मातृदिनाच्या पाश्र्वभूमीवरील ‘चतुरंग’मध्ये (१० मे) छापून आलेला कवयित्री नीरजा यांचा ‘सीतामाई ते जशोदाबेन’ हा लेख अतिशय उत्तम. स्त्री ही क्षणाची पत्नी असते व अनंतकाळची माता असते, म्हणूनच श्रीरामाची सीता, सिद्धार्थ म्हणजेच गौतमबुद्धांची यशोधरा यांनीही अनंतकाळची माता राहणंच स्वीकारलं. लक्ष्मणाची ऊर्मिला आणि आत्ता चर्चेत असलेल्या जशोदाबेन यांनी पत्नीपद अव्हेरलं गेल्याचा बभ्रा केला नसेल आणि सोवळ्या साध्वीसारखा निरिच्छ एकटेपणा व्यतीत केला असेल. आजकालच्या औटघटकेच्या नातेसंबंधांमध्ये पती-पत्नीची ‘सोयीस्कर’ कामं पार पाडण्याच्या मानसिकतेला तर पूर्वीच्या त्या पतिव्रता अतिरेकीच वाटतील. अनंतकाळचं पत्नीपद ‘सोसणाऱ्या’ त्या स्त्रियांकडे कमालीची सहनशक्ती आणि पतीकार्यावरील गाढ विश्वासामुळे त्यांच्या ध्येयमार्गात अडसर न होण्याची स्वत:वरच घालून घेतलेली सक्ती असावी असं वाटतं.
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे अशा स्त्रियांची झालेली गळचेपी गळा भरून आणणारीच होती. पण त्याच वेळी त्या स्त्रियांकडेही लक्ष जावं ज्यांनी पुरुषांच्या कार्यामध्ये सहभाग घेऊन स्त्रीशक्तीला विधायक स्वरूपात पुढे आणलं. रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या स्त्रियांनी पुरुषप्रधान संस्कृतीचा बाऊ  न करता कल्पकतेनं, वटवृक्षाच्या आधारानं वेलीनं बहरावं तसा आपल्या आणि संपर्कातल्या इतर स्त्रियांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून दिला. अर्थातच त्यासाठी त्यांच्या पतींनी स्त्रीशक्तीला वेळीच ओळखून तेवढा सन्मान दिला, म्हणून हे शक्य झालं.
-श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे

ही टिप्पणी किती सयुक्तिक ?  
बाईचं माणूसपण नाकारून तिला आपल्या तालावर नाचवण्याची पुरुषप्रधान परंपरा आपल्याकडे किती जुनी आहे हे नीरजा यांच्या ‘सीतामाई ते जशोदाबेन’ या लेखातून समोर आले. लेखिकेने विविध उदाहरणांमधून अतिशय समर्पकपणे हे मांडले आहे. यापूर्वीही किती तरी वेळा वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळे लिहिले गेले आहे. ऊर्मिलेची किंवा यशोधरेची घुसमट, सीतेची किंवा द्रौपदीची फरफट हा तर नेहमीच ललित लेखकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.
रामदास स्वामी बोहल्यावरून पळून गेल्यावर त्यांच्या नियोजित वधूचे काय झाले हा प्रश्न कुणाच्याही मनात उभा राहतोच. काही वर्षांपूर्वी आम्ही सज्जनगडावर गेलो होतो तेव्हा तिथल्या एका रामदासी बुवांना मी हा प्रश्न विचारला होता त्यावेळी त्यांनी मला एक कथा सांगितली. ‘श्रेष्ठींना म्हणजे स्वामींच्या थोरल्या बंधूंना नारायण हा सामान्य मुलगा नाही, प्रपंचाच्या पाशात अडकणार नाही याची कल्पना होती. पण नारायणाच्या विवाहासाठी आई अधीर झाली होती. तेव्हा त्यांनी परिवारातला एक होतकरू मुलगा हेरून ठेवला आणि नारायण निघून गेल्यावर त्या मुलीचे त्या मुलाशी लग्न लावून दिले.’ या खुलाशावर विश्वास न ठेवण्याचे मला काही कारण नव्हते.
रामाकडून सीतेवर झालेल्या अन्यायाबद्दल आधुनिक विद्वानांनी आणि लोकगीतांच्या अनामिक रचनाकारांनी खूप काही लिहिले आहे. सीतेने जे सोसले ते द्रौपदी वगळता क्वचितच दुसऱ्या कुणा स्त्रीच्या वाटय़ाला आले असेल. पण या संदर्भात मला एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतो. कोणीही पुरुष एकाच वेळी आदर्श पिता, पती, पुत्र, बंधू होऊ  शकणार नाही. कारण या सर्व नात्यांच्या मागण्या अनेकदा परस्परविरोधी असतात. (बाईलाही एकाच वेळी आदर्श पत्नी, कन्या, माता होणे शक्य नसते. तेव्हा संपूर्ण आदर्श व्यक्तिमत्त्व असण्याची अपेक्षा करणे हा दोघांवरही सारखाच अन्याय ठरेल.)  मग कुठे तरी न्यून राहणारच. आदर्श राज्यव्यवस्थेला आपण ‘रामराज्य’ म्हणतो. त्या अर्थाने राम हा उत्तम प्रशासक होता, आदर्श राजा होता. प्रजेच्या मनात राजाबद्दल कोणताही किंतु असू नये. केवळ राजाचे नव्हे तर त्याच्या कुटुंबाचेही चारित्र्य, वर्तन नेहमी संशयातीत असले पाहिजे आणि प्रजेतील अगदी अतिसामान्य व्यक्तीच्या मतांचाही राजाने आदर केला पाहिजे, या आदर्शाला जपताना पती म्हणून तो कमी पडला. उणा ठरला. आपल्या सीतात्यागाच्या निर्णयाने आपण कायम टीकेचा विषय होऊ , हे त्याला कळले नसेल अशी शक्यता नाही. पण तरीही ‘आदर्श राजा’ या भूमिकेपासून तो ढळला नाही. आजतागायत आपण आदर्श राज्यव्यवस्थेची चरम सीमा म्हणजे ‘रामराज्य’ असेच म्हणतो. रामाची म्हणजेच पर्यायाने पुरुष वर्गाची बाजू घेण्याचा माझा मुळीच उद्देश नाही? पण सत्ययुगातल्या पुरुषाला, आदर्श राजाला आजचे, आधुनिक युगातले सामान्य पुरुषाचे निकष कसे लावायचे आपण?
पुराण काळातल्या किंवा इतिहासकालीन पुरुषांप्रमाणेच आधुनिक काळातल्या असामान्य पुरुषांनासुद्धा हे निकष लावून चालणार नाही. कित्येक स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, संशोधक, संत या सगळ्यांच्या पत्नींनाही रूढार्थाने सुखी संसार लाभला नाही, उपेक्षा-अन्यायाला तोंड द्यावे लागले. या पुरुषांनी सामान्य संसार केला असता तर आज जे स्वातंत्र्य, मोकळा श्वास, विकास आणि आध्यात्मिक बळ भारतीयांना आणि भारतीय स्त्रियांना लाभलेय ते लाभले नसते. लोकोत्तर कार्य करून संपूर्ण समाजाला कल्याणकारी दिशा देणाऱ्या स्त्री-पुरुषांना सामान्य सामाजिक निकष लावून आपणसुद्धा एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच करतो आहोत.   
बाईला माणूस म्हणून जगू द्या, ही आजची मागणी. ती न्याय्यच आहे. ती पूर्ण होण्यासाठी सर्व शक्तीनिशी बाईने उभे राहायला हवे, हवेच! पण त्यासाठी पुराणात डोकावून वेगळ्या काळात, जीवनशैलींत जगलेल्या माणसांना आजचे निकष लावून टिप्पणी करणे कितपत संयुक्तिक ?  
-राधा मराठे

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

काहीतरी गमवावे लागतेच
‘सीतामाई ते जशोदाबेन’ या लेखातून, कुठल्याही गोष्टीवर, घटनेवर वेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याची व तर्कशुद्ध विचार मांडण्याची लेखिका नीरजा यांची हातोटी दिसून येते. फक्त एक वाटते, आपण याकडे पुरुषाने स्त्रीवर केलेला अन्याय म्हणून न बघता, कर्तृत्ववान व्यक्तीच्या हातून तिच्या सहचरी व्यक्तीवर झालेला अन्याय म्हणून बघायला काय हरकत आहे? नीरजा यांनी दिलेल्या उदाहरणांत कर्तृत्ववान व्यक्ती पुरुष आहेत एवढेच, पण जर आपण इंदिरा गांधी व फिरोज गांधी यांचे उदाहरण घेतले तर? फिरोज गांधींना तर त्यांचे आडनावही बदलायला लावले गेले होते. हे तर फार मोठे उदाहरण झाले, पण लहान प्रमाणावर कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रियांच्या पतींनासुद्धा त्या त्या प्रमाणावर ‘तसा’ अनुभव येतोच. तेव्हा काही तरी करून दाखविण्यासाठी व्यक्तीला काही तरी गमवावेच लागते.
सिद्धार्थचा गौतम बुद्ध होण्यासाठी त्याला केवळ पतीधर्मच नाही तर राजधर्माचादेखील त्याग करावा लागला होता. आता सहचरी व्यक्ती आणि विशेषत: समाज त्याकडे कशा दृष्टिकोनातून बघतो हा त्यांचा प्रश्न आहे.
-अविनाश ताडफळे, विलेपार्ले

