसे आहे.
तृतीयपंथीयांना स्वीकारण्यास प्रतिष्ठित समाज सुरुवातीच्या काळात घाबरेल किंवा नाके मुरडेल, पण तेही समाजात मिसळून काम करू शकतात हे स्पष्ट झाल्यावर त्यांच्यासाठीही कोणतेही क्षेत्र वज्र्य असणार नाही.
-मोहन ठेकेदार, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा