‘चतुरंग मैफल’मधील ‘स्वराधीन होताना’ (१९ ऑक्टोबर) हा सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्यावरील लेख मनाला अतिशय भावला. जोग हे हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळाचे महत्त्वाचे साक्षीदार आहेतच, पण आजही संगीत क्षेत्रात तेवढय़ाच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांच्या ‘गाणारे व्हायोलिन’ या कार्यक्रमाने आणि ध्वनिफितीने हजारो रसिकांची मने रिझवली आहेत. संगीत क्षेत्रातल्या कामगिरी प्रमाणेच जोगांचे ‘स्वर आले जुळुनी’ हे आत्मचरित्र अतिशय वाचनीय आहे. केवळ मराठीतल्याच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतील देखील नामवंत संगीतकारांनी विविध चित्रपटांत त्यांची व्हायोलिनची साथ घेतलेली आहे. गीतरामायणाच्या रचनेत बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांचे सहाय्यक या नात्याने जोगांचे देखील अमूल्य योगदान आहे. अशा या मोठय़ा आणि तेवढय़ाच शालीन कलाकाराची चतुरंग मैफलसुद्धा उत्तम सजली.
– अॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण.
आठवणी जाग्या झाल्या
‘प्रत्यक्ष जगताना’ या सदरामधील ‘पुनर्वसनाचा नीहार’ या लेखातील (१२ ऑक्टोबर) सुनीता जोगळेकर यांचे अनुभव वाचून ‘नीहार’ हे घरकुल (वसतिगृह) संचालित करणाऱ्या ‘वंचित विकास’ या सेवाभावी संस्थेचा अगदी सामान्य कार्यकर्ता असलेल्या माझे मन भरून आले!
आज ‘नीहार’मधून ६७ मुलामुलींचे यशस्वी पुनर्वसन झाले असून ३९ मुली लग्न करून सुखाचा संसार करताहेत, हे वाचून कोणाही सहृदय व्यक्तीची अशीच अवस्था झाल्यावाचून राहणार नाही.
इथे कविवर्य कुसुमाग्रजांची कविता आठवते, ‘साऱ्याच कळय़ांना हक्क आहे, फूल म्हणून जगण्याचा!’ यानिमित्ताने आठवण झाली, ती सलग तीन वर्षे यशस्वीरीत्या सुरू असलेल्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमामधील पहिल्या वर्षीच्या (२०११) अकरा संस्थांमध्ये ‘वंचित विकास’ संस्थेचा अंतर्भाव होता त्याची! त्या वेळेस दानशूर-उदार वाचकांनी भरभरून आर्थिक सहाय्य केले. उपक्रमाच्या समारोप समारंभात संस्था प्रतिनिधी या नात्याने मदतीचे धनादेश स्वीकारण्याचे भाग्य लाभले. हा माझा सन्मान समजतो.
– बाळकृष्ण भागवत, बोरिवली.
चित्रकाराने घडविला साक्षात्कार
‘चतुरंग मैफल’मध्ये वासुदेव कामत यांनी ‘कुंचल्यातून साक्षात्कार’ (१२ऑक्टोबर) या लेखात त्यांच्या चित्रामागील आध्यात्मिक अनुभूतीचे केलेले वर्णन खूप भावले. निळय़ा रंगातील भगवान कृष्णाची पावले आणि त्यापुढे विनम्र झालेला छोटासा अर्जुन बारकाइने पाहिल्यावर मीही कामतांपुढे नतमस्तक झालो. कुंचल्याच्या भाषेचा अर्थ उलगडून सांगणारी त्यांची भाषाही तितकीच दाद देण्याजोगी आहे. चित्रकाराला चित्रातून व्यक्त होता येते, पण चित्रकार भाषेतूनही त्या चित्राला अजून जास्त उंचीवर नेऊन ठेवू शकतो याची प्रचीती त्यांच्या लेखातून आली. विचारांना आणि चित्रांना आध्यात्मिक रंग कसा चढतो हे त्या विषयाशी एकरूप झाल्यावर जसे कामतांना कळाले ते त्यांनी आम्हा वाचकांना शब्दातून समर्पकपणे सांगितले आहे. राजा रविवर्मा यांची चित्रे पाहून आनंद तर वाटतोच तथापि त्यातील बारकावे समजल्यावर तो झालेला आनंद दुसऱ्यालाही सांगावा असे वाटते, पण शब्द अपुरे पडतात. हे बारकावे शब्दबद्ध करण्यात कामत यशस्वी झाले आहेत एवढे खरे!
– मोहन ठेकेदार, पुणे.
स्त्रीने सबला व्हायला हवे!
‘र्निवश बलात्काराच्या राक्षसाचा’ (१४ सप्टेंबर) या छाया दातार यांच्या लेखातून बलात्काराबाबत कायदा काय सांगतो व त्याबाबत स्त्रीला काय माहिती असणे आवश्यक आहे याबाबत मुद्देसूद; परंतु सविस्तर विवेचन केले आहे. या कायद्याचा आधार स्त्रीला तिच्यावर दुर्दैवी प्रसंग ओढवला तर घेता येतो. औषधशास्त्रात स्र्१ी५ील्ल३्र५ी (रोगाला प्रतिबंध करणारी) आणि उ४१ं३्र५ी (रोग निवारण करणारी) अशा प्रकारची औषधे असतात. बलात्काराबाबत कायदा हा दुसऱ्या प्रकारात मोडतो असे म्हणावे लागेल; परंतु बलात्कारापासून रोखण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येऊ शकतात हे महत्त्वाचे. प्रथमत: स्त्रीने तिच्या नावाला चिकटवलेला ‘अबला’ हा शब्द फेकून देण्यासाठी मानसिक, शारीरिक, शैक्षणिक दृष्टीने सक्षम व्हायला हवे. या दुर्दैवी प्रसंगास ठामपणे प्रतिकार करायचा निर्धार करायला हवा. ती मानसिकरीत्या सक्षम व जागरूक असेल तर बलात्कारी तिच्या हातालाही स्पर्श करू शकणार नाहीत, असा तिखट कटाक्ष तिने द्यायला हवा.
– सुधीर देशपांडे, विलेपार्ले (मुंबई).
सासू-सासऱ्यांत मोकळेपणा हवा!
‘त्याचं तिचं लाईफ’ या सदरातील गौरी कानिटकर दोन्ही लेख ( ७ सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर ) वाचनीय व मननीय आहेत. या नात्यावर एवढा खोल विचार कोणीच करीत नाही. सासू म्हणजे छत्तीसचा आकडा एवढेच काय ते सुनेच्या मनावर बिंबवलेले असते. या नात्यात सुसंवाद घरातल्या सासू-सासरेमंडळीकडून सुरू होणं सोयीस्कर असल्या पाहिजे. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधूनच हे प्रतिबिंब अधिकाधिक ठळक बनते. सध्याच्या मुलांना शिकलेली नवीन विचारांची पत्नी हवी असते. तर सासूला आपल्या सकट सर्वघराची जबाबदारी घेणारी सून हवी असते. सुनेची स्वत:ला काही स्वप्नं असतील तिचीसुद्धा काही तरी ध्येयं असतील. सासू-सासर- सून ही जनरेशन गॅप कधीच कमी होणार नाही का? ही नाती पारंपरिक विळा-भोपळ्याच्या नात्यासारखीच राहतील का ? जोपर्यंत सासू-सासरे-सून या नात्यात मोकळेपणा येत नाही. तोपर्यंत या पर्यायाचा विचार करण्यात काहीच गैर नाही.
– ज्योती घेवडे, पुणे.
दर्जेदार पुरवणी
२० ऑक्टोबरची संपूर्ण चतुरंग पुरवणी वाचली. या अंकातील प्रत्येक सदर वाचनीय आहे. सुप्रिया देवस्थळी यांचे ‘तडे गेलेले ग्लास सिलिंग’, वंदना धर्माधिकारी यांचे ‘बँकिंग क्षेत्रातील स्त्रीशक्ती’, अमृता सुभाषचे ‘श्रीमंत’, डॉ. वर्षां दंडवते यांचे ‘कोण होतीस तू?’ आणि डॉ. श्रृती पानसे यांचे ‘भावना प्रज्ञ’ हे लेख फारच उल्लेखनीय होते.
ज्या स्त्रियांनी उदा. अरुंधती भट्टाचार्य, चंदा कोचर, शुभलक्ष्मी पानसे, शिखा शर्मा, विजयालक्ष्मी अय्यर यांनी अथक परिश्रम करून ते साध्य केले व ग्लास सिलिंगला तडाच नाही तर सिलिंग तोडून त्या बाहेर पडल्या. त्यांची बुद्धिमत्ता तर वरच्या दर्जाची आहेच, पण प्रयत्नही खूप आहेत. फार कौतुक करावेसे वाटते.
डॉ. वर्षां दंडवते यांच्या ‘कोण होतीस तू?’ लेखातील अनुभव तर माझ्या दररोजच्या जनरल प्रॅक्टीसमध्ये अनुभवले आहे. वासंती वर्तक यांचा ‘पाच पिढय़ांची परंपरा’ हे सदर वाचून मात्र मनाची उदासीनता गेली. पं. रमाबाई रानडे यांनी स्त्री शिक्षणाची पेरणी केली व त्याच्या पाचही पिढय़ांनी ती जोपासलीच नाही तर ती वृद्धिंगत केली. पाचही पिढय़ा डबल, ट्रिपल, ग्रॅज्युएट आहेतच, पण पणजीचे गुण अंगात बाणवणाऱ्या डॉ. वसुधा आपटे यांचे कौतुक वाटते.
– अपर्णा वाळिंबे, पनवेल.
मातृभाषा धोक्यात
१२ ऑक्टोबरच्या अंकातील ‘मुलांचा कट्टा’ या सदरातील सध्याच्या शैक्षणिक समस्याबाबत पालकांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन इतर समस्याचे शासन व शिक्षण संस्था यांना विचारात घेऊन विवरण केले आहे त्याबाबत श्रीमती अनुराधा गोरे यांना धन्यवाद.
पालकांमध्ये इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमांबाबत मोठे आकर्षण निर्माण झाले. म्हणून आज प्लेग्रुप पासून मुलांच्या शिक्षणाची सुरुवात मोठय़ा प्रमाणात होत आहे. आजपर्यंत मराठी माध्यमांतून शिक्षण घेऊन देदिप्य यश मिळवले त्याचा विसर होत आहे. चीन, कोरिया, जपान वगैरे देशांनी आपली मातृभाषा जिवंत ठेवून देशांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रगत बनविले.
शहरी भागात सेमी इंग्रजी, इंग्रजी माध्यम शाळांची वाढ होत आहे. इंग्रजी माध्यमाबरोबर पोशाखात बदल होत आहे. घरातील आई बाबा, आजी आजोबा इत्यादी कुटुंबातील सुसंवादी शब्द लोप पावतात अशा संस्कारामध्ये सुद्धा होणारे बदल हे भाषा व समाज यांना धोकादायक आहेत. याची पालक, शिक्षण संस्था व शासनाने गंभीर दखल घेणे हाच ‘चतुरंग’मधील लेखाचा निष्कर्ष आहे.
– सुरबा देसाई, मुंबई
वाचनीय लेख
‘सारे काही पालकांच्या हाती’ (१२ ऑक्टोबर) हा अनुराधा गोरे यांचा लेख वाचनीय व अनुबोधक आहे. मराठी माध्यमाच्या महानगरपालिकेच्या शाळांना उतरती कळा लागण्यास खरोखर आपणच जबाबदार आहोत. आज अनेक शास्त्रज्ञ, क्रीडापटू, लेखक, उच्चविभूषित पदावर पदस्थ असलेले मराठी माध्यमांतून शिक्षण घेऊन आपला उच्चांक टिकवून ठेवला. त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत.
आम्ही लहान असताना (साधारण १९५०चा काळ) त्यावेळी सक्तीने १ ली ते ७ वी महानगरपालिकेच्या शाळेतच शिक्षण व्हायचे. महानगरपालिकेची शाळा सोडल्याचा (७ वीपास) दाखला दाखविल्याशिवाय खासगी शाळेत प्रवेश मिळत नसे. हा सर्वाना नियम होता.
शिक्षक व शिक्षिकासुद्धा वर्गात ३० मुले असली तरी सर्वावरती लक्ष ठेवून मनापासून शिकवीत असत. घरीसुद्धा आई-बाबा शिकलेले नसले तरी मुलांचा परवचा, पाढे व इतर वाचन स्वत: करून घेत असत. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या तारखेला शाळेतील शिक्षकांचा गट घरोघर भेटी देऊन मुलांची प्रगती व वागणूक याबद्दल पालकांशी चर्चा करत. त्यामुळे पालकही समाधानी होते.
स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली यासुद्धा उत्साहात पार पडत. क्लासचीसुद्धा ज्यांना अत्यंत गरज आहे, त्यांना अतिअल्प शुल्काच्या मोबदल्यात ठरावीक विषय क्लासमध्ये शिकवले जात असे.
आज एक किंवा दोन मुले असूनसुद्धा पालकांना त्यांच्या व्यवसायामुळे किंवा अर्थार्जनामुळे मुलाकडे लक्ष देण्यास वेळच नाही. सर्व मुलांना इंग्रजी माध्यमात घातले जाते. तळागाळातील पालक सध्या मुलांना आर्थिक परिस्थिती नसूनसुद्धा इंग्रजी शाळेत घालतात. त्यामुळे मुलांना काय शिकतो हेच कळत नाही. बालवाडीपासूनच क्लासला घालून त्यांचे जीवन बदलून टाकतात. ज्या संस्कारांचे धडे आईवडिलांकडून मिळायला हवेत, ते मिळत नाही. त्यामुळे परिस्थिती बिकट होते.
त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याशी वेळात वेळ काढून संवाद साधला पाहिजे. योग्य वेळेला मार्गदर्शन केले पाहिजे. कारण हीच मुले उद्या येणारा भविष्यकाळ उज्ज्वल करतील व इतर मुलांचे मार्गदर्शक ठरतील.
– विजया भट, बोरिवली (पूर्व).
मन चिंती ते..
२६ ऑक्टोबर पुरवणीतील ‘ब्लॉग माझा’ सदरातील ‘आत्या’ हे सरळसाधे व्यक्तिचित्र मनाला विशेष भावले. विशेषत: पोलिसांना त्रास होऊ नये म्हणून सोनसाखळी चोराची तक्रार करायची नाही ही संकल्पना. यातील व्यावहारिक शहाणपणाचा भाग बाजूला ठेवला तरी मनाच्या या निरागसतेचे मूळ बालपणातच दडलेले असावे काय? हा प्रश्न पडण्याचे कारण नुकत्याच आलेल्या अनुभवात असावे. काही दिवसांपूर्वी मी पुण्याला मुलीकडे गेले होते. एक दिवस आम्ही दोघीही बाहेर गेलो होतो. १२-१३ वर्षांची माझी नात एकटीच घरी होती. त्यावेळी सिलिंडर घेऊन गॅस कंपनीचा माणूस आला. तिने दार उघडून त्याला पैसे देऊन सिलिंडर बदलून घेतले. घरी आल्यावर हे कळले तेव्हा क्षणभर आमच्या छातीत धस्स झालं. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ तिला समजावून, पण निक्षून सांगितले तेव्हा तिने निरागसपणे विचारले, ‘अगं आई, तो बिचारा तीन जिने चढून सिलिंडरचे ओझे घेऊन आला, लिफ्टने आला म्हणून काय झाले, त्याला पुन्हा येण्याचा त्रास कशाला गं द्यायचा?’ आता बोला.
भारती महाजन-रायबागकर, नाशिक
‘जोगांची मैफल उत्तम सजली’
‘चतुरंग मैफल’मधील ‘स्वराधीन होताना’ (१९ ऑक्टोबर) हा सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांच्यावरील लेख मनाला अतिशय भावला.
First published on: 23-11-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response