अशी उदाहरणे तर सार्वत्रिक
‘सीतामाई ते जाशोदाबेन’ हा नीरजा यांचा लेख ओढून ताणून वाचकांच्या गळी पूर्वग्रहदूषित विधाने उतरविण्यासाठी लिहिलेला वाटतो. मोदींच्या विवाहावरून उठलेल्या वादळाला फोडणी देण्यासाठी लेखिकेने पुराणातले आणि इतिहासातले बरेच दाखले देऊन आजही विशेषत: आपल्याकडची स्त्रीविषयक मानसिकता कशी बदललेली नाही हे दाखविण्याचा हा प्रयत्न वाटतो.
अगदी नजीकच्या काळापर्यंत स्त्रिया स्वावलंबी नव्हत्या आणि त्यामुळे पुरुषी वर्चस्वाखाली स्त्रियांना एखाद्या वस्तूप्रमाणे वापरल्याचे दिसते, हे खरेच आहे; परंतु कित्येक वेळा विवाहावेळी दोघांचे स्वभाव एकमेकांना पूरक आहेत वा नाही हे कळत नाही हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. डॉ. श्वइट्झर यांच्या ध्येयासक्तीमुळे त्यांच्या पत्नीला विभक्त व्हायची वेळ आली होती. अब्राहम लिंकन यांना समजून घेणे त्यांच्या पत्नीला शक्य होत नसे आणि लिंकन यांनाही तिच्या आडमुठय़ा स्वभावाचा पुष्कळ त्रास सहन करावा लागला. अलीकडचे उदाहरण म्हणजे ताराबाई मोडकांच्या ध्येयासक्त स्वभावामुळे त्यांच्याही वैवाहिक जीवनात आलेल्या अडसराचे देता येईल-तेव्हा अशा विस्कटलेल्या नात्यांना अमुक एका स्त्रीला किंवा पुरुषाला जबाबदार धरता येणार नाही. अर्थात व्यसने, मारहाण, किंवा बाहेरख्यालीपणा इ. दुर्गुणांमुळे झालेल्या विवाह विच्छेदनाची जबाबदारी मात्र निश्चितच त्या दुर्गुणी व्यक्तीची असते. त्यामुळे नीरजा यांचा लेख एककल्ली विचारसरणीचा वाटतो.
-राजीव मुळ्ये, दादर

न सुटणारे कोडे
नीरजा यांचा अप्रतिम लेख वाचण्यात आला. हे न सुटणारे कोडे आहे ते सोडवायचे झाल्यास मनाचे पूर्ण समाधान होईल, असे उत्तर मिळत नाही एवढे मात्र खरे. मानवाला शिक्षणाचा शोध लागला नसता तर तो कसा जगला असता? मानवाव्यतिरिक्त इतर जिवांच्या बाबतीत आपण हा विचार करू शकू का? केल्यास त्याचे कोणते उत्तर मिळेल? हे उत्तर लेखात नमूद केलेल्या परिस्थितीचे असू शकेल का? स्त्री-पुरुष संबंध जोडल्यानेच हे प्रश्न निर्माण झाले असतील तर संबंध हवेतच कशाला?
– अरविंद रामचंद्र

त्यांच्यासाठी पत्नी देशकार्यातील अडथळा नव्हती?
लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सरदार पटेल आदी अनेक नेत्यांना, स्वातंत्र्य संग्रामातील छळ सहन करत तुरुंगवास भोगणाऱ्या, हसतमुखाने फासावर जाणाऱ्या अनेकांना, पत्नी हा देशकार्यातील मोठा अडथळा वाटली नाही. तरीही त्यांच्या हातून महान देशकार्यच घडले! मग यांचाच विचार असा ब्रेन वॉश केल्याप्रमाणे का? घटस्फोटपण नाही? विवाह मान्य नाही तर पुरुषाला मोकळीक, पण स्त्रीला कुंकवाची गुलामी का? तिच्या मताला शून्य किंमत? ‘तुम मेरी नही तो किसी और की भी नही?’  हे हिंदी सिनेमातल्याप्रमाणे नाही शोभत प्रत्यक्षात. लेख आवडला.
-आर. जे.

आजही मी पुराणकालीनच
नीरजा यांचा लेख म्हणजे सर्वसमावेशक विचार असलेला अभ्यासपूर्ण लेख. पुरुष म्हणून आजही मी पुराणकालीन पुरुषांसारखाच आहे ही जाणीव करून देणारा लेख. पुरुषप्रधान संस्कृतीचा लाभ घेताना पद्धतशीरपणे मी स्त्रीला गृहीत धरतो हे मला समजावणारा लेख.
– योगेश माळी