‘मुलीचे स्वागत करा’ या विचाराची दुसरी बाजू अपरिहार्यपणे ‘मुलगा नकोच’ किंवा ‘मुलगा व्हावा अशी इच्छासुद्धा करू नका’ अशी असल्याचा गरसमज काहींचा झाला आहे. आपल्याला मुलगा नाही या नैराश्यातून आलेली ही प्रवृत्ती वाढीस लागते आहे. एका मुलीच्या आई तर म्हणाल्या, ‘‘मी तर देवाचे आभार मानते मला मुलगा नाही म्हणून. हल्ली मुलगे करतात बायकोची आणि तिच्या आईची ताबेदारी. आई-वडिलांना विचारत नाहीत. सुना आणि त्यांच्या आया आपल्या घरावर असं वर्चस्व गाजवतात की आपल्या घरात आपणच पाहुण्या होतो. हवेत कशाला मुलगे?’’
त्यांनी दिलेली दूषणे त्यांना स्वत:लासुद्धा लागू होतात हे त्या विसरल्या. ज्या घरात पहिली मुलगी आहे, तिथे दुसऱ्या बाळाची चाहूल लागली की घरातली माणसे वैतागून जातात. एका प्रश्नाने- काय या वेळी मुलगा का? (हा प्रश्न इतक्या विविध पद्धतीने विचारला जातो की, त्यावर एक वेगळा संशोधन निबंध व्हायला हरकत नाही.) आपल्या हाती काही नसतं, हे अशिक्षित माणसांनासुद्धा कळतं आजकाल, पण तरी विचारतात. मुलगी होण्यात काही वाईट नाही म्हणजे मुलगा व्हावा अशी इच्छासुद्धा करायची नाही असे कुठे लिहिलेय? पहिल्या नातीनंतर नातू झाला तेव्हा ‘काय अगदी खूश असाल ना आता? नातू झालाय!’ या प्रतिक्रियेने कंटाळून मी एका बाईंना सरळ विचारलं, ‘तुमच्याकडे दुखवटा पाळतात का मुलगा झाल्यावर?’ मी अर्थातच टीकेचा विषय ठरले. मुलगी झाली तर? या प्रश्नाला तर उगाचंच गíभत धमकीचाच वास येतो.
मुलगा झाल्यावर ‘जितं मया’ अशी प्रतिक्रिया देणं आणि मुलगी झाल्यावर सर्वस्व बुडाल्यासारखं दु:ख करणं वा वर उल्लेख केलेल्या दुसऱ्या टोकाच्या मुलगाविरोधी प्रतिक्रिया देणे याव्यतिरिक्त साधी सरळ इच्छा किंवा निखळ आनंद या भावनासुद्धा माणसाच्या मनात असतात? मुलगा व्हावा अशी इच्छा करून मुलगी झाली तरी तिच्यावर तेवढंच प्रेम करणारी माणसं आहेत, हे नाकारायचं, हेसुद्धा चांगलं नाही.
-राधा मराठे, ई-मेलवरून
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा