‘आवाज उठवायलाच हवा’ या अॅड. उज्ज्वला कद्रेकर यांच्या लेखात (१२ एप्रिल) विवाहपूर्व शरीरसंबंधांबाबत सोदाहरण, सविस्तर व समर्पक उहापोह लेखिकेने केला आहे. हे वाचताना एक मूलभूत प्रश्न मनात आला, मुलं लग्नाचं आमिष भलेही दाखवू देत- पण या आमिषाला मुलींनी का बळी पडावं? ‘शारीरिक संबंधांना विवाहाशिवाय अनुमती नाही असे ठाम मत मुलींचे का असू नये’ की असे मत असणे हे मुलींना बुरसटलेपणाचे लक्षण वाटते? जर असे मत बुरसटलेपणाचे असेल तर मुली लग्नाच्या आमिषाला नव्हे तर शरीरसुखाच्या आकर्षणाला बळी पडतात, असे म्हटल्यास वावगे ठरेल का?
यासह खालील काही मुद्देही विचारात घेतले पाहिजेत असे वाटते. तरुण-तरुणींमध्ये सहवासाने यौवनसुलभ भावना जागृत होतात, दोघेही सहमतीने जवळ येणे, आनंद उपभोगणे या गोष्टींचे साक्षीदार होतात, पण हे घडताना जर ‘धमकी’,‘बळजबरी’ असा प्रकार घडू लागला तर मुलीने न घाबरता वडीलधाऱ्यांची मदत घ्यायला हवी, हा विचार शंभर टक्के पटला.
विवाहाशिवाय शरीरसुख मिळवण्याच्या रस्त्यावर मुला-मुलीचे पाऊल पडते, तेव्हा या मार्गावरील धोक्याचे चढउतार व अनैतिक वळणे यांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी दोघांचीही असायला हवी. धोक्याच्या वळणावर अपघात झाल्यास, त्याचे खापर दुसऱ्यावर फोडून अपघाताच्या जबाबदारीतून स्वतची सुटका करून घेणे किंवा मग सुडाच्या भावनेने पेटून उठणे हे कितपत योग्य, याचाही विचार व्हायला हवा.
धोक्याच्या वळणावरील अपघात मुलगा-मुलगी कुणाच्याही बाबत घडू शकतो. भावनिक गुंतवणूक कुणाची किती यावर त्या अपघाताची तीव्रता ठरते. मुलींना या वळणावर कायद्याचा आधार आहे, पण सावधानता बाळगणे केव्हाची इष्टच..
– डॉ. सुजाता जोशी- पाटोदेकर, नांदेड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा